|| गौरी प्रधान

बाहेर छान पाऊस पडत आहे आणि आपल्या हातात छान वाफाळत्या कॉफीचा मग व  त्यासोबत गरमागरम कांदाभजीची बशी.. असा पाऊस कोणाला नाही आवडणार? पण गरमागरम कांदाभजी आणि पावसाचे नाते जितके दृढ तितकेच किंवा त्यापेक्षा थोडे जास्तच पावसाळी वातावरण आणि फुगून तट्ट झालेल्या दरवाजांचं नातं जास्त घट्ट.

दरवर्षी पावसाळा आला म्हणजे एकदा तरी घरी सुताराला बोलावणे होतेच. मग हवेतील बाष्प शोषून तट्ट झालेल्या दाराला तो कसबीपणे रंधा मारून सैल करतो. परंतु वर्षांनुवर्ष दर पावसळ्यात असा रंधा मारल्यानंतर तयार होणाऱ्या फटी पावसाळा संपला की डोळ्यात खुपू लागतात. पाहा विषय कुठून कुठे गेला नाही?

पावसाळा म्हटला की थोडय़ाफार फरकाने लाकडी वस्तूंवर त्याचा परिणाम होतोच, पण थोडी काळजी घेतल्यास होणाऱ्या परिणामांची तीव्रता मात्र कमी करता येऊ शकते.

सुरुवात दरवाजाने झालीच आहे तर दरवाजाबद्दलच आधी बोलू. बरेचदा घराचा मुख दरवाजा हा लाकडाचा बनवलेला असतो. तर हे लाकूड निवडताना पक्के केलेले लाकूडच निवडावे, इंग्रजीत त्याला म्हणतात तसे. लाकूड पक्के करताना त्याला ऊन, वारा व पावसात ठेवले जाते, जेणेकरून त्याच्या आकुंचन-प्रसरण पावण्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ते कोणत्याही हवामानात तग धरण्यास तयार होते. ही प्रक्रिया शक्यतो जुन्या लाकडात पूर्ण झालेली असते. त्यामुळेच दरवाजासाठी किंवा इतरही काही फर्निचरसाठी जुने लाकूड सर्वोत्तम.

लाकूड कोणते वापरायचे हे तर ठरले, पण एवढेच करून भागणार नाही तर त्याला व्यवस्थित पॉलिश किंवा पेंटदेखील नियमितपणे करावे लागेल, तरच ते कमी बाष्प शोषून घेईल.

दरवाजानंतर आता घरातील इतर फर्निचरविषयी बोलूयात. जर ते लाकडात बनवलेले असेल तर वेळोवेळी पेंटिंग, पॉलिशिंग, इ. गोष्टी त्यालाही दरवाजाप्रमाणेच लागू होतात. शिवाय खिडकीतून जिथून थेट पावसाचे पाणी आत येऊ शकते अशा जागेपासून आपले फर्निचर थोडे लांबच ठेवावे, खेरीज हलवण्याजोगी कपाटे अथवा पलंग असल्यास त्यांना शक्यतो ओल येत असणाऱ्या भिंतीपासून थोडे पुढे ओढून ठेवावे म्हणजे तिथल्या ओलीचा फर्निचरवर परिणाम होणार नाही.

पावसाळ्यात फर्निचरची स्वच्छता हाही एक फर्निचरला खराब होण्यापासून वाचवण्याचा मार्ग आहे बरं. फर्निचर जितके स्वच्छ आणि कोरडे ठेवता येईल असे पाहावे. ते पुसतानादेखील ओल्या कपडय़ापेक्षा सुक्या सुती कापडाचा वापर करावा. पेंट किंवा पॉलिश खराब नाही नं झालेले हेही तपासून पाहावे व वेळेत त्याची डागडुजी करून घ्यावी. फर्निचर जर लॅमिनेट लावलेले असेल तर मात्र ते तयार करून घेतानाच त्याच्या कडांवर व्यवस्थित लॅमिनेट लावले गेले आहे याची खात्री करूनच घ्यावी. अन्यथा त्याची दुरुस्ती अथवा डागडुजी करणे जवळजवळ अशक्य.

फर्निचर बनवताना जशी मुळातून काळजी घेणे आवश्यक तसेच काही अगदी साधे सोपे उपाय करूनदेखील ऋ तुमानानुसार काळजी घेता येतेच. आपल्याकडे फार जुन्या काळापासून कापूर किंवा फिनेलच्या (डांबराच्या) गोळ्या कपाटाच्या कानाकोपऱ्यात ठेवण्याची पद्धत आहे. या गोळ्या अतिरिक्त बाष्प शोषून घेतात आणि कपाटाला बुरशी वगैरे लागण्यापासून वाचवतात.

परंतु संपूर्णपणे कापडाने आच्छादलेले सोफे किंवा खुच्र्या यांचं काय? त्यावर तर आपण या गोळ्या पसरून नाही ठेवू शकत. खेरीज कापडाचा वापर असल्याने सर्वात जास्त दमटपणा याच प्रकारच्या फर्निचरमध्ये अधिक शोषला जातो. प्रश्न तर मोठा गंभीर आहे. शिवाय वरील सर्व उपायांनीदेखील हवेतील दमटपणाची समस्या काही सोडवली जातच नाही.

जर हवेतीलच बाष्पाचे प्रमाण कमी करता आले तर या समस्येच्या मुळावरच घाव घालता येईल. अशावेळी आपल्या मदतीला येते आधुनिक विज्ञान. मी नेहमीच म्हणते ‘आपली पिढी भाग्यवान आहे’ कारण आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आधुनिक विज्ञानाकडे आहेत.

कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीतही असेल, बाजारात डी-ह्य़ुमिडीफायर नावाचे यंत्र मिळते ज्याचे कार्य थोडेफार एअर कंडिशनरप्रमाणे चालते. यात खोलीतील दमट हवा शोषून घेतली जाते आणि त्यातील पाण्याचा अंश काढून घेऊन कोरडी झालेली हवा पुन्हा खोलीत सोडली जाते. त्यामुळे खोलीतील दमटपणा कमी होण्यास मदत होते.

आता मला खात्री आहे माझे वाचक मित्र नक्की पावसाळ्याशी दोन हात करून त्यांच्या फर्निचरचे रक्षण करायला तयार असतील. आणि मी तयार आहे वाफाळत्या कॉफीचा आणि गरमागरम कांदाभजीचा आस्वाद घ्यायला!

(इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com