20 February 2019

News Flash

दिवाळखोरी कायद्यात सुधारणा ग्राहकास धनकोचा दर्जा

दिवाळखोरी ही कोणत्याही व्यवसायाकरता नीचतम अवस्था असते

|| अ‍ॅड. तन्मय केतकर

दिवाळखोरी ही कोणत्याही व्यवसायाकरता नीचतम अवस्था असते, जेव्हा आर्थिक नुकसान किंवा दूरवस्थेमुळे एखादा व्यवसाय पुनरुज्जीवित करणे अशक्य ठरते तेव्हा व्यवसायाची दिवाळखोरी जाहीर करण्यात येते. कोणत्याही व्यवसायाची अशी दिवाळखोरी जाहीर होणे हे त्या व्यवसायात हितसंबंध असलेल्या व्यक्ती आणि संस्थांकरतादेखील नुकसानदायक ठरत असते. दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर व्यवसायाकडे असलेली मालमत्ता त्या व्यवसायाची देणी देण्याकरता वापरण्यात येते. त्याकरता त्या व्यवसायाच्या मालमत्तेची विक्री आणि लिलाव करण्यात येतो आणि त्याद्वारे आलेल्या पैशातून व्यवसायाची देणी दिली जातात. या पैशातून कोणाची देणी देता येतील याबाबत दिवाळखोरी कायद्यात विशिष्ट कायदेशीर तरतुदी आणि प्राधान्यक्रम आहेत आणि त्यानुसारच सर्व धनकोंची (क्रेडिटर) देणी दिली जातात. एखादा धनको (क्रेडिटर) व्यवसायात गुंतवणूक करूनदेखील जर त्या देय प्राधान्यकमात नसेल तर त्याच्या देण्यांना प्राधान्यक्रम मिळत नाही.

रेराअगोदरच्या काळात प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाच्या किंवा भरीव प्रगतीच्या अगोदरच नोंदणी (बुकिंग) स्वीकारली जात होती, ग्राहकांकडून बुकिंग आणि नंतर बांधकामाच्या प्रगतीच्या प्रमाणात पैसे स्वीकारण्यात येत होते. बांधकाम व्यवसायाची ही रीत बघता, बांधकाम प्रकल्प आणि व्यवसाय हे ग्राहकांच्याच पैशातून चालत होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जोपर्यंत जागेचा ताबा मिळत नाही तोवर सर्व ग्राहक हे एकप्रकारे बांधकाम व्यवसायाचे धनकोच (क्रेडिटर) होते. मात्र असे असूनही या ग्राहकांना दिवाळखोरी कायद्यात कोणताही स्वतंत्र आणि विशिष्ट दर्जा आणि प्राधान्यक्रम नव्हता. परिणामी एखाद्या बांधकाम व्यवसायाने किंवा व्यावसायिकाने दिवाळखोरी जाहीर केल्यास, त्याचा ग्राहकांना काहीही फायदा होत नव्हता. दिवाळखोरी कायद्यात स्थान नसल्याने ग्राहक या दिवाळखोरीच्या कारवाईत सहभागी होणेदेखील अशक्य होते. परिणामी दिवाळखोरी जाहीर झाल्यास इतर धनकोंना त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे त्यांची देणी दिली जात होते आणि ग्राहकाच्या हातात काहीच येत नव्हते.

आपल्या देशातील बांधकाम व्यवसायाची व्याप्ती आणि बांधकाम व्यवसायाच्या ग्राहकांची मोठी संख्या लक्षात घेता, या ग्राहकांना दिवाळखोरी कायद्याच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता लक्षात घेऊनच या कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे.  ६ जून २०१८ रोजी आपल्या राष्ट्रपतींनी दिवाळखोरी कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर सही केली आणि सुधारित दिवाळखोरी कायदा देशभरात लागू झाला आहे. या अध्यादेशानुसार मूळ कायदा कलम ५(८) मधील आर्थिक कर्ज या संज्ञेच्या व्याख्येत दुरुस्ती करण्यात आलेली असून, बांधकाम प्रकल्पातील (रिअल इस्टेट प्रोजेक्ट) ग्राहकाकडून (अलॉटी) घेतलेल्या पैशांचादेखील या आर्थिक कर्जाच्या संज्ञेत सामावेश करण्यात आलेला आहे. या सुधारित संज्ञेतील बांधकाम प्रकल्प आणि ग्राहक या संज्ञांकरता रेरा कायद्यातील संज्ञांच्या व्याख्या लागू होणार असल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. बांधकाम व्यवसायाच्या ग्राहकांकरता कायद्यातील ही सुधारणा अत्यंत महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी आहे.

यापूर्वी एखादा बांधकाम प्रकल्प रखडल्यास किंवा व्यवसायात नुकसान होत असल्यास, दिवाळखोरी जाहीर केल्यास, प्रकल्पातील ग्राहकांना दिवाळखोरी कायद्यात काहीही स्थान नसल्याने, त्या प्रकल्पाच्या किंवा व्यवसायाच्या ग्राहकांच्या आर्थिक दाव्यांपासून आपोआपच सुटका मिळणे शक्य होते. अशा परिस्थितीत त्या प्रकल्पाच्या आणि व्यवसायाच्या ग्राहकांना झालेले नुकसान भरून काढणे कठीण आणि काही अंशी अशक्यप्राय ठरत होते.

दिवाळखोरी जाहीर करून ग्राहकांच्या आर्थिक दाव्यांपासून सुटका करून घेण्याचा मार्ग या नवीन सुधारणेमुळे कायमचा बंद झालेला आहे. यापुढे आता दिवाळखोरी जाहीर केली तरीदेखील त्या दिवाळखोरीच्या कारवाईतदेखील सामील होण्याचा आणि आपली आर्थिक देणी वसूल करण्याचा मार्ग ग्राहकांकरता मोकळा झालेला आहे. सध्या दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर उभे असलेल्या किंवा दिवाळखोरी जाहीर करण्याच्या प्रयत्न असलेल्या काही विकासकांच्या उदाहरणांच्या पाश्र्वभूमीवर ही नवीन सुधारणा निश्चितच ग्राहकोपयोगी आहे. रखडलेल्या किंवा बंद पडलेल्या किंवा लवकरच बंद पडण्याची शक्यता असलेल्या प्रकल्पांच्या ग्राहकांकरता या सुधारणेचा फायदा होणार आहे, मात्र त्याकरता अशा सर्व ग्राहकांनी दिवळखोरी कायद्यातील प्रक्रियेबाबत अधिकाधिक जाणून घेणे आणि दिवाळखोरी जाहीर झाल्यास त्वरित कारवाई सुरू करणे आवश्यक आहे.

tanmayketkar@gmail.com

First Published on July 7, 2018 3:46 am

Web Title: loksatta vasturang marathi articles 18