|| डॉ. मिलिंद पराडकर

बहामनी साम्राज्यातून फुटून निघालेला त्यांचा सुभेदार अहमदशहा बहिरी याने इ. स. १४९०च्या सुमारास अहमदनगर शहराची स्थापना केली व निजामशाहीची  मुहूर्तमेढ रोवली. याच घराण्यातला तिसरा राजा हुसेन निजामशहा याच्यावर विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंडय़ाचा कुतूबशहा अन् विजयनगरचा रामराजा यांनी संयुक्तपणे आक्रमण करून त्यास पार पठणपावेतो पळवून लावले. या लढाईनंतर हुसेन निजामशहास रामराजाशी अतिशय जाचक अन् अपमानास्पद अटींवर तह करावा लागला. यातून योग्य तो बोध घेत हुसेन निजामशहाने इ. स. १५५३ ते १५६५च्या दरम्यान अहमदनगरच्या या दुर्गाची निर्मिती केली. पुढे १६३६ मध्ये शहाजहानने हे राज्य पाडाव करेपर्यंत- अर्थात मधली काही पळापळीची वष्रे सोडली तर- हा दुर्ग निजामशाहीची राजधानी म्हणून प्रसिद्ध होता.

Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू
statue of Gond raje Bakt Buland Shah the founder of Nagpur city is Neglected by government
नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!
Development of six villages
बीकेसीच्या धर्तीवर मढ, मार्वेसह सहा गावांचा विकास लांबणीवर?

अहमदनगर शहराच्या पश्चिमेला असलेला मलभर घेराचा हा दुर्ग भूदुर्ग या प्रकारात मोडतो. दीर्घ वर्तुळाकार आकाराचा हा दुर्ग चारही बाजूंनी ९० ते १८० फूट रुंदीच्या व १४  ते २० फुटांपर्यंत खोलीच्या खंदकाने वेढलेला आहे. तटबंदीला तोफांच्या माऱ्याने नुकसान होऊ नये म्हणून चहुबाजूंनी मातीचे ढिगारे रचलेले आहेत. हे या दुर्गाचे एक आगळेवेगळे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. ओढून घेता येण्याजोग्या खंदकावरील पुलावरून दुर्गात प्रवेश करण्यासाठी एका भल्यामोठय़ा बुरुजाला उजवीकडून वळसा घालीत काटकोनात आत शिरावे लागते. हे पहिले द्वार. आत शिरताच समोर अन् उजवीकडे पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत अन् पुन्हा काटकोनात डावीकडे वळायला लावणारे दुसरे द्वार आहे. त्यातून आत शिरले की तटबंदीच्या आत- मुख्य दुर्गात प्रवेश होतो. हे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला तर दुसरी परसदारची वाट पश्चिमेला आहे.

निजामशाहीची बखर (मराठी) यात असा उल्लेख आहे की, या दुर्गाचे बांधकाम निजामशहाने चोवीस अमीरांस वाटून दिले. त्या प्रत्येक अमीराने एक एक बुरूज व मधला तट असे बांधकाम सत्तावीस महिन्यांत पूर्ण केले अन् हा राजधानीचा दुर्ग तयार झाला. विजापूरचा दुर्गही असाच बांधला गेला, असे सिडनी टॉय विजापूरच्या संदर्भात म्हणतात. त्यालाही या उल्लेखामुळे प्रामाण्य प्राप्त होते. ही बहुधा तत्कालीन  रूढ पद्धती असावी अथवा राजाज्ञेची जोर-जबरदस्ती तरी!

या दुर्गात असलेल्या सहा महालांची नोंद इतिहासात आहे. सोनमहाल, गगनमहाल, मीनामहाल, रूपमहाल, बगदादमहाल अन् मुल्क आबाद असे हे सहा महाल अन् इतरही काही इमारती या दुर्गात होत्या. गंगा, यमुना, शक्करबाई अन् मछलीबाई अशा चार विहिरी या दुर्गाची पाण्याची गरज पूर्ण करत होत्या.

मध्ययुगीन इतिहासकार फेरिस्ता याने आपला ‘गुलशने-इ-इब्राहिमी’ या ग्रंथाचा बराचसा भाग या दुर्गात मुक्कामाला असताना लिहिला. तेव्हा त्याने या दुर्गात असलेल्या ग्रंथालयाचा उपयोग केला, असे तो नमूद करतो. तिथे त्याने दुसरा निजाम बुरहाणशहा याने लिहिलेल्या राजधर्मावरचा निबंध पाहिल्याचेही तो नमूद करतो.

या दुर्गाने निजामशाहीची आर्थिक भरभराटसुद्धा पाहिली. निजामशाहीचे इराण, अरबस्तान, पोर्तुगाल यांच्याशी अतिशय उत्तम व्यापारी संबंध होते. इथला व्यापार वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे, व्यापारी मार्गाची उत्तम व इतरत्र न आढळणारी अशी व्यवस्था निजामशाहीत होती. ती म्हणजे, अंतर दाखवणारे मलाचे दगड व चौकात निरनिराळ्या गावांच्या दिशा दर्शवणारे दगड. यामुळे स्थानिक व परदेशी अशा दोन्ही व्यापारीवर्गाची मोठीच सोय झाली अन् त्यामुळे व्यापारालासुद्धा भले उत्तेजन मिळाले. या दुर्गाच्या परिसरात अजून एक नोंद घेण्याजोगी कथा घडली. ‘मुलूख-मदान’ ही जगविख्यात तोफ अहमदनगरच्या दुर्गामध्येच ओतली गेली. रुमीखान (रुम म्हणजे तुर्कस्थान) नावाच्या तुर्की सरदाराने ही ५५ टन वजनाची, चौदा फूट लांबीची अन् चार फूट व्यासाची प्रचंड तोफ इथे निर्माण केली. या तोफेच्या तोंडाला सिंहाकृती आकार दिलेला आहे. सिंहाने तोंडात हत्ती पकडला अशी आकृती तिथे आहे.

एकेकाळी एका बलाढय़ शाहीची राजधानी म्हणून बिरुद मिरविणारा हा दुर्ग मुगलांच्या ताब्यात गेल्यापासून एक तुरुंग म्हणून विख्यात झाला अन् ती त्याची कीर्ती इ.स. १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ापर्यंत कायम राहिली होती!

तेराव्या अन् चौदाव्या शतकात वारंगळच्या राज्यकर्त्यांच्या अखत्यारीत असलेला गोवळकोंडय़ाचा हा दुर्ग चौदाव्या शतकाच्या प्रथमार्धात बहामनी राज्याची जी वाटणी झाली, त्या वाटणीत कुलीखान या पहिल्या कुतूबशहाच्या पदरात पडला. त्याने या दुर्गाला राजधानी म्हणून मुक्रर केले अन् सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात, औरंगजेबाने कुतूबशाहीचा पाडाव करेपर्यंत हा दुर्ग दक्खनच्या एका शाहीची बुलंद राजधानी असा डौल मिरवीत राहिला.

तेराव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात मार्को पोलोने जेव्हा हा दुर्ग व त्याचा परिसर पाहिला, तेव्हा तो याच्या ऐहिक समृद्धीनं चकित झाला. हिऱ्यांच्या व्यापाराचे मोठे केंद्र असे त्याने गोवळकोंडय़ाचे वर्णन केले आहे. जरी हा दुर्ग कुतूबशाहीची राजधानी म्हणून प्रसिद्धी पावला असला, तरी दुर्ग म्हणून याचे अस्तित्व यादव काळापर्यंत मागे नेता येते. मात्र, आज दिसणारे बहुतांशी बांधकाम हे कुतूबशाहीच्या काळात निर्माण केले गेलेले आहे. याच्या फत्ते दरवाजाच्या तटबंदीची रचना व ठेवण थेट विजापूर व चितोड यांच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. याची जास्त जाणीव बाला हिस्सार या बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे बांधकाम पाहून होते.

शहरांभोवती असलेली तटबंदी अन् ३०० फूट उंचीच्या टेकाडावर असलेल्या बालेकिल्ल्याच्या पायथ्यास वेढा घालून असलेली दुहेरी तटबंदी, हे या भूदुर्गाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. दुसरे एक वैशिष्टय़ म्हणजे, ईशान्येच्या दिशेस असलेला नऊ पाकळ्यांचा बुरूज. अगदी याच पद्धतीचा बुरूज उस्मानाबादजवळच्या नळदुर्गात अन् देवगिरीच्या दुर्गातही बांधलेला आहे. नळदुर्ग हा जरी चालुक्यकालीन असला तरी त्याचे दगडी बांधकाम हे बहामनींच्या कार्यकाळात झाले. गोवळकोंडय़ाच्या दुर्गातही बहामनी काळातच बांधकामात भर पडली. या दोन वेगवेगळ्या दुर्गाच्या वैशिष्टय़ांमधले हे साम्य एकच दर्शविते की, हे बांधकाम करणारे शिल्पी वा अभियंते एकच होते. या प्रकारचे अनेक पाकळ्या असलेले बुरूज महाराष्ट्रातील, याखेरीज इतर कोणत्याही दुर्गावर नाहीत, हे विशेष म्हणावे लागेल.

सर्पाकृती प्रवेशमार्ग असलेले आठ धिप्पाड दरवाजे हे या दुर्गाचे भूषण म्हणावे लागेल. पकी मक्का दरवाजा, फत्ते दरवाजा, मोती दरवाजा अन् वंजारी दरवाजा हे दुर्गाचे मुख्य दरवाजे. दरवाजांच्या अन् तटबंदीच्या माथ्यावर असलेल्या जंग्या एकाच छिद्रातून माऱ्याच्या दोन वा तीन दिशा देतात. दरवाजे हे बहुधा आतला व बाहेरचा अशा जोडय़ांच्या स्वरूपात आहेत. बाहेरून दिसू नयेत म्हणून ही द्वारे समोरून अर्धगोलाकार तटबंदीने झाकलेली आहेत व द्वाराचा प्रत्येक हिस्सा या तटबंदीच्या माऱ्याच्या टप्प्यात आहे. बालेकिल्ल्याच्या महाद्वाराची रचना हे या पद्धतीच्या बांधकामाचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे.

या लेखमालेत अगोदर इतरत्र म्हटल्याप्रमाणे या द्वारांवर असलेली मूलत: हिंदू राजचिन्हे, यक्षमुखे वा कीíतमुखे, वा रूपकात्मक शिल्पे ही नक्कीच विचार करायला लावतात, की यांचे मूळ कुठे दडलेले असावे?

शहरात व बालेकिल्ल्यांत पाण्याची उत्तम सोय आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर राजवाडय़ाचे अवशेष, कार्यालयांचे अन् न्यायसभेच्या वा राजसभेच्या इमारतींचे अवशेष आहेत. इतिहासाच्या मूक साक्षीदारांची ती जणू करुणगाथा आहे!

गेल्या लेखात म्हटले त्याप्रमाणे, अगदी शक्य असूनही या परकीय सत्ताधीशांनी सह्य़ाद्रीचा, तिथल्या गर्द अरण्यांचा व दुर्गाचा युद्धशास्त्राच्या दृष्टीने कधीच अभ्यास केला नव्हता असे इतिहासावरून म्हणता येते. बहुधा याचे एक कारण असेही असू शकते की, या परकीय सत्ताधीशांवर इथल्या स्थानिकांकडून आक्रमणे कधी झालीच नाहीत. दुसरे असे की, क्रूर प्रवृत्तीच्या यावनी सत्तांची पाळेमुळे फार खोल गेलेली होती. या सत्तेविषयी लोकांच्या मनी दहशत होती. त्यामुळे आपल्यावर कधी कुणी आक्रमण करेल, आपणास कुणी प्रतिकार करेल यांविषयी या सत्ता निश्चिंत होत्या. काही प्रयत्न या दिशेने झालेही. मात्र ते धाडस ज्यांनी ज्यांनी केले त्यांची वाताहत झाली. तिसरे अन् महत्त्वाचे कारण असे की, या यावनी सत्तांच्या राजधान्या मदानी होत्या. सह्य़ाद्रीच्या विक्राळ गाभ्यापासून शेकडो कोस दूर होत्या. नियंत्रण राखण्यासाठी त्यांचे प्रांताधिकारी असत. मात्र ते देशमुख-देशपांडय़ांच्या शब्दावर तरी अवलंबून असत. किंवा या स्थानिक अधिकाऱ्यांचा धाक तरी बाळगून असत. परंतु राज्याची सर्वसामान्य स्थिती अशी आलबेल असताना मानसशास्त्रीयदृष्टय़ा वृत्ती निष्काळजी होते, हीसुद्धा वस्तुस्थिती मानायला हवी. अन् मग म्हणूनच या पातशाह्य़ांचे सह्य़ाद्रीतल्या दुर्गम दुर्गाकडे दुर्लक्षच झाले वा त्यांनी तसे जाणीवपूर्वक केले. भले ते दुर्ग त्यांच्या अमलाखाली होते, त्यांची शिबंदी त्या दुर्गावर होती तरीसुद्धा लष्करी हालचालींच्या दृष्टीने निरतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या दुर्गाचे महत्त्व या पातशाह्य़ांस कधीच उमजले नाही. अन् जेव्हा उमजले तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली होती!

जिथून प्रतिकार होईल अशी तीळभरही आशंका नव्हती, नेमक्या त्याच अनपेक्षित ठिकाणाहून पहिला घाव बसला अन् त्या क्षणी या पातशाह्य़ांस भरलेले कापरे त्या अस्तंगत होईपर्यंत कधीच गेले नाही! युद्धशास्त्राच्या पटावरली पहिली मानसिक लढाई शिवछत्रपती चीतपट करून जिंकले होते!

अतिशय दुर्गम अशा सह्य़ाद्रीच्या प्रदेशात राहणाऱ्या या जनतेला तिथली बिकट भौगोलिक परिस्थिती तळहातावरल्या रेषांगत ठाऊक होती. त्यामुळे त्यांना या प्रदेशात लष्करी हालचाली करणे वा अशा हालचालींचे नियोजन करणे मुळीच कठीण गेले नाही. पातशाही सन्याची व त्यांच्या अधिकाऱ्यांची अवस्था नेमकी याच्या उलट होती. समोरासमोरच्या पारंपरिक मदानी युद्धात ती सन्ये निष्णात होती. त्यांचे तोफखाने अजेय होते. मात्र या दुर्गम अशा गिरिदुर्गाच्या तेवढय़ाच दुर्गम चढांवर आक्रमक म्हणून पाय घालताक्षणी त्यांच्या मदानी मनोवृत्तीच्या पार ठिकऱ्या उडाल्या. एका झटक्यातच त्यांची प्रतिकारशक्ती गळून पडली. जिथे ईर्षेचीच वाताहत उडाली, तिथे शस्त्रास्त्रांना अर्थच उरला नाही, अन् मग पिकली फळे आयतीच झोळीत पडावीत तसे हे दुर्ग एकामागोमाग एक शिवछत्रपतींच्या हाती लागले!

युयुत्सुवृत्तीच्या शिवछत्रपतींसाठी हे जणू देवदत्त दान होते. यातली मर्माची गोष्ट त्या तरुण अन् महत्त्वाकांक्षी राजाने नेमकी हेरली अन् शिवनेरीच्या गिरिदुर्गावर जन्मलेला तो राजा पुण्याच्या कसब्यातल्या लाल महालाची सावली सोडून मुरुंबदेवाच्या – राजगडाच्या- डोंगरावर राहायला आला. ही घटना होती साधारणत: इ. स. १६४५-४६ च्या सुमाराची. शिरवळच्या सुभानमंगळच्या गढीतील अमीनाने रोहिडखोऱ्याच्या दादाजी नरसप्रभू या देशपांडय़ांस ३० मार्च १६४५ रोजी पाठवलेल्या एका पत्रात शिवछत्रपतींनी राजगड हा दुर्ग ताब्यात घेतल्याची नोंद आहे.

या अशा सुरुवातीनंतर शिवछत्रपतींनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. सह्य़ाद्रीतील या दुर्गाच्या साहाय्याने त्यांनी आपल्या संकल्पित राज्याची रचना करावयास प्रारंभ केला. मुलखाची लावणीसंचणी करून रयतेस अभय देण्याची पद्धत त्यांनी पुण्यास असतानाच दादोजी कोंडदेव- सुभेदार, किल्ले कोंढाणा यांच्या सोबतीने सुरू केलीच होती. नियमित सारावसुलीची पद्धतही साऱ्या जहागिरीत त्यांनी रुजू केली होती.  सर्वसामान्य रयतेच्या मनी यामुळे भला विश्वास निर्माण झाला होता. हाच विश्वास कायम करण्यासाठी आता दुर्गाची ठाणी उभारून त्यांनी एतद्देशीय जनसामान्यांना पुंडपाळेगारांपासून, चोराचिलटांपासून, मुजोर सत्ताधीशांपासून संरक्षण देण्याची योजना कार्यान्वित केली. या दुर्गावर राहणारी फौज रयतेचे संरक्षण करेल, तिथले अधिकारी भोवतालच्या प्रदेशास काय हवे काय नको ते पाहतील. कज्जेखटले निवारतील. दादफिर्यादींचे निराकरण करतील. राज्याच्या महसुलावर लक्ष ठेवतील. अशी तोपावेतो कुणी न केली अशी योजना शिवछत्रपतींनी या प्रथम चरणात रुजू केली. लष्करी अन् मुलकी कारभार त्यांनी एकाच ठिकाणी एकवटला. अन् त्यामुळे एका एका दुर्गाच्या रूपाने, त्या त्या रहाळावर नियंत्रण ठेवू शकणारे पूर्णतया स्वतंत्र असे सत्ताकेंद्र त्यांनी निर्माण केले. ‘सप्तप्रकरणात्मक शिवचरित्रा’चे कत्रे मल्हार रामराव चिटणीस म्हणतात- ‘..आणि विचार केला की, किल्ले कोट घ्यावे, प्रांतात अमल बसवून नीतिने रयतेस सुख वाटे की, ईश्वरा, यांचे राज्य चिरकाल होवो. अशी लावणी कौल देऊन करावी.’  बखरकार चिटणीस पुढे म्हणतात- ‘आपले राज्यामध्ये चोरभय अगदी नसावे ऐसे मनात आणून जागाजागा बेरड, चोर, आडेकरी होते त्यांस धरून आणून कित्येकांचे शिरच्छेद केले. आणि ज्या ज्या देशातील होते त्या त्या प्रांतातील किल्ले, ठाणी, कोट येथे असाम्या नेमून देऊन त्यांस शेते वगरे देऊन गडकरी यांस घेरियाचे चौकीस नेमून, त्यांची जीविका चालेसे करून, यातून चोरी कोणी केली असता शिरच्छेद करावा, ऐसे केले. प्रतिगावास रखवाली एक बेरड त्या किल्ल्याचा त्या प्रांतात असावा. चोरी जालीया त्याने भरून द्यावी, पता लावून द्यावा ऐसे केले. याजमुळे राज्यात कोठेही चोरभय नाही ऐसे जाले.’ हे खरोखरीच अभूतपूर्व असेच होते! हे असे या महाराष्ट्रदेशी कित्येक शतकांत घडले नव्हते. यातून एक दृष्टीस येते की, दुर्गाच्या व दुर्गावरील सन्याच्या आश्रयाने पंचक्रोशीतील रयतेस अभयाचे छत्र देण्याचा नवाच पायंडा शिवछत्रपतींनी पाडला.

दुसरेही एक कारण यामागे होते. राज्यउभारणीच्या सुरुवातीच्या काळात, लष्करी, मुलकी, प्रशासकीय, आर्थिक अशा साऱ्याच बाबतीत जम बसणे महत्त्वाचे होते. अनुभवाची तसे म्हटले तर वानवाच होती. आर्थिक अवस्था तर हेवा करावा अशीच होती. तुटकीफुटकी शस्त्रे असलेले हजारबाराशे उत्साही लष्कर होते. छत्तीस फुटक्या खेडय़ांची कर्यात मावळची मोकासदारी होती अन् दिमतीला धडपणे तटबंदीही नसलेला राजगड होता. मग संख्येने, अनुभवाने अन् युद्धसामग्रीने प्रचंड पातशाही फौजांशी समोरासमोरच्या लढाईत गाठ घेणे म्हणजे विनाशाला आमंत्रणच होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात हे कटाक्षाने टाळले गेले. रयतेचा विश्वास अन् उत्पन्नाचे स्रोत यावर लक्ष केंद्रित केले गेले. लष्करी योजनांचाही विचार झाला. कमीतकमी सन्यानिशी, कमीतकमी वेळेत, जास्तीतजास्त शत्रुसन्याचा जास्तीतजास्त नुकसान करीत पराभव करायचा अशी युद्धयोजना अस्तित्वात आणली गेली. सह्य़ाद्रीच्या विक्राळ अन् उत्तुंग अशा कडेकपारी व त्यांमध्ये रचलेले दुर्जेय दुर्ग हा या प्रमेयातला अत्यावश्यक असा घटक होता. गनिमी कावा हे या विलक्षण युद्धतंत्राचे नाव!

दुर्गशास्त्रातील एका अद्भुत अध्यायाची ती नांदी होती!

discover.horizon@gmail.com