|| सुचित्रा साठे

जून महिना लागून तो ‘जून’ व्हायला लागला की ‘धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आढळे’ हे पावसाचं चित्र मनाच्या कॅन्व्हासवर सारखं उमटत राहतं. दरवर्षी येणारा हा पाहुणा त्याच्या वास्तव्याने ‘पाणावलेली’ दृश्यं, मोबाइलच्या ‘स्टेटस्’प्रमाणे पटापट अंत:चक्षूंसमोरून सरकत राहतात. रोजची दैनंदिन कामं करताना मोबाइलच्या मेसेजच्या रिंगटोनकडे कसा ‘कान’ असतो, त्याच उत्सुकतेने पावसाच्या आगमनाचे वेध लागलेले असतात. जीव गरमीने आणि प्रतीक्षेने अगदी व्याकूळ झाला असताना ‘अचानक’ दारी येशिल का? हा सांगावा त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि तो अकस्मात हजर होतो. त्याच्या आगमनाचा गारवा अंगावर लपेटला जातो. मातीतून ‘अत्तर’ काढण्याची किमया करतच तो स्थिरावतो.

त्या पर्यावरणाने त्याला पाहण्यासाठी खिडकीतून डोकावण्याचा मोह होतोच. किंबहुना इतर ऋतूंमध्ये खिडकीकडे पाठ फिरवली जाते, थंडी वाजते, गरम झळा लागतात. या कारणास्तव मात्र पावसाळ्यात किती वेळा खिडकीतून बाहेर बघितलं जातं, याला गणतीच नाही. दिवसाचे वेळापत्रक व्यवस्थित पार पडेल की नाही याचा अंदाज घेण्यासाठी सारखं ‘आकाशदर्शन’ घेतलं जातं. पंचमहाभूतातलं आकाश हे महत्त्वाचं भूत, ईश्वराच्या जागी असलेलं, अगदी चिमुरडय़ानेही ‘बाप्पा वर आहे’ म्हणत नोंद घेतलेलं. परंतु ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?’ असं अजीजीने विचारूनसुद्धा आकाश पावसाच्या आगमनाचा थांगपत्ता लागू देत नाही. मग त्याचा अंदाज घेण्यासाठी ढगांच्या खेळनाटय़ाकडे बघावेच लागते.

खिडकीतून बाहेर बघताक्षणी हिरव्या प्रसन्नतेने डोळे विस्फारले जातात. नुकत्याच रेखाटलेल्या निसर्गचित्रात सुरुवातीला हिरव्या तैलरंगांनी पानं रंगवल्यावर ती हिरवाई कशी ठळकपणे नजरेत भरते, तसं काहीसं होतं. खिडकीतून दिसणारी झाडं एकदम टवटवीत वाटायला लागतात. किती महिन्यांत डोक्यावरून अंघोळ झालेली नसल्यामुळे सगळी अगदी मातकट, धुळकट, कळकट वाटत असतात. पण तो आल्यामुळे आता..  धुळीचा मागमूस उरला नव्हता. पावसाच्या आगमनाने धुळीला रामराम केला होता.

वनश्रींचा मेकओव्हर करता करता घरांचाही नंबर लागतो. नुकतंच बसायला लागलेल्या बाळाच्या डोक्यावरून पाण्याचा तांब्या ओतला की तो कसं डोळ्याची उघडझाप करतो, मधेमधे ‘पापा’ पितो, तशीच अवस्था घराची होते. निर्माण झालेल्या फटीतून, उघडय़ा खिडक्यांतून पाणी घरात डोकावतं. पाऊस वेडावाकडा येतो, हातचलाखी करून ग्रिलचा कोपऱ्या कोपऱ्यांत घुसत साफसफाई करून टाकतो. सुरक्षेचा विचार करून निवडलेल्या ग्रिलच्या नक्षीची पुसापूस करणं हे अत्यंत अवघड, वेळखाऊ, कंटाळवाणं काम, पण पाऊस आला की जणू पदर खोचून हे काम प्राधान्याने उरकून टाकतो. त्या ग्रिलचे रूप उजळत जाते. जणू घराचा चष्माच बदलला जातो.

डासांसाठी लावलेल्या बारीक जाळ्या म्हणजे धुळीची विश्रांतीस्थानंच. पण बहुरूपी पाऊस अनेक सोंगंढोंगं करत धुळीला पळवून लावतो. छोटय़ा चौकोनातला पारदर्शक पाण्याचा पडदा जणू नैसर्गिक एसी बसवतो. याच कारणास्तव पावसाळ्याच्या तोंडावर साफसफाई करून घेतली की जरा निवांतपणा येतो.

घरातली धुळवड काही कमी नसते. सकाळी सगळं फर्निचर, खिडक्यांचे कट्टे, दाराची चौकट, मांडण्या, सगळे सपाट पृष्ठभाग ओल्या फडक्याने पुसूनसुद्धा संध्याकाळपर्यंत पुन्हा धुळीची पावडर लावून बसतात. या पावसाचे सीमोल्लंघन करून घरात घुसणं परवडणार नाही. म्हणून ‘तो’ बिचारा कधी नाजूकपणे तर कधी आवेगाने खाली उतरत सगळ्या वातावरणातल्या धूलिकणांना दामटवून खाली बसायला लावतो. साहजिकच त्यांना घरात प्रवेश करता येत नाही. एरवी वाऱ्याशी संगनमत करून धुळीला बिनधास्तपणे आत ढकलणारे पडदे आता नुसतेच झुलत राहतात; काम करण्याचा नुसता आव आणणाऱ्या व्यक्तीसारखे. म्हणूनच उन्हाळा-पावसाळा यांच्या सीमारेषेवर जाळ्यांचा, पडद्यांचा धोबीघाट उरकून घेतलेला असतो.

पावसाच्या सरळ रेषांच्या पडद्यामुळं धुळीचा इतस्तत: वावर कमी होत असल्यामुळे जाळी जळमटांचंही प्रमाण मंदावतं, साहजिकच गणपतीपर्यंत. साफसफाईमध्ये थोडी चालढकल चालू शकते. अशा रीतीने पाऊस घरात न येता धुळीवर नियंत्रण ठेवण्याची मोठीच कृपा करतो. साहजिकच धुळीची अ‍ॅलर्जी असणारे सुखावतात. अर्थात, ‘तो’ घरात आला नाही तरी त्याचं अस्तित्व जाणवत राहतं. धूळ, घाम कमी होतो, पण सगळीकडे दमटपणा, ओलसरपणा जाणवतो. कपडे वाळून चुरचुरीत होत नाहीत, सर्दटलेले वाटतात. बाहेरून पावसात भिजून आल्यावर ओले कपडे सुकवायचं नवं दालन उघडावं लागतं. धुतलेले, अर्धवट वाळलेले, पुन्हा भिजून ओले झाल्यामुळे वाळत टाकलेले असे विभाग पडतात. त्यांच्यातील सीमारेषा पुसट असतात. त्यामुळे जरा जागरूक राहावं लागतं. ओल्या छत्र्या बेसिन, बाथरूम नाही तर गॅलरीत टिपं गाळत बसतात. छत्री उघडून ठेवली तर घरातली लहानगी लपण्याची जागा मिळाल्यामुळे खुशीत येऊन छत्रीभोवती फिरत राहतात. कोणी तिऱ्हाईत आलं की ओली छत्री कुठं ठेवू, हा प्रश्न सोडवावा लागतो. बादलीची सोय दिसेल अशा ठिकाणी करावी लागते.

पायपुसण्याचं काम भारीच वाढतं. त्यांच्या संख्येत वाढ करावी लागते. कारण ते पटकन् कोरडं होऊन मदतीला हजर होत नाही. घासलेली भांडी, डबे पटकन् कोरडं होण्याचं नाव काढत नाहीत. त्यामुळे एक तर पुसण्याचे काम वाढते, नाही तर ओटय़ावरील पसारा वाढतो. पावसाचा मारा झेलणाऱ्या भिंतींवर कधी कधी ओल हजर होते. त्या ओलीवर पोपडे धरतात. ते भिंतीचं रूप पालटून टाकतात. त्याही स्थितीत पावसाला तोंड देत भिंत उभी राहते. एसी, फ्रिज यांचा भाव कमी होतो. कुबटपणा मात्र अगदी निमित्ताला टेकलेला असतो.

घराबाहेर पडायचं जिवावर येतं. आता पाऊस नाही, पण जायच्या वेळी आला तर.. मग जावं की नाही, या विचारांची आवर्तनं मनात भिरभिरत राहतात. म्हणून तर लक्ष सतत खिडकीतल्या करडय़ा, राखाडी रंगाकडे वळत असते. आकाशात गडगडाट होऊन वीज चमकली की त्याला घाबरून घरातील वीज मधे मधे आपलं तेजतल विसरून जाते.

झाडे मोत्यांचा साज चढवतात. त्याची मुक्त हस्ते उधळण करतात. मधूनच सूर्यकिरणं डोकावतात आणि मोत्यांची तेज‘श्री’ झळकते. पंचमहाभूतांमधील आकाशापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, वायू हातात येत नाही, तेज तर दोन हात बाजूलाच राहते. राहता राहिली पृथ्वी आणि आप, त्यांना आपण स्पर्श करू शकतो. किंबहुना या आपतत्त्वानेच आपल्याला आकार दिला आहे. पाऊस म्हणजे आप आणि पृथ्वी यांची भेट. या भेटीने चिखल निर्माण होतो, तो तसा व्हावा, अंगणात दिसावा अशीच इच्छा असते. नाही तर चिखल ‘दीन’ होऊन चिखल दिन साजरा करण्यासाठी त्याची शोधाशोध करावी लागेल, नाही का?

suchitrasathe52@gmail.com