|| मैत्रेयी केळकर

माझी बाग एव्हाना तुमच्या सगळ्यांच्या अगदी चांगली परिचयाची झालेली आहे. या बागेमुळे भरपूर कौतुकही माझ्या वाटय़ाला आलं, समाधान मिळालं हे तर खरंच; पण ही बाग मला विचारसमृद्ध करून गेली. जीवनाचा नवा अर्थ देऊन गेली, असं म्हटलं तर कुणालाही क्षणभर आश्चर्य वाटेल.

Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

बागेत काम करणं, नवीन रोप लावणं हे सगळं खूप सुख देणारं असतं, त्याचबरोबर त्या रोपांच्या सहवासात घडणारं, एकरूप होणारं मन जेव्हा तुम्हाला सृष्टी समेवत तादात्म्य पावण्याचा अनुभव देतं तेव्हा अगदी भरून पावतं. वाटतं, सगळं काही भवताली असतानाही आपण मात्र किती र्वष स्वत: रिकामच ठेवलं. निसर्ग निसर्ग म्हणत किती जंगलं, रानं धुंडाळली. घनदाट वनात, ओढय़ाच्या खळखळाटात पाखरांच्या किलबिलीत शांततेचा अनुभव येतो खरा, पण मुळात ही शांतता आपल्या मनात आधी वस्तीला यायला हवी. एकदा हे घडलं की सगळं सोपं होतं. अनुभवाने सांगते, ही शांतता, ही तादात्म्यता मी अनुभवली आहे. आपला छंद, आपला परिसर, आपल्या गजबजाटी जगातला निसर्ग आपल्याला बदलतो, ज्ञानेश्वरीमधल्या ओव्यांचं सौंदर्य आकळून येतं, गूढ गर्भ आध्यात्मिक अर्थापर्यंत पोहोचवणारी निखळ निसर्ग रूपं सहजी समोर साकारतात आणि मग वेगळा अभ्यास करावा लागत नाही. ज्ञानेश्वरीतील तेराव्या अध्यायातील या दोन ओव्या मला फार आवडतात..

अगा वृक्षासी पाताळी। जळ सापडे मुळी।

ते शाखांचिये बाहाळी। बाहेरी दिसे।

कां भूमीचे मार्दव। सांगे कोंभाची लवलव।

बहरलेल्या वृक्षांच्या फांद्यावरून त्याला मिळणाऱ्या पाण्याचा जसा अंदाज येतो तसाच मऊ  लुसलुशीत कोंबावरून त्याच्या उत्तम मातीचा अंदाज बांधता येतो. या ओव्यांची रचना ज्ञानेश्वरांनी जरी आध्यात्मिक अर्थ समजावण्यासाठी केली असली तरी त्यातील विज्ञान हे प्रत्येक वनप्रेमीने समजून घ्यायला हवे. हे विज्ञान, ही कोमलता या रोपांच्या, या पानांच्या, या फुलांच्या संगतीत सहज समजून येते. मग आहे त्या परिस्थितीतसुद्धा अगदी परिपूर्ण आनंद मिळतो. हे अनुभवणं  तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच या लेखाचं निमित्त.

या वर्षी पाऊस खूप लांबला, अगदी ऐन दिवाळीतही येऊन थडकला होता. पण आता जवळजवळ संपला, तेव्हा बागेची नीट मांडामांड करावी म्हणून एक अख्खा दिवस हाताशी घेऊन कामाला लागले. ऑनलाइन मागवलेलं सामान उघडून बसले. यातून आता काय करता येईल याची गणितं मांडू लागले. पुण्याच्या उपाध्यांकडून मागवलेल्या सुरेख पिशव्यावजा कुंडय़ा या सामानात होत्या. त्यांचा आकार, रंग आणि पोत इतका मोहक होता की कामाला अगदी उत्साह यावा. यात लावायचं काय याचा विचार करत मी आखणी केली.

पण तत्पुर्वी धुंद पावसात, सचेल न्हालेली आणि अस्ताव्यस्त फोफावलेली माझी इवली बाग मला आता नीटनेटकी मांडायची होती. एक सृजनसोहळा नुकताच संपून गेला होता. माझ्या झाडापेरांना अंगभर मोहरवून, फुलवून गेला होता. त्याच्या हिरव्या पाऊलखुणा सर्वदूर पसरल्या होत्या. रताळ्याच्या वेलाने हिरवी माया गोळा करून स्वत:ला अगदी मजबूत केलं होतं. गच्चीवर आच्छादन म्हणून घातलेल्या प्लॅस्टिकखाली त्याची प्रजा सुखेनैव पसरली होती. रताळी मातीत वाढतात, इथे ती प्लॅस्टिकखाली वाढली होती. त्यांचे भलेभक्कम कंद वेडय़ावाकडय़ा चपटय़ा आकारात आच्छादनाखाली लपले होते. प्लॅस्टिक गुंडाळून ठेवताना त्याखाली लपलेली ती रताळ्याची प्रजा अवचित समोर आली आणि सृष्टीच्या कौतुकाचं एक पान अल्लद उघडलं.

रातराणी, जास्वंद आणि गोकर्णाला भरपूर नवी फूट फुटली होती. अवघी झाडं कळ्यांनी ओसंडून गेली होती. सोनटक्का अजूनही फुलत होता. पावसाचं पाणी पिऊन त्याला भरपूर धुमारे फुटले होते. मातीला समांतर असा त्याचा वंशविस्तार सहजी दिसत होता. मटाराच्या वेलांनी आधाराला घट्ट धरून फुलांची निर्मिती केली होती. भुईमुगाची पिवळी फुलं जमिनीकडे झेपावली होती. त्यांचे तुरे मातीपर्यंत पोहोचले की शेंगा धरण्याचं काम सुरू होणार होतं. गवती चहाची पाती जोमदारपणे वाढली होती. गाठळलेल्या मुळांचा पसाराही बरंच अंतर कापून कुंडीभर पसरला होता. पावसात जोमदार वाढलेले अळूचे कंद अजूनही तुकतुकीत पानांनी सजले होते. हळदीची पानं मात्र आता पिवळट पडली होती. गणपतीत याच पानांवर मी मोदक उकडवले होते. अबोलीचा बहर रोडावला होता. तर कोरांटी थंडीने गारठली होती. सोनचाफा बहरानंतरचा विसावा घेत होता. कमळाची तळी सर्दावली होती. एकुणातच बाग अगदी मलूल, संथ, सुप्तावस्थेत होती. भरपूर ऊन मागणाऱ्या या मंडळींचा हा विश्रांतीचा काळ होता.

बरीचशी छोटी झुडपं सुकली होती. त्यांच्या वाळक्या काडय़ा अगदी वाईट दिसत होत्या. बाग म्हटली की कशी ती टवटवीत हिरवीगार, नीटनेटकी आणि डोळ्यांना सुखावणारी असली पाहिजे. ही मात्र तशी मुळीच दिसत नव्हती. पावसाळ्याचं हिरवेपण हरवलेली, हिवाळ्याचं पिवळेपण ल्यालेली ती खरीखुरी वास्तविक बाग होती.  तिचा आकर्षकपणा उणावला होता. मनात कुठेतरी हे टोचत होतं. निदान वाळकं गवत, सुकलेली पानं आणि काडय़ा काढून टाकाव्यात म्हणून उसन्या उत्साहाने उठले. एवढय़ात एक भिरभिरतं फुलपाखरू जवळून उडालं आणि वाळक्या फांदीपाशी गेलेला हात थांबला. अरे, फुलपाखरांना कसे विसरलो आपण; ही कळाहीन बाग म्हणजे फुलपाखरांचं आवडतं ठिकाण. आताच तर त्यांचा जीवनक्रम पूर्ण होण्याचा काळ. कोरांटी, मारतोंडी, अबोली ही त्यांची आवडती आणि हक्काची झाडं. वाळक्या काटक्या आणि पानांवरच तर त्याची बाळं विसावली होती. मी तोच आसरा नष्ट करू पाहात होते. पिवळी पडलेली पानं जोवर झाड गाळत नाही तोवर ती ओरबाडून तोडू नयेत. हिप्पळगावकर सरांनी शिकवताना सांगितलं होतं. चटकन ते आठवलं. पिवळं पानही जोवर उपयुक्त आहे तोवर ते झाडाला चिकटून राहतं आणि त्याच्या आधारे मग अनेक जीव शत्रूपासून बचाव करीत आपला वंश वाढवतात. निसर्गाच्या या मांडणीतच  किती  कौतुक दडलंय पाहा. संस्कृतच्या वर्गात ऋग्वेदामधील विज्ञान उलगडताना, कालिदासाचं कुमारसंभव वाचताना प्राचीन काळी  लोकांची असणारी निसर्गाची समज थक्क करत असे. झाडाखाली पडलेल्या वाळक्या फांद्या आणि पानं सरपण म्हणून गोळा करणारे आदिवासी, यज्ञासाठी सोमवल्ली तोडताना, औषधी वनस्पतींकडून पानं, फुलं, मुळ्या यांची मागणी करताना त्या त्या वनस्पतींना विनंतीरूपी प्रार्थना करणारे आपले पूर्वज निसर्गाला किती जाणत होते. आज आपण त्यापासून फार दूर येऊन पोहोचलोय. संवेदनशीलताच हरवून बसलोय. विचारांची अशी भराभर फिरत होती. मी बाग नीटनेटकी करण्याचा विचार सोडला. जमिनीवरची वाळकी पानं आणि माती गोळा करून एका कुंडीत भरली. उमाने सोसायटीतील झाडांचा वाळका कचरा आणून दिला होता. त्यातलं प्लॅस्टिक वेगळं करून ती पानं कुंडय़ांमधे दाबून भरली. वर थोडं सुकं शेणखत आणि माती पसरली आणि कुंडी तयार केली. पावसात कोथिंबीर आणि पालक मुळीच टिकला नव्हता. टोमॅटोही पावसाच्या माऱ्यात कोलमडले होते. मागच्या वर्षीच्या भेंडीच्या आणि मटाराच्या बिया साठवल्या होत्या. ते घरचं बियाणं हाताशी होतंच. मग या मौसमात परत मटार पेरला, भेंडी रुजत घातली, चेरी टोमॅटोच्या बिया लावल्या. एका ग्रो बॅगमध्ये वांगी आणि एकात मिरच्या लावल्या. पालक आणि मेथी नवीन कुंडय़ांमध्ये लावून वर कोकोपीट भुरभुरलं. सिमला मिरचीच्या बियाही  लावल्या. हे सगळं या वेळी  कापडी कुंडय़ांमध्ये लावलं होतं. या कुंडय़ांमध्ये पाणी साठून राहत नव्हतं, पण कोकोपीटमुळे पुरेशी ओल राहत होती. परिणामी मेथी चार दिवसांत मातीबाहेर येऊन डोकावू लागली. तिची हिरवीगार हिरवळ इतकी सुरेख दिसत होती, की चक्कं तास-दोन तास त्या मेथीपाशी बसून अख्ख्या बागेचं निरीक्षण करण्यात जाऊ  लागले. कोथिंबीर साधारण आठवडय़ाने मातीबाहेर डोकावली आणि मग संथ वाढत राहिली. तब्बल दोन आठवडय़ांनी सिमला मिरचीची रोपं डोक्यावर आपल्याच बियांच्या टोप्या घालून उगवली. उतावीळ टोमॅटो मात्र झटपट रुजला आणि बघता बघता बोटभर उंचीची रोपं मिरवू लागला. मिरची आपल्या गतीने वाढत होती. पालक आठवडय़ाने उगवला. वांग्याच्या झाडांनी बाळसं धरलं.

माझं रोजचं पाणी देणं चालूच होतं. बागेचा एक कोपरा असा चांगला शेवाळला होता. फुलपाखरांची लगबग वाढली. वीतभर लांब वाढल्यावर एकदा  मेथी काढून घेतली. हिरवीगार लसणाची पातं भेंडीच्या रोपांबरोबर वाढली होती. ती खुडली आणि घरच्या मेथीसोबत झक्क आमटी केली. लगेच नवीन मेथी दाणे पेरले.

एक दिवस मात्र संध्याकाळी नेहमीप्रमाणे पाणी घालताना लक्षात आलं की भेंडीच्या रोपांना कीड लागली आहे आणि वांगं आणि मिरचीची सगळी पानं कुणी तरी फस्त केली आहेत. पूर्वी असं काही झालं की मला राग तरी यायचा किंवा मेहनत वाया गेली म्हणून वाईट तरी वाटायचं. पण आता मात्र असं काही झालं की आपल्याला नवीन काही शिकायला मिळणार याची खात्री असते. कारण माझ्या समस्येवर मलाच उत्तर शोधायचं असतं. तेच तर खरं  शिक्षण असतं. भेंडीच्या रोपांवर नीम अर्क फवारला. वांग्यांच्या आणि मिरचीच्या रोपांना जाळीखाली ठेवलं. अरे हो, या जाळ्यांविषयी सांगायचं राहिलंच की. मी चार लोखंडी सळ्यांचे सांगाडे बनवून त्यांना बारीक जाळ्या लावल्या आहेत. याच्या खाली मी भाज्यांच्या कुंडय़ा ठेवते. त्यामुळे उंदीर आणि कबुतरांचा त्रास होत नाही. आज मात्र वांग्याची मोठी मोठी पानं खाल्ल्यामुळे रोपं अगदी बिचारी झाली होती. पण गंमत अशी की, चार दिवसांतच या रोपांना भरपूर फूट फुटून ती मस्त बहरली. अधिक मजबूत झाली. पान खाणं ही जणू इष्टापत्तीच ठरली होती. आता वांग्याला सुरेख जांभळं फूल आलं. पण दोनच दिवसात गळून पडलं. असं होणं म्हणजे फुलाचं परागीभवन न होणं. याला कारण अर्थातच जाळी होती. मग नवीन फुलं येताच स्वत: त्यांचं परागीभवन करावं म्हणून एक रंगकामाचा मऊ  ब्रश घेतला आणि कामाला लागले. मधमाशीचं काम मला करायचं होतं. ब्रशवर हळुवारपणे परागकण गोळा करत ते कुक्षीवर म्हणजे फुलाच्या मधल्या हिरव्या दांडय़ावर लावले.  काम झालं होतं. पण अशी कृत्रिम फळधारणा नकोच म्हणून मग पहिली जाळी बदलली. जरा मोठय़ा भोकांची जाळी लावली. आणि गंमत म्हणजे पुढे  ब्रश वापरावा लागला नाही. छोटय़ा माश्या फुललेल्या प्रत्येक वांग्याच्या फुलाभोवती रुंजी घालू लागल्या.  मागील वर्षी बियांपासून कोबीची रोपं केली होती. रोपं सुरेख वाढली. प्रत्येक कुंडीत एक अशी पाच रोपं लावली. कोबीचे गड्डे मस्त भरले. खूप आनंद वाटत होता. पण एक दिवस या भरलेल्या गडय़ांना कीड लागली. पानांना मोठी भोकं पडली. मी अर्थातच हिरिरीने गोमुत्राच्या पाण्याने त्यांना अंघोळ घातली. कीड अगदी धुऊन काढली. पण फारसा परिणाम झाला नाही. पक्ष्यांचा वावर मात्र वाढला. हळूहळू किडकी पानं नष्ट झाली आणि नवीन जोमदार पानांचे कोबी गड्डे भाजीसाठी मिळाले. काही तर  शेजारीपाजारी देता आले. हे कोबी लावले तेव्हाचा आणखी एक अनुभव सांगते. बहुतेक सकाळी मी झाडांना पाणी घालते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी पाणी घालत होते. कमळ आणि कुमुदिनीची कुंड पाण्याने भरायला वेळ लागतो. म्हणून आधी  इतर झाडांना, भाज्यांना  पाणी घातलं. आणि कुंडाकडे वळले तर एक छोटा सुभग पक्षी माझ्या पुढे सरकण्याची जणू वाटच पाहात होता. मी पुढे जाताच तो अल्लद खाली उतरला. कोबीच्या वाटीसारख्या पानांमध्ये साठलेल्या पाण्यात त्याने आपली अंघोळ उरकली. टणक अशा गड्डय़ावर आपली इवलीशी चोच घासली. असं दोन-तीन वेळा करून तो सुखाने उडून गेला. उन्हाळ्यातल्या त्या गरम सकाळी त्या इवल्या पक्ष्याला थोडा वेळ तरी का होईना थंड पाण्याच्या स्नानाचा आनंद मिळाला. कोबी लावल्याचं जणू सार्थक झालं. असे कितीतरी सुखावणारे अनुभव बागेमुळे मिळाले.

खरं तर ही बाग रूढ अर्थाने सुंदर नाही. फार नखरेल, खर्चीक सजावटही नाही. महागडी खतं आणि माती मी वापरत नाही. नारळाच्या शेंडय़ा, वाळलेली पानं काडय़ा, कचरा यावर झाडं वाढतात, फुलतात. बागेला भेट द्यायला भरपूर पक्षी येतात. कीटक फुलपाखरं तर मुक्कामाला असतात. भरपूर आनंद मिळतो. खूप शिकायला मिळतं. मन शांत होतं. पण सगळं इतकं सोप्पं थोडंच असतं, सुखाच्या फुलांमध्ये दुखा:चे दडलेले एक-दोन काटे टोचतातच. गच्चीवर लावलेली ही बाग जशी काहींना आवडते तशी काहींना नावडतेसुद्धा! त्यांचे शाब्दिक सपकारे बसतात अधूनमधून. पण कुणाला त्रास होणार नाही एवढं पथ्य पाळत मी माझं काम सुरू ठेवलंय.  मला खात्री आहे की एवढं सगळं  वाचल्यावर नक्कीच तुम्हीही कोणती ना कोणती झाडे लावण्याचा विचार करताय, हो ना! मग वाट कोणाची पाहाताय? चला एखादी भाजी, एखादं फुलझाड लगेच लावायला घ्या आणि सृजनातला हा निखळ आनंद अनुभवा.