09 July 2020

News Flash

महारेराचे नवीन परिपत्रक : प्रकल्प नोंदणी आणि करार नोंदणी

रेरा प्रकल्प नोंदणी आणि करार नोंदणीबाबत दि. २० सप्टेंबर २०१९ रोजी राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले.

(संग्रहित छायाचित्र)

अ‍ॅड. तन्मय केतकर

रेरा कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यापासूनच नवनवीन समस्या आणि नवनवीन विषयांबाबत स्पष्टता आणण्याच्या उद्देशाने महारेरा प्राधिकरणाने वेळोवेळी परिपत्रके काढून स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.

रेरा प्रकल्प नोंदणी आणि करार नोंदणीबाबत दि. २० सप्टेंबर २०१९ रोजी राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले. त्या परिपत्रकानुसार, ज्या प्रकल्पांना रेरा नोंदणी बंधनकारक आहे, त्या प्रकल्पांनी अशी नोंदणी केल्याशिवाय किंवा अशा प्रकल्पाला पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय अशा प्रकल्पातील करारांची नोंदणी करण्यावर र्निबध आणले. वास्तविक हे खूप आधीच होणे अपेक्षित होते, पण उशिरा का होईना, रेरा प्रकल्प नोंदणी आणि करार नोंदणीचा परस्पर संबंध जोडण्यात आला. वास्तविक कायद्याची अंमलबजावणी करायला लावणारे हे परिपत्रक असल्याने त्याचा कोणास त्रास होण्याचा संबंध नव्हता.

मात्र काही ग्राहक आणि विकासकांनी त्या परिपत्रकाबाबत महारेरा प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या आणि त्या तक्रारींची दखल घेऊन महारेरा प्राधिकरणाने दि. ११ ऑक्टोबर २०१९ रोजी या विषयावर स्पष्टता देणारे परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे. त्यानुसार, प्रकल्प नोंदणीपासून सूट असलेले प्रकल्प, करार नोंदणीच्या अगोदर पूर्णत्व/ भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले प्रकल्प किंवा प्लॉटिंगच्या बाबतीत सक्षम कार्यालयाकडून अकृषिक परवानगी मिळालेले प्रकल्प, महारेरा प्राधिकरणाने प्रकल्प नोंदणी आवश्यक नसल्याचा आदेश दिलेले प्रकल्प, या प्रकल्पातील करार नोंदणीकरिता महारेरा नोंदणीच्या आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.

महारेराकडे नोंदणी असलेल्या प्रकल्पांबाबत देखील स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. त्यानुसार, महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांपैकी पूर्णत्व/भोगवटा प्रमाणपत्र किंवा प्लॉटिंगच्या बाबतीत, सक्षम कार्यालयाकडून अकृषिक परवानगी मिळालेले म्हणजेच पूर्ण झालेले प्रकल्प असतील आणि त्यांच्या महारेरा नोंदणीमध्ये त्यासंबंधी फॉर्म ४ अपलोड केलेला दिसून येत असेल, तर अशा प्रकल्पांमधील करार नोंदणीकरिता प्रकल्पनोंदणीचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

महसूल आणि वन विभागाचे २० सप्टेंबर २०१९ रोजीचे परिपत्रक आणि महारेराचे दि. ११ ऑक्टोबर २०१९ रोजीचे परिपत्रक याचा एकत्रित विचार केल्यास- ज्या प्रकल्पांना पूर्णत्व/भोगवटा प्रमाणपत्र किंवा प्लॉटिंगच्या बाबतीत सक्षम कार्यालयाकडून अकृषिक परवानगी मिळालेली आहे, त्यातील जागांच्या करार नोंदणीकरिता महारेरा नोंदणी आवश्यक नाही असा अर्थ निघू शकतो. या सगळ्या प्रकल्पांना करार नोंदणीकरिता महारेरा नोंदणी गरजेची नाही म्हटल्यावर अशा प्रकल्पांना महारेरा नोंदणी सक्तीची नाही, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. आता हा अर्थ रेरा कायद्यातील तरतुदींशी देखील ताडून बघणे आवश्यक आहे.

प्रकल्प नोंदणी आणि प्रकल्प नोंदणीपासून सुटीबाबतच्या महत्त्वाच्या तररतुदी रेरा कायदा कलम ३ मध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार प्लॉट विक्रीकरिता देखील प्रकल्प नोंदणी आवश्यक आहे. त्यामध्ये अकृषिक परवानगीबाबत काहीही उल्लेख नाही. पूर्णत्व/भोगवटा प्रमाणपत्राचा विचार करता कलम ३ मध्ये याबाबत ‘प्रायर कमेंसमेंट ऑफ थिस अ‍ॅक्ट’ असा शब्दप्रयोग वापरण्यात आलेला आहे. म्हणजेच प्रकल्पाला रेरा कायदा अस्तित्वात येण्याअगोदर असे पूर्णत्व/ भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असल्यास नोंदणीपासून सूट मिळू शकते. एकदा रेरा कायदा अस्तित्वात आल्यावर पूर्णत्व/ भोगवटा प्रमाणपत्र असण्याने किंवा नसण्याने काहीही फरक पडणार नाही आणि नोंदणीपासून सूट देखील मिळणार नाही. या तरतुदींमध्ये महारेराच्या या नवीन परिपत्रकाने एकप्रकारे बदल किंवा दुरुस्ती केलेली आहे असे म्हणावे लागेल. या दुरुस्तीमुळे विकासकांमध्ये ग्राहकांचे पैसे किंवा बुकिंग न घेता प्रकल्प पूर्ण करू शकणारे आणि इतर असा भेदभाव निर्माण होणार आहे.

बांधकाम व्यवसायाची नियामक संस्था म्हणून उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणे हे महारेराचे कर्तव्यच आहे, आणि त्याच अनुषंगाने महारेराने हे नवीन परिपत्रक काढलेले असणार असे जरी गृहीत धरले तरीसुद्धा मूळ कायद्यातील तरतुदींमध्ये असा बदल किंवा दुरुस्तीचा अधिकार महारेरा प्राधिकरणाला आहे का? हा प्रश्न उद्भवतो. गतकाळात को-प्रमोटर बाबतीत उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून काढण्यात आलेले चांगले परिपत्रक केवळ कायद्याच्या चौकटीत न बसल्याने महारेरा प्राधिकरणास मागे घ्यावे लागले होते. आता या नवीन परिपत्रकास आव्हान मिळते का? मिळाल्यास हे परिपत्रक टिकते का? हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे.

tanmayketkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 12:04 am

Web Title: maharera new circular project registration abn 97
Next Stories
1 वास्तुसोबती : सेफी आमची बॉस
2 घर सजवताना : सजली दिवाळी घरोघरी
3 देशमुखांचा वाडा
Just Now!
X