||  डॉ. शरद काळे

कोणत्याही सणाच्या आदल्या दिवशी जर फूल मंडईत चक्कर मारली, तर फूलविक्रेते मन लावून फुलांचे हार, तोरणे, गुच्छ, वेण्या, इत्यादी बनविण्यासाठी काम करताना आढळून येतात. दिवसभर किंवा जास्तीचे कष्ट करून हे फूलविक्रेते तुमच्या घरातील सणवार सुशोभित करीत असतात. त्या फुलांना शेतात वाढविण्याचे कार्य शेतकरी मेहनत घेऊन करीत असतात आणि मगच ती फुले मंडईत पोहोचतात. आपण हौसेने या साऱ्या गोष्टी घरी आणतो, त्या वापरून आरास करतो, पूजा करतो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना व घरातील सर्वाना आनंद वाटेल अशी वातावरण निर्मिती करीत असतो. सणवार संपला की या फुलांचे काम संपते. ती सुकू लागतात आणि मग ती काढून टाकली जातात. निर्माल्य म्हणून ते नेहमीच्या केरात न टाकता वेगळी ठेवली जातात देखील, पण दिली मात्र जातात रोजचा कचरा कर्मचाऱ्यांनाच! हे सर्व निर्माल्य एकत्रित गोळा करून काही महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे खत बनविण्यासाठी प्रयत्नीशील असतात. अजूनही समाजातील मोठा वर्ग निर्माल्य नदीच्या पाण्यात किंवा समुद्रात विसर्जित करतो, कारण तशी मानसिकताच विकसित झालेली असते.

या निर्माल्याचे घरच्या घरी खत करणे सहज शक्य आहे. पण फुलवाला हार, वेण्या आणि इतर गोष्टी बनविताना जशी मेहनत घेतो, तशीच थोडी मेहनत केली तर चांगले खत बनविता येईल. हार, गुच्छ, वेण्या उकलून त्यातील कलाबतू, रेशमी दोरे, तारा, प्लास्टिकच्या सजावटीच्या गोष्टी आणि आरास तयार करताना वापरण्यात आलेले घटक वेगळे करणे आवश्यक असते. देवासमोर लावलेल्या उदबत्त्या आणि धूप यांची रक्षा खताच्या बादलीत टाकता येईल, पण आगपेटीच्या विझलेल्या काडय़ा, उदबत्तीची न जळलेली काडी, कापसाच्या वस्त्रमाला या मात्र कटाक्षाने वेगळ्या ठेवाव्यात. फुले, पत्री आणि दुर्वा एकत्रितपणे बारीक कापाव्यात आणि त्यांचे खत केले तर शुद्ध सेंद्रिय खत आपल्याला त्यातून मिळेल. हे खत मातीचा पोत नक्कीच सुधारते. एकत्रितपणे हे खत शेतावर पोहोचले तर निसर्गचक्रपूर्ण केल्याचे समाधान आपल्याला त्यातून मिळेल आणि सणवारांचा आनंद द्विगुणितच नव्हे, तर शतगुणित होईल. विघटन न होणारे पदार्थ वापरून काही नवनिर्मिती करता आली तर दुधात साखर! तसे शक्य नसेल तर त्यांचा पुनर्वापर करणाऱ्यांना ते कसे परत देता येईल यादृष्टीने प्रयत्न करता येतील.

आमच्या घरातील निर्माल्याचे आणि रोजच्या जैविक टाकाऊ पदार्थाचे नियमितपणे खत केले जाते. गेली कित्येक वर्षे त्यातील एखादा ग्रॅम पदार्थही आम्ही केरात टाकीत नाही. ही खत करण्याची पद्धत सोपी आहे, थोडी मेहनत घ्यावी लागते. पण निसर्गचक्र राखण्यासाठी ही मेहनत प्रत्येकाने घेणे हे कर्तव्य ठरते. sharadkale@gmail.com