एकविसाव्या शतकातील बदलत्या घरांची चर्चा करीत असताना एक गोष्ट जाणवत राहते की, विज्ञानाच्या प्रगतीचा वेग प्रचंड असला तरी आपण यंत्रमानव नसून फक्त मानव आहोत हे लक्षात ठेवणेच दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे. एका विद्यार्थ्यांने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिकेचा गोळ्या झाडून अतिशय निर्घृणपणे खून केला, ही बातमी वाचली आणि मन काही दशकांपूर्वीच्या आमच्या शाळेत गेले. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्वच शिक्षक आमच्यावर पुत्रवत प्रेम करीत होते. शिस्तीसाठी काही शिक्षकांचा मार खाण्याची पाळी थोडय़ाफार फरकाने प्रत्येकावर यायची, पण त्यात वावगे होते असे कधी वाटले नाही, पण त्यामुळे कुणा विद्यार्थ्यांच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली होती असे आमच्या शालेय जीवनात कधी जाणवले नाही. घरचे पालकदेखील त्यात कधी हस्तक्षेप करीत नव्हते आणि केलाच तर तो आम्हालाच दटावण्याच्या स्वरूपात असे! शिस्तीसाठी मार खावा लागतो हे समीकरण मनात पक्के बसलेले होते. म्हणूनच १८ वर्षांचा एक विद्यार्थी उठतो काय आणि वडिलांचे पिस्तूल घेऊन भर दिवसा सर्वासमोर मुख्याध्यापिकेवर गोळ्या झाडतो काय! सर्वच अतक्र्य आणि विचित्र घडत आहे. नुसती हीच एक बातमी नाही, तर वृत्तपत्राचे कोणतेही पान उघडले तर ज्या बातम्या दिसतात त्या वाचून मन अधिकाधिक अस्वस्थ होत राहते. तरुण पिढी कोणत्या दिशेने जात आहे आणि समाजात नक्की काय चालू आहे? आपली घर आणि कुटुंब ही संस्था मोडकळीस येत चालली आहे, नैतिक मूल्यांच्या कल्पना बदलत चालल्या आहेत, मानवी संस्कृतीचे अवमूल्यन होत आहे हे पाहून ही अस्वस्थता वाढतच चालली आहे. विज्ञानाने आपण मानवाचा यंत्रमानव तर बनविला, पण त्याच विज्ञानाच्याच मदतीने आपल्याला या यंत्रमानवाचा पुन्हा मानव करता येईल, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बाहेर आलेला बाटलीतील राक्षस आता पुन्हा बाटलीत कसा बंद करता येईल?

समाजातील विविध घटकांशी चर्चा करीत असताना असे जाणवते की एक मोठा वर्ग या बाबींमुळे अस्वस्थ आहे, पण या परिस्थितीत नेमका कसा मार्ग काढायचा याबद्दल गोंधळ आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणे योग्य असे सर्वाना वाटत असूनही मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत ही वस्तुस्थिती आहे! हे प्रकरण वाटते तितके सोपे राहिलेले नाही. विज्ञानातील नको त्या गोष्टींचा विळखा हळूहळू इतका घट्ट आवळला गेला आहे, की त्यातून बाहेर कसे यावे हा प्रश्नदेखील कुणाच्या मनात येईल अशी स्थिती उरलीच नाही! त्या विळख्यात राहूनच आपल्याला जीवन जगायचे आहे अशी धारणा आता प्रत्येकाची झाली आहे आणि त्या विळख्याला विळखा का म्हणावयाचे, असा उलट प्रश्न आता प्रत्येकाच्या तोंडी आला आहे किंवा येऊ  घातला आहे. हे सर्व वाचायला भयानक वाटेल, पण जर एक नजर आपल्या स्वत:च्या जीवनाकडे टाकली तर त्यात बरेच तथ्य आहे असे लक्षात येईल. हातातील मोबाइल किंवा खोलीतील दूरचित्रवाणी संच या दोन उपकरणांनी आपली जीवनशैली पार बदलून टाकली आहे.

दिवसाची सुरुवात जेथे होते भ्रमणध्वनीच्या रिंगेने

त्या देशाचे भविष्य घडले जाईल का विज्ञानाने?

सकाळी व्हाट्सअप, दुपारी फेसबुक अन् सायंकाळी?

पुन्हा व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेल मेसेज मात्र कधीकाळी!

अभ्यास आणि काम मात्र फक्त मधल्या फावल्या वेळात

नसेल एखादी सनसनाटी सीरियल किंवा मॅच जर त्या काळात!

पुस्तके वाचायची असतात सांगेल कोण कोणाला?

ऐकायला वेळ कसा असेल, भ्रमणध्वनी सर्वाच्याच कानाला!

चर्चा, भाषणे अन् संवाद यांतून होत असतो ज्ञानबोध

पण हे बोधामृत हवे आहे कुणाला, हाच घ्यायचाय शोध!

विज्ञानाची धडपड आहे जीवन सुखी करण्याची

ते सुखी जीवन कशासाठी? जाणीव नाही महत्त्वाची!

जन हो व्हा सावध, शिका तो नीर क्षीर विवेकी

विज्ञानाची ही अपत्ये वापरा हो नेमकी अन् नेटकी

कधी संपेल हे दुष्टचक्र अन् ऐकू येईल भूपाळी,

करील जडणघडण मनाची दररोजच्या सकाळी!

देशातील कोणत्याही भागातील १३ ते १६ वर्षांच्या मुलांशी बोलताना असे जाणवते की या मुलांना शिक्षक, शेतकरी किंवा वैज्ञानिक होण्यात अजिबात स्वारस्य नाही. वास्तविक पाहता या तीन क्षेत्रांमध्ये सृजनशीलतेसाठी जेवढा वाव असतो तेवढा इतर कोणत्याही क्षेत्रात नसतो. जर भारतातील नव्या पिढीला या सृजनशील व्यवसायांचे आकर्षण वाटत नसेल तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. म्हणूनच घर या संस्थेने शाळेबरोबरीनेच आपली जबाबदारी ओळखून मुलांना तसे मार्गदर्शन केले पाहिजे. अन्यथा विज्ञानाच्या प्रगतीमुळे प्रगत देशांचे गुलाम म्हणून जगण्याची पाळी आपल्यावर येऊ  शकते! यावर पालकांनी आपल्या मुलांसाठी दूरदर्शन मालिका बंद ठेवून आणि मोबाइलपासून दूर राहून २-३ तास तरी द्यायची खूप गरज आहे. त्यांना जर आपण घरातल्या घरात शेतीशास्त्राची ओळख करून दिली तर त्याचा त्यांच्या भावी आयुष्यात नक्कीच चांगला उपयोग होणार आहे. म्हणूनच घर आदर्श बनवायचे असले तर घरातले स्वयंपाकघर आणि हॉल आणि इतर खोल्या अद्ययावत करण्यापलीकडे आपल्याला बरीच मेहनत करावी लागणार आहे.

म्हणूनच आपण या मालिकेतून नवतंत्रज्ञानाची माहिती घेत असतानाच शेती, बागकाम आणि त्यात घडत असलेल्या बदलांची दखल घेणार आहोत. यातून स्फूर्ती घेऊन जर मुलांनी त्यांच्या घरात असे काही सुंदर प्रयोग केले आणि जर आम्हाला कळविले तर त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.

आपल्याला आता शेती क्षेत्रात व्हर्टिकल अ‍ॅग्रीकल्चर आणि हायड्रोपोनिक्स असे दोन नवीन परवलीचे शब्द ऐकू येऊ  लागले आहेत. मातीविरहित शेती असेही त्यास म्हणता येईल. पारंपरिक शेतीत इतके पाणी वापरले जाते त्याच्या फक्त ५ ते १०% प्रमाणात या नवीन प्रकारच्या शेतीसाठी लागणार आहे. आपल्याला ठिबक सिंचनाची जुजबी माहिती असतेच. ठिबक सिंचनाची निर्मिती इस्रायलने आपल्या वाळवंटात शेती फुलवण्यासाठी काही दशकांपूर्वी यशस्वी वापर करून शेती क्षेत्रात मोठीच क्रांती केली होती. आजही शेतीचा हा इस्रायल पॅटर्न जागतिक स्तरावर आदर्श म्हणून समजला जातो. पाणी वापराच्या बाबतीत हाच पॅटर्न आणखी गणितीय मॉडेल्सच्या आधाराने पुढे नेण्याचा प्रयत्न उभ्या शेतीत जात आहे. विशेषत: जिथे जागा कमी असते तिथे या नवीन तंत्राचा चांगला उपयोग होणार आहे. त्यातून उत्पादन तर घेता येईलच, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या शेतकीविषयक ज्ञानात चांगलीच भर टाकता येईल. नवीन पिढीच्या मनातदेखील त्यामुळे जिज्ञासा निर्माण होईल, त्याची परिणती समाजातील शेतकी प्रवृत्ती रुजविण्यासाठी आणि वृद्धीसाठी होईल. याच ध्येयाने प्रेरित होऊन लोकांसमोर ही मालिका मांडावीशी वाटत आहे.

गावागावांत जी शेते आपल्याला पाहावयास मिळतात त्यांना आडवी किंवा जमिनी सपाट शेती असे संबोधता येईल. लांबी, रुंदी आणि खोली अशा त्याच्या तीन बाजू असतात. उभ्या किंवा व्हर्टिकल शेतीत लांबी, रुंदी आणि उंची अशा तीन बाजू असणार आहेत. एकावर एक जसे आपण इमारतींचे मजले बांधतो. तसाच काहीसा हा व्हर्टिकल शेतीचा प्रकार आहे. जिथे बाल्कनी, गॅलरी किंवा अंगण उपलब्ध आहे आणि जर थोडा वेळ तरी ऊन येत असेल तर आपल्याला व्हर्टिकल शेती करता येईल. घराची दिशा (वास्तुशास्त्र म्हणून नव्हे, तर वनस्पतींच्या वाढीसाठी म्हणून!) जर पूर्व पश्चिम असेल तर त्याचा चांगला उपयोग आपल्याला या व्हर्टिकल शेतीसाठी करता येईल. ही शेती करताना आपल्याला सुरुवातीला फुलझाडे आणि भाज्या  वाढवायच्या आहेत. पालक, मेथी, लाल माठ, शेपू, चुका यांसारख्या पालेभाज्या, कोथिंबीर, मिरची, आलं, पुदिना यासारख्या हिरव्या मसाल्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि वांगी, भेंडीसारख्या फळभाज्या आपण घरी वाढवू शकतो.

शहरशेतीचे काही महत्त्वाचे फायदे

  • शहरातदेखील उन्हाच्या उपलब्धतेनुसार कमी जागेत शेतीचे प्रयोग करता येतील.
  • वर्षभर हवे तेव्हा हवे ते पीक घेता येऊ शकते.
  • पारंपरिक पद्धतीने केलेल्या शेतीत वापरलेल्या पाण्याचा निचरा होताना त्यातून पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न या प्रकारच्या शेतीत कमी होतील अशी अपेक्षा आहे.
  • शेतात लागणाऱ्या पारंपरिक इंधनाच्या गरजा कमी होऊ शकतील.
  • शेतीवरचे पर्जन्यराजाचे नियंत्रण कमी करता येऊ शकेल.
  • जुन्या आणि वापरात नसलेल्या पडीक जागांचा वापर यासाठी करता येऊ शकेल.
  • शहरातील जनतेत शेतकरी प्रवृत्ती निर्माण करून स्रोत निर्मितीची केंद्रे आपल्याला सुरू करता येतील.

– डॉ. शरद काळे

sharadkale@gmail.com

(लेखक भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आणि सिम्बायोसिस कचरा स्रोत व्यवस्थापन केंद्र येथे प्राध्यापक आहेत.)