तसं प्राणिप्रेम मला वारशाने मिळालंय!  माझ्या कुटुंबात सगळेच प्राणिप्रेमी आहेत. कर्जतला आमचं मोठं कुटुंब आहे. माझे काका-काकू, आजी वगैरे सगळे एकाच बिल्डिंगमध्ये राहायचो. या सगळ्या गडकरी गोतावळ्याला प्राण्यांची भयंकर आवड. आमच्याकडे मनीमाऊ होत्या, मासे होते, खारुताई होती इतकंच काय गोगलगायही होती. एक काळ तर आमच्या घरात तब्बल १२ मांजरं होती. त्यांचा निराळाच थाट होता. माझे आई-बाबा दोघंही नोकरीला तर मी शाळेत. ही बाराजणांची टीम एका काकूकडे जाऊन सकाळी गरम पोळी मटकवायची. मग पाळणाघरात गेल्यासारखं आजीच्या घरात जायचं. दिवसभर धुडगूस घालून झाला की संध्याकाळच्या चहाला दुसऱ्या काकूकडे हजर व्हायचं. संपूर्ण इमारतीमध्ये गडकरींची जेवढी घरं होती, त्याच ठिकाणी ही मांजरं बरोब्बर जात असत. दुसरीकडे कुठेही यांची घुसखोरी नसायची.

कर्जतच्या आमच्या घराला तर गमतीने मांजरींचा पांजरपोळ म्हणायचे. कारण अक्षरश: अनेक ठिकाणहून सोडलेल्या मांजरी आमच्याकडे आश्रयाला यायच्या. आमच्याकडे शुभीताई नावाची एक पांढरीशुभ्र मांजर होती. ती कमरेपासून पांगळी होती. ती पुढच्या पायावर चालायची आणि मागचं सगळं शरीर घासत जायची. तिला बहुधा अपघात झाला असावा किंवा कुणी तरी जबरदस्त मारलं असावं. माझे बाबा आयुर्वेदिक औषधं बनवतात. त्यांनी एक तेल खास शुभीताईसाठी बनवलं होतं. ते रोज शुभीताईला त्या तेलाने मॉलिश करायचे. असं करता करता शुभीताईचे मागचे पाय चक्क बरे झाले. नंतर नंतर तर ती इतकी मस्ती करायला लागली की थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी वगैरे मारायची.

एकदा मी ठाण्याला गेले असताना मला मुठीपेक्षाही मोठी गोगलगाय दिसली. तिला मी पर्समध्ये टाकून चक्क कॉलजला नेलं. वाटेत भाजीबाजारातून कोबीची पानं वगैरे घेतली आणि तिला खाऊ घातली. कॉलेज संपेपर्यंत मी बेंचखाली ती भलीथोरली गोगलगाय लपवली होती. थोडय़ा थोडय़ा वेळाने तिला पानं खायला देत होते. घरी गेल्यावर तर मज्जाच. बाबांनी तिचं नाव ठेवलं गिळगिळ. मी एका मोठय़ा टपात तिला ठेवलं. खायला प्यायला दिलं आणि थोडय़ा दिवसानंतर ती आणखी मोठी झाल्यावर तिला विहिरीत सोडून दिलं. आमच्या कर्जतच्या विहिरीत अनेक प्रकारचे मासेही मी सोडलेले आहेत. फिश टँकमध्ये माशांची वाढ खुंटते म्हणून त्यांना विहिरीच्या पाण्यात सोडून दिलं आहे. तिथल्या नैसर्गिक पाण्याला आणि हवामानाला ते आता चांगलेच सरावलेत. असंच एकदा माथेरानला गेलो असताना झाडावरून पडलेलं खारुताईचं पिल्लू सापडलं. पिल्लाचा एक पाय फ्रॅक्चर होता. आम्ही त्याला घरी घेऊन आलो. औषध लावलं. खाऊ दिला. थोडं मोठं होईपर्यंत ते पिल्लू आमच्याकडे होतं, त्याचं नाव चुबूक. दिवसभर उचापत्या करून झाल्या की संध्याकाळी मातीच्या फुलदाणीत केलेल्या त्याच्या खास बिछान्यात चुबूक मस्त झोपून जायची. मग एक दिवस ती आपली आपणच बागेत निघून गेली. पण आईने ठेवलेला आंबा, एखादं फळ खायला मुद्दाम ती आमच्याकडे चक्कर मारायची.

आता ठाण्याच्या माझ्या घराबद्दल. आमच्याकडे सध्या चिंगू आणि तिची पिल्लं बंडू आणि बच्चू राहतात. त्यांचा बाबा असलेला मुन्ना हा बोकाही होता. पण तो गेल्याच वर्षी गेला. ही पर्शिअन मांजरं आहेत. त्यांना थंड वातावरण लागतं. त्यामुळे ते एसीशिवाय झोपत नाहीत. शिवाय त्यांना भरपूर केसही असतात. त्यांची निगा राखावी लागते. त्यांच्यासाठी आमच्या घरातल्या फर्निचरचे कोपरे मुद्दामच गोलाकार ठेवले आहेत. जेणेकरून यांना लागू नये. तसंच सोफ्याचं कव्हरिंगही त्यांना आवडेल असं, पटकन न फाटेलसं आहे. खिडक्यांना जाळी लावली आहे. मुख्य म्हणजे घरात सगळ्या वस्तू पाच फुटाच्या वर आहेत, कारण या तिघांच्या हाती लागू नये म्हणून. या तिघांना आपलं शाकाहारी खाणं खूप आवडतं. वरणभात, साबुदाणा खिचडी तर यांची एकदम आवडती आहे.

आमच्या एका बेडरूमला बाल्कनी आणि बाथरूम दोन्ही जोडलेलं आहे, तिथे यांचा मुक्काम असतो. आम्हाला बाथरूम कायम कोरडी ठेवावी लागतात, कारण यांचे केस ओले झाले तर त्यांचा त्रास होऊ शकतो. हे तिघंही जण शी-शू वगैरे या बाथरूममध्ये जाऊन करतात. ते केल्यानंतर कुणी तरी ते साफ करावं लागतं. कारण यांना अस्वच्छता अजिबात चालत नाही. आमच्या घरात स्वयंपाकघर आणि हॉलच्या मध्ये एक पॅसेज आहे. तिथे बसून घरभर काय चाललंय हे न्याहाळणं त्यांना खूप आवडतं. बेडरूममध्ये जाऊन मस्त बेडवर ताणून द्यायला या तिघांनाही भयंकर आवडतं.  हे खोटं वाटेल, पण खरंच खरं आहे की आमची मांजरं टीव्ही बघतात. तोही स्वत:च सुरू करून. चिंगूबाईंना टीव्हीचं बटण बरोब्बर माहिती झालं आहे. सकाळी ६-७ तास हे तिघं घरी एकटेच असतात. कारण आम्ही आपापल्या कामाला जातो. त्या वेळात हे तिघं घरात भरपूर मस्ती करतात. मग जो घरी लवकर येईल त्याच्याकडून भरपूर लाड करून घेतात. आम्ही आमच्या या मांजरबाळांसाठी खाऊ आणतो, खेळणी आणतो.

बाबा या मार्जारत्रयीचे विशेष लाडके आहेत. बाबांकडून लाड करवून घ्यायचे, आईकडून खाऊ मिळवायचा आणि माझ्याकडून सगळी कामं करून घ्यायची, असा यांचा खाक्या असतो. चिंगूचं बाळंतपणही मीच केलं होतं. तिच्या अशक्त पिल्लांची मी खूप काळजी घेतली होती. अगदी उबेसाठी गरम पाण्याच्या बाटल्या भरून जवळ ठेवण्यापासून सारं काही केलं आहे. त्यांना डॉक्टरांकडेसुद्धा मीच घेऊन जाते. ग्रूमिंग, ब्रशिंगपासून सगळं करते. त्यामुळे चिंगूचा माझ्यावर जरा जास्त विश्वास आहे. खेळताना, मस्ती करताना तिला काही लागलं की ती ते फक्त मला दाखवते. मी थकून आल्यावर यांच्याशी न खेळता झोपले तर चालत नाही, मग ते माझ्या तोंडावरचं पांघरूण काढून टाकतात. चिंगू माझ्या कानात म्याव करते आणि तिला काय झालंय ते सांगते. कुठे लागलं असेल तर जखम दाखवते. मग मी उठून त्यावर मलमपट्टी केली की खूश होते.

आमच्या घराला घरपण देणाऱ्या या मनीमाऊंच्या करामती, लाड, डॉक्टरांची अपॉइंटमेंट्स यात वेळ कसा जातो कळतच नाही. यांच्यासाठी म्हणून आम्ही तिघे एकत्र कुठेच जात नाही. जेव्हा केव्हा जातो, तेव्हा कुणी ना कुणी असतंच. हे पाळीव प्राणी नसून खरं तर आमच्या घरातली माणसंच आहेत. त्यांच्याशिवाय आम्ही राहूच शकत नाही.

जुई गडकरी

swati.pandit@expressindia.com

शंब्दांकन – स्वाती केतकर-पंडित