अन्न आणि वस्त्र या मानवी जीवनातील मूलभूत गरजा. यांच्यासोबत निवारा या नावाची अजूनही एक गरज प्रामुख्याने उच्चारली जात असते. या तीन गरजांनी माणसाचा पाठपुरावा त्याच्या अगदी आदिम अवस्थेपासून केलेला आढळतो. सुसंस्कृतपणाचा स्पर्शही न झालेला हा माणूस नावाचा प्राणी जेव्हा या भूतलावर संचार करू लागला, तेव्हा अन्न या प्राथमिक गरजेची निकड त्याने त्याच्या निसर्गदत्त प्रेरणेच्या बळावर भागवली. वस्त्राची गरज निदान आदिमानवी अवस्थेत तरी त्याला भासली नसावी. किंबहुना ती त्याला कधी भासली असेल हा एका वेगळ्या संशोधनाचा विषय ठरावा. बहुधा समाज म्हणून एकत्र जगू लागण्याच्या कालखंडात, कधी तरी वस्त्रांनी त्याच्या आयुष्यात हळूच प्रवेश केला असावा. मात्र निवारा नावाची गरज अन्नासोबतच त्याच्या पाठंगुळीला बसली होती. तेथेही त्याची अंत:प्रेरणा बहुधा त्याच्या कामी आली असावी. कधी कुण्या डोंगरांच्या नैसर्गिक कपारींच्या आश्रयाला, कधी कुण्या कडय़ाच्या तळवटीला, कधी कुण्या भल्या प्रचंड वृक्षाच्या गर्द छायेमध्ये, कदाचित पाऊसपाण्यापासून, उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यानं आसरा घेतला असावा आणि निवाऱ्याचं सुख अपघातानंच त्याच्या ध्यानी आलं असावं. कदाचित हे पहिलं पाऊलच त्याच्या प्रगतीची नांदी ठरलं असावं. या गरजांच्या जोडीला निद्रा, भय, मैथुन, इत्यादींचा ससेमिराही त्याच्यापाठी होताच. ही सगळी ओझी घेऊन हा बिचारा माणूस त्याच्या प्रवासाला निघालेला आपल्याला दिसतो..

विचार करता ठळकपणे जाणवतं की, होमो सेपियन ते त्याची सुधारलेली आवृत्ती या त्याच्या प्रगतीच्या साऱ्याच प्रवासात भयानं त्याचा अथकपणे पिच्छा पुरवलेला आहे. बहुधा एकटाच राहणारा, स्वत:चे संरक्षण स्वत:च करू पाहणारा. स्वत:चे पालनपोषण स्वत: करू पाहणारा, कमीत कमी गरजा असलेला, कमीत कमी आकांक्षा बाळगणारा अन् तरीही भयगंडाने पछाडलेला. स्वत:चे अस्तित्व राखावे, याच सहजसुलभ भावनेपोटी, येणाऱ्या हरएक प्रसंगाना पाय जागीच रोवून तोंड देणारा, असा हा सर्वसाधारण आदिमानव आपल्या डोळ्यांपुढे उभा राहतो. मग जाणवतं की, बहुधा हीच त्याच्या मानसिक अन् सामाजिक उत्क्रांतीची सुरुवात असावी! मी आणि माझं अन् मग जे माझे ते इतरांचे काय म्हणून हा विचार अन् त्यातून आहे ते प्राणपणाने राखण्याची जाणीव, ही बहुधा त्याच्या उत्क्रांतीची व त्यातून झालेल्या त्याच्या घडणीची गुरुकिल्ली ठरली. शिकार करून, कंदमुळे, फळे भक्षून उदरनिर्वाह करू शकणारा हा आदिम मानव, ‘भविष्यातली गरज’ या भावनेची ओळख होताच उद्यमी बनला. अविरत कष्टांच्या जोरावर, बुद्धीचा वापर करत तो वैयक्तिक अन् सामाजिक सुधारणांची एक एक पायरी काहीशा अट्टहासाने, काहीशा अपरिहार्यतेने तर काहीशा अजाणतेपणाने ओलांडत राहिला. एकटय़ाने सुरू केलेल्या या प्रवासाच्या वाटेवर मग त्याला भेटले, त्याच्याचसारखे सोबती. वैयक्तिक गरजा मग सामूहिक झाल्या. वैयक्तिक भयगंडही सामूहिक झाला अन् त्यातून उपजला आहे, ते राखण्याचा विचार, अन् मग त्यासाठी लागणाऱ्या मनोनिग्रहाची अन् साधनांची जुळवाजुळव..

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प
Holi 2024: Five Zodiac Signs Lucky On Rang panchami
होळीला चंद्र ग्रहण व ४ दुर्मिळ योग बनल्याने ‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार; ‘अशा’ रूपात दारी येईल लक्ष्मी?

मानववंशशास्त्राच्या दृष्टीने माणसाची सर्वात प्रबळ भावना स्वसंरक्षणाची. तिचा उगम हा असा बहुधा भयापोटी झाला असावा. या भयाच्या भावनेतूनच समूह जन्माला आले. समूहाने राहण्याचे फायदे ध्यानी येऊ  लागले. मग शोध सुरू झाला वस्ती करण्यास योग्य स्थानाचा. जिथे जमीन पिकाऊ  असेल, नदीचा पाण्याने दाटलेला काठ असेल, शिकारीची निकड भागवणारी अरण्ये असतील, भटक्या आयुष्याला स्थैर्य लाभेल असे स्थान असेल- अशा स्थानी मग जगभरच्या संस्कृतींनी पाय रोवले. छोटय़ा वस्त्या, खेडी जन्माला आली. उपजीविकेची, शिकारीखेरीज, शेतीसारखी साधने याआधीच मानवाच्या आकलनशक्तीला आकळली होती. आता फिरस्त्यांचे पाय थांबले. हा होता मानवी इतिहासातील उत्क्रांतीच्या संक्रमणाचा काळ. नवे पर्व. नवी पहाट. नवी वाट. नव्या चिंता. नवे प्रश्न. यावर सुचणारे उपाय अन् उत्तरेही नवीन!

सावलीसारखा पायाशी घुटमळणारा भयगंड सोबतीस होताच. यातून उद्भवलेल्या स्वसंरक्षणाच्या जाणिवेनेच बहुधा गुहांच्या दारात पेटलेल्या शेकोटय़ांना अन् काटेरी वेलींना जन्म दिला. थोडकी प्रगती झाली अन् हा मानव गुहांमधून बाहेर पडला, झाडांच्या शेंडय़ांवरून खाली उतरला. स्वत:भोवती अनघड धोंडय़ांच्या भिंती बांधून राहू लागला. भय काहीसं उणावलं. मात्र पुरतं गेलं नाही. पावलं पुढे पुढे पडत राहिली अन् मग भिंतींच्या माथ्यावर छप्पर आलं. भिंतींमधून आत शिरायला दार आलं. दाराला कवाड आलं. सशासारखं हालणारं काळीज आता काहीसं निश्चतावलं. आता अशा एका आसऱ्याला पाहून तशी अनेक घरं एकमेकांच्या सोबतीने उभी राहिली. पहिलं खेडं हे असं जन्मलं. असाच काही काळ गेला आणि घरांच्या भिंती खेडय़ाभोवती पसरल्या. त्याला दार आलं. असं गावकुसू आकाराला आलं. आक्रमणांपासून, अन्यायांपासून, संतापणाऱ्या निसर्गापासून, स्वत:चे, स्वत:च्याच मालमत्तेचे रक्षण करावे किंबहुना, पायाशी सावलीसारख्या वावरणाऱ्या भयापासून संरक्षण हवे या निसर्गदत्त भावनेने जेव्हा प्रगत रूप धारण केले, नेमका तोच होता तटबंदी अन् दुर्ग या संकल्पनांचा जन्मकाळ. हे बहुधा नवाश्मयुगाच्या सुरुवातीला झालं असावं!

तत्पूर्वीची कथा वेदकाळापासून सुरू होते. या कालखंडातल्या दुर्गाची माहिती करून घेण्यासाठी वेद हीच साधने उपलब्ध आहेत. किंबहुना जोपर्यंत सिंधू संस्कृतीच्या लिपीचा उलगडा होत नाही व त्यामधून दुर्गासंबंधी काही माहिती उपलब्ध होत नाही, तोवर वेद हेच इतिहासाच्या उगमकाळातील दुर्गासंबंधी माहिती देणारी साधने ठरतात. वेदांमध्ये दुर्गाच्या बांधणीबद्दल, त्यांच्या वेढय़ांबद्दल अन् त्यांच्या विनाशाबद्दल अनेक उल्लेख आहेत. ऋग्वेदाच्या अनेक ऋचांमध्ये ‘पुर’ हा शब्द अनेकदा आढळतो. ‘पुर’ याचा अर्थ शहर. मात्र इथे हा शब्द बहुधा दुर्ग, तटबंदी वा गढी अशा अर्थानं वापरला गेला असावा. इंद्र हा वैदिक साहित्यातला देवसेनापती. त्याने असुरांच्या पुरांचा केलेला विनाश ऋग्वेदातल्या अनेक ऋचांमध्ये अतिशय उत्कटतेने प्रकटला आहे. इंद्राचा पुरंदर, पुरांदर्भ म्हणजे पुरांचा विनाश करणारा, पुरांचा भेद करणारा, अशा विशेषणांनी उल्लेख केलेला आहे. असुरांच्या पुरांचा नाश करण्यासाठी इंद्राला विनवणी करणारी अनेक सूक्ते वेदांमध्ये आहेत. एका सूत्रात म्हटले आहे :

‘प्रास्मै गायत्रमर्चत वावातुर्य: पुरन्दर:।

याभि: काण्वस्योप बर्हिरासदं यासद्वज्री भिनत्पुर:।’

अर्थ असा की, देवमित्रांसाठी दुर्गाचा विनाश करणाऱ्या इंद्राचे सामाने अर्चन करा. दुर्गाचा विनाश करण्यासाठी त्या वज्रपाणी इंद्राची स्तवने म्हणा.

‘तव च्यौत्रानि वज्रहस्त तानि नव यत्पुरो नवतिं च सद्य:

निवेशने शततमाविवेषीरहञ्च वृत्रं नमुचिमुताहन’

अर्थ असा की, हे वज्रहस्ता, हाती वज्र धारण केलेल्या तू तर शंबराच्या नव्व्याण्णव पुरांचा विध्वंस केलास अन् शंभरावे पुर तू स्वत:साठी ठेवून घेतलेस. तुम्ही वृत्रासुराचे अन् नमुचीचेसुद्धा हनन केलेत.

दुसरी एक प्रार्थना म्हणते :

‘आ वृषस्व महामह महे नृतम राधसे।

दृळ्हश्चिदृह्य़ मघवन्मघत्तये’

या प्रार्थनेचा सारांश असा की, या असुरांच्या भक्कम अशा पुरांचा तू विध्वंस कर, म्हणजे त्यांच्याकडच्या अपार धनाचा लाभ होईल.

हे वानगीदाखल दिलेली काही सूक्त झाली. मात्र यातून संदर्भ घेता येतात की, वेदांच्या रचनाकाळीसुद्धा दुर्गबांधणीचे शास्त्र अतिशय प्रगत अवस्थेत होते.

दुसरी ऋचा म्हणते :

‘शतमश्मन्मयीनां पुरामिन्द्रो व्यास्यत् दिवोदासाय दाशुषे’।

(शंबरासुराची) अश्ममयी- म्हणजे दगडाने बनलेली- शंभर पुरे इंद्राने दिवोदासाला दिली.

अर्थ असा की, शंभर पुरे- म्हणजेच दुर्गरूप शहरे- वसवून नांदवण्याएवढी संपन्न अशी समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था त्या काळात अस्तित्वात होती. ‘अश्ममयी’ म्हणजे दगडांनी बांधलेले, ‘शारदीय’ म्हणजे शरद ऋतूमध्ये निवास करण्यास निर्मिलेले (बहुधा शरद ऋतूमध्ये हिमालयात वितळलेल्या बर्फामुळे नद्यांस येणाऱ्या पुरापासून रक्षण करण्यास निर्मिलेले, असाही कदाचित याचा गर्भितार्थ असावा.) अशाही दुर्गाचा उल्लेख वेदवाङ्मयामध्ये सापडतो. ‘शतभुजी’ दुर्गाचे उल्लेखही इथे आपल्याला सापडतात. इथे भुजा याचा अर्थ बाहू अथवा आजच्या परिभाषेत बुरूज असा घ्यावा. शिल्पशास्त्रांवरच्या ‘जयपृच्छा’ या ग्रंथात अशा भुजांच्या अथवा बुरुजांच्या संख्येनुसार दुर्गाना वेगवेगळी नावे दिलेली आढळतात. विख्यात व्याकरणकार पाणिनीच्या मते दुर्ग, तटबंदी, खंदक, द्वारे, बुरूज अशांनी युक्त असलेली अनेक शहरे त्याकाळी अस्तित्वात होती.

जसजसा काळ पुढे सरकत राहिला, तसतशी प्रगतीसुद्धा होत गेली. त्यातूनच अधिकाधिक संरक्षणाची गरज भासू लागली अन् त्यामुळेच दुर्गशास्त्रातही नवनवीन रचना होत राहिल्या. या संक्रमणाच्या अवस्थेतून दुर्गाचे अनेकानेक प्रकार जन्माला आले. उदाहरणच द्यायचं झालं तर धनुर्वेद ही यजुर्वेदाची एक शाखा. त्याच्याही सात उपशाखा निर्माण झाल्या. वसिष्ठ, विश्वमित्र, भारद्वाज, जमदग्नी, वैशंपायन, शाङ्र्गधर व औशनस असे हे सात धनुर्वेद. त्यांपैकी औशनस धनुर्वेदात सहा निरनिराळ्या प्रकारच्या दुर्गाची लक्षणे व नावे सांगितलेली आहेत; ती अशी – धन्वदुर्ग म्हणजे वाळवंटातील दुर्ग. महीदुर्ग म्हणजे जमिनीवर रचलेला दुर्ग. जलदुर्ग म्हणजे पाण्यात असलेला वा काही बाजूंनी पाण्याने वेढलेला असा दुर्ग. वनदुर्ग म्हणजे दुर्गम, दरुलघ्य अशा अरण्याने वेढलेला असा दुर्ग. बलदुर्ग म्हणजे असीम पराक्रमी, शक्तिमान अशा योद्धय़ांनी बनलेला अथवा निवास केलेला दुर्ग. अन् शेवटचा गिरिदुर्ग म्हणजे आरोहणास वा आक्रमणास दुर्धर, शरवर्षांवाच्याही कक्षेबाहेरचा, सर्व गुणांनी युक्त असा पर्वतदुर्ग- आणि सर्व दुर्गामध्ये तोच श्रेयस्कर :

‘दुरारोहं परेधुरं शरपातस्य गोचरात्।

सर्वसम्पत्यमायुक्तं दरुग स्यात्पार्वतं श्रिये।।’

या अशा उल्लेखांवरून उपनिषदकाळातील दुर्गाच्या प्रगत अवस्थेचा अतिशय नेटका अंदाज येतो. स्मृतिकारांनी दुर्गाची जी लक्षणे, उपयोग व प्रकार सांगितले, ते खरोखरीच मनन करण्याजोगे आहेत. बोधायन व आपस्तंब धर्मसूत्रे आणि याज्ञवल्क्य, विष्णू, बृहस्पती, नारद, मनू या साऱ्याच स्मृतिकारांनी दुर्गाचे नाना प्रकार वर्णन केले आहेत.

मनू म्हणतो :

यथा दुर्गाश्रितान् एतान् नोपहिंसन्ति शत्रव:।

तथोऽअरयो न हिंसन्ति नृपं दुर्गसमाश्रितम्।।

एक: शतं योधयति प्राकारस्थो धनुर्धर:।

शतं दशसहस्रणि तस्माद् दरुग विधीयते।।

हरणांसारख्या श्वापदांनी दुर्गाचा आश्रय घेताच ती जशी भयमुक्त होतात, अगदी त्याचप्रमाणे, दुर्गामध्ये आश्रय घेतलेला राजा शत्रूच्या भयापासून मुक्त असतो. दुर्गामध्ये लपलेला एक धनुर्धर बाहेरून आक्रमण करणाऱ्या शंभर योद्धय़ांना पुरून उरतो. अन् असे शंभर धनुर्धर दशसहस्रांशी लढू शकतात.

राजनीतिरत्नाकराचा कर्ता चांडेश्वर म्हणतो : राजाने त्याचा खजिना कुशल, लायक अशा अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली कुण्या दुर्गम दुर्गात ठेवावा :

‘एयं पशव्यमाजाव्यं जाङ्गलं देशमाविशेत्।

तत्र दुर्गाणि कुर्वीत जनकोशात्मगुप्तये।।

तत्र तत्र च निष्णातानध्यक्षान् कुशलानृजून।

प्रकुय्र्यादायकम्र्मव्ययकर्मेसु चोद्यतान्।।’

मनू दुर्गाचे सहा प्रकार सांगतो :

‘धन्वर्दरुग महीदरुग अब्दरुग वाक्र्षमेव वा।

नृदरुग गिरिदरुग वा समाश्रित्य वसेत्पुरम्।।

सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदरुग समाश्रयेत्।

एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गो विशिष्यते।।

त्रिण्याद्यान्याश्रितास् त्वेषां मृगगर्ताश्रयाप्चरा:।

त्रीण्युत्तराणि क्रमश: प्लवंगमनरामरा:।।’

औशनस धनुर्वेदातल जे सहा प्रकार, तेच मनू सांगतो. धन्वदुर्ग म्हणजे आजूबाजूच्या २० कोस अंतरात पाण्याचा अंशही नसलेला असा वाळवंटातील दुर्ग. महीदुर्ग म्हणजे सपाटीवर रचलेला, अठरा फूट उंचीची व सैन्यास तटमाथ्यावरून चालता येण्याजोग्या रुंदीची तटबंदी असलेला दुर्ग. चहुबाजूंनी पाण्याने वेढलेला तो अब्दुर्ग. चहूबाजूंनी चार कोस घनदाट अरण्याने वेढलेला तो वाक्र्षदुर्ग. हत्तीदळ, घोडदळ, रथदळ व पायदळ अशा चतुरंग दळाच्या मांडणीतून रचला गेलेला तो नृदुर्ग (महाभारतात वर्णन केलेले निरनिराळे व्यूह, हे बहुधा या नृदुर्ग वा बलदुर्गाचेच प्रकार असावेत.) आणि पर्वताच्या शिखरावर रचलेला, दुर्गम वाटा असलेला, नद्यांनी वेढलेला असा गिरिदुर्ग. हा मनूच्या मते, सर्वोत्कृष्ट दुर्गप्रकार. इतर दुर्गाच्या उणिवा सांगताना मनू म्हणतो : धनुदुर्गाला इरिणचा म्हणजे वाळवंटाचा, महीदुर्गाला उंदरांचा, जलदुर्गाला साप व मगरींसारख्या जलचरांचा, वाक्र्षदुर्गाला माकडांचा, तर नृदुर्गाला अपरंपार मनुष्यसंख्येचा त्रास. मात्र आभाळात मस्तके असलेल्या गिरिदुर्गावर देवतांचा वास असतो. त्यामुळे राजाने राहण्यासाठी गिरिदुर्ग सर्वोत्तम! अशा दुर्गामध्ये धनधान्य व शस्त्रास्त्रे यांचा साठा करून, गुप्त कार्यालये राखून, मध्यभागी राजाने आपला प्रासाद निर्माण करावा.

वाल्मीकीरामायण अयोध्येच्या दुर्गाचे वर्णन करताना

म्हणते :

‘कपाटतोरणवर्ती सुविभक्तान्तरापणाम् ।

सर्वयन्त्रायुधवतीं उषितां सर्वशिल्पिभि: ।।

सूतमागधसंबाधाम् श्रीमतीम् अतुल प्रभाम् ।

उच्चाट्टालध्वजवतीं शतघ्नीशतसंकुलाम्।।

दुर्गगंभीरपरिखां दुर्गामन्यैर्दुरासदां।

वाजिवारणसंपूर्णां गोभिरुष्टै: खरैस्तथा।।’

सारांश असा की, या अयोध्येत ठरावीक अंतरावर युद्धसज्ज अशी कपाटे म्हणजे प्रवेशद्वारे होती. युद्धासाठी लागणारी यंत्रे तयार करणारे शिल्पिजन या नगरीत वा दुर्गात वास्तव्यास होते. ध्वज फडफडणाऱ्या उंच अट्टालिकांवर शतघ्नीसारखी शेकडो यंत्रे युद्धसज्ज होती. दुर्गतटबंदीचा सारा परीघ खंदकाने वेढलला होता. घोडे, हत्ती, बैल, उंट व खेचरांनी गजबजलेला तो दुर्ग शत्रूसाठी अतिशय दुर्गम होता.

इ.स.च्या चौथ्या पाचव्या शतकात- गुप्तकाळात पुराणांची रचना झाली. म्हणजे जे ज्ञान इतकी सहस्रके कंठस्थ होते, पिढय़ानपिढय़ांनी पाठांतराने राखून ठेवलेले होते ते शब्दबद्ध झाले. त्यात काही कालानुरूप नवीन भर पडली. या अवघ्या पुराणकारांनीही दुर्ग या विषयाचा सखोल ऊहापोह केला आहे. त्यासंबंधीची पुराणकारांची मतेसुद्धा निश्चितच चिंतनीय आहेत. अग्निपुराण, देवीपुराण, मत्स्यपुराण, ब्रह्मांडपुराण अन् ब्रह्मवैवर्तपुराण आदि पुराणांमध्ये दुर्ग या विषयाचे सखोल विवेचन केलेले आढळते. दुर्गाचे बांधकाम, तटबंदी व खंदक ही दुर्गाची प्रमुख अंगे, असे या पुराणकारांचे मत आहे. दुर्गातील सर्व महत्त्वाच्या इमारती दुर्गाच्या मध्यभागी हव्या, शस्त्रास्त्रांचा भरपूर साठा हवा, युद्धयंत्रे सज्ज हवीत असेही मत यात नोंदवलेले आहे. दुर्गामध्ये वसलेले शहर कशा पद्धतीने रचलेले असावे याविषयीचे मार्गदर्शनही या पुराणांमध्ये आढळून येते. राजवाडा कुठे, खजिना कुठे, गजशाळा, शस्त्रागार, स्वयंपाकघर कुठे, विप्रांची, मंत्र्यांची घरे कुठे असायला हवी, वेदाध्ययन करणारे व शिकवणारे यांनी कुठे राहावे, अश्वशाळा, गोशाळा कुठे असाव्यात, दुर्गाच्या संरक्षणासाठी कोणते उपाय योजावेत, कोणत्या वस्तूंचा भरणा दुर्गात करून ठेवावा यांविषयीची मुद्देसूद माहिती पुराणकारांनी दिली आहे.

पुराणांच्या रचनाकालाचा विचार केला तर निरपवादपणे सांगता येते की, या काळात दुर्गबांधणीशास्त्रासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चितपणे अस्तित्वात होती. अनादी काळापासून चालत आलेला केवळ निखळ संरक्षणाचा विचार या काळात काहीसा दुय्यम ठरला होता. त्याची जागा घेतली होती राजकीय धोरणांनी. निरनिराळ्या प्रकारच्या दुर्गाचा उपयोग करून घेऊन राज्य कसे निर्माण करावे, ते कसे वाढवावे व कसे राखावे, हा विचार दृढ होऊ  लागला होता. या विचाराला चालना देण्यासाठी समाजातील नाना विद्वान, विचारवंत पुढे येऊन आपापली मते मांडत होते. मार्गदर्शक सूत्रांच्या माध्यमातून आपापल्या ठाम भूमिका समाजापुढे ठेवत होते. मागल्यांच्या उणिवा दूर करीत पुढल्या पिढीतील विचारवंत नव्या विचारांच्या नवनवीन पायघडय़ा घालीत वर्तमान पिढय़ांचा मार्ग सुकर करीत होते.

यामागचे कारण अतिशय स्पष्ट होते. या नाना रूपरंगांच्या, नाना आकारांच्या, नाना नावांनी ओळखल्या जाणाऱ्या, नाना प्रकारच्या दुर्गाच्या अस्तित्वावरच तत्कालीन समाजजीवन, त्या त्या राज्याची संस्कृती, प्रतिष्ठा, अस्तित्व हे सारेच अवलंबून होते. अन् त्यासाठी हे करणे भाग होते. बहुधा आदिमानवाच्या गुहेच्या दारात उभा असलेला तो भयगंड याही पिढय़ांच्या अस्तित्वाला वाकुल्या दाखवत उभा होताच!

डॉ. मिलिंद पराडकर

discover.horizon@gmail.com

(लेखकाने ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ या विद्याशाखेत ‘दुर्गशास्त्र’ या विषयात पीएचडी केली आहे.)