19 November 2017

News Flash

परसबाग

हौस, वेळ अणि जागा असली तरी वनस्पतींची संपूर्ण माहिती असल्याशिवाय त्या घरी लावणे शक्य

विश्वास अजिंक्य | Updated: July 15, 2017 1:58 AM

प्रत्येकाला आपले घर नीट नेटके व सुंदर असावे, त्याभोवती शोभिवंत झाडे, सुगंधी फुलझाडे असावीत असे वाटते. पूर्वी लोकांकडे राहण्यासाठी मोठमोठे वाडे अथवा घरे होती. त्याभोवती खूप मोठी जागा असायची. तिथे फळांची, फुलांची, भाज्यांची झाडे असत. आता पूर्वीचे वाडे गेले. ऐसपैस जागाही गेली. त्यांची जागा आता प्लॉटस् आणि गगनचुंबी इमारतींतील फ्लॅट्सने घेतली. शहरामध्ये स्वतंत्र प्लॉट ही मध्यमवर्गीयांसाठी कठीण गोष्ट बनली आहे; परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे टेरेस गार्डनच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांचे बागेचे स्वप्न साकार होऊ शकते. यामध्ये घराच्या गच्चीवर, व्हरांडा, पोर्च, बाल्कनीमध्ये परसबाग फुलवता येते. यातून दैनंदिन उपयोगासाठी फुले, फळे, औषधे मिळतात व बागकामाचा छंदही जोपासला जातो. आपण लावलेल्या फुलझाडांमुळे व शोभिवंत वनस्पतींमुळे अतिशय रम्य वातावरण तयार होऊन सौंदर्यात भर पडते. परसबागेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिच्यापासून मिळणारे मानसिक समाधान.

हौस, वेळ अणि जागा असली तरी वनस्पतींची संपूर्ण माहिती असल्याशिवाय त्या घरी लावणे शक्य होत नाही. म्हणूनच त्यांची माहिती करून घेऊन परसबागेचा छंद जोपासता येतो. परसबागेतील कामे सुलभ व कमी वेळेत होण्यासाठी हाताशी अवजारे असणे आवश्यक आहे. झाडांभोवतालची माती हलविण्यासाठी खुरपे, मोठय़ा फांद्या-डहाळ्या तोडण्यासाठी कोयता, कलम करण्यासाठी चाकू, झाडांची छाटणी करण्यासाठी सिकेटर, कीटकनाशके फवारणीसाठी पंप, झारी, घराभोवतालच्या मोठय़ा बागेसाठी कुदळ, फावडे, घमेले इत्यादींची गरज भासते.

परसबागेत वृक्षवर्गीय फुलझाडे लावायची झाल्यास पारिजातक, सोनचाफा, झुडूपवर्गीय लावायची झाल्यास जास्वंद, गुलाब, मोगरा, शेवंती, अबोली, वेलवर्गीय जाई, जुई, चमेली तर कंदवर्गीय निशिगंध, झिनिया, लिली ही फुलझाडे लावता येतील. तर घरगुती औषधांसाठी अडुळसा, वेखंड, गवती चहा, तुळस या औषधी वनस्पतींचा परसबागेत समावेश करता येईल. परसबाग मोठी असेल तरच फळझाडे आणि भाजीपाल्यांचा विचार होऊ शकतो. शोभेसाठी  कॅलेडियम, पॉर्चुलकॅरिया, बिगोनिया, क्रोटान या वनस्पतींच्या रंगीबेरंगी पानांच्या रचनेमुळे बागेची रमणीयता खुलते. फुलझाडांना भरपूर सूर्यप्रकाशाची व मोकळ्या हवेची आवश्यकता असते. पुरेसा सूर्यप्रकाश नसेल तर झाडांची चांगली वाढ होत नाही.

कुंडीतील वनस्पतीजीवन कृत्रिमच असणार. तीत मातीही थोडीशी. तिच्यातील जीवनसत्त्वेदेखील मोजकीच व अल्पशीच. ही उणीव भरून काढण्याकरिता वेळोवेळी खतांचा उपयोग करावा. परसबागेमध्ये कम्पोस्ट व  शेणखत, गांडूळखत, लेंडीखत, निंबोळी व सरकी पेंड यांचा वापर क्रमप्राप्त ठरतो. सेंद्रिय पदार्थामुळे मातीच्या कणांची रचना दाणेदार बनून स्थिर तर होतेच, शिवाय जलधारणाशक्ती वाढते. निचरा योग्य होतो. कमी किंवा जास्त प्रमाणात पाणी किंवा खत देणे हेसुद्धा झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम करते. म्हणूनच खत-पाणी मोजून घातल्यास त्याचा वनस्पतींच्या वाढीवर व निरोगीपणावर चांगला परिणाम दिसून येतो. घरातून ठेवलेल्या कुंडय़ातील झाडांवर बहुधा पांढऱ्या रंगाची मऊ कीड पडते. बागेत चोरपावलाने शिरणाऱ्या किडी व रोग यांच्यापासून बागेचे संरक्षण करावयास हवे. वनस्पतींच्या संरक्षणासाठी लिंबोळी तसेच विविध वनस्पतींच्या अर्काबरोबरच गोमूत्र, ट्रायकोग्रामा, क्रायसोपल हे जैविक घटक, तसेच ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस या परोपकारी बुरशींचा वापर करता येतो.

घराच्या गच्चीवर परसबाग करण्यासाठी वॉटरप्रूफिंगचे चांगले काम करून त्यावर पॉलिथीन अंथरून गांडूळखत, कंपोस्टखत, पोयटा माती वापरून अतिशय उत्तम माध्यम तयार करता येईल. पोयटय़ाच्या म्हणजे नदीकाठच्या मळईच्या जमिनीत पिकांना पोषक अन्नांश भरपूर असतो. त्यामध्ये रेती, मातीचे मध्यम आणि बारीक कण, नदीच्या पुराबरोबर वाहून येणारे सेंद्रिय पदार्थ भरपूर असतात. पोयटय़ाची माती उपलब्ध नसल्यास मातीचे उत्तम मिश्रण म्हणजे २ भाग खूप सडलेले शेणखत. २ भाग बागेची माती आणि एक भाग रेती. गच्ची उपलब्ध नसल्यास बाल्कनी, पोर्च, व्हरांडा यांचाही वापर करता येतो. त्यासाठी दीड-दोन फूट खोलीच्या कुंडय़ा वापरता येतात. त्या चांगल्या भाजणीच्या व मातीच्या असाव्यात कारण त्यातून पाण्याचा उत्तम निचरा होतो व मुळांचा हवेशी संपर्क आल्याने झाडांची जोमाने वाढ होते. कुंडय़ा भरताना तळाशी छिद्र असल्याची खात्री करून प्रथम तळामध्ये विटांचे तुकड भरावेत. मग त्यावर पोयटा माती, कम्पोस्ट खत समप्रमाणात मिसळून कुंडी भरावी. पण कुंडीत एकच झाड लावावे. खोलीत अथवा व्हरांडय़ात टांगण्यासाठी तारेच्या कुंडय़ा वापराव्यात. अशा कुंडय़ांतून नॅस्टरशियम, पिटुनिया, व्हरबेनिया अशी झाडे लावून कुंडय़ा दिवाणखान्यात किंवा व्हरांडय़ात टांगून ठेवल्यास अतिशय सुंदर दिसतात.

‘बोन्साय’ म्हणजे कुंडय़ांतून वृक्षांची शेती करणे. जपानी उद्यानकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. मोठमोठे वृक्ष कुंडय़ांमध्ये सर्वसाधारण रोपांप्रमाणेच लावले जातात. त्यांची रोपे केवळ दीड-दोन फूट उंचीची असतात. लहान बोन्सायची रोपे तर ५-६ इंचच उंचीची असतात. या रोपांचा आकार लहान असतो. पण रूप मात्र मोठय़ा वृक्षांप्रमाणे असते. कुंडय़ांत लावलेले हे वृक्ष बघताना आपण नैसर्गिकरीत्या उगवलेले मोठे वृक्षच बघतो आहोत असे वाटते. ज्या वृक्षाचे जे महत्त्व, विशेषत: अथवा सौंदर्य असेल ते बोन्सायमध्ये विकसित करून प्रदर्शित केले जाते.

परसबागेमुळे घराची शोभा तर वाढतेच, पण घरातील लहान मुलांना वनस्पतीच्या लागवडीविषयी तसेच उपयुक्ततेविषयी माहिती मिळते व आपल्यालाही निर्मितीचा आनंद मिळतो.

फुलांची हौस असणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या फ्लॉवरपॉटमधील फुलांचा ताजेपणा जास्तीत जास्त टिकून राहावा असे वाटते. त्यासाठी लांब दांडीसह फुले कापावीत. फुले कधीही तोडू नयेत. लांब देठ असले की फुले लवकर कोमेजत नाहीत. देठातून त्यांना आवश्यक ती पोषकद्रव्ये काही काळ मिळत राहतात. फुले पूर्ण उमलण्यापूर्वीच तोडावीत, अर्धवट उमललेली फुले जास्त वेळपर्यंत ताजी राहतात. फुले तोडल्यावर केवळ शोभेकरिता १-२ पाने ठेवून बाकीची पाने तोडून टाकावीत. नाही तर पानांची पोषणक्रिया चालू राहून देठातील सर्व जीवनरस पाने शोषून घेतात व फुलांची उपासमार होऊन ते लवकर कोमेजून जातात. फ्लॉवरपॉटमधील पाण्यात साखर, अ‍ॅस्पिरीन आणि कोळसा टाकून तसेच पाना-फुलांवर पाण्याचा स्प्रे मारून फुले जास्त वेळ ताजी ठेवता येतात.

– विश्वास अजिंक्य

First Published on July 15, 2017 12:13 am

Web Title: marathi articles on modern terrace garden