23 February 2019

News Flash

रेराअंतर्गत सलोखा मंच

सलोखा किंवा सामंजस्य हा सर्वोत्तम मार्ग आहे

वाद निकाली काढण्याचे जे अनेकानेक मार्ग आहेत त्यापैकी सलोखा किंवा सामंजस्य हा सर्वोत्तम मार्ग आहे, याबाबत कोणाचेही दुमत होण्याचे काहीच कारण नाही. रेरा कायदा आणि महारेराच्या स्थापनेपासून महारेराला प्राप्त तक्रारींपैकी बऱ्याच तक्रारी सामंजस्याने निकाली निघालेल्या आहेत.

रेरा कायदा कलम ३२(ग) नुसार ग्राहक आणि विकासक यांच्यातील वाद सामंजस्याने निकाली काढण्याकरिता सुयोग्य व्यासपीठ उपलब्ध करणे हे महारेरा प्राधिकरणाचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्यानुसारच आता महारेरा प्राधिकरणांतर्गत सलोखा मंच स्थापन करण्यात आलेला आहे आणि लवकरच हा मंच कार्यान्वित होईल अशी आशा आहे. महारेरा प्राधिकरणाचे सचिव हे या मंचाचे अध्यक्ष आहेत, क्रेडाई आणि नरेडको या विकासकांच्या संस्थांचे १८ सदस्य आणि मुंबई ग्राहक पंचायतीचे १५ सदस्य असे एकूण ३३ सदस्य आहेत. १ फेब्रुवारीपासून या मंचाचे कामकाज सुरू झाले आहे. या मंचाची कारवाई कशी चालेल हे स्पष्ट करण्याकरिता महारेरा प्राधिकरणाने ३० जानेवारी २०१८ रोजी एक परिपत्रक काढलेले आहे. या परिपत्रकानुसार सध्या मुंबईकरिता दहा तर पुण्याकरिता ५ सलोखा मंच स्थापन करण्यात येणार आहेत. मुंबईमधील मंच महारेरा कार्यालय, विले पार्ले येथील ग्राहक भवन, चर्चगेट, पवई आणि ठाणे येथील एम.सी.एच.आय आणि नरेडको कार्यालय येथून, तर पुण्यातील मंच औंधमधील महारेरा कार्यालयातून कामकाज करणार आहे. तक्रारदाराने या मंचाकडे अर्ज केल्यावर त्याची प्रत विरोधी पक्षाला पाठविण्यात येणार आहे आणि विरोधी पक्षाने समझोता करण्याची इच्छा दर्शविल्यास तक्रारदाराला रु. १,०००/- इतके शुल्क भरावे लागणार आहे आणि शुल्क भरल्यानंतर ते प्रकरण मंचाकडे पाठविण्यात येईल. उभयतांमध्ये समेट झाल्यास उत्तम, समेट न झाल्यास महारेराकडे दाद मागण्याचे स्वातंत्र्य असेल. समजा समेट झाला आणि त्यातील अटी व शर्तीचे पालन झाले नाही, तर त्याविरोधात महारेराकडे तक्रार करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा मंच केवळ आणि केवळ ग्राहक आणि विकासक यांच्यातील वादाकरिताच आहे.

प्राप्त तक्रारींवर महारेरा प्राधिकरणातील सध्याच्या कामकाजानुसार देखील तक्रारदार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद सामंजस्याने सुटण्याची, त्यांच्यात समेट होण्याची काही शक्यता आहे का, याची चाचपणी केली जाते. या चाचपणीदरम्यान समेटाची शक्यता वाटल्यास त्याकरिता काही कालावधी देण्यात येतो, समेट झाल्यास तक्रार निकाली निघते आणि न झाल्यास देखील तक्रार गुणवत्तेच्या मुद्दय़ावर निकाली निघतेच.

महारेरा प्राधिकरण, तेथील कार्यपद्धती आणि हा नवीन मंच याचा एकसमयावच्छेदाने विचार केल्यास महारेराच्या कार्यालयांऐवजी इतर बऱ्याच ठिकाणी सुनावणीची सोय वगळता या मंचाने नक्की कोणता नवीन उद्देश सफल होणार आहे, याचे उत्तर मिळत नाही.

या सलोखा मंचाकडे दाखल तक्रार सामंजस्यात निकाली निघाली तर आणि तरच त्या मंचाचा फायदा होणार आहे. समजा समेट नाही झाला आणि तक्रार किंवा वाद तसाच राहिला तर या मंचाचा आणि मंचापुढे ग्राहकाचा आणि विकासकाचा वेळ वाया गेला असेच म्हणायला लागेल. बरं समेट न झाल्याने तक्रारदारास परत नव्याने महारेरा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करणे भाग पडणार. या नवीन तक्रारीची पुन्हा नव्याने सुनावणी होणार आणि मग निकाल येणार. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे अंतिम निर्णय किंवा अंतिम निकाल येण्यास विलंब होणार, जो होऊ नये याच उद्देशाने रेरा कायदा आणि महारेरा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे.

कोणत्याही न्यायालयीन लढाईत गुप्तता हेदेखील एक मोठे आणि महत्त्वाचे हत्यार आहे. एखादी तक्रार कशी बनवण्यात येते, त्यात कोणते मुद्दे घेतले जातात, या सगळ्या बाबींवर तक्रारीचे यशापयश अवलंबून असते हे निर्विवाद सत्य आहे. सध्या महारेरा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल झाल्यावरच विरोधी पक्षाला त्या तक्रारीची प्रत आणि माहिती मिळते. त्या ऐवजी समजा पहिल्यांदा या सलोखा मंचाकडे तक्रार केली, तिथे समेट झाला तर उत्तमच, अन्यथा विरोधी पक्षाला तक्रारदाराच्या तक्रारीची, वादाची, मुद्दय़ांची बरीचशी आगाऊ माहिती मिळते हा मोठाच धोका आहे. अशा परिस्थितीत समेट अयशस्वी झाल्यावर तक्रारदार महारेरा प्राधिकरणाकडे नक्की काय आणि कशा स्वरूपाची तक्रार करणार आहे याचा अंदाज बांधणे फारसे कठीण निश्चितच नाही. असा अंदाज आला की त्या अनुषंगाने स्वत:च्या बचावाची तयारी करणे देखील सोपे जाते.

या सगळ्याचा एकत्रितपणे विचार करता ज्या तक्रारदारांना आपला वाद किंवा तक्रार समेटाने मिटेल याची खात्री असेल त्यांनी आणि त्यांनीच या सलोखा मंचाकडे जावे. कायद्याचा विचार करता सध्या तरी आधी सलोखा मंचाकडेच जावे लागेल, त्यानंतरच महारेरा प्राधिकरणाकडे तक्रार करता येईल अशी कोणतीही कायदेशीर बाधा नाही. यास्तव दीर्घकालीन आणि अंतिम फायदा लक्षात घेता ज्या तक्रारदारांना समेटाची खात्री नसेल त्यांनी रीतसर तक्रार दाखल करावी. सलोखा करायचाच झाला तर तो महारेरा प्राधिकरणाकडे देखील करता येणे शक्य आहे.

– अ‍ॅड. तन्मय केतकर

tanmayketkar@gmail.com

First Published on February 3, 2018 4:17 am

Web Title: marathi articles on rera act 2017 part 3