रामायण आणि महाभारत या दोन प्राचीन काव्यांचा भारतीय समाजमनावर फार मोठा प्रभाव आहे. जय नावाच्या इतिहासापासून सुरू होऊन महाभारतापर्यंतच्या काव्याच्या प्रवासात या काव्याला ‘महा’ करण्यासाठी अनेक गोष्टींची भर पडत गेली. व्यासांनीच म्हटल्याप्रमाणे महाभारत हा इतिहास असल्याने त्यात राजनीती, राजवंश, युद्धवर्णन यांसारखे विषय मुख्य होते. त्यामुळे वास्तुशास्त्राचे वर्णन तुलनेने कमी आहे. पण जे संदर्भ मिळतात, त्यात काही खास प्रकारच्या वास्तूंचा उल्लेख आहे. त्यावरून त्या काळातील वास्तुरचनेच्या संकल्पना समजायला थोडय़ा फार प्रमाणात का होईना, निश्चितपणे उपयोग होतो.
कोणताही प्रासाद हा अनेक स्तंभांवर उभा असतो, पण महाभारतात मात्र एका वेगळ्या प्रासादाचा उल्लेख आहे. अठरा पर्वाच्या या महाकाव्याची सुरुवात आदिपर्वाने होते. या पर्वात राजा परीक्षिताची कथा आहे. परीक्षित राजा मृगयेला गेलेला असताना शमक नावाच्या ध्यानमग्न ऋषीला पाहतो. त्याला ऋषीची थट्टा करण्याची लहर येते. जवळच पडलेला मृतसर्प तो शमकाच्या गळ्यात टाकतो. शमकाचा मुलगा शृंगी हे सारे पाहातो आणि ‘तक्षकदंशाने मरशील’ असा शाप राजाला देतो. त्यावेळी स्वसंरक्षणासाठी सर्व सुखसोयींनी युक्त असा केवळ एका खांबाचा प्रासाद परीक्षित बनवतो. भारतीय स्थापत्यात प्रासाद हे अनेक मजली असल्याने त्या मजल्यांचा भार पेलण्यासाठी भरपूर स्तंभ असणे गरजेचे आहे. त्यामुळेच बहुस्तंभकत्व हे प्रासादांचे वैशिष्टय़ होते. त्यामुळे एकखांबी प्रासाद हे थोडेसे अतिरंजन वाटते. फार तर एखादा भव्य कक्ष किंवा खोली अशी ही रचना असू शकते. तरीसुद्धा हा एक खांबाचा प्रासाद वास्तुरचनेचा वेगळा प्रकार म्हणून आपले लक्ष आकर्षति करतो. आनंद कुमारस्वामींनी ‘अर्ली इंडियन आíकटेक्चर-पॅलेस’ या पुस्तकात व्हिएतनामची राजधानी हनोईत अजूनही उभ्या असलेल्या अशा एकखांबी पॅगोडाचा उल्लेख केला आहे. दुसरा प्रसंग आहे लाक्षागृहाचा. धृतराष्ट्राने पांडवांना वारणावतात जाऊन राहाण्यास सांगितल्यावर दुर्योधन पुरोचन या त्याच्या खास स्थपतीला बोलावून भरपूर धन खर्च करून उत्तम प्रासाद बनवण्यास सांगतो. हा उत्तम प्रासाद कसा बनवावा त्याच्या खास सूचनाही देतो. त्यानुसार प्रासादाच्या िभती उभ्या करताना त्यात तेल, तूप, चरबी आणि मोठय़ा प्रमाणात लाखेचा उपयोग करण्यास सांगतो. याशिवाय भिंतींना ‘शण’ म्हणजे घायपातीचा एक प्रकार (Cannabis Sativa or Crotolaria Juncea), राळ, अशा ज्वालाग्राही पदार्थाचा लेप दिलेला आहे. प्रासादाच्या अंतर्गत रचनेत लाकडी वस्तूंचा संग्रह कोणालाही संशय येणार नाही अशा प्रकारे करण्याची सूचना आहे. पण विदुराला दुर्योधनाच्या या कारस्थानाची कल्पना असते. पांडव वारणावतात राहायला गेल्यावर विदूर उत्तम खंदक खणणाऱ्या एका माणसाला तेथे पाठवतो. तो अत्यंत गुप्तपणे प्रासादाच्या मधून एक सुरूंग काढतो. या सुरूंगाचे द्वार प्रासादाच्या भूमीशी समतल असल्याने कुणालाही त्याच्या खाली सुरूंग आहे याची कल्पना येत नाही. भुयारांनी युक्त अशा या प्रासादाची तुलना संकटकाळी पळून जाण्यासाठी गुप्त मार्ग असलेल्या कौटिल्याच्या भूमिगृहाशी करता येते. कौटिल्याच्या वास्तुशास्त्रात आपण या भूमिगृहाचा विचार अधिक सविस्तरपणे करणार आहोत.  
द्रौपदीशी विवाह करून पांडव हस्तिनापुरी आले. त्यावेळी आपली मुलं व पांडव एकत्र राहू शकत नाहीत याची जाणीव असलेल्या धृतराष्ट्राने पांडवांना खांडवप्रस्थाला जाऊन तिथे नवीन नगरी वसवण्यास सांगितली. ही नगरी मुळात पौरव नरेशांची राजधानी होती. पण मुनींनी ती नष्ट केली होती. ती पुन्हा वसवण्याचा आदेश धृतराष्ट्राने दिला. या नगरीचा स्थपती विश्वकम्र्याने कृष्णाच्या आज्ञेनुसार नगरीची रचना करायला सुरुवात केली.  सर्वप्रथम नगरी वसवण्यासाठी योग्य ती मापं त्याने घेतली, असे महाभारतकार म्हणतात. ही मापं जरी दिली नसली तरी जमीन मोजण्याचे काम प्रथम झाले आहे. कोणत्याही वास्तूच्या निर्मितीसाठी जमिनीची निवड आणि मापं या प्राथमिक गोष्टी असतात. त्यामुळे त्यांचा उल्लेख सर्वत्र दिसून येतो. अगदी कौरव-पांडवांच्या अस्त्रविद्य्ोच्या प्रदर्शनासाठी जो मांडव घातला, त्यासाठीदेखील वृक्ष, मोठमोठय़ा शिळाविरहित जमिनीची निवड केल्यावर तिची मापं घेऊन वास्तुपूजन केल्याचा उल्लेख सभापर्वाच्या एकशे बत्तिसाव्या अध्यायात येतो; तर जनमेजयाने केलेल्या सर्पसत्रासाठीदेखील अशाच प्रकारे वास्तुशास्त्रविशारदांनी भूमीची मापं घेतल्याचा उल्लेख आदिपर्वातील एकावन्नाव्या अध्यायात आहे. चंद्रासारखी शुभ्र धवल अशी ही हस्तिनापुरी चारी बाजूंनी सागरासारख्या भव्य खंदकांनी युक्त होती. त्याच्या प्रवेशद्वाराची तुलना पक्षीराज गरुडाच्या उघडलेल्या पंखांशी केली आहे. या उपमेतून द्वाराची भव्यता आणि भक्कमपणा दोन्हीही स्पष्ट होतात. नगरीत विविध शस्त्रांनी युक्त अशी शस्त्रागारं, फिरण्यासाठी दीर्घ मार्ग होते. सौंदर्यवृद्धीसाठी उद्यानं, उपवनं, कमळ व हंस, सारस अशा पक्ष्यांनी युक्त अशा नगरीची निर्मिती झाल्यावर विद्वान ब्राह्मण, शिल्पकार म्हणजेच विविध कारागीर तिथे निवासाला आले. थोडक्यात, एका परिपूर्ण नगरीची निर्मिती झाली.
मयसभा
महाभारतातील आणखी एक महत्त्वाची वास्तू म्हणजे मयसभा. मयसभेचा स्थपती आहे मयासुर. या वास्तूच्या निर्मितीसाठी लागणारे बरेचसे साहित्य मयासुराने हिरण्यशृंग पर्वताजवळील िबदुसार नावाच्या तीर्थावरून घेऊन आल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. या िबदुसार तीर्थाच्या संदर्भात व्यासांनी आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. हिरण्यशृंग पर्वत कैलास पर्वताच्या उत्तरेला मनाक पर्वताजवळ आहे. त्या ठिकाणी प्रजापतीने अनेक यज्ञ केले होते. या यज्ञांसाठी मणिमय खांब व सोन्याच्या वेदी उभ्या केल्या असल्याचे सांगून व्यास म्हणतात, या साऱ्या गोष्टी केवळ शोभेसाठी निर्माण केल्या होत्या. कोणत्याही शास्त्रीय सिद्धांतानुसार त्यांची निर्मिती नव्हती.
शोभरथ विहितास्तत्र न तु दृष्टान्तत: कृता।.. (आदि ३. १३)
मयासुर या िबदुसार तीर्थावर जाऊन मयसभेसाठी लागणारे बरेचसे साहित्य आणि खासकरून स्फटिक घेऊन आला.
तत्र गत्वा स जग्राह गदां शङखं च भारत।
स्फटिकं सभाद्रव्यं यदासीत् वृषपर्वण:॥ (सभा, ३.१८)
साहित्याची जमवाजमव झाल्यावर दहा हजार हात विस्तृत अशा लांब-रुंद मयसभेची निर्मिती केली. तिच्या भोवताली असणाऱ्या परकोट व फाटकांना उत्तम रत्ने बसवली होती. सभेत जागोजागी वृक्ष, वनं, उपवनं व वापी होत्या. मयसभेच्या मध्यभागी असणारी रमणीय पुष्करिणी सभेच्या सौंदर्यात भर घालत होती. या सभेच्या निर्मितीला नेमका किती काळ लागला होता ते व्यासांनी नमूद केले आहे.
ईदृशीं तां सभां कृत्वा मास: परिचतुर्दशै:।
निष्ठितां धर्मराजाय मयो राजन् न्यवेदयत्॥ (सभा, ३. ३७)
(धर्मराजासाठी निर्माण केलेल्या या मयसभेला १४ महिन्यांचा कालावधी लागला होता).
या मयसभेचे अधिक वर्णन द्यूतपर्वात येते. मयसभेचे वर्णन ऐकून ती बघायला उत्सुक असलेला दुर्योधन जातो. पण ती मयसभा असल्याने तेथे वेगवेगळ्या भूल घालणाऱ्या, गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी असतात आणि त्यातून दुर्योधनाची उडालेली फजिती वर्णन केली आहे. खरे तर मयसभेच्या वर्णनापेक्षा दुर्योधनाची फजिती दाखवण्यातच कवीला जास्त रस आहे. पण तरीसुद्धा मयसेभीतील काही विशिष्ट रचनांचे वर्णन तिथे येते. स्फटिकमय स्थानाशी आल्यावर येथे पाणी आहे असे समजून तो आपली वस्त्रं उचलून चालू लागतो, नंतर प्रत्यक्षात जिथे स्फटिकासारखे स्वच्छ जल होते, तिथे मात्र पाणी आहे असे लक्षात न आल्याने पुढे जातो आणि पाण्यात पडतो. दुसऱ्या एका ठिकाणी स्फटिकाचा दरवाजा असतो. तो न जाणवल्यामुळे दुर्योधन आत शिरू लागल्यावर त्याचे डोके त्यावर आपटते. अर्थात, दुर्योधनाची झाली तशी फजिती मयसभेच्या निर्मितीनंतर तिथे जे राजे आले होते, त्यांचीही झाल्याचे व्यासांनी म्हटले आहे. मयसभेतील या पुष्करिणीत असंख्य रत्न अशा प्रकारे बसवली होती की, पुष्करिणीचे अस्तित्व जाणवत नव्हते. त्यामुळे ते पाण्यात पडले.
नमित्तिक रचना
राजसूय यज्ञ किंवा कौरव-पांडवांतील द्यूत क्रीडेसाठी मुद्दाम नव्या वास्तू उभ्या केल्याचे दिसून येते. राजसूय यज्ञाला अनेक राजे येणार म्हणून धर्माने इंद्रप्रस्थात खास निवास व्यवस्था उभी केली होती. नव्याने उभ्या केलेल्या या वास्तू खाद्यपदार्थानी परिपूर्ण होत्या, स्नानासाठी असलेल्या दीíघका म्हणजे आधुनिक काळातील स्वीमिंगपूल वृक्षांनी परिवेष्टीत होत्या. उंच उंच अशा या प्रासादात चढून जाण्यासाठी सोपान किंवा जिने होते. जागोजागी भव्य आसने मांडली होती. प्रासाद पुष्पमालांनी सजवलेले असून सर्वत्र लावलेल्या अगरूंमुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते. प्राचीन काळातील साऱ्याच वास्तूंप्रमाणे हे प्रासादही शुभ्र धवल होते. स्वाभाविकपणे त्यांची तुलना हंस व चंद्राशी केलेली दिसते.
राजसूयाप्रमाणे दुर्योधनाने पांडवांना द्यूतात हरवण्याचा निर्णय घेतल्यावर धृतराष्ट्राने आपल्या कार्यात पारंगत अशा हजार कारागिरांना निर्भय होऊन तोरणस्फाटिक नावाचे द्यूतगृह उभे करण्याची आज्ञा दिली. एक कोस लांब-रुंद असलेली ही द्यूतसभा सहस्रस्तंभा म्हणजे एक हजार सुवर्ण खांबांची होती. ती वैदुर्य रत्नाने सजवलेली व १०० दरवाजांनी युक्त होती (द्यूतपर्व १७- २०). महाभारतात नव्याने निर्माण केलेल्या इंद्रप्रस्थ नगरीचा उल्लेख आहे. द्रौपदीशी विवाह झाल्यावर कौरव पुन्हा हस्तिनापूरला येतात. त्यावेळी कौरव-पांडव एकत्र राहू शकणार नाहीत याची जाणीव धृतराष्ट्राला असल्यामुळे तो त्यांना खांडवप्रस्थाला जाऊन तिथे नवी नगरी वसवून राहाण्यास सांगतो. धृतराष्ट्राच्या आज्ञेने पांडव भयंकर अशा वनाच्या दिशेने प्रस्थान करतात.
 प्रतस्थिरे ततो घोरं वनं तन्मनुजर्षभा:।
तिथे गेल्यावर नगररचनाशास्त्रानुसार पांडव प्रथम जमीन मोजतात. नंतर चारी बाजूंनी प्रचंड खंदक असलेल्या अशा या नगरीची रचना होते. नगरी अंकुश, शतघ्नी अशा शस्त्रांनी आणि असंख्य योद्धय़ांनी संरक्षित होती, असे वर्णन आदिपर्वात येते.
रामायण व महाभारत हा इतिहास आहे, अशी भारतीयांची धारणा असल्यामुळे या काव्यांतील काही महत्त्वाच्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. हस्तिनापूर व त्याच्या अवतीभवती पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेल्या विटा १८ इंच लांब, ११ इंच रुंद व ३ इंच उंच आहेत. गोलाकार विटांचा उपयोग गोल विहिरींसाठी केल्याचे दिसते. घरातील कचरा, शिळे अन्न, खराब पाणी गोळा करण्यासाठी अडीच फूट पक्क्या मातीचे कुंड सापडले. याव्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट उत्खननात सापडली, ती म्हणजे हस्तिनापूरच्या दुसऱ्या स्तरात माती, राखेचे अवशेष सापडले. त्यावरून या वस्तीचा ऱ्हास भीषण अग्निकांडाने झाला असावा, असे वाटते. परीक्षिताचा मृत्यू सर्पदंशाने झाल्यामुळे संतापलेल्या त्याच्या मुलाने जनमेजयाने सूड म्हणून सर्पसत्र केले. मंत्रोच्चारण सुरू झाल्यावर सर्व ठिकाणांहून सर्प त्या यज्ञात येऊन पडू लागले, असे या सर्पसत्राचे वर्णन केले आहे. या यज्ञात साऱ्या सर्पाची आहुती दिली गेली. ही आहुती देण्यासाठी सगळीकडून सर्प पकडून आणले असतील का सर्प असलेल्या जंगलाला पेटवून देऊन हे कार्य पूर्ण केले असेल, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्प संख्या अधिक असलेले ठिकाण निश्चित करून तेथील जंगल पेटवून सर्पसत्र केले गेले असेल तर उत्खननात मिळालेल्या राखेचा संदर्भ वाचकांना लागू शकतो.
या पाश्र्वभूमीवर प्राचीन काव्य किंवा साहित्यातील संदर्भ आणि पुरातत्त्व विद्य्ोसारखे शास्त्र यांची सांगड घालून संस्कृत साहित्याचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे, असे वाटते.

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…