News Flash

गोविंदपूरम्चं संस्मरणीय विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

गगनाला गवसणी घालणाऱ्या मंदिरांच्या गगनचुंबी गोपुरांच्या गराडय़ात अस्सल मराठी पद्धतीचे हेमाडपंथी देऊळ दृष्टीला पडल्यावर भक्तिभावानं ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही.

| August 2, 2014 01:22 am

गगनाला गवसणी घालणाऱ्या मंदिरांच्या गगनचुंबी गोपुरांच्या गराडय़ात अस्सल मराठी पद्धतीचे हेमाडपंथी देऊळ दृष्टीला पडल्यावर भक्तिभावानं ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही.
कुंभकोणमजवळच्या काही स्थानांना भेट देत असताना एका अस्सल ‘मराठी’ स्थानाला जाण्याचा योग आला. ते ठिकाण म्हणजेच श्रीविठ्ठल-रुक्मिणीचं भव्य मंदिर. चक्क तामिळनाडूमधलं! इथली सगळी विठ्ठल मंदिरं एकत्रित भव्यतेत कमी पडतील एवढं विशाल! प्रत्येक विठ्ठलभक्तानं आवर्जून भेट द्यावी किंवा ते बघण्यासाठी तरी विठ्ठलभक्त व्हावं अशी ही कलाकृती!
कांची कामकोटीचे ५९वे पीठाधिपती श्री. बोधेंद्र सरस्वती यांची समाधी असलेल्या स्थानाजवळ नामसंकीर्तनाचं महत्त्व पटवून देणारी व्याख्यानं व प्रवचन करून जमवलेल्या निधीतून या मंदिराच्या बांधकामाला २००४ साली सुरुवात झाली व ते २०११ मध्ये पूर्णही झालं. हेमाडपंथी प्रकारात मोडणारं अस्सल ‘मऱ्हाठी’ पद्धतीचं हे वास्तुशिल्प तमीळ व मराठी कारागिरांनी एकत्रितपणे सारं कौशल्य पणाला लावून उभारल्याची खात्री इथं गेल्यावर पटते. सूर्यनमस्काराच्या १३२ भागांनुसार १३२ फुटांची उंची ठेवण्यासाठी ४० फूट उंचीवर ९२ फूट उंचीचं गोपूर बांधलं असून १८ हा यशाचा अंक मानून या उंचीवर तांब्याचा कळस व २७ नक्षत्रांएवढय़ा पायऱ्या या मंदिराच्या कलाकृतींच्या अप्रतिम सौंदर्यात भर टाकतात. मंदिराच्या आतल्या भागात ६०० चौ. फू. अर्थमंडप सुमारे ५००० भक्तांना ध्यान करण्यासाठी, तसेच वसंत मंडप २००० चौ. फू. क्षेत्रफळाचा महामंडप व महाद्वार अशी याची अंतर्गत रचना आहे. प्रवेश करण्यापूर्वी दोन भव्य मराठमोळे द्वारपाल नजरेत भरतात. इथल्या आकर्षक मूर्तीचं दर्शन घेताना चरणस्पर्शाची सोय केली गेली आहे. मंदिराच्या उत्तरेकडे तीर्थ (पुष्करिणी) असून जवळच बोधिवृक्षाखाली वरदविनायक स्थापित केला आहे. मंदिर वास्तुशिल्प शास्त्राचे निकष लावले तर दक्षिणेत प्रचलित असलेला नंदी, नारद, मय् मरकडेयादि वास्तुमहर्षीनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बनविलेलं आहे. याच्या आवारात अनेक औषधी वनस्पती व पारंपरिक फुलझाडं, फळझाडं व सुगंधी फुलांचे वृक्ष यांची लागवड केली गेली आहे.
दक्षिणेतील मंदिरांना गोशाळेशिवाय पूर्णत्त्व येऊच शकत नाही. इथे तर श्रीकृष्ण अवतार पांडुरंगाचं अस्तित्व असल्यानं जवळच गोशाळाही बांधली आहे. द्वारका, वृंदावन व मथुरा येथून आणलेल्या ३०० देशी गायी व त्याचबरोबर येथील स्थानिक प्रजातीच्या  ३०० मिळून एकूण ६०० गायी आहेत. या गायींच्या सान्निध्यात राहण्याची व फिरण्याची विशेष व्यवस्था असून गोशाळा स्वच्छता व टापटीप कसोशीने राखली गेली आहे. इथे गायींची दररोज वैद्यकीय चिकित्सा केली जाते. इथलं १० लिटर दूध जवळच्या थिरूवडईमुरदूर मंदिरातील शिवलिंगावर अभिषेकासाठी दिलं जातं. इथं गायीच्या खाद्यासाठी दान भक्तांकडून स्वीकारलं जातं. इथल्या दुधाची विक्री केली जात नाही. तंजावर जिल्ह्य़ातील थिगलूरच्या चंद्रमंदिराकडे जाताना रस्त्यात एका वेगळ्या विश्वात नेणाऱ्या गोमय व गोमूत्राचा गंध या गोशाळेच्या अस्तित्वाची जाण करून देतो.
गगनाला गवसणी घालणाऱ्या मंदिरांच्या गगनचुंबी गोपुरांच्या गराडय़ात अस्सल मराठी पद्धतीचे हेमाडपंथी देऊळ दृष्टीला पडल्यावर भक्तिभावानं ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. या दक्षिणी राज्यात २७४ शिवमंदिरं, १०८ विष्णू व दिव्यदेशमचं तसेच लक्ष्मी विनायक व सुब्रह्मण्यम या देवतांची अगणित देवालयं असताना त्यात कांचीपूरम, कोइम्बतूर येथील विठ्ठल मंदिरांव्यतिरिक्त गोविंदपूरम्च्या विठ्ठलमंदिराची भर पडली आहे.
वास्तू हे आपल्या मनाचं प्रतिबिंब असते. मंदिरबांधणी ही मुळात राज्यकर्त्यांच्या मनातील श्रद्धा, आस्था, जिव्हाळा, सृष्टीकर्त्यांबद्दल कृतज्ञतेची भावना इत्यादीची अभिव्यक्ती होय. अशा प्रकारची मानसिक जडणघडण असलेल्या राज्यकर्त्यांच्या प्रदेशात भव्यदिव्य मंदिर शिल्पांची निर्मिती झालेली आढळते. या मंदिरांचा केवळ धार्मिक दृष्टिकोन नसून सामाजिक न्यायनिवाडा, विषमता दूर करण्यात, दान व अन्नदान व आरोग्यकारक यज्ञचिकित्सा, वृक्षवनस्पती, पशुपक्षी यांना देवत्व बहाल करून पर्यावरणरक्षणाचा संदेश, सामाजिक एकसंधता धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था इ. गोष्टींचा अंतर्भाव होतो. अशा मंदिरांच्या प्रदेशातून परत आल्यावर विश्रांती घेताना या मंदिरांच्या दिव्यकृती व निसर्ग डोळ्यापुढून सरकतच राहतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:22 am

Web Title: memorable vittal rukmini temple of govindapuram
Next Stories
1 वास्तुगिरी- वास्तुरचना आणि संवेदनशीलता
2 पुनर्विकासातील नव्या घरांत दिव्याखाली अंधार!
3 आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी
Just Now!
X