09 July 2020

News Flash

चाळीतली संस्मरणीय दिवाळी..

तेव्हा मिळालेल्या बोनस रकमेतून कपडा-लत्ता, फटाके, सुगंधी साबण, तेल, अत्तर, इतर खरेदी याचा जमाखर्च मांडण्यात बाबा बिझी असायचे.

 

|| पुरुषोत्तम कृ. आठलेकर

मुंबईतील जुन्या चाळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, सणवार, उत्सव आदी घडामोडीच्या साक्षीदार राहिल्या आहेत. आता जीर्ण झालेल्या या चाळी हळूहळू कालबा होऊ लागल्या असून, त्याची जागा आता उंचच उंच टॉवर्स घेत आहेत. गिरगाव, परळ, लालबाग, दादर येथे आजही अशा जुन्या चाळी आहेत, ज्यांना हेरिटेजचा दर्जा हवा असे वाटते. कारण लाकडी जीने, उत्तम सागवानचे दरवाजे. छोटय़ा, पण आखीव खोल्या, हवा खेळती राहावी म्हणून खिडक्या, मोठय़ा गॅलऱ्या, त्याला लाकडाचे रेलिंग अशा समोरासमोरील चाळी आणि मध्ये छोटेसे पटांगण अशा या वास्तूतल्या आठवणी आजही ताज्या आहेत. काळाबरोबर राहणीमान, आचारविचारांचे संदर्भ बदलत जाणार ही वास्तविकता स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. पण संवेदनशील मन हे जपले गेले पाहिजे. अशा या चाळींमधून साजरी होणारी दिवाळी म्हणजे एक आनंदाचा उत्सव असायचा. दिवाळीची चाहूल लागायची तीच घराघरांमधून येणाऱ्या खमंग वासांनीच. फराळ तयार करण्यासाठी सर्व गृहिणींची पिठाच्या गिरणीकडे जाण्याची होणारी लगबग, फराळाचा पदार्थ तयार होतच नमुना म्हणून शेजाऱ्यांना चव दाखवून त्याच्याकडून प्रशस्तिपत्र घेण्याची तत्परता, शाळांना तेव्हा २१ दिवस सुट्टी असावयाची. मग सगळी मुले घरचा आणि सार्वजनिक कंदील बनविण्यात मग्न असायची. तेव्हा मिळालेल्या बोनस रकमेतून कपडा-लत्ता, फटाके, सुगंधी साबण, तेल, अत्तर, इतर खरेदी याचा जमाखर्च मांडण्यात बाबा बिझी असायचे. प्रत्येक घरात किमान ५/६ माणसे असत. मग केलेल्या खरेदीचे समान वाटप होत असे. वसुबारस ते भाऊबीज अशी सहा दिवस दिवाळी, त्याप्रमाणे फटाक्यांचे थोडे थोडे वाटप होत असे. अशी सर्व तयारी करत असताना अभ्यंगस्नानाचा पहिला दिवस म्हणजे मग आम्हा मुलांमध्ये स्पर्धा असायची. अगदी पहाटे लवकर उठून कोण फटाके फोडतोय, अशाच वेळी घरा-घरातून रेडिओवर लागलेल्या कीर्तनाचे स्वर ऐकू यायचे. सुगंधी उटणे, तेल, साबण लावून अभ्यंगस्नान झाले की नवीन खरेदी केलेले कपडे घालून देवळात जात असू. देवदर्शन झाले की घरातले, शेजारी सर्वानी एकत्र येऊन मस्तपकी फराळ करावयाचा.. हे सर्व अलिखित नियम होते. संस्कार होते. संस्कृती होती.

शेजारधर्म, पाहुणचार, आदरातिथ्य ही जी काही शिकवण मिळाली ती या चाळींतूनच. त्यामुळे आजही त्यावेळची दिवाळी मनात घर करून आहे. काळानुरूप व बदलती जीवनशैली यामध्ये नक्कीच बदल झालेत. आचारविचारसुद्धा बदलत चालले असले तरी चाळीमध्ये आजही तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने साजरी होणारी दिवाळी अविस्मरणीयच!

pkathalekar@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 7:16 am

Web Title: memorial diwali in chawl abn 97 2
Next Stories
1 घर.. एक सोबती, एक सच्चा मित्र
2 वस्तू आणि वास्तू : ताटं, वाटय़ा, तवे, चमचे!
3 महारेराचे नवीन परिपत्रक : प्रकल्प नोंदणी आणि करार नोंदणी
Just Now!
X