एक कलाकार म्हणून विविध भूमिका साकारताना वेगवगळ्या सेट्सवर, घरांमध्ये शूटिंग होतं. प्रत्येक मालिकेतल्या सेटवरचं, घरातलं वातावरण वेगळं.. परंतु काम करताना काही काळ का होईना त्या सेट्शी, घरांशी एक कलाकार म्हणून बंध जुळतात. अनेकदा असंही होतं, की शूटिंगचा कार्यभाग उरकला की मागे त्या सेट्सच्या, घराच्या फारशा खुणा मनात उरत नाहीत. पण शुटिंगची काही ठिकाणं, घरं कळत नकळत मनात घर करून राहतात.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’या मालिकेमधील अभिमानची भूमिका साकारताना ‘सरंजामे निवास’ या घराशी पियुष म्हणूनही एक वेगळं नातं जोडलं गेलंय. हे घर मला गावच्या घराची आठवण करून देतं, आणि म्हणून ते मला जास्त आवडतं, जवळचं वाटतं. आपल्या फ्लॅट संस्कृतीमधल्या बंदिस्त जीवनशैलीमुळेही असू शकेल कदाचित, पण या ‘सरंजामे निवास’ची आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गावच्या घराची अनुभूती सुखावून जाते.
एरवीच्या मालिकांमधील लोकेशनपेक्षा थोडं वेगळं असलेलं हे घर मला शांततेची अनुभूती देतं. कामाच्या व्यस्ततेमुळे कितीही दमलो असलो तरी या घराच्या परिघात प्रवेश करताक्षणी त्या दमलेपणाचं मन-शरीरावरचं मळभ झटकलं जातं. असा हा प्रसन्न परिसर आणि त्या परिसरातील हे घर.. आणि या घराचं प्रशस्त अंगण!
शूटिंगच्या निमित्ताने गेले काही महिने मी या घराशी जोडला गेलोय. हे घर सदैव एका सकारात्मक ऊर्जेनं भारलेलं वाटतं. अर्थात, कुठल्याही घरात चांगली-वाईट ऊर्जा येते ती तिथे राहणाऱ्या माणसांमुळे.. या घराचंही काहीसं तसंच आहे. मालिकेतील आम्ही सगळे कलाकार एका सकारात्मक ऊर्जेने काम करतो, वावरतो; परिणामी तिथलं वातावरणही त्याच सकारात्मक ऊर्जेनं भरून राहिलंय. ‘अस्मिता’ची टीम म्हणजे एक कुटुंबच. आणि एकत्र कुटुंबाप्रमाणेच आम्ही एकमेकांशी बांधले गेलोय.. हे या घराचंच देणं असावं का? आम्ही एकत्र जेवायला बसतो. एकत्र खूप गप्पा मारतो. एका घराला, कुटुंबाला बांधून ठेवणारी जी एक आपलेपणाची भावना असते, तीच ‘अस्मिता’च्या टीममध्ये आहे.. या घराच्या वातावरणामध्ये आहे. आणि त्यामुळेच या सेटवरचं वातावरणही सदा प्रसन्न, हसरं असतं. आमची टीम ही एकमेकांची नाती अलवारपणे जपणाऱ्या कुटुंबासारखी आहे. आणि त्यामुळेच हे घर आम्हा सर्वाना ‘आपलंसं’ वाटत असावं!
आणि हो, या घरातली माझी सगळ्यात आवडती जागा म्हणजे इथलं अंगण. कारण हे अंगण मला थेट घेऊन जातं माझ्या बालपणापाशी. माझ्या मित्राच्या घरालाही असंच अंगण होतं. तिथे मी माझ्या मित्रांसोबत खूप खेळायचो.. बागडायचो.. आई-बाबांशी गप्पा रंगायच्या. या सगळ्या माझ्या जुन्या आठवणींकडे हे अंगण घेऊन जातं आणि म्हणून ते माझ्यासाठी स्पेशल आहे. अंगणातील आंब्याचं झाड व त्याच्या पारावर गप्पा मारणं हा आमचा विसाव्याचा क्षण. हा आमचा गप्पांसाठीचा आवडता कट्टाच!
या घराने मला वास्तुसोबतीही दिले. मुळातच माझा पिंड हा निसर्गातील या सहचरांशी संवेदनशील असलेला.. कीटक, प्राणी हे माझ्या जिव्हाळ्याचेच.. इथेही कुत्र्याच्या एका पिल्लाशी आमच्या टीमचं विशेष नातं जुळलं. इथेच एका मंदिराचा सेट आहे, तिथे एका कुत्रीनं पिल्लांना जन्म दिला. त्यातील एक लहानसं काळं पिल्लू आमच्या मेकअप रूमच्या एसीखाली येऊन बसू लागलं. मग मी आणि मयूरी त्या पिल्लाची काळजी घेऊ लागलो. त्या पिल्लाला खाऊ घालणं हा आमचा शिरस्ताच. आता ते मोठं झालंय. आता ते थेट आमच्या सेटवरच्या दाराच्या बाहेरच येऊन बसतं.
माझ्या वैयक्तिक आयुष्यातही हळव्या असलेल्या अंगण आणि प्राणीप्रेम या दोन गोष्टी या घराने दिल्या. असं हे सरंजामे निवास.. आणि त्याचं प्रशस्त अंगण.. मला कायम सकारात्मक ऊर्जा देणारं.. माझ्या भूमिकेला तीच ऊर्जा पुरवणारं.. ल्ल ल्ल
piyushranade28@gmail.com
शब्दांकन : लता दाभोळकर