20 September 2020

News Flash

मॉडर्न आजीचा बटवा

थंडीच्या दिवसांत माझ्या आजोळी रोज सकाळी घरात एक गोड, खमंग आणि उबदार वास दरवळत असायचा. आम्ही सारे उठण्याआधी, आजीने चुलीवर काढय़ाचं आधण चढवलेलं असायचं.

| February 8, 2014 01:34 am

थंडीच्या दिवसांत माझ्या आजोळी रोज सकाळी घरात एक गोड, खमंग आणि उबदार वास दरवळत असायचा. आम्ही सारे उठण्याआधी, आजीने चुलीवर काढय़ाचं आधण चढवलेलं असायचं. गवती चहा, तुळस, आल्याचा कीस, र्अधबोबडे केलेल्या एखाद्-दोन काळ्या मिरी, लवंगा, धणे आणि या सगळ्याचा उकळून अर्क निघाला म्हणजे चवीपुरता थोडासा गूळ. याच काढय़ाच्या पाण्यात मोठय़ांसाठी चहा बनायचा, तर लहानांसाठी दिवसाची सुरुवात या खमंग, चविष्ट आणि ऊन काढय़ाने व्हायची. दिवसभर मग आजी या सगळ्या जिन्नसांपासून निकाढा बनवायची आणि प्यायची. मलादेखील तो आवडायचा. प्रत्येक ऋतूकरता तिच्याकडे खास, चविष्ट आणि गुणकारी असा काढा हमखास असायचाच. बकुळीची फुलं घालून केलेला काढा तर मला फारच आवडायचा.
आजीचा बटवा हरवला..
आज, धकाधकीच्या आयुष्याचाच एक भाग म्हणजे आपल्याला आजारी पडायलादेखील वेळ नाही. धावपळीच्या चक्रात, साध्या सर्दी-पडशासारख्या आजारांवरही आपण घरगुती औषध करण्याऐवजी कोणतीतरी गोळी किंवा डॉक्टरांकडून सुई टोचून चटकन् बरं व्हायचा मार्ग पत्करतो. आज अनेक घरांत तर आजी-आजोबाच नसतात आणि गेल्या दोन पिढय़ांना या आरोग्यदायी गोष्टींची माहितीच राहिलेली नाही, असंही अनेक घरांतून दिसतं.
मात्र बदलत्या वास्तुरंगात अनेक नव्या गोष्टी आपल्या घरी स्थिरावताहेत. उजाड शहरी वातावरणात डोळ्याला थोडी हिरवाई दिसावी म्हणून घरातच काही कुंडय़ांतून रोपं लावण्याच्या आपल्या वृत्तीलाच काही मंडळी जाणूनबुजून आकार देताहेत.
गिरगावच्या गजबजलेल्या चाळीत असो किंवा कोल्हापूरच्या चौसोपी वाडय़ात असो, दारी छोटीशी तुळस लावायची आपली परंपरा आपण कसोशीने जपतो. अधिक हौशी घरांमध्ये खिडकीच्या ग्रिल्समध्ये, बाल्कनीमधून किंवा अगदी घरांमध्ये रोपं लावतात. कुणी मनीप्लँट लावतात तर कुठे गुलाबाची रोपं. मात्र गेल्या काही वर्षांत हा ट्रेण्डदेखील बदलतो आहे. शोभेच्या, फुलझाडांच्या सोबतीने अनेक घरगुती उपयोगाची रोपं दिसायला लागली आहेत.
    माहितीचं को-ऑपरेटिव्ह
मुंबईमध्ये ‘अर्बन लीव्हज’सारख्या संस्था लोकांना एकत्र आणत आहेत. एकत्र आलेली ही मंडळी आपापल्या घरी ओल्या कचऱ्यापासून खतमिश्रित मृदा तयार करण्यासाठी एकमेकांना प्रशिक्षित करतात. अनुभवी मंडळी आपले अनुभव नवोदितांसोबत वाटून घेतात. कुणी आपल्या घरांच्या खिडकी-बाल्कनींमधून तर कुणी आपल्या सोसायटीच्या इमारतींच्या छतांवर घरच्याघरी फळं, भाज्या आणि औषधी वनस्पतींची लागवड करतात. गवतीचहा, कोरफड, तुळस, पुदिना, ओवा, आंबेहळद, लसूण, कोिथबीर, मेथी, शतावरी ते पाश्चात्त्य वनस्पतींमध्ये रोजमेरी, थाईम, बेसिल यांची लागवड होते. सोबतच टॉमेटो, मिर्ची, तोंडली, भेंडी, मूग, मटकी अशा भाज्यांची रोपंदेखील काही घरी दिसतात. ‘अर्बन लीव्हज’चे  अनेक कार्यकत्रे अगदी अभिमानाने आपल्या घरच्या या औषधी रोपांच्या गुणांची वाखाणणी करतात. त्यांचा उपयोग करतातच, त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्याचाही प्रयत्न करतात. ई-मेल ग्रुप्स, मुंबईमध्ये ठिकठिकाणी होणाऱ्या आठवडय़ा अखेरी बैठका या माध्यमांतून ही मंडळी माहितीची देवाणघेवाण करतात. जुन्या जाणत्या, ३०-४० र्वष संसार झालेल्या स्त्री-पुरुषांकडून नव्याने संसार थाटलेल्यांना, लहान मुलांना रोपांची निगा राखण्याविषयी जसे धडे मिळतात त्याचप्रमाणे त्या रोपांच्या औषधी गुणधर्माचीही माहिती मिळत जाते.
आरोग्यदायी
आपल्या पिढीतली आघाडीची सूत्रसंचालिका, निवेदिका आणि ऑल इंडिया रेडियोच्या एफ.एम. गोल्डची आरजे रश्मी ही घरगुती औषधांच्या उपयुक्ततेबद्दल मनमोकळेपणाने बोलते, ‘‘माझ्या आईकडे बारीकसारीक गोष्टींकरता डॉक्टर गाठायची पद्धतच नाही. सर्दीपडशावर घरीच मधातून आल्याच्या रसाचं चाटण मिळतं. पोटातल्या कृमींवर लसूणाच्या कुडीचा उतारा असतो तर सीझनल तापावर दारातल्या कोरफडीच्या थंडाव्याचा उतारा असतो.’’ रश्मी अगदी उत्साहाने सांगत होती, ‘‘माझ्या घरी असलेल्या जिन्नसांच्या औषधी गुणांची माहिती मी करून घेते. माझ्या मुलाला मी लहानपणापासूनच घरगुती औषधांची सवय लावत गेले. त्याची कफप्रवृत्ती आहे, त्यामुळे त्याला सर्दीचा त्रास नेहमी होतो. लहान असताना त्याच्या मनगटावर किंवा गळ्यात मी लसुणाच्या कुडांची माळ बांधत असे. त्याच्या वासाने त्याच्या पडश्याचा त्रास कमी व्हायचा. पुढे दात येताना कुतूहल म्हणून तो त्या माळा चावायचा आणि लसणीचा रस पोटात जायचा, साहजिकच त्यामुळे पोटाच्या विकारांपासून दोन हात दूर राहिला. शिवाय चव डेव्हलप झाली तो फायदा वेगळाच. आता त्याच्या आंघोळीच्या पाण्यात निलगिरीच्या तेलाचे दोन थेंब टाकते.’’ आता १०-१२ वर्षांच्या आपल्या मुलाच्या सवयींविषयी सांगताना रश्मी म्हणते, ‘‘तोही आता शाळेत नियमित वक्तृत्व स्पर्धा वगरेंत भाग घेतो. घसा बसला, थोडीशी सर्दी वाटली तर तो स्वत:च मायक्रोवेव्हमध्ये पाणी गरम करून घेतो, त्यात मध आणि आल्याचा रस घालून पितो किंवा रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद, चिमूटभर सुंठपूड आणि थोडं घरचं तूप घालून तो स्वत:च पितो.’’ अगं रश्मी पण अशा घरच्या औषधांमुळे मोठय़ा आजारांवेळी दुर्लक्ष झालं तर? माझ्या या प्रश्नावर हसत ती सहज म्हणाली, ‘‘अरे श्रीपाद, आजाराचं गंभीरपण ताडायला आपण शिकायलाच हवं, मात्र घरच्या या उपायांमुळे औषधं, आजारपण ही देखील चवीष्ट, उपयुक्त होतात हे पाहा की! शिवाय, रासायनिक औषधांच्या माऱ्यापेक्षा या रोजच्या खाण्यातल्या जिन्नसांनी आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आपण टाळतच असतो हे किती महत्त्वाचं आहे.’’
व्यावसायिक यश
मॉडर्न घरांमधून आजीच्या बटव्याला मिळणारी ही पसंती लक्षात घेऊनच पुण्याच्या ‘रोिलग नेचर’ने आपल्या संकेतस्थळावर एक नवा विभाग केला – औषधी रोपं. ‘‘पुण्यात घरगुती बागकामाला आणि त्या अनुषंगाने निसर्गस्नेही विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘रोिलग नेचर’ नावाचं संकेतस्थळ आम्ही ८ऑगस्ट २०१३ या दिवशी बाजारात उतरवलं. फुलझाडं, शोभेची रोपं, बागकामाचं साहित्य हे आम्ही विकत असतानाच अनेक ग्राहकांनी आम्हाला औषधी रोपांविषयी विचारणा करायला सुरुवात केली आणि ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही तुळशी, बेसिलपासून इटालिअन रोजमेरीपर्यंत तब्बल २५प्रकारचे औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची रोपं विकायला लागलो. ‘रोिलग नेचर’च्या संस्थापकांपकी एक, अíपत गुप्ता आपल्याला उत्साहात सांगतो. ‘‘ऑनलाइन माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं सोपं होतं, त्याशिवाय ब्लॉग आणि आमच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आम्ही रोपांविषयी अनेक प्रकारची माहिती देतो. रोपांची निगा, त्यासाठी लागणारा प्रकाश, मातीचा प्रकार, कुंडीचा आकार, पाणी देण्याची पद्धत ही माहिती तर आम्ही देतोच, शिवाय त्या रोपांच्या उपयुक्ततेविषयी माहिती देण्याचादेखील आमचा प्रयत्न असतो.’’ आपल्या या उपक्रमाविषयी माहिती देताना अíपत सांगतो, ‘‘आम्हाला लोकांचा प्रतिसाद उत्तमच मिळालेला आहे. मात्र औषधी वनस्पतींकरता मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच आहे. आम्ही सेंद्रिय पद्धती आणि लोकांनी आपल्या घरगुती बागेतल्या गोष्टी अधिकाधिक वापराव्यात याकरता जागृती करण्याचा प्रयत्न नेहमीच करतो आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे.’’
‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ असं आपलं नेहमीच होतं. मात्र आजीचा बटवा पुन्हा आपल्याला गवसतो आहे. घराघरांतून तुळशी-गुलाब-मोगऱ्यापासून कुंडय़ांतून रुजलेली ही सुशोभनाची आवड आता कढीपत्ता, नागवेल, आलं, लसूण, पुदिना या आरोग्यदायी रोपांचाही विचार करते आहे. हा व्याप कुठे घरी करायचा इथपासून, एक लाइफस्टाइल स्टेटमेंट ते मनोमन पटलेली घरगुती औषधांची उपयुक्तता आजच्या आपल्या घरांतून नवे रंग भरते आहे. घर हे आरोग्यदायी असावं यासाठी झटणारा आजीचा बटवा आता नव्या रूपात आपल्या घरात पुन्हा मानाने परततो आहे, स्थिरावतो आहे.    
कोरफड : थंड प्रवृत्तीच्या या वनस्पतीचा गर बहुगुणी असाच म्हणायला हवा. खोकल्यावर विशेष गुणकारी कोरफडीचा कडू चवीचा गर मधासोबत घेता येतो. हा गर केसांसाठी उत्तम कंडिशनरचं काम करतो, विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्या थंड गुणामुळे फारच उपयुक्त. हा रस कृमीनाशकही आहे.
कढीपत्ता : पदार्थाचा स्वाद वाढवण्यासोबतच रक्तदाबावर गुणकारी.
नागवेल : विडय़ाच्या स्वादासोबतच नागवेलीची पाने पाचक, मुखदरुगधीनाशक असतात.
गवती चहा : सर्दी-खोकल्यावर गुणकारी. नियमितपणे चहामध्ये घेतल्यास चहाचा स्वाद वाढतोच, कफाचा त्रासही कमी होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 1:34 am

Web Title: modern grandmothers medicine
Next Stories
1 ‘हनू’ची घरं
2 गृहनिर्माण संस्थांचे उप-विधी
3 विद्युत अपघात टाळण्यासाठी हे लक्षात ठेवा..
Just Now!
X