आपल्या घराचं स्वप्नं साकारताना आणि ते खास करून सजवताना आपण नेहमीच चिकित्सक असतो. आपली ‘घर’ या संज्ञेची व्याख्याच निराळी असते. आपलं घर म्हणजे जणू काही आपला श्वासच असतो. आपल्या प्रत्येकाची घराविषयीची संकल्पना आणि एकूणच घराच्या बांधकाम तसेच गृहसजावटीच्या बाबतीतली व्याख्याच वेगवेगळी असते. आपलं हक्काचं, स्वत:चं घर कल्पकतेने बांधण्याकडे, निवडण्याकडे आणि ते सजवण्याकडे प्रत्येकाचाच कल निराळा असतो; पण तो कल कसा आहे हे आपल्या स्वत:कडे आणि गृहसजावट या विषयाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून ठरत असतो.  
गृहसजावट करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी :
बदलत जाणारे जीवनमान आणि काळाची गरज म्हणून घराच्या बांधकाम पद्धतीत तसेच अंतर्गत सजावटीतदेखील आमूलाग्र बदल घडत गेले आहेत. घराच्या बाबतीत केवळ निवारा असा माफक दृष्टिकोन राहिला नसून, तो खूपच व्यापक झाला आहे. याच दृष्टिकोनातून गृहसजावटीसाठी काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेणं सद्य:स्थितीत आवश्यक झालं आहे.   
उपलब्ध जागा आणि त्या जागेचे स्वरूप : घराच्या अंतर्गत संरचनेच्या कामात उपलब्ध जागा आणि त्या जागेचे स्वरूप या दोन्हीही बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे सर्वात प्रथम त्याची माहिती करून घेणं आवश्यक असतं. जागेचं आकारमान जसं महत्त्वाचं असतं तसंच त्या जागेचं स्वरूपदेखील अत्यंत ws03महत्त्वाचं असतं. ज्या घराचं अंतर्गत सजावटीचं काम करणं अपेक्षित आहे, त्या घराचं एकूणच आकारमान, उंची, लांबी, रुंदी कशी आहे हे सर्व अभ्यासपूर्वक समजून घेणं आवश्यक असतं.  याचबरोबर बांधकामाचा कोणता प्रकार वापरला गेला आहे, म्हणजे लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे, की आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर याचा जरूर विचार करावा लागतो. बांधकामासाठी कोणकोणतं साहित्य, वस्तू अर्थात मटेरियल वापरलं गेलं आहे हे पाहणं आवश्यक असतं. जागेचे आकारमान, नैसर्गिक प्रकाश तसेच हवा कशा आणि किती प्रमाणात उपलब्ध होत आहे हेदेखील लक्षात घेऊन त्यानुसार अंतर्गत संरचनेचे नकाशे बनवणं आवश्यक असतं.    
उपलब्ध साधनसामग्री : घराची जागा ज्या भौगोलिक परिसरात आहे त्या ठिकाणी उपलब्ध असलेली साधनसामग्री गृहसजावटीच्या कामासाठी वापरात आणलेली असणं केव्हाही उपयुक्त ठरतं. बाजारात रोजच नवनवीन वस्तू उपलब्ध होत असतात. यात काही वेळा नव्या-जुन्याचा मेळ घालून एखादी सुंदर अशी संरचना साकारता येऊ  शकते. घराच्या परिसरात उपलब्ध वस्तूंचा तसेच उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करूनदेखील अतिशय चांगली गृहसजावट करता येऊ  शकते. अलीकडच्या काही दिवसांमध्ये अनेकांचा परदेशी वस्तूंच्या वापराचा कल वाढला आहे. अगदी दोन-चार दिवसांत विमान प्रवासाने परदेशातून गृहसजावटीच्या विविध वस्तू आणणे शक्य होत असल्याने, तसेच त्या वस्तूदेखील आर्थिक मर्यादेत मिळत असल्याने अनेक जण त्याला पसंती देतात.  ws02
अंतर्बाहय़ सजावटीच्या नावीन्यपूर्ण वस्तू : सद्य:स्थितीत आंतर्बाहय़ सजावटीच्या नावीन्यपूर्ण वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. अशा विविध वस्तूंचा वापर करून निरनिराळी संरचना साकारून आपल्या घराला हटके रूप देता येऊ  शकतं. नैसर्गिक तसेच कृत्रिम स्वरूपाच्या अनेक वस्तू हल्ली सहजपणे उपलब्ध होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. घराच्या जमिनीपासून ते अगदी छतापर्यंत अनेक प्रकारच्या वस्तूंचा वापर अंतर्गत संरचनेसाठी आणि सजावटीसाठी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.
कल्पक आणि सौंदर्यपूर्ण संरचना : प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा संबंध त्या व्यक्तीच्या घरासाठी बनवलेल्या संरचनेशी असतो. आपापली अपेक्षा, गरज, उपजत कलागुण, छंद, आवड, निवड, सवड, वैचारिक क्षमता, सामाजिक स्थान, व्यावसायिक संबंध, कौटुंबिक आकार, शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत तसेच याव्यतिरिक्त इतर सर्व लौकिक आणि अलौकिक गुण या सर्व बाबींवर आपल्या घराची बाहय़ तसेच अंतर्गत संरचना आणि सजावट कशी असावी हे ठरतं. उलटपक्षी असंही म्हणता येईल की वरील सर्व बाबींचा विचार करून केलेली आपल्या घराची संरचना आपलं आणि आपल्या कुटुंबीयांच्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व खुलवत असते. आपल्या राहणीमानात एक प्रकारे अशा प्रकारे सजवलेलं घर ऐट आणू शकतं. कल्पक आणि सौंदर्यपूर्ण संरचना करून सजवलेलं घर निश्चितच सौंदर्याचा साक्षात्कार घडवू शकतं.
कुशल आणि आधुनिक तंत्रज्ञान : सद्य:स्थितीत अंतर्गत सजावटीच्या कामासाठी अत्यंत कुशल आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. साइट डेव्हलपमेंट, स्ट्रक्चरल डिझाईन, सॅनिटरी, प्लम्बिंग, ड्रेनेज, पाणीपुरवठा व सेवरेज डिझाईन, रेन-वॉटर हर्वेस्टिंग, व्हेिंटलेशन, ग्लोबल वॉर्मिग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, एअरकंडिशनिंग डिझाईन आणि इतर मेकॅनिकल सिस्टम्स, एलिव्हेटर्स, एस्कलेटर्स, फायर डिटेक्शन, फायर सिक्युरिटी, लँडस्केप, इंटीरियर, ग्राफिक डिझाईन अशा अनेकविध कामांत आर्किटेक्टला सहभागी व्हावं लागतं. तसंच कुशल आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून काम करायचं असतं. या सर्वच कामांमध्ये कुशल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अत्याधुनिक संरचना साकारणे शक्य होऊ  शकते; किंबहुना ते अधिक पसंत केले जात आहे. रिमोट कंट्रोल आणि सेन्सरच्या साहाय्याने वापरल्या जाणाऱ्या अनेकविध अत्याधुनिक वस्तू गृहसजावट करण्यासाठी सध्या बाजारात उपलब्ध आहेत.     
माफक खर्चाची संरचना : पै-पै जमवलेली जमापुंजी आपल्या स्वत:साठी अथवा घरासाठी वापरताना आणि मुख्य म्हणजे ती मिळवताना तसेच जमवताना अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण आपल्याला झाल्याशिवाय रहात नाही. आपलं प्रत्येक स्वप्न साकार होताना आपल्याला मिळणारा आनंद निश्चितच निराळा असतो; पण ही स्वप्नं साकारण्यासाठी आपल्या पैशाची यथायोग्य बचत करणंही तितकंच जरुरीचं असतं. सद्य:स्थितीत अनेक वेळा साधेपणा म्हणजे भोळेपणा किंवा गबाळेपणा समजला जातो; पण असं जरी असलं तरीही माफक खर्चाची संरचना तयार करणे अथवा निवडणे हेच अधिक सयुक्तिक ठरतं. गृहसजावट केल्यानंतर त्याच्या देखभालीचा खर्चदेखील सुरुवातीलाच विचारात घेणं आवश्यक असतं. मुळातच गृहसजावट करत असताना केलेला खर्च जर माफक असेल तर निश्चितच भविष्यातील त्या घराच्या देखभालीचा खर्चही मर्यादित असणार आहे.
आपल्या स्वप्नातल्या घराचं वेगळेपण अनुभवताना आणि त्यासाठी संरचना निवडताना आपल्या आशा, अपेक्षा, इच्छा, ईर्षां, उन्नती, संपन्नता यांच्या परिपूर्णतेसाठी प्रत्येक बाबीचा विचार करणं आवश्यक असतं. खरं म्हणजे, आपली आणि आपल्या कुटुंबाची खरी ओळख आपल्या घरावरूनच होत असते. या सर्व दृष्टिकोनातून वरील सर्व बाबी किती महत्त्वाच्या असू शकतात, हे जाणून घेऊन आपली सजगता, सतर्कता आणि सौंदर्यदृष्टी यांचा मिलाफ आपण आपल्या जीवनात घडवून आणू शकतो.
शैलेश कुलकर्णी -sfoursolutions1985@gmail.com
इंटिरीअर डिझायनर