18 August 2019

News Flash

वास्तुसोबती : झेंडू :माझ्या आयुष्यातला आनंदाचा भाग!

मी, माझे आई-बाबा आणि माझा दादा असं आमचं कुटुंब! आम्ही चौघेही प्राणीप्रेमी

(संग्रहित छायाचित्र)

मुक्ता बर्वे

आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारी, वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी, नाटय़शास्त्राची अभ्यासू विद्यार्निनी, नाटय़निर्माती मुक्ता बर्वे हिच्याकडे एक गोंडस मनीमाऊ आहे. तिचं नाव आहे ‘झेंडू’.

मी, माझे आई-बाबा आणि माझा दादा असं आमचं कुटुंब! आम्ही चौघेही प्राणीप्रेमी. मी नऊ वर्षांची असल्यापासून आमच्या वास्तूला नेहमीच सोबती लाभला. आमच्याकडे आतापर्यंत बऱ्याच मांजरी येऊन गेल्या. सगळ्यात पहिला आला ‘मुन्ना’. हा बोका होता. त्यानंतर रांगच लागली. गुरू, गौरी, ऐश्वर्या या नावाच्या मांजरी आमच्याकडे लहानाच्या मोठय़ा झाल्या. माझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण यांच्या संगतीतच झालं.

मी मुंबईत आले तेव्हा माझ्याकडे कितीतरी वर्ष घरी पाळीव प्राणी नव्हता. कारण मी एकटी मुंबईत राहायचे. मुंबईत माझं स्वत:चं घरही नव्हतं. दैनंदिन जीवनक्रम वेळेत बांधता येत नव्हतं. मग अशा वेळी घरी प्राणी आणून त्याचे हाल करायचे नव्हते.

ठाण्यात स्वत:चं घर घेतल्यावर लगेचच मी मांजर घरी आणलं. काही वर्ष मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी एकत्र राहायचो. मग तिची एक आणि माझी एक अशा दोन मांजरी होत्या. सध्या घरी एकच मांजर आहे- जी टर्किश आहे. आणि तिचं नाव आहे ‘झेंडू.’ झेंडूच्या शरीरावर तीन रंग आहेत, जे स्मोकी आहेत. म्हणून पहिल्यांदा मी तिचं नाव ‘स्मोकी’ ठेवलं. तिचा रुबाब एखाद्या खानदानी राणीसाहेबांनाही लाजवेल असा आहे. म्हणून मी नंतर तिचं नाव ‘स्मोकी जोधा’ असं ठेवलं. पण आमच्या राणीसाहेबांना ही दोन्ही नावं अजिबात पटली नाहीत. तिचा चेहरा झेंडूच्या फुलासारखा आहे, म्हणून मग मी तिचं नाव साधंसरळ ‘झेंडू’ ठेवलं आणि सरतेशेवटी तिलाही ते आवडलं.

झेंडूचा गृहप्रवेश झाला आणि माझी आणि माझ्या मैत्रिणीची भंबेरी उडाली. त्याचं झालं असं- माझ्या मैत्रिणीच्या मित्राच्या मांजरीला पिल्लं झाली. त्यातलं एक पिल्लू मी घरी आणलं. आम्ही झेंडूला घेऊन घरी आलो. दोन मिनिटांसाठी पायावर पाणी घ्यायला म्हणून मी आत गेले तेवढय़ात झेंडू गायब. तेव्हा आम्ही पंधराव्या मजल्यावर राहत होतो. गॅलरीला नेट लावली होती, घराचा मुख्य दरवाजा बंद होता. तरीही ती कुठेच दिसत नाही म्हटल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तेवढय़ात आमची तिसरी मैत्रीण कुतूहलाने नवीन पेट बघायला घरी आली. झेंडू हरवल्याचं कळाल्यावर तीसुद्धा झेंडूला शोधू लागली. इकडेतिकडे शोधताना मला दोन गाद्यांमध्ये छोटंसं पिल्लू सापडलं. तेव्हा मला चांगलंच कळून चुकलं की झेंडूला फार अटेन्शन लागतं.

झेंडू घरी आली तेव्हा ती खूपच छोटी होती. ती फार आवाज करत नाही. ती तिच्याच विश्वात रममाण असते. ती माझी जोधा राणी आहे. ती वेळेची पक्की आहे. सकाळी सहा वाजता उठते. आमच्याकडून तिची सेवाशुश्रूषा सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू असते. नऊ ते अकरा ती झोपते. त्यानंतर थोडा वेळ उठते. थोडंसं खाते. दुपारी ती पुन्हा झोपते. मधे मधे पाणी पिण्यासाठी फक्त आवाज देते. संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून आई-बाबांसोबत सोफ्यावर बसून टीव्ही बघायला तिला फार आवडतं. मधेच तिची ब्रह्मानंदी टाळीसुद्धा लागते. रात्री ११ वाजता ती तिचा दिवस जोशात सुरू करते. झेंडू निशाचर आहे, असं म्हणायला हरकत नाही. तिला मी जगभरातून कॅट टॉइज् आणले आहेत. पण ती त्यांच्याशी अजिबात खेळत नाही. ड्रेसला लोंबणाऱ्या नाडय़ांशी खेळायला तिला आवडतं. रात्री १२.३० पर्यंत ती मला जागं ठेवून खेळायला लावते. मांजरी खेळांचा आणि तिचा फार काही संबंध नाही.

झेंडूला इतर प्राणी फार आवडत नाहीत. घरात फार माणसं आलेली तिला खपत नाहीत. पाहुणे आले की ती बेडखाली जाऊन बसते. माझे आई-बाबा तिचे आजी-आजोबा आणि मी तिची आई.. असं आमचं तिच्याशी वेगळंच नातं आहे. विश्वास बसणार नाही, पण तिची कामं तिनेच सर्वाना वाटून दिली आहेत.

माझे बाबा म्हणजेच तिचे आजोबा तिचे केस विंचरून देतात. तिचे लाड करतात. तिची आई म्हणजेच मी तिचं डायट सांभाळते. तिचं कॅटफूड मी खास अमेरिकेतून मागवते. तिला गवत खायला फार आवडतं, त्यामुळे आमच्याकडे स्वयंपाकाला येणारी रेखाताई तिच्यासाठी गवत घेऊन येते. आम्हीच झेंडूच्या घरात राहतो आणि ती आमची बॉस आहे, असाच तिचा रुबाब आहे.

मला खेळवणारी, माझा दिवसभराचा क्षीण विसरायला लावणारी, मला मानसिक बळ देणारी झेंडू माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा भाग आहे.

शब्दांकन : मितेश जोशी

mitesh.ratish.joshi@gmail.com

First Published on July 20, 2019 1:40 am

Web Title: mukta barve beautiful cat zhendu abn 97