कोकीळ सकाळपासूनच कुहूऽऽकुहूऽऽ आवाज करत राहाते आणि मला तर माझी सकाळ आणि मी धन्य झाल्यासारखं वाटतं. स्वयंपाक करताना माझं सतत लक्ष त्या झाडांकडे असतं. कुठला पक्षी दिसतो का ते बघते. ऐकायला रेडिओ असतो. मग मला कोणी नसलं तरी चालतं. मला एकटेपणा, कंटाळा आला असं त्यामुळेच कधी वाटत नाही.
मी लहानपणापासून मुंबईला राहाते. लग्नाआधी सॅण्डहर्स्ट रोड स्टेशनसमोर राहायचे. त्यामुळे निसर्ग तसा माझ्यापासून लांबच. आमचे माहेरचे गावही पेणकडील खारपट्टा बाजू. तिथे सर्वत्र रखरख. तिथे विहिरी नाहीत. कारण पाणी सर्वत्र खार. दूरवर कुठेच झाडं नाहीत. फक्त खाडीवरून येणारा वारा. माझे वडील नेहमी म्हणायचे, ‘इथे फक्त हवा पिऊन माणूस जगेल.’ इतका तो वारा अंगाखांद्यावर खेळताना बरं वाटायचं.
पुढे लग्न झाल्यावर लालबागला राहायला आले. तिथेही तीच अवस्था. एक कुठे झाड नाही. बिल्डिंगमध्ये खिडकीच्या कठडय़ावर ठेवलेल्या कुंडीत तुळस किंवा सदाफुली दिसायची. त्यानंतर पुढे डोंबिवलीच्या काँक्रीटच्या जंगलात राहायला गेले. तिथे तर मुंबईपेक्षा बिकट परिस्थिती. २००५ साली आम्ही टिळकनगर (चेंबूर) इथे राहायला आलो आणि मुंबईतच अगदी आमच्या कॉलनीत, घराच्या खिडकीतून मला निसर्ग काय असतो ते पाहायला, अनुभवायला मिळालं.
टिळकनगरमध्ये शिरलो आणि फेरफटका मारला तर दिसतं रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावलेली आहेत. वेगवेगळ्या जातीची झाडे इथे पाहायला मिळतात. त्यामुळे उन्हातून चालतानासुद्धा थंडावा वाटत राहातो. प्रत्येक चौकात छोटी छोटी सर्कल करून त्यामध्ये झुडूपवजा फूलझाडं लावून ठेवली आहेत व त्यांना गोलाकार कठडे आहेत. इथे तशी छोटी छोटी पाच-सहा मैदानं आहेत. पण आमच्या बिल्डिंगशेजारी म्हणजे टिळकनगर कॉलनीत प्रवेश करताना दिसणारं लोकमान्य टिळक मैदान तसं अर्धा ते पाऊण किलोमीटरचं मोठं गोलाकार विस्तीर्ण मैदान. मैदानाला लागूनच रस्ता आहे. रस्त्याला लागूनच सर्वत्र जुनी मोठी झाडं थोडय़ा अंतरावर पाहायला मिळतात. पुढे सर्व जुन्या बिल्डिंग तोडून ७, ९, १०, १४ मजल्यांच्या गोलाकार रस्त्यालगत बिल्डिंग आहेत. प्रत्येक इमारतीच्या सोसायटीनं झाडं लावलेली आहेत. मुलांना खेळण्यासाठी जागा ठेवली आहे. तसेच ग्राऊंडला चालण्यासाठी ट्रॅक आहे. सर्व थरातील लोक इथे सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी येतात. ट्रॅकच्या बाजूला जी जागा आहे तिथेसुद्धा पहिल्यापासूनची मोठी झाडं आहेत व जिथे जिथे जागा आहे तिथे कडुलिंबाची झाडं लावली आहेत. त्या प्रत्येक झाडाची जो काळजी घेतो त्याचं नाव व पत्ता लिहिलेला आहे. कॉलनी अगदी स्वच्छ आहे. ग्राऊंडवरून चालताना विविध तऱ्हेच्या पक्ष्यांचा संध्याकाळी नुसता किलबिलाट चाललेला असतो. वाऱ्याच्या झुळकेबरोबर सुकी पानं पडतात. झाडांच्या फांद्या आवाज करत हलतात. मन अगदी प्रसन्न होतं. पावसात तर हिरवा गालिचा होतो. सर्व मैदान पोपटी गवताने भरून जाते. ते बघून डोळे सुखावतात.
मैदानाच्या समोरच आमची बिल्डिंग आहे. आमचं घर पहिल्या मजल्यावर आहे. आमच्या किचन व बेडरूमच्या खिडकीसमोर ४ ते ५ गुंठय़ाएवढी मोकळी जागा आहे. त्या जागेत नारळाची चार झाडं आणि बाजूच्या सोसायटीतील नारळाची झाडं आहेत. तसेच त्या जागेत शेवग्याच्या शेंगेचे झाड व एक मोठं झाड आहे. त्या झाडाची पानं चिंचेच्या पानासारखी व त्याला गुलाबी रंगांची फुलं येतात. तुऱ्यासारखी फुलं दिसतात. या झाडाचं नाव माहीत नाही. तसंच पिवळ्या फुलांचं झाडही आहे. आंब्याचं झाड आहे. पण  त्याला आंबे काही येत नाहीत. पण दुसरं झाड आहे. त्याला आंब्यासारखी फळं येतात. हिरवीगार. पुढे ती लाल होऊन फुटतात व त्याला लाल फुलं येतात. पपईचं झाड आहे. जांभळाचं झाड जरा पुढे आहे. पावसात तर ही जागा म्हणजे मला इटुकलं- पिटुकलं माळरानच वाटतं. खूप गवतवजा छोटी झाडं येतात आणि सर्वत्र हिरवा पोपटी रंग दिसतो. नुसतं बघूनच  मन प्रसन्न होतं. इथेच मी अनेक प्रकारचे पक्षी अगदी जवळून पाहाते. ‘बुलबुल’ पक्षी तर जोडीने इकडे-तिकडे फिरताना दिसतात. ‘नाचरा’ पक्षी तर एक जागेवर कधीच स्थिर उभा राहात नाही. ते त्यांचं नाचणं-बागडणं मी बघतच बसते. ‘तांबट’ पक्षी हिरवा-पिवळा धम्मक रंगाचा, तर कधी ‘गडद निळ्या’ रंगाचा पक्षी दिसतो. ‘दयाळ’ जो रंगाने काळा पण त्याच्या पंखाला पांढऱ्या रंगाची किनार असते. तो पक्षी तर सतत थांबून थांबून शीळ घालत असतो आणि त्याला त्याची सोबतीण साद देत असते. जणू एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला आवाज देत असतो आणि ती त्याच्या हाकेला ओ देते. हे दयाळ पक्ष्यांचं शीळ घालणं ऐकायला खूप छान वाटतं. वसंत ऋतू आला की कोकीळ सकाळपासूनच कुहूऽऽकुहूऽऽ आवाज करत राहाते आणि मला तर माझी सकाळ आणि मी धन्य झाल्यासारखं वाटतं. स्वयंपाक करताना माझं सतत लक्ष त्या झाडांकडे असतं. कुठला पक्षी दिसतो का ते बघते. ऐकायला रेडिओ असतो. मग मला कोणी नसलं तरी चालतं. मला एकटेपणा, कंटाळा आला असं त्यामुळेच कधी वाटत नाही. नारळाच्या झाडावर नारळ मोठे कसे होतात, ते मी रोज बघते. त्यातील दोन झाडं जवळजवळ चौथ्या मजल्यापर्यंत गेली आहेत. एकदा एक मद्रासी मुलगा आला होता. तो कमरेला कोयता अडकवून सरसर झाडावर चढला आणि नारळ कोयत्याच्या साहाय्याने तोडून खाली टाकत होता. ते अवाक् होऊन पाहातच बसले. शेवग्याच्या शेंगा, त्याचा पाला काढतात. ती कोवळी लुसलुशीत पानं बघून खूप बरं वाटतं. रोजच्या बघण्यातले कावळे, चिमण्या, कबुतरं तर दिसतातच; पण डोमकावळे, टिटव्या, पोपट पक्षीही बरेच वेळा बघायला मिळतात. डोमकावळे हे आकाराने मोठे आणि गडद काळा चकाकणारा रंग. अगदी खिडकीसमोर येऊन चपाती खाऊन जातात. मध्येच कधीतरी दुपारी निवांत झाडाच्या फांदीवर कावळा कावळीला चोचीने पंखात हळुवार खाजवताना दिसतो. हे दृश्य अगदी मनोहर वाटतं. चिमण्याही गलका करून चिवचिवाट करत बसतात. कावळा त्याचे घरटे झाडावर बांधतो व अंडी उबवतो. त्यातून छोटे छोटे पिल्लू चोच वर करून ओरडताना दिसते. तसेच अगदी फुलपाखरा एवढेसे प्राणी अगदी बारकाईने निरीक्षण केले तर ओळखू येतात. नाही तर आपल्याला ते फुलपाखरूच वाटतात. पावसात तर छोटी पिवळ्या रंगाची फुलपाखरे तर थव्याने उडतात. खारी तर झाडावरून इकडून
तिकडे एकमेकींशी पकडापकडीचा खेळ खेळतात. खिडकीच्या ग्रिलवर येऊन दोन हातांनी ग्रिल पकडून इवलेसे कान टवकारून पिटुकल्या डोळ्यांनी बघत बसतात. असं वाटतं त्या विचारतात, मी आत येऊ का?
एकदा तर एक पांढऱ्या रंगाचा ससाणा खिडकीच्या खाली येऊन बसला. रात्रीच्या वेळी प्रथम मला ते मांजरच वाटले. मग निरीक्षणाअंती त्याला चोच आहे हे लक्षात आलं. एकदा एक घुबड चुकून समोरील बिल्डिंगच्या ए.सी.च्या टपावर बसलं आणि कावळे त्याच्यापाठी लागले, पण ते घुबड कोपऱ्यात एखाद्या ध्यानस्थ साधूसारखं डोळे मिटून गप्प उभं होतं.
अशा प्रकारे अनेक पक्षी पाहायला मिळतात. मोठय़ा लाल चोचीचा पांढऱ्या रंगाचा फ्लेमिंगोसारखा दिसणारा पक्षी तर मोरासारखाच, पण लांब शेपटीचा पक्षी, तर कधी रानकोंबडी असे चुकूनमाकून आलेले पक्षी दिसतात. डोक्यावर लाल तुरा, गडद हिरव्या रंगाचे पक्षी. सुक्या झाडाच्या खोडावर टकटक आवाज करणारा लाकूडतोडय़ा पक्षीही दिसतो. असे अनेक प्रकारचे, रंगांचे पक्षी दिसतात. गवतावर आलेली छोटी पिवळी, जांभळ्या रंगाची सफेद फुलं तर बघत राहावीशी वाटतात. वेगवेगळ्या तऱ्हेचे कीटकही दिसतात. रंग बदलणारा सरडा कुंपणावर बसला की वाटतं एखादं सुकं पानच आहे. एवढा त्याचा रंग ओळखू न येण्यासारखा बदलतो. हिरव्या पानाच्या फांदीवर हिरव्या पानाचाच एखादा भाग आहे असं वाटतं. सकाळी पूर्व दिशेला पडणारी सूर्याची किरणं झाडावर पडली की झाडं अगदी न्हाऊ घातल्यासारखी दिसतात. कोवळी सूर्याची किरणं खिडकीतून आत येतात. चहा पिताना मन अगदी प्रसन्न होतं.  निसर्ग म्हणजे काय हे मी प्रत्यक्ष अनुभवते आहे. फक्त आजुबाजूला डोळसपणे पाहाण्याची गरज आहे.