|| डॉ. मिलिंद पराडकर

सजीवांच्या जगात एक बुद्धिमत्ता वगळता, शारीरिक सामर्थ्यांबाबत मानव हा दुबळा प्राणी म्हणूनच गणला पाहिजे आणि या शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी म्हणून त्याने त्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वाटचालीत भौतिक साधनांच्या साहाय्याने जर आवश्यक वाटले तर फेरबदल करून संरक्षक आश्रयस्थाने निर्माण केली असली पाहिजेत. दुर्ग वास्तूंचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी दुर्गाचे नसíगक आणि बांधून काढलेले तात्पुरते आणि बारमाही उपयोगाचे, सखल आणि डोंगराळ भागातले, बचावासाठी आणि चढाईसाठी बांधलेले असे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु दुर्गाचे जलदुर्ग, स्थलदुर्ग, गिरिदुर्ग, वनदुर्ग यांसारखे प्रकार लक्षात घेता अशी वर्गवारी करणे व्यर्थ आहे, हे सहज लक्षात येईल. दुर्गातील नसíगक आणि कृत्रिम घटकांचा वापर लक्षात घेता त्यातील काही प्रासंगिक अथवा अस्थायी असू शकतील तर काही निश्चितच स्थायी स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. तसेच नसíगक आणि कृत्रिम घटकांचा मेळ किती चातुर्याने केला आहे ते परिणामाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने त्यावर आधारलेले वर्गीकरण तेवढे महत्त्वाचे होत नाही. सर्व दुर्गीकरणाचा हेतूच मुळी बचाव आणि चढाई असा आहे. मानवाने आपल्या निरनिराळ्या सांस्कृतिक अवस्थांत दुर्गीकरणाचे तंत्र उत्तरोत्तर विकसित कसे केले, त्यामागील त्याचे हेतू काय याचा विचार करणे अगत्याचे ठरेल.

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

पुरातत्त्ववेत्त्यांच्या दृष्टिकोनातून नागरीकरणाच्या प्रक्रियेच्या राज्यशास्त्राच्या त्यातल्या त्यात आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्राच्या व धर्मशास्त्राच्या राज्यसिद्धांताप्रमाणे दुर्ग हा प्रगत मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दुर्ग हा प्रगत वास्तुस्वरूपात, नागरीकरणाच्या प्रक्रियेअगोदर दृग्गोचर होत नसला तरी निसर्ग आणि भौतिक साधनांचा मेळ करून येणाऱ्या शत्रूपासून बचाव करण्यासाठी व वेळप्रसंगी चढाई करण्यासाठी आश्रयस्थान तयार करण्याची कल्पना मानवाच्या वनेचर-अवस्थेतही असली पाहिजे. आपण राहत असलेल्या नसíगक अथवा बदल करून अधिक सुरक्षित केलेल्या गुंफेच्या प्रवेशावर मोठा धोंडा ठेवून त्याचे तोंड बंद करणे, अथवा रात्रीच्या वेळी मोठी शेकोटी ठेवणे, टेंभा ठेवणे ही दुर्गसंकल्पनेची प्राथमिक अवस्था म्हटली पाहिजे. मोठे प्राकार असलेल्या वास्तू- ज्यांना दुर्ग म्हणता येईल, अशा सांस्कृतिक संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेत म्हणजे नवाश्मयुगातही आढळत नाहीत. पहिल्या वन्य अवस्थेतून मानवाचा ग्रामीकरणाच्या अवस्थेत प्रवेश झाला तो नवाश्मयुगात झाला. शेतीचे स्वरूपही प्राथमिकच होते. त्यामुळे वस्ती खेडय़ातून असे आणि त्या खेडय़ाचा कारभार कुलसंकुलाच्या नायकामार्फत होई. खेडय़ाचे स्वरूप आजच्या वाडीसारखे असून, सगळे रहिवासी एकमेकांचे कुठल्या ना कुठल्या रीतीने नातेवाईकच होते. निर्माण झालेल्या दूध-दुभत्याच्या, पशूंच्या व धान्य-पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी वाडीच्या प्रमुखावरच होती. त्यामुळे काही नवाश्मयुगीन वस्त्यांभोवती लाकडामातीच्या भिंती घातल्याची उदाहरणे आहेत. अशी उदाहरणे ही बहुधा दुर्गसंकल्पनेची दुसरी अवस्था असावी.

नवाश्मयुगाला अधिक जवळ असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे शेतीबरोबर पशुपालन. माणसाळलेल्या गुरांना शिवारात चारून आणल्यानंतर ठेवण्यात येणाऱ्या वास्तूचा गोष्ट (मराठी गोठा) म्हणून उल्लेख येतो. दुर्गाचा गोपुर हा प्रवेशद्वाराचा भागसुद्धा अशाच नवाश्मयुगीन आठवणी जतन करीत असावा. गोपुर हे नगराचे प्रवेशद्वार असावे. धनगरासारख्या मेंढपाळ जमातीसुद्धा रात्रीच्या वेळी मेंढय़ांना कुंपणात ठेवतात. मराठीतला वइ/ई शब्द खेडय़ात घराभोवतीच्या झाडाझुडपांच्या किंवा इतर कुंपणासाठी वापरला जातो. वाट, वाटक, (संस्कृत आणि प्राकृत) किंवा वाड (प्राकृत) हा कुंपण किंवा कुंपणाची भिंत या अर्थाने वापरला जाणारा शब्द पूर्वीच्या इतर शब्दांप्रमाणेच संरक्षण संकल्पनेच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. प्राकार किंवा पागार हे समानार्थक शब्द प्राचीन संस्कृत आणि प्राकृत वाङ्मयामध्ये वास्तूभोवतीची संरक्षक भिंत, कोट किंवा परकोट या अर्थाने वापरले जातात. प्राकाराचा उंचवटय़ाभोवतीची भिंत असाही अर्थ होतो. त्यावेळी तो दुर्ग या संकल्पनेच्या अधिक जवळ जातो. प्राचीन संस्कृत वाङ्मयात (पू:) किंवा पुर या शब्दाची प्राचीनता तर ऋग्वेदापर्यंत जाते. देवानां पू: अयोध्या या वचनाचा अर्थ तटबंदी असलेले देवांचे नगर लढून जिंकणे अशक्य, अशा अर्थाने आहे. पुर किंवा पुरी हे शब्द तटबंदी असलेली राजधानी या अर्थाने नेहमीच वापरले जातात. देवतांच्या निवासासंदर्भात ही संरक्षक तटबंदी, कवच अशा प्रकारच्या संकल्पना उत्क्रांत झाल्याचे पुराणकथांतून दिसून येते.

मध्ययुगीन भारतातील देवालयसंकुलांमुळे प्रसिद्ध असलेल्या नगराभोवतीच्या भव्य तटबंदीच्या बाबतीतही हाच निष्कर्ष काढावा लागेल. कांचीपुरम् येथील कैलासनाथ व वैकुंठपेरूमाळ या देवालयांभोवती मदुरै येथील मीनाक्षीच्या देवालयाभोवती तसेच शिवाच्या पाच पुरींभोवती असलेल्या तटबंदी आणि गोपुरे परकीय आक्रमणांपासून बचावापेक्षा धार्मिक कारणातूनच बांधली आहेत हे निश्चित. ज्याप्रमाणे पंढरपूर हे वैकुंठनगरीची प्रतिकृति आहे त्याप्रमाणे ही तीर्थक्षेत्रे त्या त्या देवतांच्या म्हणजे विष्णुलोक, शिवलोक, इत्यादींच्या प्रतिकृति आहेत. काञ्चीपुरी, इत्यादी ठिकाणी असलेल्या तटबंदींमधील प्रवेशद्वारांचा म्हणजे गोपुरांचा प्रतिमाशास्त्रदृष्टय़ा अभ्यास केल्यास गोपुरांवर त्या त्या दिशांच्या दिक्पालांचे चित्रण आढळून येते. अमंगळ शक्तींना तटबंदीबाहेर ठेवणे हे त्यांच्या कार्यापकी एक कार्य असते. दिक्पाल या देवतेच्या संकल्पनेमागे दिग्बंध नावाची संकल्पना आहे. कुठलाही धार्मिक विधी सुरू होण्याअगोदर पूजास्थल किंवा यज्ञस्थलाभोवतीचा परिसर पवित्र व्हावा म्हणून काही विधी केले जातात. पूजाकर्त्यांची शरीरशुद्धी हाही त्यातलाच भाग आहे. यज्ञवेदीची जमीन चार अंगुळापर्यंत खोल खणली जाते या मागचे कारण असे की, असुर-राक्षस हे हरळीच्या मुळांच्या आधाराने जमिनीवर येतात व यज्ञात विघ्न करतात. यज्ञवेदीच्या म्हणजे अग्निकुंडाच्या भोवती पळसाच्या समिधा अथवा दर्भाच्या जुडय़ा परिधि म्हणून ठेवतात ते असुरांना वेदीत प्रवेश मिळू नये म्हणून. पवित्र आसमंताचे रक्षण करण्यासाठीची परिधिची कल्पना आणि ऐहिक संपत्ती आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी तटबंदी या कल्पना समांतर आहेत. ज्यांच्यामध्ये अजून नागरी जीवन पद्धती विकसित झालेली नाही अशा आदिवासींच्या धार्मिक विधीत यज्ञातील परिधि संकल्पनेशी समानता असलेले विधी आजही प्रचलित आहेत. एवढेच काय, तर महाराष्ट्र किंवा भारतात इतरत्र आढळणाऱ्या प्रागतिहासिक शिलावर्तुळामागेही अशाच प्रकारच्या संरक्षण कल्पना असाव्यात यात शंका नाही.

वरील सर्व प्रपंच करण्यामागे हेतू असा की, मानवी वस्तीभोवतीच्या तटबंदीचा आणि पर्यायाने दुर्ग या संकल्पनेच्या प्राचीनतेचा भौतिक पुरावा जरी अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे नवाश्मयुगाअगोदर जात नसला तरी संरक्षणाविषयीची (मग ते भौतिक असो वा आध्यात्मिक) काळजी माणसाच्या मनात अगदी वनेचर अवस्थेपासून असली पाहिजे हे ठसविण्यासाठी हा प्रपंच केला हे लक्षात यावे.

तटबंदी आणि दुर्ग ही विकसित कल्पना अर्थातच नागरीकरण आणि राज्य या संकल्पनेशी विशेषरूपाने निगडित आहे. गॉर्डन चाइल्ड या प्रथितयश पुरातत्त्ववेत्त्याने मानवी संस्कृतीच्या विविध अवस्थांविषयी विवरण करताना नागर संस्कृती ही पूर्वीच्या दोन अवस्थांपेक्षा वेगळी आहे हे दाखविण्यासाठी नागर संस्कृतीच्या दहा वैशिष्टय़ांचा दाखला दिला आहे. त्यातील चौथ्या वैशिष्टय़ात तो म्हणतो : नवीन उत्पादन पद्धतीत उत्पादनाची वाढ झालेली दिसते; या अधिक उत्पादनाच्या द्योतक म्हणून नवीन वास्तू उभ्या राहिलेल्या दिसतात. उदा. नगरदेवतेचे देवालय, राजवाडा, धान्याची कोठारे व इतर धार्मिक वास्तू (उदा. इजिप्तमधील पिरॅमिड्स). यातच तटबंदीच्या कामांचा व पर्यायाने दुर्गाचा समावेश करण्यास हरकत नाही.

मोठय़ा नगरांचा तटबंदी किंवा संरक्षक वास्तू हा अविभाज्य घटक होता. मोहेंजोदारो, हडप्पा, कालीबंगन, लोथल यांसारख्या शहरात राज्यकर्त्यां वर्गाचा श्रमिक वा इतर वर्गापासून ठळकपणे वेगळा दिसणारा वस्तीचा भाग, सर्व शहराभोवती असलेली सामायिक तटबंदी, उर्वरित नगरविभागांचे प्राकारासारख्या भिंतींनी केलेले विभाजन यावरून शहरातल्या एकूणच नागरिकांच्या संरक्षणाविषयीची काळजी स्पष्ट दिसून येते. त्यामुळे एका अर्थाने सर्व नगरच एका तटबंदिस्त दुर्गात सुरक्षित होते असे म्हणता येईल. अर्थशास्त्रात वर्णिलेल्या आदर्श पुराचेच ते जणू काही एक प्रारूप होते असे म्हणावयास हरकत नाही, पण या प्रकारची तटबंदी उभारण्यामागे फक्त राजकीय व थोडी आíथक कारणेच होती असे म्हणता येत नाही. तटबंदी उभारण्यामागे काही सामाजिक व धार्मिक कारणेही असतील असे दिसते.

गॉर्डन चाईल्ड यांनी नागरसंस्कृती दुर्गाला एक भव्य वास्तू म्हणून दिलेल्या महत्त्वापेक्षाही कौटिल्याच्या अर्थशास्त्रात राज्यसंस्थेतील दुर्गाचे महत्त्व अधिक लक्षणीय वाटते. राज्य हा जर एक पुरुष मानला तर : स्वमिन्, अमात्य, सुह्रद, कोश, राष्ट्र, दुर्ग आणि बल म्हणजे सन्य हे त्याचे प्रमुख अवयव होत असे कौटिल्य आणि त्यानंतरचे अर्थशास्त्रकार म्हणजेच राज्यशास्त्रातील विचारवंत मानतात. अमात्य आणि बल हे राजाच्या मुलकी आणि सनिकी प्रशासनाचे प्रतिनिधी होत; तर राष्ट्र म्हणजे शहरातील प्रजाजन (पौर) आणि खेडय़ातील रहिवासी (जनपद) मिळून बनते. राष्ट्र आíथकदृष्टय़ा उत्तम चालावयाचे तर राज्याचा खजिना (कोश) भरलेला पाहिजे आणि व्यापार-उदीमासाठी आवश्यक ती शांतता पाहिजे, तर मित्र (सुह्रद) राष्ट्राशी उत्तम संबंध आवश्यक असतात. अंतर्गत सुव्यवस्था राखावयाची तर मुलकी आणि सनिकी प्रशासन उत्तम हवे. व्यापाराला योग्य वातावरण राखण्यासाठी, शत्रूला काबूत ठेवण्यासाठी दुर्ग हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते राज्याचे प्रमुख अंग आहे. शांततेच्या काळात आणि युद्धजन्य परिस्थितीत ते महत्त्वाची कामगिरी बजावतात.

इतिहासातल्या कोणत्याही कालखंडाचा राजकीय वा सामाजिक वा लष्करी दृष्टिकोनातून विचार करताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवत राहते, ती म्हणजे त्या त्या कालखंडात असणारे तटबंदीयुक्त शहरांचे वा दुर्गाचे महत्त्व. वेदवाङ्मयापासून तो अठराव्या शतकातल्या रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रापर्यंत दुर्ग या संकल्पनेच्या स्वरूपाविषयी असंख्य उल्लेख सापडतात. दुर्ग हा विषय कोणत्याही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा होता याचे हे उल्लेख प्रमाण निदर्शक आहेत. राज्य निर्मिणे, आहे ते राखणे, राखलेले सांभाळणे अन् वाढवणे या अवघ्या प्रक्रियेमध्ये तटबंदीयुक्त शहरांची अन् दुर्गाची भूमिका अतिशय महत्त्वाची अन् मध्यवर्ती ठरत होती. सतराव्या शतकातील शिवतत्त्वरत्नाकर या ग्रंथाची रचना केलेला बसव भूपाल म्हणतो : कोशसंचयामुळे अवघीच काय्रे सुलभ होतात. कोशामुळे सुख लाभते, तर कोशहीन दु:खी ठरतो. जसा विषहीन नाग वा मदहीन हत्ती अगदी तशीच अवस्था सारे काही असलेल्या मात्र दुर्गहीन अशा राजाची असते. हे उत्तर काळातील लिखाण प्रातिनिधिक मानले तरी प्राचीन काळापासून चालत आलेला दुर्गसंकल्पनेचा आणि दुर्गाच्या महत्त्वाचा वारसा यात उमटलेला ठळकपणे दिसतो.

हर्षवर्धनाच्या काळात बंगाल व दक्षिण भारतात बलाढय़ राज्ये नांदत होती अन् त्यांच्या राजधान्याही मजबूत तटबंदीने वेढलेल्या होत्या. वाकाटक, नाग, गुप्त, वर्धन यांची आपापली अवाढव्य साम्राज्ये होती. आणि जरी त्यांचे उल्लेख आढळत नसले तरी ही सारीच साम्राज्ये बलाढय़ अन् दुर्जेय अशा दुर्गानी युक्त होती. काही प्राचीन राजधान्यांची नावे राजमान्य झाली आहेत. शासनाच्या कृपाकटाक्षामुळे तिथे किरकोळ अशा स्वरूपाची उत्खननेही झालेली आहेत. त्यांमधून जे काही चित्र उमटले आहे ते या प्रमेयावर प्रकाशझोत टाकण्याएवढं नक्कीच आहे. यादीच द्यायची झाली, तर चारसद्दा- ७ चौ.कि.मी. तटबंदी, पाटलीपुत्र – १३ चौरस मल, राजगृह – १३.५ चौरस मल,महास्थानगढ – ३.५ मल घेरा, बाणगढम् – १ मल घेरा, चंद्रकेतुगढम् – ४ मल घेरा, बराट (विराटनगर – मत्स्य महाजनपदाची राजधानी) – ३ मल घेरा, उज्जयिनी – १.७५ चौरस मल बालेकिल्ला अन् ४ मलांचा घेरा, शामळाजी ३ चौरस कि.मी. बालेकिल्ला अन् २ मलांचा घेरा, चंद्रवल्ली- २ मलांचा घेरा, नागार्जुनकोंड- ५.५ चौरस कि. मी. बालेकिल्ला अन् ३.५ मलांचा घेरा, तक्षशिला- ६ मलांचा घेरा, हस्तिनापूर- २.५ मलांचा घेरा, संकिशा- ३.५ मलांचा घेरा, चासनगर- ३ मलांचा घेरा, अहिच्छत्र- ३.५ मलांचा घेरा, कौशांबी- तटबंदीने वेढलेले ८ चौरस मल, श्रावस्ती- ३ मलांचा घेरा, वैशाली- बालेकिल्ला १ मलाच्या तटबंदीने वेढलेला, धान्यकटक- १ मलाचा घेरा, शिशुपालगढ- ३ मलांचा घेरा.

यांतील सर्वच ठिकाणच्या उत्खननात तटबंदींचे अवशेष सापडले आहेत. ही सर्वच शहरे िहदुस्थानच्या प्राचीन इतिहासाशी संबंधित आहेत अन् आजच्या घडीस इथे जुन्या अवशेषांवर नवीन शहरे वसलेली आहेत. या प्रमुख शहरांव्यतिरिक्त राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी असलेली शहरे, व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या जागा, सरहद्दीवरील स्थळे ही सारीच दुर्गाच्या स्वरूपात असलीच पाहिजेत. नुसती राजधानी तटाबुरूजांनी बंदिस्त करून काय राज्य साधते? अशाने काय राज्याचे साम्राज्य बनते? हे तर यत्किचितही शक्य नाही. इतिहासात उल्लेख नसले, लिखितप्रमाणे उपलब्ध नसली अथवा पुरातत्त्वज्ञांना कदाचित आजवर ते सापडले नसले तर याचा अर्थ ते तसे नव्हतेच असा तर मुळीच होत नाही. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर जाणवते की, दुर्गाविषयी, तटबंदींविषयी, तटबंदीने युक्त अशा गावांविषयी व शहरांविषयीची नोंद, अगदी प्राचीन काळी रचल्या गेलेल्या शिल्पशास्त्रावरील ग्रंथांपासून तो थेट सतराव्या शतकापर्यंतच्या शिल्पशास्त्रावरल्या विविध ग्रंथांमध्ये आढळून येते.

या प्रदीर्घ कालखंडात दुर्गाच्या मूलभूत अशा कल्पनेत फारसे फरक झाले नाहीत, तरीसुद्धा शस्त्रास्त्रांच्या प्रगतीमुळे व बदलत्या संरक्षणविषयक गरजांमुळे त्यात काही सहज बदल होतही गेले. दुसरे कारण म्हणजे, स्वत:चे वैभव, स्वत:चा दिमाख, स्वत:चे सार्वभौमत्व इतरांसमोर मिरवावे, या उद्देशानेही दुर्ग अन् शहरे रचली गेली. मात्र त्यातून, त्या त्या कालखंडात असलेले दुर्ग या प्राथमिक व मूळ कल्पनेचे महत्त्व अधिकाधिक स्पष्ट अन् अधोरेखित होत गेले. शिल्पशास्त्रातील दुर्ग ही शाखासुद्धा प्रगत होत गेली. या शास्त्रात प्रगत असलेल्या वास्तुशास्त्रज्ञ व स्थपतींची ‘दुर्गकारीण:’ ही पदवीसुद्धा याच अनुषंगाने निर्माण झाली. नारद, अगस्त्य, मानसार, मयमत, विश्वकर्मा या पूर्वसुरींच्या नावानं विख्यात असलेल्या शिल्पशास्त्रांवरील ग्रंथांचा आधार व परामर्श घेत उत्तर काळात या विषयावरील ग्रंथांची रचना झाली. मानसोल्लास, युक्तिकल्पतरू, समरांगणसूत्रधार, अपराजितपृच्छा, जयपृच्छा, वास्तुराजवल्लभ, वास्तुमंडन, वास्तुमंजिरी या सर्वच वास्तुशास्त्र वा शिल्पशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये दुर्ग या विषयाच्या विविध पलूंवर प्रकरणे लिहिली गेली. या साऱ्याच अक्षरवाङ्मयात गिरिदुर्गाच्या अजेयपणाचा, त्यांच्या उत्तुंगतेचा, दुर्गमतेचा जो साक्षात्कार दाखवलेला आहे, त्यावरून असे भासते की केवळ दुर्गबांधणीचीच नव्हे तर दगडांनी रचलेल्या गिरिदुर्गाच्या बांधणीची मानसिकता अन् नपुण्य त्या काळीही विपुल प्रमाणात उपलब्ध असावे- नव्हे असलेच पाहिजे. त्याविना असे ग्रंथ अन् असे दुर्ग रचलेच गेले नसते.

मध्ययुगात महाराष्ट्र दुर्गबांधणीत आघाडीवर होता आणि हेमाडपंती देवळे बांधणारे अणि खडक कोरून गुंफा निर्माण करणारे स्थपती आणि पाथरवट या कामात लागले असल्याने स्थापत्याचा आणि कलेचा अपूर्व असा संगम त्यात झालेला दिसतो. स्थपतींच्या शेकडो वर्षांच्या अनुभवामुळे त्यांनी दृष्टीला सुख तर दिलेच, पण ते अभेद्यही राहिले.

पूर्वसुरींनी दुर्ग बांधताना प्रादेशिक दुर्गमतेचाही विचार केला. भौगोलिक वैशिष्टय़े ध्यानी घेऊन दुर्गाची स्थाने व प्रकारसुद्धा निवडले गेले. दुर्गशास्त्राचा विचार करताना हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो. दुर्ग मुळात बांधले गेले ते लष्करी दृष्टिकोनातूनच. अन् हे तत्त्व केवळ मध्ययुगीन दुर्गानाच नव्हे, तर अगदी इतिहासपूर्वकाळापासून अस्तित्वात असलेल्या दुर्गानाही अगदी तंतोतंत लागू पडते. जगभरात याचे पुरावे पसरलेले आहेत. उदाहरणे खूप देता येतील : आजच्या पॅलेस्टीनमधील ‘जेरीको’ हे शहर पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते जगातील सर्वात जुनी मानवी वस्ती असलेले तटबंदीयुक्त शहर मानले जाते. पुरातत्त्ववेत्त्यांनी आजपर्यंत या शहराचे वीस थर उत्खनित केलेले आहेत. यांतला सर्वात खालचा थर अदमासे अकरा हजार वर्षांपूर्वीचा आहे (ख्रिस्तपूर्व ९०००). एका नवाश्मयुगीन वसाहतीभोवती ही तटबंदी बांधलेली आहे. संपूर्णतया दगडी बांधणीच्या या तटबंदीत पायऱ्या असलेला बुरूज आहे. पाच फूट उंचीचा व सतरा फूट रुंदीचा हा तट, पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते आक्रमणापासून संरक्षण व्हावे याच हेतूने बांधलेला आहे.

‘गिल्गमेश’ या महाकाव्यात वर्णन केलेलं ‘उरूक’ हे सुमेरीअन संस्कृतीतले शहरही जगातल्या तटबंदीयुक्त शहरांमधले सर्वात जुन्यांपकी एक वसाहत म्हणून ओळखले जाते. मुंडीगाक-कंदाहार, ट्रॉय, इस्तंबूल या साऱ्याच अतिप्राचीन शहरांच्या तटबंदी या लष्करी गरजेतूनच निर्माण झालेल्या आहेत. इतिहासपूर्व काळापासून वापरात असलेले हे तत्त्व युद्धसाहित्याच्या निरनिराळ्या शोधांसोबत वा प्रगतीसोबत उत्तरोत्तर प्रगतीच्या निरनिराळ्या पायठण्या ओलंडीत गेले. याचे पडसाद जगभरात उमटले. हिंदुस्थानात ही स्थित्यंतरे नोंदली गेली. राज्यसंरक्षण, राज्यसंवर्धन व राज्यप्रशासन या दुर्गाशी संबंधित असलेल्या सूत्रांपकी पहिली दोन सूत्रे ही संपूर्णतया लष्करी गरजाशीच संबंधित होती. किंबहुना संरक्षणाच्या प्राथमिक गरजेतून झालेली ही उत्क्रांती आक्रमकतेचा परिपूर्ण साज लेवून, मध्ययुगात जवळजवळ जगभरात विख्यात झाली.

आपल्या देशात या कालखंडात निर्माण झालेल्या दुर्गानी इतिहास रचला!

discover.horizon@gmail.com

(या लेखातील थोडासा भाग माझे मार्गदर्शक डॉ. अरिवद जामखेडकर यांनी माझ्या प्रबंधाला लिहिलेल्या प्रस्तावनेतून घेतला आहे.)