News Flash

घर घडवताना.. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने

आज आपण घर घेताना क्लब-हाऊस, पोहण्याचा तलाव, व्यायामशाळा अशा सोयीसुविधा असलेले गृहप्रकल्प निवडतो.

| May 17, 2014 01:02 am

आज आपण घर घेताना क्लब-हाऊस, पोहण्याचा तलाव, व्यायामशाळा अशा सोयीसुविधा असलेले गृहप्रकल्प निवडतो. या साऱ्यांसोबतच आपण आपल्या गृहनिर्माण वसाहतीत एक वाचनालय असावं असं ठरवलं तर निश्चितच ते खिशाला परवडेल; शिवाय वसाहतीतल्या लहान मुलांना, मोठय़ा माणसांना आणि वृद्धांना जवळच एक वाचनालयही उपलब्ध होईल.
वा चन संस्कृती लोप पावते आहे, पुस्तकांची विक्री मंदावते आहे अशा अत्यंत निराशाजनक वातावरणात आजूबाजूला अनेक घरं दिसतात- ज्यांत पुस्तकांचा मोठा संग्रह असतो. वाचनाची आवड आणि पुस्तकांचा, घरांच्या, माणसांच्या सांस्कृतिक जडणघडणीत अनन्यसाधारण वाटा आहे, हे नक्की!
डिसेंबर महिन्यात माझ्या घरातली वीज दोन-तीन दिवस गायब होती. साहजिकच संगणक, इंटरनेट, टेलिव्हिजन, चित्रपट, डीटीएच यांसारखी आधुनिक साधनं विजेअभावी निरुपयोगी झाली होती. करमणुकीकरता आणि वेळ सत्कारणी लावण्याकरता मला पुस्तकांचाच आधार होता. त्या तीन दिवसांत मी मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशी मिळून तब्बल सात पुस्तकं वाचली! दिवसभर कामातून सुट्टी घेतली होती. सायंकाळी जेवणाव्यतिरिक्त काही उद्योग नसायचा. त्यामुळेच वाचण्याकरता उत्तम वेळ मिळाला. रामकृष्ण पिल्लईंचं ‘कॉर्पोरेट चाणक्य’, एडवर्ड रुदरफर्ड यांचं ‘रुस्का’, मुन्शी प्रेमचंद यांची ‘गोदान’ कादंबरी, मीना प्रभू लिखित ‘गाथा इराणी’ हे प्रवासवर्णन, तर सानियाच्या ‘स्थलांतर’, ‘अवकाश’ आणि ‘आवर्तन’ या कादंबऱ्या; इतकी सारी पुस्तकं वाचून काढली.
रात्री नेमाने पुस्तकाची काही पानं वाचल्याशिवाय झोपायचं नाही, हा नियम गेले काही दिवस सातत्य हरवून बसला होता. त्याऐवजी, टीव्हीवर कार्यक्रम पाहणं, मोबाइलवर बातम्यांचा आढावा घेणं  किंवा अगदी त्यावेळीही ई-मेलला उत्तरं देणं या गोष्टी करत रात्री झोपेच्या अधीन होणं वाढीला लागलं होतं. पण त्या तीन दिवसांच्या वाचनानंतर पुन्हा एकदा झपाटल्यासारखी नवी पुस्तकं घेऊन, ती रात्री झोपण्यापूर्वी वाचण्याची नियमित सवय मी पुनरुज्जीवित केली आहे.
कशाला वाचायचं? मला नाही त्याची गरज..
खरंच, काही लोकांना वाचायची गरज वाटत नाही. वाचनाशिवाय त्यांचं चालत असेल, मला मात्र वाचायला आवडतं. आता, आवड म्हणण्यापेक्षा वाचणं ही माझी गरज झाली आहे. तो माझ्या व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग आहे. एक व्यावसायिक गरजही आहे की मी रोजच्या बातम्या, आजूबाजूच्या घडामोडी वाचायला हव्या. त्यासोबतच विविध विषयांचं अद्ययावत ज्ञान ठेवण्याचा फायदा माझ्या व्यवसायात नक्कीच मिळतो, त्यामुळेही वाचन ही माझी गरज आहे. माझ्या घरात आजोबांना मी कधीही काहीतरी वाचत असलेलंच पाहिलं आहे. रोजच्या वर्तमानपत्रापासून ते छापील पत्रकं, पुस्तकं, मासिकं, किंबहुना मराठीत लिहिलेला कोणताही कागद ते अगदी आवर्जून, मनापासून वाचत असत. माझे बाबा त्यांच्या अभ्यासविषयांव्यतिरिक्त अनेक इंग्रजी आणि मराठी पुस्तकं वाचत, त्यांचं उदाहरणही माझ्या समोर होतं.
कधी ते नक्की आठवत नाही, मात्र सर्वात पहिलं मला आवडलेलं आणि मी माझं म्हणून मिरवलेलं पुस्तक म्हणजे डॉ. सालिम अलींचं ‘बुक ऑफ इंडियन बर्डस्’ आईबाबांचं बोट धरून निसर्गसफरींवर जाताना सोबत करणारं, पक्षी ओळखायला मदत करणारं हे रंगीत चित्रांनी सजलेलं पुस्तक मला फार आवडत असे. इंग्रजीतला मजकूर तेव्हा कळत नव्हताच, मात्र ती चित्रं पाहताना मजा वाटायची. पुढे केव्हातरी साने गुरुजींच्या ‘कथामाला’, आचार्य अत्र्यांच्या ‘कुमारमाला’ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीणा गवाणकरांचं ‘एक होता काव्‍‌र्हर’ हातात मिळालं आणि झपाटल्यासारखा मी वाचायला लागलो.
अनोख्या साहित्यिक सेवा देणाऱ्या लिटररी एंजल्स आणि द इटर्नल लायब्ररी या कंपन्यांची संस्थापक आणि संचालक अहल्या नायडू म्हणते, ‘‘हे खरं आहे की काही लोक वाचत नाही. त्यांना त्याची गरजच वाटत नाही किंवा त्यांचं वाचल्यावाचून काही अडत नाही.’’ मात्र पुढे लहानपणी वाचलेल्या पुस्तकांच्या बाबतीत निरीक्षण नोंदवताना ती म्हणते, ‘‘वाचनाच्या बाबतीतही प्रत्येकाची विशिष्ट आवड असते, अगदी संगीताच्या आवडीसारखीच. बऱ्याचदा, संगीतासारखी ही आवडदेखील आपण लहानपणी काय वाचतो किंवा आपले आईवडील काय वाचतात यावर ठरते. आयुष्यभर आपण यात भर घालतो. मात्र लहानपणी ठरलेली वाचनाची, विशिष्ट विषयांची आवड जन्मभर तीच राहते.’’ हे खरं असेल असं मला वाटतं. मला स्वत:ला कविता, कादंबरी, कथा, वैचारिक, निबंध, लघुनिबंध, नाटक असे अनेक प्रकार आवडत असले तरी चरित्र विशेषत्वाने आवडतात. निसर्गविषयक पुस्तकं मी अधिक सहजपणे, चवीने वाचतो. लहानपणी मनापासून आवडलेल्या ‘एक होता काव्‍‌र्हर’चा किंवा ‘द बुक ऑफ इंडियन बर्डस्’चा हा परिणाम म्हणायचा का?
आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना
आपल्या घरी वडिलांना ‘गुरुचरित्र’ आणि ‘नवनाथभक्तीसारा’चं पारायण करताना पाहून ही पुस्तकं हाताळत शब्दांशी नाळ बांधलेल्या सुशांत देवळेकरच्या घरी आज पुस्तकांचं भांडार आहे. मराठी साहित्य, विशेषत: व्याकरण आणि भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा हा माझा दोस्त या विषयांवरची अनेक पुस्तकं ठिकठिकाणाहून जमवतो. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘आमच्या वरळीच्या छोटय़ाशा घरात माझ्या पुस्तकांमुळे शेजारीपाजारी अवाक् व्हायचे. भिंती पुस्तकांच्या कपाटांनी भरल्याच, शिवाय माळ्यावर, पलंगाखालीदेखील पुस्तकंच होती. घरातली जागा ही अडवण्यासाठीच असते. प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे ती अडतेच- कधी साडय़ा, कधी इलेक्ट्रॉनिक उपकरणं, कुणाघरी चित्रं, तर कुठे देश-विदेशातून जमवलेल्या वस्तूंनी. माझं घर पुस्तकांनी नेहमीच भरलेलं आहे.’ आपल्या संग्रहाविषयी सांगताना सुशांत म्हणतो, ‘‘माझ्याकडे छापील पुस्तकं आहेतच, मात्र आता संगणकीय पुस्तकंदेखील आहेत. मला दोन्ही आवडतात, त्यात आपपरभाव नाही. प्रत्येकाचेच फायदे-तोटे आहेत. मात्र छापील पुस्तकांचा संग्रह मला महत्त्वाचा वाटतो. लेखकांच्या स्वाक्षऱ्या असलेली, मित्रांनी प्रेमाने दिलेली, काही विशेष प्रसंगी बक्षीस म्हणून मिळालेली, शे-सव्वाशे र्वष जुनी, खास बांधणी असलेली तर काही पुस्तकं देखण्या टंकात, नक्षीत किंवा खास कागदामुळे सुशोभित झालेली असतात. मात्र या सगळ्यांचं सार असं की या सगळ्या पुस्तकांमुळे अनेक विषयांवरचे संदर्भ माझ्या घरी अगदी हाताच्या अंतरावर असतात.’’
सुशांतसारखी खरी पुस्तकप्रेमी मंडळी आता दुर्मीळ होत चालली आहेत हे नक्की. मात्र त्यांची कारणमीमांसा करताना अहल्या नायडू एक गंमतशीर मात्र पटणारं कारण सांगते, ‘‘चांगली पुस्तकं प्रकाशित होत नाहीत, त्यांची जाहिरात होत नाही, लोकांना चांगली पुस्तकं वाचायला आवडत नाहीत ही सगळीच कारणं अंशत: खरी असतीलही, पूर्णाशाने मात्र ती खरी नाहीत. खरं म्हणजे पुस्तकांच्या किमती अनेकदा सामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर असतात हे खरं कारण आहे.’’ द इटर्नल लायब्ररी या आपल्या कंपनीच्या माध्यमातून अहल्या आणि तिचा जीवनसाथी मिथील हे व्यक्ती, संस्था, कार्यालय यामध्ये लायब्ररीज् तयार करायला सल्लागार म्हणून काम करतात. या कामाच्या अनुभवाचाच भाग म्हणून अहल्या एक सहज उपाय सुचवते, ‘आज आपण घर घेताना क्लब-हाऊस, पोहण्याचा तलाव, व्यायामशाळा अशा सोयीसुविधा असलेले गृहप्रकल्प निवडतो. या साऱ्यांसोबतच आपण आपल्या गृहनिर्माण वसाहतीत एक वाचनालय असावं असं ठरवलं तर निश्चितच ते खिशाला परवडेल, शिवाय वसाहतीतल्या लहान मुलांना, मोठय़ा माणसांना आणि वृद्धांना जवळच एक वाचनालय उपलब्ध होईल.’ या उपक्रमाची गरज विशद करताना अहल्या ठामपणाने सांगते, ‘‘वाचनामुळे व्यक्तिविकासात महत्त्वाचा फायदा होतो. वाचणारी व्यक्ती अधिक संवेदनशील घडते, लहान मुलांच्या मेंदूच्या विकासात वाचनामुळे हातभार लागतो, वाचणारी मंडळी अधिक कल्पक आणि प्रगल्भ घडतात. वाचनाचा छंद जोपासणाऱ्या, विविध विषयांचं वाचन करणाऱ्या व्यक्तींच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतातच, शिवाय त्यांच्या भावनिक कक्षा रुंदावण्यासही मदत होते. साहजिकच आदर्शवत, प्रत्येकाकडे स्वत:चा पुस्तक-संग्रह असायला हवा, मात्र महागाईच्या कारणास्तव ते जमलं नाहीच, तरी वाचनाची गरज भागवलीच पाहिजे.’’
पुस्तकांच्या वाढत्या किमतींचा प्रश्न सुशांतलाही भेडसावतो. ‘व्याकरण वगैरे अभ्यासविषयांची पुस्तकं दुर्मीळ आणि महागही आहेत. मात्र शोधलं की सापडतंच. शिवाय अनेक जुनी, पण महत्त्वाची पुस्तकं मी चक्क रद्दीत विकत घेतली आहेत.’ पुस्तक संग्रहाचा, विशेषत: जुन्या पुस्तकांच्या संग्रहाचा सुशांतचा हेतू विशेषच आहे. तो म्हणतो, ‘माझ्याकडची ही पुस्तकं अनेक मार्गानी आलेली आहेत. त्यापैकी इतरांच्या संग्रहातून माझ्या संग्रहात आलेल्या पुस्तकांची संख्याही खूप आहे. माझ्याकडून ही पुस्तकं कदाचित कुठल्या मोठय़ा संग्रहात जातील. शिवाय जुन्या पुस्तकांच्या संगणकीकरणाचे प्रयत्न वैयक्तिक पातळीवर झाले तर ते अधिक वेगाने होतील आणि जुनी पुस्तकं संरक्षित होण्याला आणि नव्या पिढीला उपलब्ध होण्याला हातभार लागेल.’ सुशांतच्या या विचारांचा प्रत्यय मला खासच येतो आहे. माझ्या औरंगाबादच्या एका भेटीदरम्यान मला माझ्या मामेआजोबांनी- एम. एन. देशपांडे यांनी संपादित केलेलं, १९७५ साली भारतीय पुरातत्त्व खात्याने प्रकाशित केलेलं पुस्तक खात्याच्या भांडारात मिळालं. पुस्तकाची ही प्रत मी विकत घेतली आणि सांभाळून ठेवलेली आहे. शिवाय ती छायांकित करून संगणकावर उतरून घेतलेली आहे. तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे मला हे पुस्तक केव्हाही संदर्भ म्हणून सहज वापरता येतं. तसंच मूळ दुर्मीळ प्रत सारखी हाताळावीदेखील लागत नाही.
लहानपण दे गा देवा
माझा एक लहान मित्र माझ्यासारखाच वाचनवेडा घडतो आहे. आजच्या अनेक मुलांप्रमाणेच तो चौकस आहे. तंत्रज्ञानाला त्याने सहज आपलंसं केलेलं आहे, त्यामुळेच गुगलवर सर्च मारण्यासारख्या गोष्टी तो सहज करतोच. मात्र त्यासोबतच त्याच्या आईच्या मदतीने तो अनेक नव्या गोष्टी पुस्तकातून, मासिकांमधून, रोजच्या वर्तमानपत्रांतून वाचतो. शाळेत रोज आजच्या महत्त्वाच्या बातम्या विचारतात या सक्तीने सुरुवात झालेलं रोजचं वृत्तपत्र वाचन आता आवडीमध्ये परिवर्तित झालेलं आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या आटणाऱ्या पाणीसाठय़ाच्या बातम्यांनी हा छोटा मित्र पाणी वापरावर कडक र्निबध आणतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी तो त्याच्या वयाच्या इतरांपेक्षा अधिक जागरूक आहे. आईच्या मदतीने, त्याच्या वयाला साजेशा कथा, कादंबऱ्यांमधले उतारे वाचल्याने त्याच्या पातळीवर तो स्त्री-पुरुष समानता, जातीवाद, सामाजिक विषमता इत्यादी विषयांबाबतीत विचार करतो. प्रश्न विचारतो आणि त्यांची आपल्यापरीने उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतो. कवितांची त्याला गोडी लागली आहेच, शब्दांच्या नाद-लयीची गंमत त्याला भुलवते ही माझ्याकरता विशेष आनंदाची गोष्ट ठरते आहे.
या छोटय़ा मित्राला पाहिलं म्हणजे मला माझ्या बालपणाची आठवण होते. पाठय़पुस्तकात धडय़ांचे लेखक म्हणून भेटणारे यदुनाथ थत्ते माझ्या आजी, मामा-आजोबांचे स्नेही. स्वातंत्र्यसैनिक, संपादक आणि साहित्यिक अशी गंभीर ओळख पाठय़पुस्तकांतून झालेले यदुकाका प्रत्यक्षात मात्र कमालीचे साधे, हसरे, हसवणारे आणि मुलांत रमणारे होते. त्यांच्या घरची एक आठवण माझ्या मनात कायमची कोरलेली आहे. त्यांचा सारा संसार पुस्तकांच्या अधेमधे घरभर पसरलेला होता. चिवडय़ाचा डबा त्या पुस्तकांच्या मागे, कडबोळी त्या कवितासंग्रहांच्या डोक्यावर आणि त्या अमुक-तमुक साप्ताहिकाच्या गठ्ठय़ाशेजारच्या खुर्चीवर आरामात बस म्हणावं असे संवाद त्यांच्यात आणि आमच्यात होत असत. मला अप्रूप वाटायचं ते म्हणजे त्यांच्या आणि जान्हवी आजी; म्हणजेच यदुकाकांच्या पत्नीच्या स्मरणशक्तीचं. त्या उतारवयातही ते बिनचूकपणे कोणत्या पुस्तकात काय आहे ते सांगत. पटकन् कुठेतरी हात घालून गोष्टीचं, गाण्याचं पुस्तक काढून ते आम्हा मुलांना समरसून, अगदी हावभावांसकट, वाचून दाखवत. कधी निरोप घेताना, स्वत: लिहिलेल्या पुस्तकाची प्रत काही विशेष संदेश लिहून हाती ठेवत. त्या वेळी खासच वाटायचं की आपलं घरदेखील अस्सच पुस्तकांनी भरलेलं असावं. त्यांच्यासारखंच आपणही भरपूर गोष्टींचा खजिना असणारं, ज्ञानी आणि सगळ्यांचं आवडतं व्हावं. यदुकाका आणि जान्हवी आजीच्या घरीच नकळत पुस्तकांचा संबंध आनंदाशी, आयुष्य समृद्ध करणाऱ्या जादूई जगाशी जोडला गेला.
घरात एक छोटासा का होईना पुस्तक-संग्रह जमा करा. घरी येणाऱ्या प्रत्येक एका पुस्तकासोबत तुमचं घर श्रीमंत, समृद्ध होताना अनुभवणं ही एक वैयक्तिक, आनंददायी अनुभूती आहे, हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2014 1:02 am

Web Title: need of library in residential complex
Next Stories
1 देखभाल व सेवाशुल्काविषयी अधिक काही..
2 सोसायटीची सर्वसाधारण सभा व गोंधळ
3 लेकुरवाळं घर
Just Now!
X