माधुरी साठे

पूर्वी मी, मत्रिणींबरोबर माथेरानला जाण्यासाठी एका मत्रिणीच्या घरी नेरळला गेले होते. त्यावेळी मी नेरळ पाहिले होते व मला नेरळ व तिथली शांतता आवडली होती. त्यानंतर मी व माझे पती नेरळला घर बांधण्यासाठी जागा बघायला गेलो होतो. जुलैचा पहिला आठवडा होता. रस्त्यावरून जाताना सगळीकडे दुतर्फा मोठी झाडे होती. आणि जेथे जागा दाखविली तेथे मोठा हिरवागार माळ होता. हिरवेगार गवत बघायला सुखावह वाटत होते.

आम्ही तेथे आमचा ‘स्वप्नपूर्ती’ बंगला बांधला आणि पाऊस व नेरळचे नाते यांनी मला नेरळ अधिकच आवडायला लागले. ज्यांना पाऊस अनुभवायचा आहे त्यांनी नेरळला पावसात भिजायला एकदा यावेच. नेरळला जेव्हा पाऊस येतो त्यावेळी हिरव्यागार उंचच उंच डोंगरावर काळे ढग दाटून येतात. आकाशातही काळे ढग इकडे-तिकडे विहार करायला लागतात आणि मग नभ मेघांनी आक्रमिले हे गाणे माझ्या तोंडी येते. हळूहळू काळोखी वातावरण होते. वादळी वारे घोंघावतात. ते वारे सुखावह वाटतात. झाडे आनंदाने डोलायला लागतात. पानांची सळसळ सुरू होते. विजांचा कडकडाट, लखलखाट सुरू होतो आणि मग आपला लाडका पाऊसराजा डौलात, वाजतगाजत राजासारखा येतो. मग सगळेजण हातातील कामे सोडून त्याचे स्वागत करायला सरसावतात. खिडकीतून, दारातून, गॅलरीतून, गच्चीतून डोकवायला लागतात. पावसाचे थेंब हातावर घ्यायला लागतात. लहान मुले, त्याचबरोबर काही मोठेही त्याच्या धारा अंगावर घ्यायला सरसावतात. रस्त्यावर मातीचे ओहोळ वाहायला सुरुवात होते. काही ठिकाणी साचलेल्या पाण्यात लहान मुले डुबुक उडय़ा मारतात, कागदाच्या होडय़ा सोडतात. आमच्या घराच्या मागे एक छोटा ओढा तयार व्हायचा. तेथे माझी मुलगी लहान होती तेव्हा पाण्यात खेळायला जायची. नेरळच्या गावातील शेतकरी गुडघाभर चिखलात आनंदाने पेरणी करायला सुरुवात करतात.

पाऊस आल्यावर झाडांची पाने धुऊन हिरवीगार होतात. प्रत्येक पान व झाडाला सचल स्नान घातल्यासारखे वाटते. पानांवर पावसाचे पाणी मोत्यासारखे चमकताना दिसतात. नेरळला घरांच्या आवारात मोगरा, जाई, जुई, अनंत, चाफा, प्राजक्त वगरेंसारखी फुलझाडे असल्यामुळे वाऱ्याच्या झोताबरोबर त्यांचा सुगंध आसमंतात दरवळतो. पाऊस आल्यावर वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे पक्षी इकडून तिकडे पळायला लागतात. काही आपले पंख फडफडवीत झाडांच्या आडोशाला बसतात. त्यांचा छान किलबिलाट सुरू असतो. पाऊस आल्यावर माथेरानच्या हिरव्यागार डोंगरावर अनेक लहान-मोठे स्फटिकासारखे धबधबे कोसळताना दिसतात. कधी कधी ढगांमुळे डोंगर दिसेनासा होतो. कधी कधी ढग डोंगराला टेकलेले दिसतात. नेरळला पाऊस आल्यावर त्याचा आनंद लुटण्यासाठी व निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी होते व परत परत येथे येण्यासाठी त्यांना ओढ लागते. सगळ्या पर्यटकांची आकर्षण असलेली माथेरानची राणी (मिनी ट्रेन), धो धो पडणाऱ्या पावसामुळे अपघात होऊ नये म्हणून पावसाळ्यात बंद ठेवावी लागते.

नेरळला रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस पडत असेल तर आमच्याकडे असलेल्या सुरूच्या झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येते. सोसाटय़ाच्या वाऱ्याचा वेगळाच आवाज येतो. रातकिडय़ांचे किर्र आवाज येतात तसेच बेडकांचा डराव डराव आवाज येतो.

असा धुवॉंधार पाऊस पडत असल्यावर गरमागरम कांदाभजी व चहा याची तलफ कोणाला येणार नाही तर नवलच! या पावसात गरमागरम भजी व चहा घेत निसर्गाचे सुंदर रूप पाहण्यासारखा अवर्णनीय आनंद नाही. मग नेरळला मध्यावरती भजी, चहा, वेगवेगळ्या पदार्थाचे गणेश नावाचे दुकान आहे तेथे जावे, पदार्थाचा आस्वाद घेत, छान गप्पा मारीत, गाणी म्हणत मजा करावी.

श्रावण महिन्यात पाऊससरींचा पडदा विरळ होत जातो. ऊनपावसाच्या खेळात इंद्रधनूवरून अलगद श्रावणधून उतरते आणि हिरव्या गालिच्यावरून नेरळच्या रानपावेतो वाट जाते. आणि ओळखीचे सूर ऐकायला येऊ लागतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रंगीबेरंगी तेरडा फुलतो. आघाडा दिसतो, भेंडीची झाडे दिसतात. केशरी देठ असलेल्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो व गोड सुगंध आसमंतात दरवळतो.

नेरळला गेल्यावर पावसात श्री स्वामी समर्थाच्या मठाला भेट द्यावी. सगुणा बागेत जाऊन मजा करावी. तेथील पावसाची व निसर्गरम्यतेची मजा घ्यावी.

हा नेरळचा पाऊस बघून, या पावसाची व त्यामुळे खुललेल्या निसर्गाची पुन्हा पुन्हा उमलण्याची सुंदर शिकवण घेऊन, मन प्रफुल्लित करून, नव्या उमेदीत आपण आयुष्य जगायला सुरुवात करावी.

madhurisathe1@yahoo.com