News Flash

वास्तुगिरी : आधी लोकजीवन मग वास्तुरचना

गेल्या काही दशकांतील मुंबईचा बकालतेकडे झालेला प्रवास हा बुद्धी आणि विचारक्षमता नसलेल्या किंवा गमावून बसलेल्या समाजाचे बाह्य़ रूप आहे.

| September 6, 2014 02:01 am

गेल्या काही दशकांतील मुंबईचा बकालतेकडे झालेला प्रवास हा बुद्धी आणि विचारक्षमता नसलेल्या किंवा गमावून बसलेल्या समाजाचे बाह्य़ रूप आहे. आपले वास्तूव्यवहार आणि व्यवसाय शासकीय धोरणांनी करकचून बांधलेले आहेत आणि त्या नियमांमध्ये लोकांच्या वास्तवातल्या गरजांपेक्षा राजकीय, सैद्धांतिक अंधश्रद्धांचा आणि प्रशासकीय गरजांचा पगडा आहे.
एका कुटुंबाच्या घराची वास्तूरचना करणे आणि दोन किंवा अधिक कुटुंबांच्या घरांची वास्तू रचना करणे हे मूलभूतपणे वेगळेच असते आणि अवघडही. कारण कुटुंबांची रचना, सदस्य संख्या, राहणीमान या बाबतीत समानता असणे अशक्य. एकाच कुटुंबातील सख्ख्या नात्यातील कुटुंबांमध्येही विविधता असते तेथे नानाविध भाषेच्या, प्रदेशाच्या, वयोगटाच्या कुटुंबांसाठी इमारत बांधायची असते तेव्हा मोठय़ा प्रमाणात त्यांच्या केवळ काही मूलभूत गरजांचा विचार करता येतो. वास्तू रचनाकाराला प्रत्येकाच्या व्यक्तिगत आवडीनुसार घराची रचना आणि बांधकाम यांचा विचार करता येत नाही. सहसा एकतर बाजारातील ग्राहकांच्या मागणीनुसार नाही तर सरकारी मानकानुसार वास्तू रचना करता येतात. जेव्हा बिल्डर किंवा विकासक घरे निर्माण करतो तेव्हा महापालिकेचे नियम आणि बाजारातील मागणी यांची सांगड घालून तो जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी वस्तू रचना करतो. अशा वेळी वास्तुरचनाकार बिल्डर आणि इमारतीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातातले बाहुले बनतो!.
पूर्वी काही लोक एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था स्थापन करीत. मग जमीन विकत घेऊन एकतर त्यावर बंगले नाहीतर बहुमजली इमारती बांधत. त्यावेळी वास्तुरचनाकारांची मोठी परीक्षाच असे. कारण प्रत्येक सभासदाला काही तरी वेगळे हवे असे. प्रत्येकाच्या वेगळ्या कल्पना असत. आर्थिक क्षमता आणि कुटुंबाच्या अपेक्षा वेगळ्या असत आणि त्यातून एकमत होणे दुरापास्त होत असे. शेवटी विकास नियमावली आणि आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन इमारतीचे आराखडे करणे शक्य होत असे. सभासदांचे एकमत होणे किती दुरापास्त असते ते काही वेगळे सांगायला नको.
परंतु हे सर्व शहाणपण व्यवसायात शिरल्यानंतर यायला लागले. त्याआधी महाविद्यालयात व्यावसायिक शिक्षण घेत असताना वास्तुरचनाकाराचे सर्वोच्च  स्थान आम्ही गृहीत धरलेले होते.  Fountainhead We  ही आयन रँड या आत्यंतिक व्यक्ती स्वातंत्र्याचा उदो उदो करणाऱ्या लेखिकेची कादंबरी आम्हा विद्यार्थ्यांची जणू गीता होती. प्रत्येक वास्तुरचनेत माझे व्यक्तिमत्त्व दिसलेच पाहिजे हा त्या कादंबरीतील वास्तुरचनाकार नायकाचा आग्रह असे. त्याला इमारतीच्या मालकाने, प्रवर्तकाने सूचना दिलेल्या अजिबात चालत नसत. बांधकामाचे शासकीय नियम तर त्याला अजिबातच मान्य नसत. लोकांनी कसे राहावे, इमारतींचा, खोल्यांचा, त्यातील फार्निचरचा वापर कसा करावा, कोणता रंग भिंतीना असावा, काच असावी की विटा वा लाकूड या सर्व बाबतीत केवळ स्वत:चाच अधिकार तो मान्य करीत असे. सामान्य लोकांना, समाजाला, ग्राहकांना बांधकामांबाबत काही काळत नाही आणि म्हणून वास्तुरचनाकार हाच इमारतींच्या संबंधातील निर्णयांचा सर्वोच्च नियंत्रक असतो अशी त्याकाळी आम्हा विद्यार्थ्यांचीही समजूत होती. ‘वास्तूरचना नजरेत भरणारीच हवी’ हाच एकमेव निकष मानला जात असे.
या सर्व शिक्षण काळात आधुनिक युरोपीय किंवा पाश्चात्य वास्तुशैली हीच सर्वात श्रेष्ठ आहे आणि ती ‘जागतिक’ असली पाहिजे हेही नकळतपणे बिंबवले जात असे. मोठय़ा उत्तुंग काचेच्या ठोकळेबाज इमारती या तेव्हा भव्य, नेत्रदीपक, सुंदर असतात अशी समजूत प्रचलित झाली होती. कॉलेजच्या वाचनालयात येणारी सर्व पुस्तके, वास्तू-कलेची बहुतेक मासिके ही सर्व तेथूनच येत. तेव्हा भारतातील वास्तुकला मासिकांची सुरुवातही झाली नव्हती. त्यामुळे परदेशी, चमकदार, आकर्षक आणि रंगीबेरंगी, मासिकातील वास्तुरचना आमच्या मानसिकतेचा भाग झाली असल्यास नवल नाही. भारतीय आणि पाश्चात्य वास्तुशास्त्राचा इतिहास शिकविला जात असे, पण त्यातून आधुनिक वास्तुरचनेसाठी त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. शिवाय त्यात बुद्धकालीन लेणी, देवळे, मशिदी, चर्च यांच्या इमारतींच्या वस्तू शैलीवरच भर असे. राजमहाल, समाध्या, ताजमहाल आणि इतर स्मारके यांचा अभ्यास, त्यांच्या आकारांचा, कलाकुसरीचा, सौंदर्य शास्त्रांचा अभ्यास असे. परंतु इतिहासकालीन वा प्रचलित शहरा-खेडय़ातील सामान्य लोकांची, शेतकऱ्यांची, विविध कारागिरांची घरे, वाडे, दुकाने, कार्यशाळा, इतर शासकीय इमारती कशा होत्या हे काहीच शिकविले जात नसे. समाजशास्त्र, इतिहास, बांधकाम साहित्य प्रकार असे अनेक विषय होते, परंतु त्यातून लोकांना, समाजाला काय हवे असते, त्यासाठी काय करायचे हे काही शिकविले जात नसे. किंबहुना समाज, लोकांचे जीवन सतत बदलत असते आणि वास्तू मात्र स्थिर आणि दीर्घ काळासाठी बांधलेल्या असतात आणि त्यांची सांगड घालणे कसे अवघड असते हे शिक्षण झाल्यावर, प्रत्यक्षात काम करायला लागल्यावर उमजायला लागले.
१९६०-७० चा काळ हा ‘आधुनिक वास्तुरचना’ शैलीचा अत्युच्च बिंदू होता. लोकांच्या गरजांपेक्षा मोठय़ा आकारांना, आंधुक ठोकळेशैलीलाच जास्त महत्त्व दिले जात असे. बाहेरून इमारत आकर्षक दिसणे, भव्य आणि वेगळेपणाने उठून दिसणे हेच जास्त महत्त्वाचे मानले जात असे. पण १९८०च्या दशकापासून या वास्तू शिक्षणाबद्दल आणि मुख्य म्हणजे आधुनिक आदर्शवादी वास्तुशैलीबाबतच मोठे विचारमंथन पाश्चात्य देशात सुरू झाले. आपल्याकडे मात्र असे काही वैचारिक वाद झालेच नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले, पहिल्या पिढीतील वास्तुरचनाकार अनुकरण करूनच व्यवसायात स्थिरावत होते. बहुतेकांसाठी व्यवसायातील आर्थिक यश हाच मोठा निकष होता.  
वास्तुशास्त्र आणि वास्तू व्यवसाय लोकांना, समाजाला, शहराला, चांगले किंवा वाईट वळण देऊ  शकतो हे मलाही काही वर्षांनी कळायला लागले. गेल्या काही दशकांतील मुंबईचा बकालतेकडे झालेला प्रवास हा बुद्धी आणि विचारक्षमता नसलेल्या किंवा गमावून बसलेल्या समाजाचे बाह्य़ रूप आहे. आपले वास्तूव्यवहार आणि व्यवसाय शासकीय धोरणांनी करकचून बांधलेले आहेत आणि त्या नियमांमध्ये लोकांच्या वास्तवातल्या गरजांपेक्षा राजकीय, सैद्धांतिक अंधश्रद्धांचा आणि प्रशासकीय गरजांचा पगडा आहे.
‘सिटीज फॉर पीपल’ हे एका डच वास्तुरचनाकाराच्या पुस्तकात पाश्चात्त्य देशात गेल्या साठ वर्षांत आधुनिक वास्तूरचनेमुळे, जोडीलाच मोटारीला प्राधान्य देणाऱ्या वाहतूक नियोजनामुळे किती आणि कोणत्या, घोडचुका झाल्या, त्यामुळे शहरांवर, लोकजीवनावर काय काय घातक परिणाम झाले याची फार चांगली चर्चा केली आहे. आपल्याला जर लोकांसाठी घरे, वास्तू आणि शहरे बांधायची असतील तर आधी आपल्याला ‘माणूस आणि त्याच्या माणूसपणाचे निसर्गदत्त आणि मूलभूत आयाम’ समजून घ्यायला हवेत. त्यांचे जीवनव्यवहार समजून घ्यायला हवेत. आणि त्यासाठी लोकांबद्दल ममत्व हवे, प्रेम हवे. लोकांना समजून घेण्यासाठी प्रयत्न आणि संशोधन हवे. ‘आधी लोकजीवन आणि मग वास्तू’ हा त्यांचा मंत्र आहे. विविध प्रदेशातील वैशिष्टय़पूर्ण लोकजीवनाचा अभ्यास करून मगच वास्तुरचना करणे ही आजची जागतिक गरज आहे.                 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:01 am

Web Title: people life first then construction design
Next Stories
1 गणपती.. घरोघरी.. मनोमनी..
2 घर घडवताना.. ‘वाद’ आणि घर
3 चाळींतील उत्सवांनी जगायला शिकवले!
Just Now!
X