अरुण मळेकर

आता पर्यटनाच्या अनेक शाखांचा उगम होऊन त्यांचा विस्तार होत आहे. त्यातील अनेक प्रकारच्या सहल प्रकारांतील ‘वारसा वास्तुदर्शन’ (ऌएफकळअ‍ॅए हअछङ) ही नवीन शाखा प्राचीन इतिहासासह वारसावास्तू बांधकाम, शिल्पाकृती यात स्वारस्य असणाऱ्यांसाठी एक नवीन दालन उघडले आहे. पण आपल्याकडे बरेचसे पर्यटक पर्यटन यात्रेतून प्रवास करताना स्थळदर्शनातील वारसावास्तूंना भेट दिल्याचे समाधान घेऊन परततात; परंतु लहानमोठय़ा वास्तूंच्या बांधकामावरील शिल्पकाम आणि अन्य कलाकृतीकडे पाहाण्याची एक अभ्यासपूर्ण नजर अभावानेच आढळते.

दिल्ली, आग्रा, फत्तेपूर-सिक्री, अजमेर या पुरातन नगरांवर अनेक वर्षे मोगल साम्राज्याचा अंमल होता. त्या काळात उभारलेल्या बऱ्याच इमारतींना विश्वव्यापी मान्यतेची पावती मिळालीय. ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील त्यांचे कलापूर्ण टोलेजंग बांधकाम पाहताना आपण मोहित होतो. पण त्या बांधकामावरील शिल्पाकृतींसह साकारलेली कलाकृती पाहण्यासाठी एक कलात्मक दृष्टी लागते. ही अभ्यासू नजर ज्यांच्याकडे आहे त्यांनाच मोगलकालीन अजरामर कलाविष्काराची जाणीव होईल.

भारतभूमीवर साम्राज्यविस्तार करणाऱ्या परकीय आक्रमकांनी धर्मासह आपल्या संस्कृतीची मोहोर उमटवताना, त्यांच्या कलाकृतीचे सादरीकरण अनेक वास्तूंमधून आढळते. मोगलकालीन निर्माण झालेल्या काही सौंदर्यशाली वास्तूंमधून ‘पिएत्रा डय़ुरा आर्टवर्क’चा आविष्कार पाहावयास मिळतो. हा कला प्रकार मूळ बांधकामातील घटक नाही. मात्र त्याच्या आधारे वास्तुवैभव वृद्धिंगत करण्याचा एक प्रकार आहे. इ.स. १५२६ ते १८५७ या मोगल काळातील संस्थापक बाबर ते बहादूर शहा जाफर या सत्ताधीशांच्या काळात ज्या अनेक वास्तू निर्माण झाल्या, त्यातील काही वास्तूंतून हा कलाविष्कार आढळतो.

आग्रा किल्ल्यामध्ये संगमरवराचा वापर करून विशिष्ट भाग सुशोभित केला आहे. या भव्य किल्ल्यात वावरताना सर्वत्र शुभ्र धवल संगमरवरी दगडी बांधकाम दिसते. येथील नक्षीदार खांब, कारंजी, भिंती या बांधकामांवर रंगीत चित्राकृती आपल्याला पेंटिंगच वाटते, पण कुठेही जोडकाम नसलेल्या या कलाकृतीवर ‘पिएत्रा डय़ुरा’ कला प्रकारांनी कायमस्वरूपी चित्राकृती पाहावयास मिळते.

‘पिएत्रा आर्ट’ कलाकृती निर्माण करणाऱ्यांकडे कलापूर्ण दृष्टीसह द्रष्टेपणाही होताच. प्रेशस स्टोनवर प्रथम नियोजित चित्राकृतीचे आरेखन करून त्यानुसार ते डिझाइन अर्धा ते पाऊण इंच खोल कोरले जाते. त्यावर तयार झालेल्या आकाराच्या पत्थरावर मिळत्याजुळत्या रंगसंगतीच्या सुशोभित स्टोन पकड घेणाऱ्या (अऊऌएरकश्ए) घटकाच्या साह्यने घट्ट बसवला जातो. हे कलाकृतीचे नाजूक काम करताना मूळ कोरीव दगड आणि त्यात बसवायचा स्टोन यांचे मोजमाप अचूक असायला हवे. कारण पाहाणाऱ्याला जोडकाम दिसता कामा नये. या निर्माण केलेल्या कलाकृतीवर ते आणखीन चित्ताकर्षक दिसण्यासाठी त्यावर पाचू, माणिक बसवले जायचे.

आग्रा किल्ल्यातील महत्त्वाच्या दालनांतील अनेक खांबांवर पानाफुलांचे डिझाइन आणि त्यावरील पाचू, माणिक पाहताना मोगल सम्राटांची कलात्मक दृष्टी जाणवते. पांढऱ्या पार्श्वभूमीवरच्या संगमरवरावर हिरवे, काळपट, लाल रंगाचे पिएत्रा आर्टवर्क साकारताना अचूक रंगसंगतीसह भूमिती शास्त्राचा आधार कलाकारांनी घेतल्याचे जाणवते. अल्प साधनसामग्रींनी त्यांनी निर्माण केलेली अजब कलाकृती थक्क करणारी आहे.

सम्राट अकबरांनी उभारलेली विजयनगरी सिक्रीमधील शेख सलीम अलीच्या चिश्तीच्या दर्ग्यातील छतावरील प्रेशस स्टोनमधील पिएत्रा आर्टवर्क आढळते. आग्रा शहराबाहेर अकबराने त्याच्या हयातीत जे आपले थडगे बांधायला घेतले ते त्याचा पुत्र जहांगीरांनी इ.स. १६१३ मध्ये पूर्ण केले. ते ‘अकबर होम्स’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या भव्यतेबरोबर त्यावरील पिएत्रा वर्क पाहावयास मिळते. पिवळ्या, काळ्या, पांढऱ्या संगमरवरावरील इनले वर्कही त्यात दिसते. या भव्य वास्तूचे प्रवेशद्वार, चौफेर मिनार आणि छोटे घुमट यांचे बांधकाम करतानाही भूमिती शास्त्राचा आधार घेतल्याचे जाणवते. याशिवाय सर्वत्र पानाफुलांच्या डिझाइनबरोबर उर्दू लिपीतील वळणदार अक्षरे पिएत्रा डय़ुरा वर्कमध्ये साकारण्याचे कौशल्य जागोजागी जाणवते.

आग्रा किल्ल्यातील इतमाद उल्ला यांच्या कबरीवरही हीच कला पाहावयास मिळते. इतमाद उल्ला हे जहांगीरांचे वझीर आणि पत्नी नूरजहाँचे वडील होते. इ.स. १६२२-२४ या काळात नूरजहाँची जी कबर बांधली गेली, या दोहोंवर नाजूक कलाकुसर, रंगसंगती, कौशल्य नजरेत भरते. आग्रा स्थळदर्शनात ताजमहाल दर्शन आलेच. जागतिक मान्यतेच्या या वास्तूमधील ‘पिएत्रा वर्क’कडे आपली नजर जात नाही, कारण या वास्तूची भव्यता, सौंदर्याबरोबर दंतकथा ऐकण्या-वाचण्यात आम्ही वेळ घालवतो.

ताजमहालच्या बाह्य़ आणि अंतर्गत भागात पिएत्रा डय़ुरा वर्कचा नजराणा जागोजागी आढळतो. मार्बलयुक्त भव्य अशा प्रवेशद्वाराने पिएत्रा आर्टवर्कने आपले स्वागत होते. या प्रवेशद्वारीच कुराणातील अल्लाची नावे काळ्या सेमी प्रेशस स्टोनमधून साकारलेली आहेत.

ताजमहालाच्या प्रमुख घुमटाखाली सम्राट शहाजहान आणि बेगम मुमताज यांच्या कबरी आहेत. त्यावरील पिएत्रा डय़ुरा वर्क लक्ष वेधून घेते. या कलेच्या माध्यमातून मकराना मार्बलवरील पाने, फुले, वेलबुट्टय़ा नैसर्गिक रंगांनी साकारण्यात कलाकारांचे नैपुण्य दिसून येते. माणिक आणि पाचूही रंगसंगतीत भर घालताहेत. या कबरीसाठी मार्बल राजस्थानातील मकराना येथून, तर रेड सँडस्टोन फत्तेपूर-सिक्री येथून आणला आहे.

आता ही कलाकृती दुर्मीळ होत चालली आहे, पण आग्रा परिसरात ही कलाकृती साकारणारे कलाकार अजूनही आहेत. प्रत्यक्ष ताजमहालचे बांधकाम करणाऱ्या शिल्पकारांचे हे वंशज समजले जातात. अंगभूत कला आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या साह्य़ाने त्यांचे काम चाललेच आहे. ही पिएत्रा डय़ुरा आर्ट कलाकृती टिकवण्यासाठी सरकारचे अनुदानही त्यांना मिळते. कलाकारांनी निर्माण केलेल्या वस्तुखरेदीला पर्यटकांचा मोठा आधार आहे.

आग्रा परिसरात प्राचीन, ऐतिहासिक वास्तुवैभवातील ‘पिएत्रा डय़ुरा’ कलाविष्कार पाहिल्यावर चित्रकला, शिल्पकलेविषयी अनभिज्ञ असलेला माणूसही त्याकडे आकर्षित होणारच; पण आजच्या आधुनिक चेहऱ्याच्या नवनवीन वास्तुनिर्मितीच्या झंझावातात या ‘पिएत्रा डय़ुरा वर्क’ कलाकृतीचे संवर्धन व्हायला हवे असे वाटल्यावाचून राहत नाही.