18 March 2019

News Flash

नियोजनबद्ध प्लम्बिंग

बाथरूम म्हटलं की आपल्याला आठवतं ते ‘थंडे थंडे पानी से नहाना चाहिये..’ हे सुप्रसिद्ध गाणं.

बाथरूम म्हटलं की आपल्याला आठवतं ते ‘थंडे थंडे पानी से नहाना चाहिये..’ हे सुप्रसिद्ध गाणं.  एक कल्पना करा की, खरंच आपल्या बाथरूममध्ये फक्त गारच पाणी येत असेल तर?  कारण सगळ्याच ऋतूंत आपण गार पाण्याने अंघोळ करू शकत नाही. आजकाल तर आपण बेसिन, किचनचे सिंक सगळीकडे गरम पाणी कसे येईल याचाच प्रयत्न करत असतो. एकाच नळातून गरम आणि गार पाणी येणे म्हणजे काही जादू नसते, हे आताशा आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. त्यासाठी लागते ते प्लम्बिंग; आणि नुसते प्लम्बिंग नाही तर नियोजनबद्ध प्लम्बिंग. आज आपण प्लम्बिंग या विषयाची माहिती घेऊ या. इलेक्ट्रिकल इतकेच प्लम्बिंग महत्त्वाचे आहे. कारण याकडे जरा जरी दुर्लक्ष झाले तर फारच नुकसान होऊ शकते. प्लम्बिंग करताना नुसतंच सौंदर्याचा विचार करून उपयोगाचे नाही, त्याचे अचूक प्लॅनिंगही बघणे फार आवश्यक आहे. कारण ज्या गोष्टी कन्सिल्ड असतात त्या फारच विचारपूर्वक करायला लागतात.

प्लम्बिंग करायला घेतो तेव्हा दोन गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या लागतात. जसे- आपण घरात पाणी कसे आणणार आणि त्याची पाइपलाइन कशी आणि कुठे कुठे फिरवणार. आणि दुसरे म्हणजे, जे वापरलेले पाणी म्हणजेच सांडपाणी बाहेर कसे नेणार. म्हणजेच इनलेट- आउटलेट आणि ड्रेनेजचाही विचार फार आवश्यक आहे.

सुंदर आणि उपयुक्त अशा बाथरूमसाठी आणि घरातील प्रत्येक अशी जागा- जिथे आपण पाण्याचे नळ बसवणार आहोत त्यासाठी आपल्याला योग्य प्लम्बिंगची गरज असते. प्लम्बिंग लाइन कशी आणि कुठे फिरणार हे ठरवण्यासाठी आधी आपल्याला बाथरूमचा लेआऊट ठरवावा लागतो. त्यानंतर जर टाईल्सचा आराखडाही निश्चित केला तर आपल्याला नळ, शॉवर अर्थात सॅनिटरी वेअर्सची जागाही ठरवता येते. म्हणजे नळ टाइल्सच्या जॉईन्टवर बसवायचे की डिझायनर टाईलच्या मध्यावर बसवायचे हे ठरवता येते. याशिवाय या सगळ्या फिटिंग्जची उंची नीट ठरवून घेतली की पाइपलाइनचे काम सोपे होते. बाथरूमचे फिटिंग्ज आधीच निश्चित करावे. कारण कन्सिल्ड पाइपलाइनसाठी डायव्हर्टरचा भाग भिंतीत नीट बसावावा लागतो, तसेच ६.ू चेही फिटिंग करणे सोपे जाते. कारण काही ठिकाणी कन्सिल्ड फ्लश टँक लावावा लागतो. फ्लशव्हॉल्व्हही लावलेला असतो. एकदा काम सुरू झाले की मग फारच घाई होते, मग मध्येच काम थांबते.. हे सगळे टाळण्यासाठी सॅनिटरीवेअर्स आधीच निश्चित करावेत. बाथरूमचे काम सुरू होते तेच पाइपपासून.

आता जाणून घेऊ या की प्लम्बिंग करताना कोणते पाइप लावावेत. जी.आय., सी. पी. व्ही.सी., पी.व्ही.सी., यू.पी.व्ही.सी. या प्रकारचे पाइप बाजारात उपलब्ध आहेत.

जी. आय.- जी.आय.पाइप हे धातूचे असतात. यांचा वापर अंतर्गत प्लम्बिंगसाठी होतो. पण कधी चुकून यावर ड्रिल केले गेले की हे पाइप खराब होतात. याशिवाय हे पाइप गंजण्याची भीतीही जास्त असते. त्यामुळे आजकाल या पाइपचा वापर कमी प्रमाणात केला जातो.

सी.पी.व्ही.सी. हे पाइप अंतर्गत प्लम्बिंगसाठी वापरले जातात. गरम आणि गार पाण्याच्या पाइप- लाईनसाठी याचा वापर होतो. गरम पाण्याच्या तापमानाचा यावर कोणताही परिणाम होत नाही. चुकून जर का या पाइपवर ड्रिल झाले तर याचे एक सोल्युशन बाजारात उपलब्ध आहे, ज्याने पाइपला पडलेले भोक बंद करता येते. याशिवाय हे पाइप गंजत नाहीत. आजकाल या प्रकारच्या पाइपचा वापर पब्लिंगसाठी केला जातो.

पी.व्ही. सी. – या पाइपचा वापर प्रामुख्याने पाणीपुरवठय़ाठी केला जातो किंवा सांडपाण्यासाठी. जसे टाकीपासून घरापर्यंत पाणी आणण्यासाठी या पद्धतीचे पाइप वापरतात. हे पाइप गरम पाण्यासाठी योग्य नसतात. एका विशिष्ट तापमानापुढे हे पाइप गरम पाणी वाहून नेऊ  शकत नाहीत.

यू. पी.व्ही. सी.- या पाइपचा प्रामुख्याने वापर हा पाणी वाहून नेण्यासाठी होतो.

पूर्ण प्लम्बिंग व्यवस्थित होण्यासाठी आधी नीट प्लॅनिंग करून कुठे किती नळ घ्यायचे हे ठरविले पाहिजे. म्हणजे पाइपलाइन सगळीकडे नीट फिरवता येते. कारण किचन, कॉमन बेसिन, गॅलरी, गार्डन अशा बऱ्याच ठिकाणी पाण्याचा वापर होत असतो आणि काही ठिकाणी तर बाथरूमसारखा गरम आणि गार पाण्याचा वापर होत असतो. त्यामुळे आधीच जर का नीट नियोजन केले तर कमी तोडफोड करावी लागते. याशिवाय फिटिंग्जही फार महत्त्वाच्या असतात. कारण त्याशिवाय बाथरूम उपयुक्त होऊ  शकत नाही. आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिटिंग्ज उपलब्ध आहेत. त्यामुळे सगळे फिटिंग्ज आधीच निश्चित करणे आवश्यक असते. कारण त्या त्या फिटिंगनुसार त्याचे पाइपिंग होते तर कधी कधी पाण्याच्या दाबाची समस्या उद्भवते. तेव्हा किती h.P चा  प्रेशरपंप  लावायचा हेही ठरवावे लागते आणि तसे प्लम्बिंग करावे लागते. आपण सोलरचाही वापर करू शकतो.

सुरक्षित बाथरूमसाठी उत्तम दर्जेदार पाइप, फिटिंग्ज, तसेच तांत्रिकदृष्टय़ा प्रशिक्षित कामगार हे फार महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या तज्ज्ञांकडून संपूर्ण पाइपलाइनचा आराखडा तयार करून घेणे गरजेचे आहे. म्हणजे जर का कधी काही नवीन वस्तू जसे- टॉवेलरॉड किंवा एखादी शेल्फ लावायची असेल तर तुम्ही ड्रॉईंग बघून पाइपलाइनचा विचार करून ड्रिल करू शकता. उत्तम, सुंदर, उपयुक्त याचबरोबर सुरक्षित बाथरूम असणेही तितकेच किंबहुना अधिक महत्त्वाचे आहे. बाथरूम ही घरातली एक अशी जागा आहे, जी उत्तम आरोग्यासाठीही महत्त्वाची असते. त्यामुळे यात कोणतीही तडजोड न करणे हेच योग्य.

कविता भालेराव

kavitab6@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)

 

First Published on March 3, 2018 4:49 am

Web Title: planned plumbing plumbing work