13 December 2019

News Flash

वास्तुसंवाद : दुरूस्ती खर्चाचे अंदाजपत्रक

अंदाजपत्रक तत्कालीन मार्केट रेटनुसार व्यावहारिक असणे किंवा वास्तविक असणे आवश्यक असते.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा पुराणिक

अंतर्गत रचन क्षेत्रातील कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक हे त्या जागेचे स्थान (Location)), तेथील दळणवळणाची साधने, जागेचे क्षेत्रफळ, कामाचा आवाका, मटेरिअल्सची क्वालिटी, कुशल कारागीर, काम पूर्ण करण्यासाठी मिळू शकणारा वेळ, त्याचप्रमाणे ग्राहकाच्या राहणीमानाचा दर्जा आणि डेकोरेटिव्ह वस्तूंची खरेदी.. अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. हे अंदाजपत्रक तत्कालीन मार्केट रेटनुसार व्यावहारिक असणे किंवा वास्तविक असणे आवश्यक असते.

वास्तु-संवाद या लेखमालेत आत्तापर्यंत आपण अंतर्गत रचना क्षेत्रातील ‘प्लानिंग अँड डिझाइिनग’ या पहिल्या टप्प्याअंतर्गत उपभोक्त्याच्या गरजा, त्यानुसार रचनेचा आराखडा, रचना-तत्त्वांचे महत्त्व आणि वापर, तसेच संकल्पना इत्यादी विषयांचा विचार केला.

यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे. अर्थात प्रोजेक्ट कॉस्टिंग किंवा बजेटिंग. आजच्या लेखात आपण याच विषयाचा विचार करू.

मराठीत एक छान म्हण आहे, ‘अंथरूण पाहून पाय पसरावे.’ अगदी हेच तत्त्व अंतर्गत रचनेचे काम करताना लागू होते. म्हणजेच नियमित खर्चाच्या व्यतिरिक्त आपण अंतर्गत रचनेच्या या कामासाठी काय आर्थिक तरतूद करू शकतो याचा वैयक्तिक आढावा घेणे महत्त्वाचे. त्याचप्रमाणे अंतर्गत रचनाकाराच्या मदतीने कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक (Budgetary Estimate) तयार करणे ही दुसरी पायरी. रचनेचा आराखडा (Proposed Layout) आणि सुनिश्चित संकल्पनेनुसार तयार केलेली रेखांकने  (Conceptual Elevations) यानुसार अंतर्गत रचनाकार- जे कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करतात ते अत्यंत तपशीलवार आणि मुद्देसूद असणे गरजेचे असते. हे अंदाजपत्रक तपशीलवार असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येक स्वतंत्र मुद्दय़ानुसार त्या कामाचा आवाका समजून घेणे, त्या विशिष्ट कामासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा आढावा घेणे सोपे जाते आणि कोणत्या कामासाठी किती पैसे लागतील याची पूर्ण कल्पना येते. याला Item Rate Estimate असे म्हणतात.

अगदी सुरुवातीला म्हणजे, आराखडा (Layout) तयार करण्याआधी रचनाकार जो खर्चाचा अंदाज देतो तो अत्यंत ढोबळमानाने दिलेला असतो. त्यासाठी या क्षेत्रातील कामाचा अनुभव आणि मार्केटमधील इंटिरियर प्रॉडक्ट्सच्या किमतींचा अंदाज असणे गरजेचे असते.

उपभोक्त्याच्या गरजा समजून घेऊन, त्यानुसार रचनेचा आराखडा आणि संकल्पना तयार झाल्यानंतर मात्र कामाच्या खर्चाचे तपशीलवार अंदाजपत्रक तयार केले जाते. त्यानुसार कामाचा आणि खर्चाचा साधकबाधक विचार करून निर्णय करता येतात. प्रोजेक्टचे बजेट निश्चित करता येते.

त्याचप्रमाणे कामाचा आवाका मोठा असेल तर दोन ते तीन कंत्राटदारांकडून कोटेशन्स मागविली जातात. अशा वेळेस वर उल्लेख केल्याप्रमाणे Item Rate Schedule मागवले जाते. मटेरियलचे स्पेसिफिकेशन आणि क्वांटिटी सारखी असेल तर त्या तीनही कोटेशन्समधील प्रत्येक कामासाठीच्या रेटची तुलना करणे योग्य असते.

बरेचदा नुसती साइट दाखवून तीन कोटेशन्स मागविली जातात आणि जे तुलामनात्मक विधान (Comparative Statement) केले जाते ते नक्कीच चुकीचे ठरते. तीनही कंत्राटदार वेगवेगळ्या पद्धतीने मटेरियल स्पेसिफिकेशन्स ठरवतात. कामाचा दर्जा निश्चित नसतो आणि अशा प्रकारे केलेल्या तुलनेनुसार केलेली कंत्राटदाराची नेमणूक पुढे जाऊन कामाचा दर्जा बिघडण्यास किंवा काम अर्धवट स्थितीत बंद पडण्यास कारणीभूत होते.

म्हणूनच BOQ (Bill of Quantities) आणि BOM (Bill of Material) हे अंतर्गत रचनाकाराने किंवा सल्लागाराने बनवणे आणि त्यानुसार निविदा (Quotations) मागवणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.

विशेषत: व्यावसायिक क्षेत्रात हल्ली बरेचदा कार्यालयीन अंतर्गत रचना करताना त्रिमितीय चित्रे (Three  Dimensional Views)आणि त्याबरोबर अंतर्गत कामाचे कोटेशन मागवले जाते. यानुसार आलेल्या  कोटेशन्सनुसारदेखील योग्य पद्धतीने तुलनात्मक विधान (Comparative Statement) करता येऊ शकत नाही. कारण संपूर्ण मोजमापे असलेला आराखडा आणि working drawings यांचा अभाव असतो.

कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक आणि उपभोक्त्याची खर्च करण्याची क्षमता या  दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन रचनाकाराच्या मदतीने  ग्राहक कामांचा प्राधान्यक्रमही ठरवू शकतो. संपूर्ण घराचे अत्यंत सुनियोजित प्रकारे पुढील कमीतकमी आठ ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी अंतर्गत काम करून घ्यायचे असेल तर मटेरियलची क्वलिटी प्रमाणापेक्षा खाली न येऊ देता, टप्प्याटप्प्याने काम करणे जास्त श्रेयस्कर ठरते. टॉयलेट्स आणि स्वयंपाकघरासंबंधातील सर्व कामे तसेच फ्लोअिरग, फॉल्स सीलिंग, इलेक्ट्रिकल आणि पेंटिंग ही कामे पहिल्या टप्प्यात करून घेतली तर  बेडरूम आणि लिव्हिंग रूममधील फर्निचरचा भाग दुसऱ्या टप्प्यात पूर्ण करता येतो.

अंतर्गत रचन क्षेत्रातील कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक हे त्या जागेचे स्थान (Location), तेथील दळणवळणाची साधने, जागेचे  क्षेत्रफळ, कामाचा आवाका, मटेरिअल्सची क्वालिटी, कुशल कारागीर, काम पूर्ण करण्यासाठी मिळू शकणारा वेळ, त्याचप्रमाणे ग्राहकाच्या राहणीमानाचा दर्जा आणि डेकोरेटिव्ह वस्तूंची खरेदी अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. हे अंदाजपत्रक तत्कालीन मार्केट रेटनुसार व्यावहारिक असणे किंवा वास्तविक असणे आवश्यक असते.

हे रिअ‍ॅलिस्टिक अंदाजपत्रक (Budgetary Estimate) तयार केल्यावर ग्राहकाने आपल्या खर्चाच्या मर्यादा रचनाकाराला सांगितल्या तर खर्च मर्यादित राहण्यास मदत होते.  तसेच  ठरलेल्या अंदाजपत्रकानुसार  काम करताना रचनकारानेही  वेळोवेळी ग्राहकाला अतिरिक्त खर्चाची कल्पना देणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे डेकोरेटिव्ह वस्तू किंवा रेडिमेड फर्निचर खरेदी करताना योग्य किंमत देणे आणि आवश्यक वाटल्यास पर्यायी वस्तूचा विचार करणे हे खर्च नियंत्रित ठेवण्यास आवश्यक असते. बरेचदा कमी किमतीतले, पण उत्तम रंगसंगती फर्निंशग, सोफा कव्हर्स, पडदे खोलीतील वातावरणाला नक्कीच उजाळा देतात.

अंदाजपत्रकानुसार, योग्य खर्चात काम पूर्ण होण्यासाठी  वेळोवेळी खर्चाचा आढावा घेणे गरजेचे असते आणि हे काम  रचनाकार आणि ग्राहक या दोघांचेही असते. रचनाकार आणि ग्राहक यांचे परस्परांमधील नाते जरी व्यावहारिक असले तरी ते दोघेही त्या नात्याशी आणि स्वत:शी पूर्णत: प्रामाणिक असले तर ती कलाकृती आर्थिक मर्यादांचे भान राखून नक्कीच सर्वाना जीवनानंद देऊ शकते, हे मात्र निश्चित.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)

First Published on July 20, 2019 1:43 am

Web Title: planning and designing seema puranik abn 97
Just Now!
X