राजकारण आणि वास्तुशास्त्र यांचा संबंध नाही असा देश जगात कोठेही नाही. जगातील कोणत्याही शहरात, विशेषत: राजधानीच्या शहरात गेल्यावर तेथील राजकीय इतिहास आपल्याला सहज दिसायला लागतो. जुन्या ऐतिहासिक वास्तू आपण मुद्दाम बघायला जातो तेव्हा त्या देशाचा राजकीय इतिहास समजतो. इतकेच नाही, तर जेव्हा आपण त्या शहरात नुसतेच भटकत असतो तेव्हा तेथील सामान्य इमारतीही आपल्याला तेथील प्रचलित राजकीय व्यवस्थेची जाणीव करून देत असतात. खरे तर कोणत्याही काळातील, प्रदेशातील वास्तुकला म्हणजे राजकारणाचे मूर्त स्वरूप. त्याच्या उलट विचार केला तरी हेच दिसते. म्हणजे कोणत्याही देशातील, शहरातील प्रचलित राजकारण समजून घ्यायचे असेल तर तेथील नव्या इमारतींचे नमुने बघितले तरी पुरते. मुंबईमधील प्रतिभा, आदर्श, कॅम्पा कोला आणि जुन्या म्हाडा कॉलनीतील आणि गेल्या दहा वर्षांत बांधलेल्या ‘झोपु’ योजनेतील इमारती म्हणजे राजकीय वास्तुशास्त्राची मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरणे आहेत. साठ सालापासूनचा मुंबईच्या राजकीय वास्तुशास्त्राच्या अधोगतीच्या प्रगतीचा आलेखच त्यातून बघता येतो.  
आधुनिक काळातील जागतिक राजकीय वास्तुशास्त्र सहजपणे, मूर्त स्वरूपात दिसते ते बर्लिनमध्ये. साठच्या दशकापासून जवळजवळ तीन दशके आधुनिक जागतिक राजकारणाने या शहराचे दोन तुकडे केलेले होते. पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन यांच्या मध्ये उंचच उंच, लांबच लांब भिंत घालून तेथील समाजही दुभंगून टाकला गेला होता. नव्वदच्या शतकाच्या पहाटे तेथील कम्युनिस्ट राजवट कोसळली आणि त्याबरोबर ती भिंतही! नाही म्हणायला एक कि.मी. लांबीची भिंतीची वास्तू ही त्या इतिहासाची आठवण म्हणून त्यावरच्या ग्राफिटीसकट जतन केलेली आहे. तर या शहरात हिंडत असताना आपण पूर्वीच्या साम्यवादी राजवटीतील विभागात आहोत की भांडवलवादी बर्लिनमध्ये हे तेथील इमारतींच्या स्वरूपातून, रस्त्यांच्या नावावरून सहज ओळखता येते.
बर्लिनच्या मध्य भागात बस पकडून पूर्वेकडे गेले की साम्यवादी राजकीय वास्तुशास्त्राची आणि तेथील सामाजिक समतेची अनुभूती येते. एकसारख्या, उंच आणि आडव्या, लष्करी शिस्तीत बांधलेल्या इमारती पूर्वेकडे दूर दूर अंतरापर्यंत पसरलेल्या बघायला मिळतात. याउलट पश्चिमेकडे गेले की भांडवलशाही विविधतेचा टेंभा मिरवणाऱ्या, व्यक्तिगत आवडीने बांधलेल्या इमारतींचा प्रत्यय येतो. गेल्या दशकातील जागतिक राजकारणात किती मोठे वैचारिक अंतर होते, याची जाणीव अतिशय तीव्रतेने बर्लिनमध्ये होते.
परंतु आता बर्लिन पुन्हा एक झाले आहे. तेथील मध्यवर्ती विभाग हा बर्लिनचा ऐतिहासिक ठेवा आता जागतिक झाला आहे. एके काळी तो पूर्व बर्लिनच्या अखत्यारीत असतानाही चांगल्या प्रकारे, पण कडक शिस्तीत जतन केलेला होता. मात्र तेथील जुन्या भव्य चर्चच्या वास्तूमध्ये प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य हिरावलेले होते. आता त्यात बदल झाला आहे. शिवाय आता तेथे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही खूप मोठी आहे. काही जुन्या भव्य इमारतींना चिकटून काही नवीन इमारती बांधल्या आहेत. मात्र ही सांधेजोड केल्याने जुन्या वास्तूंच्या ऐतिहासिक भव्यतेला, सौंदर्याला, शैलीला जराही उणेपणा येणार नाही, त्यांची शान कमी होणार नाही याची पुरेपूर काळजी आजच्या आधुनिक आणि जागतिक कीर्तीच्या वास्तुरचनाकारांनी घेतली आहे. यातून केवळ जुन्या-नव्या वास्तुकलेचा सुंदर संगम तर साधला आहेच; परंतु त्यावर मधल्या दुभंगलेल्या काळातील घटनांचे सावट पडणार नाही, याचीही काळजी घेतली आहे.
या जुन्या ऐतिहासिक वास्तू विभागापासून काही अंतरावर एक नवा सांस्कृतिक विभाग नव्याने बांधला गेला आहे. तेथेही आपल्याला कम्युनिस्ट राजवटीतील जतन केलेल्या कोरडय़ा इमारती आणि आधुनिक भांडवलशहांनी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या झगमगाट दिमाख दाखविणाऱ्या काचेच्या इमारती जवळजवळ बघायला मिळतात. दोन विरोधी टोकांच्या राजकीय विचारधारांनी दुभंगलेले बर्लिन आता वास्तुरचनाकारांच्या प्रयत्नांनी एक करण्याचे हे प्रयत्न मोठय़ा प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. एकत्र झालेल्या जर्मनीच्या राजधानीचा दर्जा पुन्हा बर्लिनला मिळाला आहे. तेथील लोकशाहीचे प्रतीक असलेल्या इमारतीला नवीन पारदर्शक काचेचा घुमट मिळाला आहे. लोकशाही स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही गोष्टी मानवी समाजांसाठी किती महत्त्वाच्या आहेत हे तेथे अनुभवाला येते. त्यामुळेच पूर्व बर्लिनमध्ये साम्यवादी काळात बांधलेल्या थंड, कोरडय़ा एका छापाने बांधलेल्या शेकडो निवासी इमारतींना थोडा तरी जिवंतपणा द्यायला हवा, असे वाटत राहते.
बर्लिनचे हे उदाहरण आज मुंबईसाठी कसे काय उपयोगी ठरेल, असे विचार बर्लिनला असताना माझ्या मनात सातत्याने येत होते. परंतु जोपर्यंत मुंबईचे तथाकथित प्रसिद्ध वास्तुरचनाकार आर्थिक लाभासाठी राजकारण्यांचे उंबरे झिजवत राहतील तोपर्यंत त्यांची प्रतिभा आणि प्रतिमा मळलेली राहील, असे मनात येते.
घोटाळाग्रस्त आदर्श, कॅम्पा कोला या इमारती काही केवळ राजकीय वास्तुशास्त्राचे प्रतीक नसून, ते आपल्या एकंदरीतच सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक  दिवाळखोरीचे जाहीर, जागतिक प्रदर्शनच आहेत. जागतिक कीर्तीची मुंबई आज अशा राजकीय वास्तुगिरीपायी विकृत झाली आहे. दिल्लीच्या नव्या महाराष्ट्र भवनाच्या वास्तूने तर आता अटकेपार दिल्लीतही त्याचे प्रदर्शन केले आहे.  
आपल्या तथाकथित, गरीब लोकांच्या नावाने राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या वास्तुशास्त्रीय संवेदनांबद्दल तर काही न बोलणेच बरे! प्रत्येक सरकारी इमारत भ्रष्ट वस्तुशैलीची नक्कल असावी आणि सर्व नागरी सेवा साम्यवादी देशांप्रमाणे फुकट असाव्यात म्हणून लढणारे पक्ष संपले तरी त्यांनी घडविलेली समाजाची मानसिकता काही संपलेली नाही. फुकट घरांचे आमिष गरिबांना आणि अफाट नफ्याचे स्वप्न बिल्डरांना दाखविणाऱ्या युतीच्या राजकीय धोरणाबद्दल तर न बोलणेच बरे. त्याचमुळे आज मध्यमवर्गीय, उच्चशिक्षित वर्गातील लोकांनाही फुकट घरांची भुरळ पडते आहे. मुंबई म्हणजे विकृत राजकीय वास्तुशास्त्राचे मोठे घोंगावणारे वादळ आहे, हेही त्यांना समजेनासे झाले आहे.
बर्लिन शहराची वास्तवात भिंत घालून विभागणी झाली होती तेव्हा तेथील समाज आणि लोकमानस मात्र एकतेच्या भावनेने झुरत होते. अधिकृतपणे भिंत बांधून मुंबईची अशी विभागणी झालेली नसूनही लोकमानस मात्र शतखंडित झाले आहे. गरिबांच्या नावाने केलेल्या नानाविध कायद्यांचा आधार घेऊन प्रत्येक शहरात मांडला जात असलेला राजकीय वास्तुशास्त्राचा व्यभिचार थांबवण्यासाठी कोणती वास्तुगिरी उपयोगी ठरेल, याचा विचार होणे आवश्यक आहे.