समस्या सोडविण्याचे डॉ. इशिकावा यांचे ‘क्वालिटी सर्कल’ अर्थात गुणवत्ता मंडळ हे जपानी तंत्र सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठीही उपयुक्त ठरावे. याद्वारे सोसायटी व परिसरातील समस्या सोडविण्यास मदत  होईल..

सध्याच्या परिस्थितीत राज्यातील सर्वच शहरांतील सहकारी गृहनिर्माण संस्थांना, घन कचऱ्याची विल्हेवाट, वाढते प्रदूषण, अनियमित पाणी पुरवठा, रस्त्यामधील धोकादायक खड्डे, झाकण नसलेली गटारे, संस्थेच्या आजूबाजूच्या रस्त्यावर / पदपथावर दुकानदारांचे व फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वेडीवाकडी पार्किंग केलेली वाहने, बेवारशी कुत्र्यांचा उपद्रव, विभागातील उद्यानांची दुरवस्था, मुलांच्या परीक्षेच्या काळात ध्वनिवर्धकाच्या आवाजावर नियंत्रण नसणे, तसेच मालमत्ता कर व पाणीपट्टी यामध्ये होणारी सततची वाढ आदी समस्यांनी ग्रासले आहे. त्याचबरोबर संस्थेतील काही सभासदांची मनमानी वृत्ती, बेमुर्वतखोर वर्तन व सततच्या असहकारामुळे संस्थेच्या कार्यकारी समितीचे सभासद नाउमेद होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे काही मूठभर सभासद नाखुशीने संस्थेचा कारभार सांभाळताना दिसतात. शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था, विविध प्राधिकरणे व अन्य शासकीय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कारभारात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी जपानच्या ‘क्वालिटी सर्कल’च्या धर्तीवर ‘सोसायटीज् क्वालिटी सर्कल’ म्हणजेच ‘सोसायटीचे गुणवत्ता मंडळ’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची आता वेळ आली आहे.
‘क्वालिटी सर्कल’ अर्थात गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातून विभागवार सहकारी गृहनिर्माण संस्थांचा एक गट एकत्र येऊन वर नमूद केलेल्या, विभागातील नागरी असुविधा / समस्या त्याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थांना भेडसावणारे प्रश्न, उद्भवणाऱ्या समस्या व दैनंदिन कारभारात येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन व सखोल अभ्यास करून उपविधी
व अधिनियम / नियम यांच्या अधीन राहून कायमस्वरूपी उपाययोजना करणे हाच मुख्य उद्देश असेल. त्यासाठी ‘क्वालिटी सर्कल’ म्हणजे काय? व त्याचा इतिहास व त्यामुळे होणारे फायदे याची सविस्तर माहिती घेऊ  :-
‘क्वालिटी सर्कल’ म्हणजे एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक छोटा समूह- जो स्वेच्छेने आठवडय़ातून एकदा एकत्र येऊन त्यांना आढळलेल्या त्यांच्या कामाशी निगडित अशा त्यांनीच निवडलेल्या अडचणींचे विश्लेषण करून त्या अडचणींवर मात करण्याचे मार्ग सुचवितो व अवलंबितो. आणि त्यामुळे त्यांचा कामाचा दर्जा सुधारतो, उत्पादन क्षमता / कुशलता वाढते व काम करण्याच्या परिस्थितीत परिणामकारक सुधारणा होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमधील उत्पादनाचा दर्जा इतका निकृष्ट होता की त्यामुळे त्या देशातील अर्थव्यवस्था अतिशय खालावली. उत्पादनाचा दर्जा उंचावून औद्योगिक आणि आर्थिक पुनरुज्जीवन करण्यासाठी जपानच्या सरकारने ‘जापनीज युनियन ऑफ सायंटिस्ट अँड इंजिनीअर्स’ यांच्या सहकार्याने १९५० मध्ये अमेरिकेतील ख्यातनाम स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल तज्ज्ञ डॉ. एडवर्ड डेमिंग यांना आमंत्रित केले. जपानमधील सर्व उद्योगातील क्वालिटी कंट्रोल सुधारण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. डेमिंग यांच्याबरोबर दुसरे एक तज्ज्ञ डॉ. जुरन यांनाही पाचारण करण्यात आले. या दोन तज्ज्ञांच्या क्वालिटी कंट्रोलच्या नवीन तंत्राने प्रभावित होऊन जपानने स्वत:चे असे एक नवीन धोरण व तंत्र आखून क्वालिटी कंट्रोल सुधारण्यासाठी ते तंत्र अमलात आणले. जपानचे डॉ. इशिकावा यांनी त्यानंतर परिश्रम घेऊन एक नवीन क्वालिटी कंट्रोल सर्कलचे तंत्र १९६२ मध्ये प्रत्यक्षात उतरविले व त्याला ‘क्वालिटी सर्कल’ हे आकर्षक नाव  दिले.
सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी ‘क्वालिटी सर्कल’ रचना
अ)    एकाच विभागातील सोयीप्रमाणे ५ ते २५ सहकारी गृहनिर्माण संस्थांचा एक गट; जो स्वेच्छेने  दरमहा/ तीन महिन्यांतून एकदा अथवा गरजेप्रमाणे एकत्र येऊन त्यांना भेडसावणारे प्रश्न, उद्भवणाऱ्या समस्या व येणाऱ्या अडचणींबाबत विचारविनिमय, सविस्तर चर्चा व विश्लेषण करून त्यावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविणे व सर्व संमतीनुसार त्याचा अवलंब करणे.
ब)    कोणत्याही नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेस गुणवत्ता मंडळाचे सभासद होता येईल. गरजेप्रमाणे व सोयीनुसार संस्थांची संख्या कमीतकमी ५ ते २५ असावी.
क)    गुणवत्ता मंडळाचे सभासदत्व स्वीकारलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील कार्यकारी समिती, त्यांच्यामधील ज्येष्ठ, अनुभवी व अधिनियम / नियम व उपविधी जाणकार असलेल्या व्यक्तीची ‘गटप्रमुख’ म्हणून निवड करील. मासिक / त्रमासिक अथवा गरजेप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या गुणवत्ता मंडळाच्या सभेस नियमित आणि वक्तशीरपणे उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेईल. आपल्या संस्थेच्या काही अडचणी अथवा प्रश्न असल्यास सभेसमोर ठेवील. आपल्या अनुभवाच्या शिदोरीवर अडचणी / समस्या सोडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होईल. सभेसमोर ठेवण्यात आलेल्या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून सूचना व शिफारसी  तयार करण्याच्या कामात मदत करील. गुणवत्ता मंडळाचे काम हे सर्वाचेच व सर्वासाठी असलेले काम आहे या भावनेतून काम करील.
ड)    गुणवत्ता मंडळात सहभागी झालेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या गटप्रमुखामधून सहकारी  कायद्यातील तज्ज्ञ, अनुभवी व ज्येष्ठ व्यक्तींची एक समन्वय समिती स्थापन करण्यात यावी.
ई)     समन्वय समितीचे कार्य :
० मंडळाचे उद्दिष्ट, धोरण, नियम इत्यादी तपशीलवार ठरविणे आणि त्यांचा नियमितपणे आढावा घेणे.
० मासिक / त्रमासिक सभांचे नियमितपणे आयोजन करणे.
० संपूर्ण कार्यक्रम आपुलकीने व उत्साहाने राबविणे.
० सर्व सभासदांना सभेमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन देणे.
० फक्त कार्यक्षेत्राशी निगडित कामातील अडचणींवर लक्ष केंद्रित करणे.
० उद्दिष्ट साधण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सभासदांची सांघिक भावना सतत जागृत ठेवणे.
० सर्व सभांची व कार्यक्रमांची रीतसर नोंद ठेवणे. उपस्थित करण्यात आलेल्या सर्व समस्या/ अडचणींवर र्सवकश चर्चा करून सर्वोत्कृष्ट मार्ग शोधून काढणे.
० गुणवत्ता मंडळाच्या चळवळीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे.
० विभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी व आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी  स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांवर गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातून दबाव टाकणे. विशेषत: महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या काळात याचा पुरेपूर फायदा करून घेता येईल.
सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून गुणवत्ता मंडळाच्या विधायक कार्यासाठी विभागवार सहकारी गृहनिर्माण संस्थांनी एकत्र येऊन ‘एकीचे बळ’ दाखवून शक्य होईल तेवढे योगदान देणे गरजेचे आहे. गुणवत्ता मंडळ फक्त सहकारी गृहनिर्माण क्षेत्रापुरते मर्यादित नसून, ते सर्व प्रकारच्या सहकारी संस्था व उद्योगांमध्ये उपयुक्त ठरेल. कारण यामध्ये अडचणींचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्यावर मात करण्यासाठी संबंधितांचा ऐच्छिक सहभाग असतो. त्यामुळे शासनाच्या उप-निबंधक कार्यालयात वैयक्तिक प्रश्न व समस्या घेऊन चौकशी व तक्रार निवारण करण्यासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
विश्वासराव सकपाळ – vish26rao@yahoo.co.in