राजस्थानच्या भटकंतीदरम्यान एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली, ती म्हणजे येथील लोकांच्या मनात कलेबद्दल असणारी प्रचंड आस्था. भडक रंगांची उधळण करणारे आणि रंगोत्सवात रंगलेले राजस्थानचे सौंदर्य विविध कलागुणांनी परिपूर्ण आहे. जणू इथल्या लोकांच्या नसानसात केवळ आणि केवळ कलेचाच सुगंध असावा. इथल्या इमारतींचे, वास्तूंचे वैभव पाहताना ही गोष्ट प्रकर्षांने जाणवते. अत्यंत नाजूक कोरीव काम केलेली संगमरवरातील भव्य मंदिरे, राजस्थानी शैलीतील महल, कोठय़ा, हवेल्या, छत्र्या एक ना दोन सर्वच गोष्टींत केवळ कारागिरी आणि कलेचे अभूतपूर्व दर्शन सर्वत्र पाहायला मिळते. त्यांचे किल्ले, राजवाडे, हवेल्या आणि मंदिरे पाहताना आपण थकून जातो, पण कलेचे अमाप वैभव पाहणे संपत नाही.
विविध कलापरंपरांमध्ये राजस्थानचे कलावैभव असणारे भित्तिचित्रकलेचे स्थानही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. येथील भित्तिचित्रांचा आवाका खूप मोठा आहे. तसे पाहता आपल्या देशाला भित्तिचित्रकलेची खूप प्राचीन परंपरा आहे. अजंता, बाघ, बदामी येथील भित्तिचित्रे जगप्रसिद्ध आहेत. मात्र, आजघडीला या कलेची ओळख आपल्याला राजस्थानमध्येही एका नव्या रूपात पाहायला मिळते. ही कला राजस्थानच्या कलावंतांनी अगदी अलीकडे म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जिवंत ठेवली. राजस्थानच्या शेखावटी इलाख्यात भित्तिचित्रांची ही परंपरा इतक्या सौंदर्यपूर्णरीतीने जतन केलेली आहे की, हे कलावैभव पाहताना आपले डोळे दिपून जातात. खरं तर राजस्थानमधील वाळवंटामध्ये राहणाऱ्या राजपूत लोकांनी सर्व प्रकारच्या कलाप्रकारांना ज्या आत्मीयतेने जतन केलेले आहे ते पाहून नवल करावे वाटते. जिथे मैलोन् मैल पसरलेले सोनेरी रेतीने भरलेले वाळवंटच आहे. जिथे हिरवाईची उणीव आहे. जिथे पाण्याचे दुर्भिक्ष जीवनाचे रंग अधिक गडद करते त्या प्रदेशातील राजपुत्रांना गडद रंगांचेच आकर्षण असावे, हेही नवलच! पण शेखावटी इलाख्यातील लोकांनी उन्हाच्या झळांनाही वैषम्य वाटेल अशा गडद रंगांमध्ये रंगवलेली सुरेख भित्तिचित्रे पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो. भित्तिचित्रांची ही अनुठी कला राजस्थानच्या शेखावटी भागातील वेगवेगळ्या हवेल्या, कोठय़ा, घरे यांच्या भिंतींवर चित्रित झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही परंपरा येथील मोठमोठय़ा भवनांमध्ये, किल्ल्यांच्या अंतरंगामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली असली तरी त्या प्राचीन कलाकृती आता काळाच्या ओघामध्ये, योग्य त्या संरक्षणाअभावी नाहीशा झाल्या आहेत. तरीही साधारणपणे अठराव्या शतकाच्या मध्यावधीनंतर शेखावटीमधील अनेक धनिकांनी बांधलेल्या मोठमोठय़ा हवेल्यांमध्ये भित्तिचित्रांचे कलावैभव पुनश्च निर्मिले गेले. साधारणत: विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अनेक वास्तूंमधून अत्यंत सुंदर अशी भित्तिचित्रांची कलानिर्मिती उत्तरोत्तर रंगत गेली. आज शेखावटीमधील सिकरा आणि झुनझुन या दोन जिल्ह्य़ांमधील जुने वाडे, हवेल्या, कोठय़ा आणि मोठमोठी घरे यामधून असणारी ही सुंदर चित्रकला पाहताना आपण थक्क होऊन जातो.
कधी काळी राजस्थानच्या ‘आमेर’ राजवटीचा हिस्सा असलेला ‘शेखावटी’ हा विभाग, आता सिकर आणि झुनझुन जिल्ह्य़ांमध्ये समाविष्ट झालेला आहे. हा भाग संपूर्ण वाळवंटी भाग नसून थोडीफार उपजाऊ जमीन आणि हिरवाई या भागांत पाहायला मिळते; परंतु काही अंशी विराण वाळवंट असलेल्या या भागातील राजपूत धंद्यासाठी म्हणून देशातील इतर भागात आणि परदेशात स्थिरावले. भरपूर पैसा कमावून धनिक झाले, पण गावाची, जमिनीची ओढ त्यांना गप्प बसून देत नव्हती. साधारण १७५० सालानंतर बाहेर जाऊन पैसा कमावलेल्या धनिकांनी आपल्या गावी मोठमोठय़ा हवेल्या, कोठय़ा उभारण्यास सुरुवात केली. साधारणपणे इ. स. १७५० ते इ. स. १९५० या दोनशे वर्षांच्या काळात राजस्थानच्या या भागात अनेक महाल, हवेल्या उभारल्या गेल्या. या हवेल्यांची वास्तुकलाही अत्यंत वैशिष्टय़पूर्ण असायची.
प्रागैतिहासिक काळातील, बौद्ध काळातील तसेच मध्ययुगीन भित्तिचित्रकलेची अनेक उदाहरणे आपल्याला भारतभर विखुरलेली पाहायला मिळतात. आपल्या पुराणानुसारही चित्रकलेला सर्वोत्तम कला मानले जाते. घरांच्या भिंतींवर चित्र रंगविण्यापाठीमागे मांगल्यमयी भावनांची पाश्र्वभूमी आहे. याच पाश्र्वभूमीवर राजस्थानातील भित्तिचित्रपरंपरेचे महत्त्व किंवा योगदान अत्यंत मोलाचे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण काही अपवादवगळता प्राचीन, तसेच मध्ययुगीन चित्रकला, काळाच्या ओघात नष्ट झाली आहे; हे जरी खरे असले तरी या परंपरेला जिवंत ठेवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य राजस्थानमधील शेखावटी प्रदेशातील शेखावतांनी केले आहे. वर्तमान काळात, म्हणजे गेल्या दोनशे वर्षांत या परंपरेचे जतन करून घराघरांतून ही कला जिवंत ठेवण्याचे कार्य केले गेले. यादृष्टीने शेखावटीमधील कलावैभव केवळ राजस्थानमध्ये नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. शेखावटीमधील अतिशय छोटय़ा-छोटय़ा गावातील लहान घरे, कोठय़ा आणि हवेल्या तसेच गढय़ा.. सुरेख अशा भित्तिचित्रांनी रंगविलेल्या आहेत. शेखावटी हा जयपूर राजघराण्याचा हिस्सा राहिला आहे. येथील सामन्त नेहमीच आर्थिकदृष्टय़ा सक्षम आणि मालदार असल्यामुळे आकर्षक महाल, तसेच हवेल्या आणि मरणोत्तर बांधल्या जाणाऱ्या छत्र्या यांच्या निर्माण कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. या भागातील सरदार, ठाकूर यांच्याबरोबर धनिक व्यापारी यांनी व्यापार उदिमातून जे धन-पैसा जोडले, त्यातून आपल्या गावात आपल्या नावाचा गवगवा होईल अशा दृष्टीने खूप मोठय़ा हवेल्या बांधल्या. स्वत:च्या आलिशान जीवनशैलीचे प्रदर्शन करण्यासाठी हा एक सुकर आणि सुयोग्य मार्ग होता.
घराच्या भिंती रंगविण्याची कल्पना खरं तर मांगलिक भावनेतून सुरू झाली असावी यामध्ये शंका घेण्यास अजिबात वाव नाही. परंतु शेखावटीमधील भित्तिचित्रांचे विषय केवळ मंगलमय विषय आणि देवादिकांचे चित्रण यातच सामावलेले नव्हते, तर त्याही पलीकडे जाऊन अनेकविध विषयांचे या चित्रशैलीद्वारे चित्रण करण्यात आले आहे. एक सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचा दृष्टिकोन या पाठीमागे होताच, पण त्याचबरोबर धनिकांच्या मर्जीनुसार, घरामधील भिंतीवर सुबक चित्रांची निर्मिती करून घरांचे सौंदर्य वाढविण्याचा मुख्य उद्देशही पूर्ण केला जायचा. यामध्ये खूप सुंदर रंग वापरून राजस्थानच्या रखरखीत, वाळवंटी भौगोलिक परिस्थितीवर मात करण्याचा एक सहज सोपा मार्गही निवडला जात असे. त्यामुळेच की काय नजरेला सुखावणाऱ्या निळा, तांबडा, हिरवा पांढरा आणि मरून अशा आकर्षक रंगांचा अधिकतर उपयोग या चित्रकारीमध्ये झाल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. बहुतेक भित्तिचित्रांसाठी धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्याशी जोडलेले विषयच या कलाप्रकारात पाहायला मिळतात. बहुतेक गढी, हवेल्या आणि कोठय़ांच्या प्रवेशद्वारावर रिद्धी-सिद्धी यांच्यासह गणेशाचे चित्रण अनिवार्य ठरते. मंगल कलश, हत्ती, देवीदेवता, याचबरोबर फुलं-पानं यांची नाजूक कलाकुसर, कुयरी, वेलबुट्टी यांची अप्रतिम नक्षी याचबरोबर रामायण, महाभारत या महाकाव्यामधील समयोचित प्रसंग, काही तत्कालीन विषयांना महत्त्व देऊन त्यांचे केलेले चित्रण, अशा अनेक प्रकारच्या चित्रांचे प्रदर्शन आपल्याला या मोठमोठय़ा इमारतींच्या अंतर्गत तसेच बाह्य़ भिंतीवर उठावदार रंगात केल्याचे पाहायला मिळते.

‘फत्तेहपूर शेखावटी’ हे गाव ‘फत्तेहखाँ कायमखान’ याने १५२१ साली वसवले होते. फत्तेहखानाने या गावात एक विशाल आणि अजिंक्य असा गढही बांधला होता. मात्र अठराव्या शतकात शेखावटीच्या सामंतांनी फत्तेहपूर ताब्यात घेतले. आज या गढाचे भग्नावशेष पाहायला मिळतात. मात्र नंतरच्या काळात शेखावटी राजपुत्रांनी फत्तेहपूरमध्ये अनेक मोठमोठय़ा हवेल्या बांधल्या. या हवेल्यांची स्थापत्य शैली खार राजस्थानी पद्धतीची आहे. प्रखर उन्हापासून सर्वतोप्रकारे संरक्षण मिळेल असेच या मोठय़ा हवेल्यांचे स्थापत्य आहे. भिंतीची जाडी अधिक ठेवली जात असे. तसेच खिडक्यांचे आकारही लहान आणि वैशिष्टय़पूर्ण असत. घरातील स्त्रियांना उन्हाळ्यात शक्यतो घरातून बाहेर पडावे लागू नये म्हणून सर्वकाही हवेल्यांच्या आवारातच सुखसोयींनी परिपूर्ण असे. गंमत म्हणजे फत्तेहपूर हे आजघडीला एक छोटेसे खेडेवजा गाव आहे, पण गावाच्या आत मध्यवस्तीत असणाऱ्या हवेल्या पाहून नवलच वाटत होते. एकापेक्षा एक मोठय़ा आणि ऐसपैस हवेल्या आहेत येथे. विशेष म्हणजे प्रत्येक हवेलीचा दर्शनी भाग, बाह्य़भिंती आणि अंतर्भाग अप्रतिम अशा चित्रांनी सजवलेला आहे. फ्रेस्को शैलीतील ही चित्रे इतक्या ठळकपणे रंगवलेली आहेत की आज दोन-अडीचशे वर्षांनंतरही ती ताजी आणि नुकतीच रंगविल्याप्रमाणे उठून दिसतात. एकदोन हवेल्यांच्या आतमध्ये जाऊन दर्शनी हॉल आणि चौकातील भिंतीवरील चित्रकारी पाहाता आली.
हवेलीतील भित्तीचित्रे पाहून खरोखरच मन थक्क होऊन जाते.  चित्रांमधील विषयवैविध्य, अप्रतिम कलाकुसर, कल्पनांचा विषयविस्तार पाहून केवळ थक्क होऊन जातो आपण. भडक रंगांमध्ये रंगवलेली ही चित्रे केवळ अप्रतिमच आहेत. शिवाय राजस्थानी वेशभूषा, दागदागिने, पुरुषांच्या अंगावरील वेगळ्या शैलीतील वस्त्रे, पगडय़ा, हत्ती, घोडे, देखण्या रूपवान राजस्थानी स्त्रिया.. हे सारं काही या चित्रशैलीच्या माध्यमातून आपल्यासमोर उभे राहते.
शेखावटी येथील नवलगढ, रामगढ, झुनझून या गावांतूनही भित्तीचित्र कलाशैलीचा अप्रतिम खजिना आहे. अप्रतिम रंगसंगतीने नटलेली ही फ्रेस्को आणि टेंपरा पद्धतीची चित्रकारी पाहून आपण केवळ थक्कच होऊन जातो.