‘वास्तुरंग’ (२४ मे) मधील श्रीनिवास घैसास यांचा सोसायटीतील वाहनांच्या पार्किंगसंबंधात लेख वाचला. त्यांनी लेखामध्ये लहान, पण महत्त्वाचे अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे सामान्य वाचकांच्या माहितीत नक्कीच भर पडेल. आता जुन्या इमारतींची पुनर्बाधणी सुरू झाल्याने पार्किंगसाठी ३/४ मजले जाणार आहेत. याचे कारण सदनिका व माणसे वाढणार असून खालची जमीन तेवढीच राहणार आहे. वाहने वाढत चालली आहेत. सध्या वाहनवाढीचे प्रमाण वर्षांला १२२ टक्के आहे. (म्हणजे पहिल्या वर्षी १०० ची २२२ होतात.)  त्यामुळे ५ वर्षांत मूळ १०० ची ५३९२ वाहने होणार आहेत. म्हणून वाहन पार्किंगची नियमावली करताना असे मुद्देही विचारात घेणे आवश्यक आहे.
– शरद भाटे, ठाणे

भूतकाळाची सफर
‘वास्तुरंग’ (१४ जून) मधील ज्योती कपिले यांचा ‘घर शोधण्याच्या खाणाखुणा’ हा लेख वाचता वाचता मीही माझ्या घरांच्या खुणांपाशी नकळतपणे पोहोचले. लहानपणचं ते गोठय़ाजवळचं घर (हल्ली मुलांना गोठे फक्त चित्रात किंवा गावी दिसतात) आता सांगताच येणार नाही, निदान शहरात तरी..
त्यानंतर स्मशानासमोरच्या घराची खूण सांगताना सुरुवातीला संकोच वाटायचा, मात्र नंतर दूर झाला. पुढे माझं घर अगदी रेल्वे स्टेशनजवळ आहे, असं सांगताना काहीशी ‘ग’  ची बाधा झाल्यासारखी भावना यायची आवाजात. आणि माझ्या नेरळच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना तर ‘वर्षभर वाहणारी आमची नदी ओलांडून या आणि डावीकडे वळा,’ असं सांगताना मस्त आनंदी वाटायचं..
खरं तर अशा लहानलहान गोष्टीच जीवन समृद्ध करत असतात; मात्र आपण त्या विचारात घेत नाही. पण या लेखाने नकळत मलाही माझ्या भूतकाळाची रम्य सफरच घडवली.
– छाया थोरात

नेटकेपणाची शिकवण
‘वास्तुरंग’ मध्ये (१४ जून) ‘सबकुछ स्लायडिंग आणि फोल्डिंग’ हा आश्लेषा महाजन यांचा लेख वाचला. लेख खूप आवडला. लेखिकेला काकांकडून मिळालेली नेटकेपणाची शिकवण आपण वाचकांपर्यंत रंजक पद्धतीने पोहोचवली आहे. ‘फोल्डिंग फर्निचर’ हा प्रकार जागेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी नक्कीच मदत करतो, असे माझेदेखील मत आहे. आपण नेमकेपणाने अशा फर्निचरचे महत्त्व समजावून सांगितले आहे.
– कालिंदी कर्णिक