09 March 2021

News Flash

स्थावर मालमत्ता : ग्राहकांचा बदललेला कल

करोना कालावधीच्या आधीसुद्धा हे क्षेत्र खूप भरभराटीस आले होते असे नव्हते

(संग्रहित छायाचित्र)

संदीप धुरत

करोनाकाळाने आपल्याला कुठली महत्त्वाची शिकवण दिली असेल तर ती ही की, आपल्या व्यक्तिगत आणि उद्योग क्षेत्राला बदलास तयार राहावे लागेल; आणि तो बदल एखाद्या जादूप्रमाणे कधीही येऊ शकतो. पाच महिने आधी, सध्या जी उद्योग क्षेत्राची वाताहत झाली आहे या संदर्भात कोणीही भाकीत केले नव्हते; किंबहुना असे काही होईल हे कोणाच्याही ध्यानी नव्हते. पण करोना संकटाने होत्याचे नव्हते करून टाकले आणि याचे परिणाम नक्कीच पुढील बराच काळ जाणवत राहतील.

यापुढील काळात ग्राहकांच्या गरजा ओळखून त्या प्रकारे सेवा देणे महत्त्वाचे राहील. या काळात जीवनावश्यक वस्तूंचे महत्त्व लक्षात आल्याने अजूनही बरेच ग्राहक त्याच गोष्टींच्या खरेदीकडे जास्त लक्ष देताना दिसून येतात. अशा वेळी एक महत्त्वाचे क्षेत्र- जे स्थावर मालमत्ता क्षेत्र- यावर काय परिणाम होईल आणि त्यातून कोणते बदल या क्षेत्राला करावे लागतील आणि त्यात ग्राहकांचा सहभाग कितपत असेल याचा हा ऊहापोह..

करोना कालावधीच्या आधीसुद्धा हे क्षेत्र खूप भरभराटीस आले होते असे नव्हते. बरेच फ्लॅट्स विकले गेले नव्हते आणि नवीन प्रोजेक्ट्स सुरू होत नव्हते. लाँच किमतीच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करणे सुरू होते आणि त्यातून तयार होणारी घरे खूप उशिराने ग्राहकांना मिळत होती. रेरा कायदा असला तरी त्याचे नियंत्रण घरे ठरलेल्या वेळेत पूर्ण करून ग्राहकांना द्यावी इतकाच सीमित आहे. त्यातही विकासकांनी पळवाट शोधून काढली- दोन वेगवेगळ्या तारखा देऊन- एक रेरानुसार पूर्णत्व तारीख आणि एक ग्राहकांना सांगायची तारीख जी बरीच आधीची असायची. जास्त चौकशी केल्यावर रेरा तारीख कळायची- जी बरीच उशिरा असायची. असो, तर हे असे प्रकार चालू असतानाच करोना संकट आले आणि त्याने हे क्षेत्र पूर्ण ठप्प करून टाकले.

निवारा ही मूलभूत गरज असूनसुद्धा या क्षेत्रात कुठे ही सुसूत्रता नाही. घरे विकणे म्हणजे त्यांची एक किंमत नसून लिलाव चालू आहे आणि त्यात सर्वसामान्य ग्राहक भरडला जातोय आणि त्याविषयी काही नियमन करावे असे कोणालाही वाटत नाही; पण आता बऱ्याच जणांच्या नोकऱ्यांवर परिणाम झाल्याने ग्राहक संख्या आटली आहे आणि खरेदीदार निरुत्साही आहेत.  ग्राहकांची अशी अपेक्षा आहे की, घरांचे भाव साधारण ३०-४०% पर्यंत घसरतील.

याच वेळी आपण पाहिले तर या क्षेत्रात विकासक आणि गुंतवणूकदार यांनी घरांच्या किमती वाढवून ठेवल्या आहेत —  covid नंतर — आणि त्या भावाने विक्री करण्याची त्यांची योजना आहे; पण आता ग्राहक अशा घरांकडे पाहणार नाहीत कारण या मंदीच्या काळात हे प्रामाणिक दर नव्हेत याची त्यांना कल्पना आहे.

अशा वेळी हे महत्त्वाचे क्षेत्र पुनर्जीवित करायचे असेल तर काय पर्याय आहेत याचा विचार व्हायला हवा.

एक योजना सरकारी स्तरावर अशी होऊ शकते की, जसे नोकऱ्यांसाठी सरकारचे एक वेब पोर्टल आहे त्याप्रमाणे स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी रेडी रेकनर भावानुसार जाहिराती असलेले एक पोर्टल निर्माण करू शकतो. www.truprice.in अशा प्रकारे ग्राहकांना माहिती उपलब्ध करून देता येईल. या पोर्टलवर कोणताही दर ठेवून अ‍ॅड पोस्ट करता येणार नाही, अवाजवी किंमत असलेल्या लिस्टिंग आपोआप वगळल्या जातील. त्यामुळे ग्राहकांना एक प्रकारे विश्वास येईल की, इथे लूट सुरू नाही आणि तर ते पुढे खरेदीसाठी विचारणा करतील. अशा प्रकारे एक विश्वास जागृत करूनच आता पुढे जावे लागेल.

ग्राहकांचा ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्यक्रम बघता त्या दृष्टीने आभासी भेट ही संकल्पना राबवावी. हे व्हिडीओ टूर इतकं सीमित नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून ग्राहकांना भेटीचा अनुभव कसा देता येईल हे पाहावे लागेल. विक्री व्यवस्थापन विभागातसुद्धा नवीन पद्धतीने ग्राहकांशी संवाद साधावा लागेल, जेणेकरून ग्राहक आपल्या आवडीनुसार खरेदी करू शकतील. सर्व बँक व्यवहार डिजिटल होताना कर्ज वितरण एक महत्त्वाची भूमिका बजावू  शकेल. या सर्वाचा मुख्य उद्देश ग्राहकांना सोय उपलब्ध करून देणे हा असून सध्याच्या मंदीच्या काळात ग्राहकांचे ब्रँड लॉयल्टीविषयी मत बदलले आहे आणि ते पूर्णपणे आपल्या पैशाचा योग्य मोबदला कुठे मिळेल या विचारावर केंद्रित आहे. त्यामुळे सध्या लक्झरी प्रकारचे गृहप्रकल्प विकले जाणे अशक्य आहे.

मध्यंतरी प्रति चौरस फुटाला लाखभर रुपये मोजल्याच्या बातम्या माध्यमात पेरल्या गेल्या. त्याने काही उपयोग होणार नाही, कारण ग्राहक आता या खेळाला कंटाळले असून आता जो विकासक खरी किंमत (ग्राहकांच्या अनुसार) सांगेल तिथेच जास्त विक्री होईल.

एक खरे की, करोनाकाळामुळे हे क्षेत्र पूर्ण बदलणार आहे आणि त्याचे पडसाद आपल्याला लवकरच पाहायला मिळतील.

sdhurat@gmail.com

(लेखक हे स्थावर मालमत्ता क्षेत्र व्यवस्थापन विशारद आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2020 12:16 am

Web Title: real estate the changing trend of consumers abn 97
Next Stories
1 घरगुती सजावट
2 उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास..
3 वाढीव बांधकाम ग्राहकांच्या पूर्वपरवानगीनेच
Just Now!
X