‘वास्तुरंग’मधील ‘रंग वास्तूचे’ मधील मनोज अणावकर यांचे लेख वाचून माझ्याही मनात माझ्या बालपणातील वाडीतील आठवणींच्या लाटावर लाटा आपटून त्याची गाज मनांत रेंगाळत राहिली.  आमची तेव्हाची डोंगरेबाग म्हणजे एक मोठी वाडीच. तेव्हाचे डोंगरे बालामृतचे मालक डोंगरे यांची ती वाडी. वाडीत माड, फणस, चिकू, बदाम यांची मोठमोठी झाडे. शिवाय तळमजल्याच्या बिऱ्हाडांनी घरापुढे केलेल्या गुलबक्षी, मोगरा यांच्या छोटय़ा-छोटय़ा बागा म्हणून ती ‘डोंगरेबाग.’ या वाडीत एकमजली अशा तीन बाजूला तीन चाळी व मधोमध एक बैठी, कौलारू बंगलीटाईप चाळ. दादरला अगदी भर वस्तीत, सुरक्षित अशी मध्यमवर्गीय ब्राह्मणांची वस्ती असलेली ही वास्तू! वाडीच्या समोर ज्यानी गांधीवधाच्या वेळी आमचे संरक्षण केले तो कुंभारवाडा, डाव्या बाजूला गोखलेवाडी तर उजव्या हाताला एक कीरवाडी व पाच मिनिटावर मोठे चर्च. शाळा, कॉलेज, देऊळ, दवाखाने, बाजार, स्टेशन सर्वच जवळ व सोयीचे.
जन्मापासून लग्न होईपर्यंत जिथे आम्ही वाढलो, भरपूर खेळ खेळलो, पडलो-झडलो रडलो आणि सुसंस्कारित होऊन घडलोही तेथेच. त्या चाळीनेच आमच्या बालपणात विविध रंग भरले.
चाळीचे रूपांतर सोसायटीत झाले व जुन्या चाळी पाहून तेथे चार ते सहा मजली नवीन इमारती बांधण्याचे ठरले. जागा थोडी जास्त मिळून, अनेक बिऱ्हाडांची सोय होईल, घरातच शौचालय, बाथरूम २४ तास पाणी मिळेल या सुविधांमुळे सर्व भाडेकरू तयार झाले.
क्रमाक्रमाने पहिली बैठी चाळ, नंतर आतली चाळ पाडून तेथील बांधकामही झाले आणि आता आमची चाळ पाडून ती बांधण्यास सुरुवात होणार होती. ही गोष्ट जवळजवळ १९८८ सालची. खरं तर त्यावेळी मी आजीच्या नात्याचं लेणं ल्यायले होते. पण माझी आई तेथे राहात होती व तिची सध्याची राहती जागा खाली करायची होती. तशी पर्यायी जागा तिला तिथल्याच एका जुन्या चाळीत मिळाली होती. पण पहिली वास्तू सोडताना व तेथील सामान हलविताना मी खूप हळवी झाले. माझे मन गलबलून गेले. वास्तविक मी तेथे राहत नव्हते व राहणारही नव्हते. फक्त आईला भेटायला व तिच्या गरजेपोटीच मला तेथे जावे लागायचे.
तरीही माझे त्या वास्तूतले माहेर, ज्यांच्या अंगाखाद्यावर मी वाढले ते प्रेमळ शेजारी दुरावणार म्हणून मला वाईट वाटत होते. घरातील हलकं सामानही जड वाटत होते. त्या छोटय़ा वास्तूतल्या भिंतीशी, कानाकोपऱ्याशी माझं भावनिक नातं जडलं होतं. अभ्यास करायची जागा, पत्ते, सागरगोटे खेळायला, दोरीच्या उडय़ा मारायला मिळणारी घरापुढील गॅलरी मला वाकुल्या दाखवीत होती. त्या वाडीतले मोकळय़ा हवेतील मैदानी खेळ, साखळी लंगडी, खो खो एैसपैस हाच आमचा शारीरिक व्यायाम, ‘जिम’ हा शब्द आमच्या पिढीला ज्ञात नव्हता. रोज संध्याकाळी तेथे भरणारा मुलांचा संघ व मुलींच्या समिती यांनी आम्हाला देशप्रेमाचे बाळकडू पाजले, शिस्तीचे व एकजुटीचे महत्त्व कळले. चाळीतल्या वंदनीय चितळेगुरुजींमुळे संस्कृतची गोडी लागली. जवळच राहणाऱ्या सेनापती बापटांकडून त्या काळातच स्वच्छता अभियानाचे धडे मिळाले. प्रख्यात आप्पा शास्त्रीसारख्या वैद्यांनी औषधं दिली. ब्राह्मण सेवा मंडळात होणाऱ्या ह.भ.प. कीर्तनकार आफळेजींच्या कीर्तनामुळे इतिहासातील शूर वीरांची, वीरश्रींची जवळून ओळख पटली, तर प्रख्यात गायक  श्री. वाटवे, बालगंधर्व, माणिक वर्मा इ. अनेक गायकांमुळे गायनाची गोडी वाढली. कोणत्याही क्लासला न जाता सर्व कला मनात ठसल्या, प्रत्येक विषयाची अभिरुची वाढली ती त्या चाळीतच- डोंगरेबागेत! दादरला तेव्हा वर्दळ खूपच कमी होती. वाडीतच क्वचितच एखादा टांगा, टॅक्सी, मोटार आली तर बालगोपाळ मंडळी ती बघण्याकरिता, आतुरतेने धावत बाहेर येत.
आजूबाजूच्या सर्वच बिऱ्हाडांतील मोठय़ा माणसांचा आम्हाला धाक वाटायचा. काही कारणाने ते कधी आम्हाला रागावले तरी ते तुमच्या भल्यासाठीच रागावले ही प्रत्येक घरातील आई-वडिलांची मुलांना शिकवण होती.
उन्हाळय़ात चाळीतल्या मधल्या चौकात वाळवणं घालण्यासाठी घरातील गृहिणींची धांदल उडायची. पापड, कुरडय़ा, चिकवडय़ा ही कामं एकमेकींच्या सवडीने व मदतीने हसत-खेळत पार पडायचे.
चाळीतली लग्नं, मुंजी अशासारखी कार्ये मधल्या चौकात मांडव घालून तर मंगळागौर, डोहाळजेवणासारखे कार्यक्रम शेजारपाजारच्या जागा घेऊन साजरे व्हायचे.
वाडीत भाजीपाला घेऊन येणारा वसईवाला, वेण्या, फुले घेऊन येणारा फुलवाला, बोहारणी अशा अनेक फेरीवाल्यांचे आवाज व वेळाही सर्वाच्या पाठ होत्या.
ज्यांच्या घरी गणपती असत त्यांच्या घरची आरती चाळीतील मुलामुलींकडून खणखाणीत आवाजात ताल काढून रंगायची. एखाद्या घरी कुणी आजारी पडल्यास त्याची चाळीतल्या सर्वानाच काळजी असायची. सर्वाचेच मदतीचे हात पुढे यायचे. तेव्हा चाळीत प्रेमविवाहही व्हायचे. अजूनही ती परंपरा चालू आहे. शाळेला रजा असेल त्या दिवशी अगर कधीतरी दुपारी डोंबारी, मदारी, गारुडी खेळ करायला यायचे. दोन पैशात तासभर आमची लहान मुला-मुलींची भरपूर करमणूक व्हायची. १९५०च्या दरम्यान चाळीत सार्वजनिक दीपोत्सव सुरू झाला. त्यावेळी मुलामुलींच्या अंगातील सुप्त गुणांना व कलेला प्रोत्साहन मिळून अनेक कलाकार घडले.
१९६० पर्यंतच्या या आठवणींचा खजिना मनांत साठवून मी सासरी आले. चाळीतील मजा तेथेच राहिली. ‘डोंगरेबागेचे’ आत्ताचे स्वरूप म्हणजे ‘अमृतकुंभ’ सोसायटी. चार ते सहा मजल्याच्या चार इमारती तेथे डौलाने उभ्या आहेत. घरोबी चारचाकी गाडय़ा, स्कूटर यांनी मधली मोकळी जागा व्यापली आहे. जुन्या पिढीतीलच पुढची पिढी त्या वास्तूत राहत असल्यामुळे पूर्वीसारखाच आपलेपणा व प्रेमाचा ओलावा झिरपताना जाणवतो. बरीच उच्चशिक्षित मुले परदेशांत स्थायिक झालेली आहेत. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, गायक आदी अनेक कलाकारानी ‘अमृतकुंभ’ आज समृद्ध व सर्वपरी श्रीमंत झाली आहे. या अभिमानाने आजही माझा ऊर भरून येतो.
कोणत्याही प्रगतीकरिता बदल हे आवश्यकच असतात. त्यानुसार अनेक साधकबाधक असे खूप छान बदलही येथे घडत आहेत. पंच्याहत्तरीच्या या वयातही माझे या वास्तूशी ऋणानुबंध आहेत. पण आज जरी मी तेथे गेले तरी मला आठवते माझ्या बालपणीची डोंगरेबागच.      
शुभदा कुळकर्णी – vasturang@expessindia.com