विद्या मोरे

पाऊस हा काही फक्त खंडाळा, लोणावळा किंवा माथेरानलाच पडतो असेनाही. कोकणात सर्वत्रच तो मुसळधार पडतो. पुन्हा निसर्गसौंदर्य बहाल करण्यात सृष्टीनेही हा आपला, तो परका असा कोणताही भेदभाव केलेला नाही. हल्ली पावसाळ्यानिमित्त सहलीला निघालेल्या समूहांना हे वास्तव उमगू लागले आहे. मुंबई ठाण्यालगत असलेल्या अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत-मुरबाड आणि पनवेल परिसरात पावसाळी निसर्गाचा सुखद अनुभव मन मोहरून टाकतो. हा निगसर्गच इथे येऊन राहण्यासाठी निसर्गप्रेमींना खुणावतो, त्याविषयी..

‘पिकतं तिथे विकत नाही’ म्हणतात ते अगदी खरं आहे. आता हेच पाहा ना, निसर्गसौंदर्याचा आस्वादच घ्यायचा असेल तर दरवेळी खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानला जायलाच हवे असे नाही. उलट वीकेंडला तिथे नेहमीचीच गर्दी असते. मग ज्याच्या शोधात आपण एवढय़ा लांब आलेलो असतो ती विश्रांती किंवा शांतता मिळण्याची सुतराम शक्यता नसते. सरत्या जूनमध्ये पावसाने आपले बस्तान बसवले की निसर्ग आपली हिरवी श्रीमंती सर्वत्र उधळून टाकतो. अशा वेळी मुंबईलगतच्या अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड किंवा कर्जत तालुक्यात फिरणे यासारखा आनंद नाही. लोणावळ्यातील गर्दी आणि तिथे पोहोचण्यासाठी करावा लागणारा द्राविडी प्राणायाम लक्षात घेता, एखाद्या अपरिचित ठिकाणी मस्तपैकी पावसाचा आनंद घेता येतो. मुंबईच्या परिघात अशी अनेक ठिकाणे आहेत. यात अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड किंवा कर्जत ही ठिकाणे आघाडीवर आहेत.

क्रयशक्ती वाढल्याने अनेक मध्यमवर्गीय मुंबईकरांनी गेल्या दोन-तीन दशकांत या परिसरात सेकंड होम्स घेऊन ठेवले आहेत. त्याचेही अनेक प्रकार आहेत. काहींनी आधी फक्त जागा घेऊन ठेवल्या. मग सवड, आवड आणि गरजेनुसार तिथे घरे/बंगले बांधले. अनेकांना एकटय़ाला तिथे करमत नाही. मग एकाच कार्यालयातील अनेकांनी अथवा सोसायटीमधील शेजाऱ्यांनी समूहाने या परिसरात दुसरी घरे घेतली. निवृत्ती ही खूप दूरची गोष्ट झाली. आता अनेक कुटुंबीयांनी पन्नाशीतच स्वेच्छा निवृत्ती पत्करून वानप्रस्थाश्रम स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. नोकरीच्या वेळी घेतलेले दुसरे घर उत्तर आयुष्य आरामात आणि आनंदात घालविण्याचे आदर्श ठिकाण ठरते. अनेकांचा हा अनुभव आहे. एकतर पुण्याच्या तुलनेत हा परिसर मुंबईपासून रेल्वे/ रस्तामार्गे एक ते दीड तासाच्या अंतरावर आहे. शिवाय प्रदूषणमुक्त आणि निसर्गसान्निध्याचे वरदान लाभले आहे. पूर्वी सेकंड होम्स म्हटली की वर्षभरातील सर्वाधिक स्थानिक केअर टेकरच्या ताब्यात असायची. आता परिस्थिती बदलली आहे. स्वेच्छा निवृत्ती पत्करलेले अनेकजण शनिवार-रविवारी अथवा एक दोन आठवडे सेकंड होममध्ये जाऊन राहू लागले आहेत. व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुक या समाजमाध्यमांमुळे शाळूसोबती, कॉलेजचे मित्र अथवा ऑफिसमधील सहकारी एकमेकांशी संपर्क साधून आहेत. त्यामुळे दोन ते तीन जोडपी समूहाने अशा ठिकाणी राहण्याचा आनंद घेऊ लागले आहेत. हल्ली शाळा-महाविद्यालयांचे माजी विद्यार्थी संघ वर्षभरातून एक-दोनदा स्नेहसंमेलनानिमित्त पुन्हा एकदा शाळेच्या बाकांवर बसण्याचा अनुभव घेऊ लागले आहेत. कुठल्यातरी प्रसिद्ध रिसॉर्टवर जास्तीचे पैसे मोजण्यापेक्षा ही मंडळी ओळखीतल्या मित्राचे शेतघर अथवा बंगला गेटटुगेदरसाठी निवडू लागले आहेत.

खेडय़ातले आयुष्य कितीही गैरसोयीचे असले तरी त्याचे अनेकांना आकर्षण असते. काहींचे गाव असते, पण ते खूप अंतरावर. तिथे जाण्या-येण्यातच बराच वेळ खर्ची पडतो. काहींचे गाव नावापुरते असते. तिथे त्याचे कुणीही सगेसोयरे नाहीत. घरही नाही. काहींच्या नशिबी सांगण्यापुरतेही गाव नसते. अशी मंडळी शहरात राहत असली तरी मनाने ‘खेडय़ामधले घर कौलारू’ उभारण्याची स्वप्ने पाहात असतात. सुरुवातीच्या काळात ही केवळ दिवास्वप्ने होती. त्यामुळे त्या मृगजळामागे धावून अनेकांनी आपले हात पोळून घेतले होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पैसे गुंतविणारे ग्राहक अधिक सजग झाले आहेत. त्यातून अंबरनाथ, मुरबाड आणि कर्जत परिसरात खूप छान टाऊनशिप उभ्या राहिल्या आहेत. आता उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांकडे स्वत:चे वाहन असते. त्यामुळे गरजेच्या वस्तू सर्व त्यात टाकून आणता येतात. पावसाळ्यात या परिसरात सहज चक्कर मारलात तर अनेक शहरी कुटुंबे पावसाचा आनंद घेताना दिसतात.

अंबरनाथ तालुक्यातून बदलापूरला वळसा घालून आपण मुरबाडकडे निघालो की वाटेत मुळगाव लागते. मुळगाव शेजारच्या डोंगरावर खंडोबाचे देऊळ आहे. हल्ली मात्र मुळगाव तिथे मिळणाऱ्या बटाटेवडय़ामुळे अधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे बारवी किंवा म्हसा गावाकडे जाणारे पर्यटक मुळगावला थांबून तेथील चविष्ट वडय़ाचा आस्वाद घेतातच. एवढेच काय अंबरनाथ, बदलापूरमधील अनेकजण दुचाकी अथवा चारचाकीवरून केवळ वडे खाण्यासाठी मुळगावपर्यंत रपेट मारतात. बुडून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक दुर्घटना घडल्यामुळे बदनाम असलेले बदलापूरजवळील कोंडेश्वर हे खरे तर एक चांगले पावसाळी निसर्गरम्य ठिकाण. या परिसरात पावसाळ्यात दाट धुके असते. हिरव्यागार डोंगररांगा, त्यावर पसरलेले शुभ्र पांढरे धुके आणि झोंबणारा गार वारा हे कोंडेश्वर परिसरातील निसर्गाचे रूप केवळ अवर्णनीय असेच आहे.

बदलापूरहून मुरबाडकडे जाताना वाटेत बारवी धरण लागते. या परिसरातील जंगल विलोभनीय असे आहे. बारवीचा रस्ता सोडून आपण पलीकडच्या म्हसा मार्गे गेलो तरी तुकतुकीत रस्ता आपली शेवटपर्यंत सोबत करतो. पुढे माळशेज घाट, नाणेघाट अशी अनेक ठिकाणे म्हणजे आनंदाचे डोई आनंद तरंग!