वास्तूवर आपल्या वागण्या बोलण्याचे तरंग उमटतात, तसेच आपल्या मनावरही वास्तूचे तरंग उमटत असतात. वास्तू आणि आपल्यातलं जे नातं आहे, त्या नात्यातल्या धाग्यांचे विविध रंग उलगडणाऱ्या अनुभवांचं सदर‘रं ग वास्तूचे’..
अष्टवसूंना धारण करणारी ‘वसुंधरा’ म्हणजेच ‘पृथ्वी’ ही आद्य वास्तू आहे आणि त्यावर बांधलेली कुठलीही इमारत हीदेखील वास्तूच होय. त्यामुळेच पर्णकुटी, झोपडी, बंगला, किंवा गृहसंकुलातली सदनिकाजि ला हल्लीच्या भाषेत ‘फ्लॅट’ म्हणतात, या सगळ्या वास्तूच आहेत. इतकंच काय, दुकान, कारखाना, कार्यालय हीसुद्धा सगळी वास्तूचीच उदाहरणं आहेत.
खरं तर, ‘हे विश्वची माझे घर’ असं मानायला शिकवणारी आपली संस्कृती ही संपूर्ण विश्वालाच वास्तूचं स्वरूप देऊन जाते. पण केवळ माणसांना किंवा इतर सजीवांना आधार देणारी आणि अष्टदिशांनी किंवा चार िभतींनी बांधली गेलेली जागा अथवा पोकळी म्हणजे वास्तू नव्हे. वास्तू सजीव असते. तिलाही माणसांसारखा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असतो. वास्तूच्या निर्मितीपासून तिच्या अंतापर्यंत तिच्याही आयुष्यात अनेक चढउतार येतात. सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वास्तू अनुभवत असते.
तिच्यात राहणाऱ्या माणसांची सुख-दु:खं ही तिची सुख-दु:खं होऊन जातात. एखाद्या देवतेप्रमाणे ‘वास्तू तथास्तु म्हणत असते’, असं आपल्याला लहानपणापासून कानावर येत असतं. त्यातला श्रद्धेचा भाग सोडला, तरी राहत्या घरात किंवा वावरत्या वास्तूत चांगले विचार करावे, चांगलं बोलावं, चांगलं वागावं ही मूल्यांची शिकवण वास्तूच्या माध्यमातून आपण एकमेकांना देत असतो. त्यामागे वास्तूत सकारात्मक वातावरण राहावं, हाच उद्देश असतो. काही वास्तूंमध्ये गेल्यावर प्रसन्न वाटतं, तर काही वास्तूंमधून कधी एकदा आपलं काम उरकून आपण काढता पाय घेतो, असं आपल्याला होत असतं. म्हणजेच जसे वास्तूवर आपल्या वागण्या बोलण्याचे तरंग उमटतात, तसेच आपल्या मनावरही वास्तूचे तरंग उमटत असतात. वास्तू आणि आपल्यातलं जे नातं आहे, त्या नात्यातल्या धाग्यांचे विविध रंग उलगडणाऱ्या अनुभवांच्या माळेतलं ‘रंग वास्तूचे’ या सदरातलं हे पहिलं पुष्प!
चाळीतल्या सगळ्या बिऱ्हाडांची सामानाची बांधाबांध करण्यासाठी एकच धावपळ सुरू होती. कदमांचा सहा वर्षांचा योगेश आईला आतल्या खोलीतून सामान आणून द्यायला मदत करत होता.
आपल्या चिमुकल्या मुठीत मावतील असे चमचे, वाटय़ा, पेले अशी छोटीछोटी भांडी आणून देतानाच आपली सगळी खेळणी आई घेतेय की नाही, याकडेही त्याचं बारीक लक्ष होतं. शेजारच्या साठे आजोबांच्या घरातही सामानाची बांधाबांध करताना ‘अगं हे घेतलं का? ते राहूनच गेलं की,’ असं म्हणून काही विसरायला नको, यासाठी सामानाची यादी आजोबा सारखी मनात आळवून बघत होते. ‘दोघांचं ते मेलं कितीसं सामान? पण त्याचंही तुम्हाला टेन्शन येतं,’ असं म्हणून साठे आजी स्वत:ला आलेलं टेन्शन लपवू पाहत होत्या. जुकरांचा तिशीतला मधू मात्र उत्साहाने सामानाची बांधाबांध करत होता. देशपांडेंची धुसफुस चालू होती. ‘एक घर बदलायचं म्हणजे किती ही कटकट? आणि पुन्हा हे सगळं तात्पुरत्या जागेत राहायला जाण्यासाठी! नव्या इमारतीत राहायला येताना पुन्हा याच सगळ्या कटकटींना सामोरं जायचंय. म्हणून सांगत होतो, तो टॉवरबिवर नको, तर माझं ऐकलं नाही कोणी..’ सर्वच घरांमध्ये ही अशी धावपळ सुरू होती. कोणी आनंदी, कोणी दु:खी, तर कोणी कातावलेला! सामान न्यायला आपला टेम्पोवाला कसा आला नाही, म्हणून कोणी वाट बघत होता. तर कोणी टेम्पोत आपलं सामान लावून घेण्याच्या धामधुमीत होता. चाळीतल्या कदम, माने , जुकर, देशपांडे, साठे अशा सगळ्यांचा चाळीतला हा शेवटचा दिवस होता.
चाळ मालकानं त्यांची चाळ बिल्डरला विकली होती. ती पाडून तिथे टोलेजंग टॉवर उभारला जाणार होता. त्यासाठी या सर्वाना शक्य तितक्या जवळपास, पण मिळतील तिथे पर्यायी जागा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे इतकी र्वष एकमेकांच्या घरांना खेटून असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या आणि रोज एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या सर्व कुटुंबांची आता निदान पुन्हा नवा टॉवर उभा राहीपर्यंत तरी ताटातूट होणार होती. जुकरांचा मधू, आपण लग्न होऊन टॉवरमधल्या नव्या फ्लॅटमध्ये राहायला जाणार, याची स्वप्न रंगवत होता, तर देशपांडेंना टॉवरमध्ये या नव्या फ्लॅटचा वाढीव मेण्टेनन्स कसा भरायचा याची विवंचना लागली होती. साठे आजोबांच्या मुलाने आधीच वेगळी जागा घेतली होती आणि त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, की या टॉवरबिवर प्रकरणात आपल्याला काही रस नाही. कारण तिथे मिळून मिळून किती जागा मिळणार? त्यामुळे त्याने बिल्डरला सांगून ठेवलं होतं की, आपल्या वाटय़ाची जागा चाळीबाहेरच्या माणसाला विकून टाक आणि आपल्याला पसे दे. ते पसे घेऊन तो थोडी मोठी जागा विकत घेणार होता. प्रत्येकाची स्वप्न वेगळी, समस्या वेगळ्या आणि मनसुबे वेगळे. संध्याकाळपर्यंत एक एक करून सगळी कुटुंबं आपल्या सामानासकट आपापल्या घरी रवाना झालीत. दुसऱ्या दिवशी ती चाळ पाडली जाणार होती. मरणपंथाला लागलेली आणि अवघ्या काही तासांचं आयुष्य उरलेली ती रिकामी एकाकी चाळ संध्याकाळी दिवेलागणीनंतर काळोखानं पोखरून गेल्यामुळे आणखीच भकास दिसत होती. पण तशाही अवस्थेत त्या काळोखी पडद्यावर आठवणींचा फ्लॅशबॅक तरळत होता. मानेंच्या विजूच्या लग्नाच्या वेळी अख्ख्या चाळीत उडालेली मंगल कार्यालयाची लगबग, गणपतीच्या दिवसांमध्ये मंडपाशेजारी घातलेल्या रंगमंचावरचे लहानग्यांचे नाच आणि मोठय़ांनी सादर केलेल्या नाटकांच्या वेळी येणारे शिटय़ा-टाळ्यांचे आवाज, सर्वाना जीव लावणाऱ्या आणि अख्ख्या चाळीच्या आजी असलेल्या िशदेंच्या आजी गेल्यानंतर त्यांना अखेरचं चाळीबाहेर नेताना चाळीतल्या अनेकांनी फोडलेले हंबरडे.. असे अनेक आवाज आणि प्रसंग त्या अंधारल्या शांततेत अधिकच गडद होत होते.
दुसरा दिवस उजाडला. चाळ आज सुरुंग लावून पाडली जाणार होती. चाळीच्या आजूबाजूचा परिसर तसा थोडासा मोकळा असल्यामुळे हा परिसर निर्मनुष्य करून चाळीच्या तळमजल्याखाली खणून त्यात हा सुरुंग पेरला जाणार होता. हातोडय़ाचे घाव घालून पाडायला बराच वेळ लागत असल्यामुळे, आधीच ठरवलेल्या योग्य प्रमाणात सुरुंगाची दारू पेरून फक्त हीच इमारत पडेल याची तजवीज करणारं, इमारत पाडण्याचं हे नवं तंत्रज्ञान वापरलं जाणार असल्याचं बिल्डरनं सांगितलं होतं. लगतच्या परिसराला धोका नसल्याचा निर्वाळाही त्यानं दिला होता. दुरूनच चाळीचं शेवटचं दर्शन घेऊन तिच्या अंत्यविधिला उपस्थित राहण्यासाठी चाळीतली काही कुटुंबं आली होती. आजूबाजूच्या परिसरातले काही जण इमारत पाडण्याचा हा नवीन प्रकार पाहण्यासाठी कुतूहलापोटी मुद्दाम आवर्जून आले होते. कोणीतरी बातमी आणली की, तळमजल्यावरच्या कुळकण्र्याच्या घरात सुरुंग ठेवला जातो आहे आणि ‘माझ्याच मेलीच्या घराचा वापर सगळ्यांची घरं पाडण्यासाठी केला जातोय,’असं म्हणून कुळकर्णी काकू एकदम रडायलाच लागल्या. आपल्यापुरताच विचार करायची ‘फ्लॅटसंस्कृती’ची हवा कुळकर्णी काकूंना अजून लागली नव्हती. त्यामुळेच त्यांना रडू आवरेना. थोडय़ाच वेळात प्रचंड कडकडाट करत ती चाळ एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दुसऱ्या मजल्यावरचं कोपऱ्यातलं आपलं घर कोसळताना पाहून िशदेंच्या आठ-दहा वर्षांच्या विजयालाही रडू कोसळलं. मानेकाकूंनी तिला जवळ घेऊन थोपटलं. खरं तर, केवळ ती चाळच कोसळली नव्हती, तर शेजाऱ्यांची सुख-दु:खं ही आपलीच मानून ती वाटून घेणारी चाळसंस्कृतीच जणू त्या इमारतीच्या रूपाने कोसळून पडत होती. नव्या टॉवरची ती नांदी होती. एखाद्या गोष्टीच्या विनाशात बरेचदा दुसऱ्या नव्या गोष्टीची मुळं रुजत असतात. पण विजयाला ते कसं कळणार? शेजारीच उभ्या असलेल्या आपल्या बाबांना तिने प्रश्न विचारून भंडावून सोडलं. ‘अहो ही चाळ जुनी झाली होती, तर ती पाडून पुन्हा तिकडे नव्याने चाळच का बांधत नाहीत? चाळ पाडल्यावर टॉवरच बांधला पाहिजे का? नवीन चाळ बांधली तर आपण पुन्हा सगळे पहिल्यासारखे एकत्र राहू शकणार नाही का?’ पण तिच्या प्रश्नांना तिचे बाबा काय उत्तर देणार होते? चाळ बिल्डरला विकायला विरोध करणाऱ्यांमध्ये सुरुवातीला तेही होते. पण अखेरीला बहुमताच्या रेटय़ापुढे, बिल्डरच्या दबावापुढे त्यांचं काहीही चालू शकलं नव्हतं. चाळ पडली. सगळे आपापल्या तात्पुरत्या घरांमध्ये राहायला लागले आणि स्थिरावले. त्या तात्पुरत्या घरांमध्ये त्यांना पहिल्यांदा ‘फ्लॅट-संस्कृती’चं वारं लागलं. उगाचंच घराचे दरवाजे उघडे ठेवायचे नाहीत. जिन्याच्या पॅसेजमधून जाताना दुसऱ्याच्या घरात डोकावणं हे ‘बॅड मॅनर्स’ असतात. एखाद्याच्या घरात अडचण असल्याचं कळलं, तरी बोलावल्याशिवाय उगाचच मदतीच्या नावाखाली दुसऱ्याच्या घरात लुडबुड करायला जायचं नसतं, असे ‘फ्लॅट-संस्कृती’तले अनेक नियम या चाळीतल्या लोकांना कळले आणि त्यांनी ते अंगवळणीही पाडून घेतले. पुढे दीड-दोन वर्षांत टॉवर उभा राहिला. साठे आजोबा मुलाच्या नव्या मोठय़ा जागेत राहायला गेले. त्यामुळे ते या नव्या टॉवरमध्ये परतलेच नाहीत. देशपांडेंनीही टॉवरमधली आपली जागा विकून विरारला कमी मेण्टेनन्सची जागा बघून ते तिथे राहायला गेले. जुकरांच्या मधूचं मधल्या काळात लग्न झालं. परंतु टॉवरमधली जागा अपुरी पडणार म्हणून त्यानेही ती जागा विकली. काही कुटुंबं सोडली तर अशाच प्रकारे चाळीतले बरेच जण पांगले. चाळ सोडून तात्पुरत्या जागेत राहायला जाताना पुन्हा टॉवरमध्ये आल्यावर काय काय करायचं याच्या आणाभाका या चाळीतल्यांनी चाळ सोडून जाताना घेतल्या होत्या. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी..’ या केशवसुतांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे त्या सगळ्या आठवणी तिथेच विरून गेल्या आणि चाळीतल्या लोकांबरोबरच तिथल्या घरांच्या उघडय़ा दरवाज्यांमधून हवेबरोबरच खेळणारी आपुलकी, आस्था आणि आहे ते वाटून घेण्याची वृत्तीही फ्लॅटमधल्या बंद दरवाजाआडच्या संस्कृतीत लुप्त झाली, ती कायमचीच!

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…