09 August 2020

News Flash

मेणवलीतील घंटेचे देऊळ

मेणवली येथे मात्र त्यातील घंटा देवळात न लावता त्या घंटेसाठी वेगळे मंदिर बांधले आहे व हेच मेणवली गावचे वैशिष्टय़ आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मृणाल तुळपुळे

मेणवली हे वाईपासून तीन किलोमीटरवर असलेले कृष्णा नदीकाठचे लहानसे गाव. त्याची ओळख नाना फडणवीसांचे गाव अशी सांगितली जाते. औंधचे भवानराव त्रंबक पंत प्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना मेणवली गाव देणगी म्हणून देण्यात आले. नानांनी त्या गावात स्वत:ला राहण्यासाठी एक सुंदर वाडा तर बांधलाच, पण कृष्णामाईच्या घाटावर एक विष्णूचे व दुसरे मेणेश्वराचे म्हणजेच शंकराचे अशी दोन देवळे देखील बांधली.

कृष्णेच्या घाटावरील या मंदिरांच्या परिसरात गेले की सर्वप्रथम एक छोटेसे देऊळ दृष्टीस पडते. ते विष्णू व शंकराच्या देवळांच्या मानाने खूपच लहान असून घंटेचे देऊळ म्हणून ओळखले जाते. या देवळाचे विशेष म्हणजे त्यात फक्त एक भलीमोठी घंटा टांगली आहे. पंचधातूंपासून बनवलेल्या या घंटेचे वजन सहाशे पन्नास किलाग्रॅम एवढे असून, त्यावर लहानग्या जिझसला कडेवर घेतलेल्या मेरीचे चित्र व १७०७ हे साल कोरलेले आहे. ही घंटा बघितल्यावर जिझस आणि मेरीचे चित्र कोरलेली घंटा देवळाच्या परिसरात का ठेवली, ती एखाद्या चर्चमधील घंटा आहे का, तिच्यासाठी वेगळे मंदिर का बांधले असे अनेक  प्रश्न आपल्याला  पडतात;  पण पेशव्यांचा  इतिहास बघितला तर त्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.

१८३९ मध्ये बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचा पराभव केला व अर्नाळा, वसई असे अनेक किल्ले जिंकून ते आपल्या ताब्यात घेतले. या किल्यांमध्ये व आसपासच्या परिसरात अनेक चच्रेस असून, त्यामध्ये मोठमोठय़ा आकाराच्या खूप घंटा होत्या. चिमाजी अप्पांच्या सन्याने वसईच्या किल्ल्यातील चर्चमधल्या घंटा काढल्या व पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्या  हत्तीवरून वाजतगाजत गावात  मिरवल्या.

वसईच्या किल्ल्यावर अशा एकूण किती घंटा होत्या व त्यांपैकी किती घंटा हत्तीवरून मिरवत आणल्या हे नक्की माहीत नाही; परंतु पोर्तुगीज चर्चमधून काढून आणलेल्या त्या घंटा नंतर वेगवेगळ्या देवळात बसवण्यात आल्या असे आढळून आले. गेले काही वर्षे इतिहासकार आणि संशोधक या घंटांचा शोध घेत आहेत, तसेच त्या विषयीची माहिती गोळा करत आहेत. त्यानुसार पोर्तुगीजांच्या काळात उत्तर कोकण, वसई, डहाणू, पालघर, दमण या भागात ८० पेक्षा जास्त चच्रेस होती आणि त्यातील प्रत्येक चर्चमध्ये व तेथील घंटागृहात किमान दोन तरी घंटा होत्या.

इतकी चर्च आणि तिथे इतक्या घंटा कशासाठी असतील, असे मनात येणे साहजिक आहे; पण पाश्चात्त्य संस्कृतीत घंटेभोवती अनेक श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि  रीतिरिवाज जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे गावच्या प्रतिष्ठेचे वा श्रीमंतीचे प्रतीक म्हणून मोठमोठय़ा घंटा बसवलेले उंच मनोरे बांधले जात असत. हे मनोरे म्हणजेच घंटागृहे चर्चचा एक भाग असे. पूर्वी गावाच्या सुरक्षिततेसाठी व गावाची राखण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाई. गावातील लोकांना पूर, वादळ अशा नैसर्गिक संकटांची सूचना देण्यासाठी, गावात घडलेल्या चांगल्या घटनेची दखल घेण्यासाठी तसेच प्रार्थनेची वेळ झाल्यावर अशा घंटागृहातील घंटा वाजवली जात असे.

वसईला मिळालेल्या या घंटा वेगवेगळ्या आकाराच्या आणि कमी जास्त वजनाच्या असून, त्या सगळ्या घंटा पंचधातूंपासून बनवलेल्या होत्या. इतिहासकारांना त्यातल्या ३८ घंटांविषयी सबळ पुरावा मिळाला असून, त्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील ३४ देवळांमध्ये बसवण्यात आल्या आहेत. नाशिकच्या शंकराच्या देवळातील, मुरुडच्या दुर्गादेवी मंदिरातील, भोरगिरी येथील भीमाशंकराच्या देवळातील या त्यापैकी काही घंटा. सुमारे  चारशेपेक्षा जास्त वर्षे जुन्या अशा या घंटा आजही सुस्थितीत बघावयास मिळतात.

मेणवली येथे मात्र त्यातील घंटा देवळात न लावता त्या घंटेसाठी वेगळे मंदिर बांधले आहे व हेच मेणवली गावचे वैशिष्टय़ आहे.

या घंटेच्या मंदिरामुळे कृष्णाकाठच्या देवळांच्या रम्य परिसराला एक प्रकारचे वेगळेपण लाभले आहे.

mrinaltul@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 12:02 am

Web Title: satara menavali temple abn 97
Next Stories
1 बांधकाम व्यवसायाला वाली नाही
2 उद्योगाचे घरी.. : वित्तीय गुंतवणुकीतून सर्वसामान्यांना श्रीमंत बनवणारं ऑफिस
3 पुनर्विकास बाजारपेठेला नवा आयाम
Just Now!
X