12 December 2017

News Flash

लाडकी चौकडी

मी आणि माझी बायको अनुजा आम्हा दोघांनाही पाळीव प्राण्यांची आवड आहे.

सौरभ गोखले | Updated: October 7, 2017 2:46 AM

सौरभ गोखले आणि अनुजा साठे

मी आणि माझी बायको अनुजा आम्हा दोघांनाही पाळीव प्राण्यांची आवड आहे. आपल्याकडे एखादा तरी छानसा भूभू असावा, असं आम्हाला कायम वाटायचं. लग्नानंतर एकदा आम्ही दोघं कॅफेमध्ये गेलो होतो. तेव्हा समोरच एक पेट शॉप होतं. तिथे आम्ही एक अत्यंत गोड असा केसाळ कुत्रा पाहिला. अनुजाला तो खूपच आवडला होता. तो होता तिबेटीयन ल्हासा आप्सो (lhasa apso) या जातीचा. तेव्हा मी ‘राधा ही बावरी’चं शूट करत होतो. सेटवर सहज एकदा अमोल बावडेकरला म्हटलं की, ‘‘अरे, मला असा असा कुत्रा हवा आहे. तुला कुठे मिळाला तर बघ.’’ एक दिवस अमोलने मला व्हॉट्सअ‍ॅपवर पपीज्चे फोटो पाठवले आणि सहज विचारलं, ‘कसे आहेत?’ मी म्हणालो, ‘छान आहेत.’ अमोल दुसऱ्या दिवशी सेटवर त्यातलं एक छोटुसं गुंडुलं भूभू घेऊनच आला. हीच आमची मफीन. आमच्याकडच्या चार कुत्र्यांपैकी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात खाससुद्धा! अमोल आमच्यासाठी कुत्रा घेऊन आलाय हे घरी कुणालाच माहिती नव्हतं. मी रात्री घरी गेलो तेच मफीनला घेऊन. दार उघडल्यावर माझ्या हातात कुत्रा बघून अनुजा एकदम आश्चर्यचकीत झाली. अनुजासाठी हे खूप छान सरप्राईज होतं.

आमची मफीन एकदम शहाणं बाळ आहे. म्हणजे कुत्र्यांना त्यांचं मलमूत्र विसर्जन करण्याचं प्रशिक्षण द्यावं लागतं, पण मफीनला तसं काहीच देण्याची गरज लागली नाही. ती तिचं तीच शिकली. ती अतिशय हुशार आहे. आमच्या गोखले कुटुंबाचा एक भागच आहे ती आता. आमच्या मित्रपरिवारापैकी अनेकांना प्राणीप्रेमी बनवण्यात मफीनचा मोठा वाटा आहे. कुत्रं पाहिल्यावरही दूर पळणारे आमचे अनेक मित्र खास मफीनला भेटायला आमच्या घरी येतात. तिच्याशी खेळतात, तिला फिरायला घेऊन जातात. आमचं पुण्याचं घर बरंच मोठं आहे. पुढे-मागे दोन्हीकडे मोठी बाग आहे. तिथे मफीनला भयंकर आवडतं. कारण तिला मस्त बागडायला मिळतं. पण मुंबईत तसं होत नाही. फ्लॅटमधल्या या घरात आम्ही दोघंच असतो. त्यात शूटिंगच्या निमित्ताने दोघंही बाहेर. मग मफीन जरा कंटाळायची. पण आता असं नाही. कारण गेल्याच सप्टेंबरमध्ये मफीनला पाच पिल्लं झाली आहेत. यातली दोन आम्ही आमच्या मित्रांना दत्तक दिली आणि तिघं आमच्याकडेच आहेत. त्यामुळे मफीनला आता मस्त कंपनी मिळालेली आहे.

आई मफीन आणि मायलो, मिनिअन आणि विम्झी ही तिची तीन पिल्लं. यातली विम्झी ही कुत्री आहे. ती खरंच जरा सर्किट आहे. म्हणजे तिचं नावही आम्ही विम्झीकल या शब्दावरून विम्झी असं ठेवलंय. ती फार मूडी आहे. घरात कुणी बाहेरचं आलेलं हिला खपत नाही. ती स्पष्टपणे नाराजी व्यक्त करते आणि कुठेतरी लपून बसते. ती माणसं बाहेर गेली की ही परत आमच्याशी खेळायला तयार होते. मी, अनुजा आणि आई-बाबा यांच्याखेरीज गोखल्यांच्या घरात कुणी आलेलं विम्झीबाईंना रुचत नाही. दुसरं कार्टून आहे ते, मायलो. हा तगडा जवान आहे. त्याला खूप उंचच उंच उडय़ा मारायला आणि उंच जागी चढून बसायला आवडतं. घरातल्या बाकीच्या जागा सोडून याने कायमच आमच्या डायनिंग टेबलवर ठाण मांडलेलं असतं. टीव्ही टेबलवरही चढायला याला आवडतं. या दोघांचा तिसरा भाऊ आहे तो, मिनिअन. हे बेणं सगळ्यात भारी आहे. हा अल्फा मेल आहे. दिसायला सगळ्यात छोटा, पण सगळ्यात खमक्या आहे. हा कायमच संरक्षणात्मक पवित्र्यात असतो. काही वेगळं दिसलं की झालीच भुंकायला सुरुवात. त्याला आमची भयंकर काळजी असते. त्याच्या भावा-बहिणींनाही आम्ही ओरडलो तर हे मिनिअन भाऊ मध्येच येऊन आरडाओरडा करतात, मी इतर दोघांना ओरडू नये, यासाठी त्याचा आटापिटा सुरू असतो.

या चौघांचा आमच्या मुंबई आणि पुण्याच्या घरांमध्ये दंगा सुरू असतो. मी आणि अनुजा राहतो पुण्यात तर काम मुंबईत. त्यामुळे सतत ये-जा सुरू असते. आमच्यासोबत या श्वानचौकडीचीही यात्रा सुरू असते. एक्स्प्रेस वे ओलांडला की यांना कळतं आपण पुण्यात आलोय. आता आपल्याला भरपूर हिंडाफिरायला मिळणार. बागडायला मिळणार. मग चौघंही कान टवकारून खिडकीतून बाहेर बघत बसतात. तर मुंबईच्या घराच्या अलीकडे एक विशिष्ट वळणावर आल्यावर मफीनला कळतं आपण मुंबईत आलोय. आपलं घरही जवळ आलंय. मग ती उतरायच्या तयारीत राहते. पिल्लांनाही ती त्याची जाणीव करून देते. मफीनची एक गमतीशीर सवय म्हणजे तिला ड्रायव्हिंग सीटवर बसायला फार आवडतं. मी गाडी चालवत असताना हे गोंडस केसाळ गाठोडं माझ्या मांडीत बसलेलं असतं. तिथून उठणं, तिच्या अगदी जिवावर येतं. शिवाय माझ्या गाडीला कोणी दुसऱ्याने हात लावलेला हिला खपत नाही. पण चार वर्षांची आमची मफीन अत्यंत समजूतदार आहे. एकदा पुण्याहून मुंबईत येताना आमच्यासोबत जितेंद्र जोशी, त्याची बायको आणि त्यांची लेक रेवा होती. ती तेव्हा खूपच छोटी होती. मफीनला मुलं आवडतात. त्यामुळे हे गाडीत आल्यावर ती रेवाशी खेळायचा प्रयत्न करायला लागली, पण रेवा खूपच लहान होती आणि तिला कुत्र्यांची फारच भीती वाटत होती. त्यामुळे अनुजाने मफीनला जवळ घेऊन सांगितलं, ‘रेवा खूप छोटी आहे, तिला तुझी भीती वाटतेय. तू आत्ता तिच्याशी खेळायला जाऊ नकोस.’ मफीनपण मग शहाण्या मुलीसारखी सर्व प्रवास संपेपर्यंत अनुजाच्या मांडीत चूपचाप बसून राहिली. तिला खरोखरच अनुजाचं म्हणणं कळलं असावं.

मी आधीच म्हटल्याप्रमाणे ही कुत्र्यांची जात थोडी वेगळी आहे, त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. त्यांच्या त्या केसांची निगा राखावी लागते. केस धुणं, विंचरणं, मसाज करणं हे सगळं करून घ्यायला आमच्या भूभूबाळांना खूप आवडतं. आम्ही त्यांना फक्त आणि फक्त डॉग फूड देतो. त्याव्यतिरिक्त काहीही देत नाही. कारण आपलं खाणं त्यांना फारसं मानवत नाही. पण उकडलेलं चिकन किंवा मटन पार्टी यांना लईच आवडते.

पुण्याच्या घरात खरं तर यांना प्रत्येक जागाच आवडते. कारण आमचं ते घर शहरात असूनही जंगलात असल्यासारखंच आहे. तिथे खूप छान हिरवाई आहे, गारवा आहे. शांतता आहे. अंगण आहे. तरीही या घरात माझ्या बेडरूमकडे जाणारा जिना हा या चौघांचाही आवडता अड्डा आहे. या जिन्यात एक खिडकी आहे, तिथून थेट मुख्य गेट दिसतं. त्यामुळे कोण येतंय, जातंय, याचा अंदाज येतो. पुण्याच्या घरी आल्यावर आमच्या चौकडीचा मुक्काम या खिडकीतच असतो. तिथे बसून बाहेरची गंमत बघायला यांना जाम आवडतं. मुंबईच्या फ्लॅटमध्ये मात्र यांना थोडा कंटाळा येतो. तिथे कधीकधी त्यांची चिडचिड होते. पण हे चौघं असल्याने त्यांचा जीव ते रमवतात. आम्ही त्यांना खायला ठेवून जातो. च्युस्टिक्स देऊन जातो. खेळणी देतो. आता पुणे-मुंबई दोन्हीकडे भरपूर वेळा राहिल्याने ये-जा केल्याने यांना दोन्ही घरं आवडू लागलीत.

आमची ही चौकडी आता आमच्याही आयुष्याचा, आमच्या फिरण्याचा, मुख्य म्हणजे आमच्या घराचा अविभाज्य भाग झाली आहेत. त्यांच्याशिवाय जगणं आता खरंच कठीण आहे बुवा!

या चौघांचा आमच्या मुंबई आणि पुण्याच्या घरांमध्ये दंगा सुरू असतो. मी आणि अनुजा राहतो पुण्यात तर काम मुंबईत. त्यामुळे सतत ये-जा सुरू असते. आमच्यासोबत या श्वानचौकडीचीही यात्रा सुरू असते. एक्स्प्रेस वे ओलांडला की यांना कळतं आपण पुण्यात आलोय. आता आपल्याला भरपूर हिंडाफिरायला मिळणार. बागडायला मिळणार. मग चौघंही कान टवकारून खिडकीतून बाहेर बघत बसतात. तर मुंबईच्या घराच्या अलीकडे एक विशिष्ट वळणावर आल्यावर मफीनला कळतं आपण मुंबईत आलोय. आपलं घरही जवळ आलंय. मग ती उतरायच्या तयारीत राहते. पिल्लांनाही ती त्याची जाणीव करून देते.

सौरभ गोखले

शब्दांकन – स्वाती केतकर-पंडित

First Published on October 7, 2017 2:46 am

Web Title: saurabh gokhale and his lhasa apso dog