News Flash

भिंतीवरची खुंटी

सुमारे पाच वर्षांपूर्वीची गावची घरे आठवली तर बहुसंख्य घरं मातीचीच होती.

सुमारे पाच वर्षांपूर्वीची गावची घरे आठवली तर बहुसंख्य घरं मातीचीच होती. तेव्हा कोणत्याही घरात गेल्यावर प्रथम दर्शन होत असे ते भिंतीवरच्या खुंटीचे. आजच्या तरुण पिढीला खुंटी म्हणजे काय हे माहीतही नसावे. पण वयाची साठी ज्यांनी ओलांडली आहे, त्यांना जुन्या काळी खुंटीचं महत्त्व काय होतं, हे वेगळं सांगायची गरज नाही.

घराच्या भिंतीवर असणारी खुंटी हा त्या काळातला अविभाज्य भाग होता. टिकाऊ लाकडापासून बनविलेली साध्या प्रकारची खुंटी घराच्या प्रत्येक भागात असायचीच. खुंटीविना घर ही कल्पनाच त्या काळी कुणी करू शकत नव्हतं. किंबहुना अशा संकल्पनेचा जन्मच त्या काळी झालेला नव्हता. कारण खुंटीची उपयुक्तता बहुद्देशीय होती आणि या काळच्या एकंदर व्यवहाराशी ती सुसंगतही होती.

पुढे गरजेप्रमाणे खुंटीच्या प्रकारामध्ये बदल होत गेले. सुतारकाम करणारे लोक नवनव्या आकाराच्या सुबक डिझाइनच्या खुंटय़ा बनवू लागले. ‘खुंटी’ ही त्या काळी घरामधली एक अत्यावश्यक बाब होती. अनेक कामांसाठी तिचा उपयोग होत असे. नमुन्या दाखल काही बाबींचा उल्लेख करण्याजोगा आहे. शाळेचे दफ्तर, शर्ट टोपी, धोतर आणि पागोटं, छत्री, सुप, केरसुणी, कापडी पिशव्या, विहिरीतून पाणी काढायच्या दोऱ्या, फुलांच्या माळा, नेहमीच्या वापरातले नऊवारी पातळ, मातीची भांडी, अंथरुण- पांघरूण.. दैनंदिन व्यवहाराशिवाय सणासुदीच्या काळात खुंटीची उपयुक्तता अधिक होती. मंगल कार्यात किंवा सणासुदीला घरात पताका लावण्याची पद्धत होती. पताका तयार करण्यासाठी खुंटीचा उपयोग होत असे. गणेशोत्सवाच्या काळात टाळ आणि ढोलकी अडकवून ठेवण्यासाठी खुंटीलाच प्राधान्य होतो. शिवाय विद्युतीकरणापूर्वी कंदील आणि पेट्रोमॅक्स बत्ती अडकविण्याची सुरक्षित जागा म्हणजे खुंटीचीच निवड केली जाई.

अशा प्रकारे अनेक कारणांसाठी खुंटीचा वापर केला जात असे. ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंचा भार खुंटीला सहन होत नसला तरी मूकपणे ती सर्व सहन करीत असे. पुढे कालानुरूप घराचं रूप पालटण्याचे दिवस आले. मातीच्या भिंतीची जागा चिरेबंदी आणि विटांच्या भिंतीनी घेतली. भिंतीना सिमेंटचं प्लास्टर आलं. आधुनिकतेची आस मनात बाळगून भिंतीना नवा साज चढू लागला. भिंती सालंकृत बनत गेल्या आणि यामुळे खुंटीचं महत्त्व आणि अस्तित्व कमी होत जाऊन ते लोप पावलं.

आज घराच्या भिंती खुंटीशिवाय आहेत. अपवाद सोडला तर भिंतीवर खुंटी नाहीच. खुंटीची आठवण आता कुणालाच होत नाही. कारण खुंटीवर प्रेम करणाऱ्या माणसांची पिढी आता म्हातारपणाकडे झुकली आहे. खुंटीच्या साऱ्या आठवणी आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

आज देखणी घरं आहेत. चकाकणाऱ्या शोभिवंत भिंती आहेत; पण त्यावरची खुंटी मात्र गायब आहे. तिची आठवण कुणालाच नाही. कारण तिची गरज आज संपलेली आहे.

– अरविंद चव्हाण

vasturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:50 am

Web Title: simple house design in village
Next Stories
1 सहकारी संस्थांची आता वार्षिक तपासणी
2 जोश्यांचे जय-वीरू
3 प्रसन्न प्रवेशद्वार
Just Now!
X