गृहसंकुले, त्यामधील सदनिका आणि त्यात राहणारी कुटुंबे यांचा बंद दरवाजाच्या आत पर्यावरणाशी जास्त संबंध येत नाही. मात्र बाहेर पडताच अनेकांना गृहसंकुलातील विविध समस्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाणीव ही होतेच. त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. बहुतेक सर्वाचाच असा समज असतो की, घनकचरा व्यवस्थापन ही नगरपालिका अथवा महानगरपालिकांची जबाबदारी आहे, पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. ही जबाबदारी गृहसंकुलाचीच- म्हणजेच अप्रत्यक्षपणे सर्व सदनिकाधारकांची आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. घनकचरा व्यवस्थापनाची सुरुवातच मुळी सदनिकेपासून होते. घरांमध्ये दोन प्रकारचा कचरा तयार होतो. ओला आणि सुका. ओल्या कचऱ्यात भाजीपाल्यांची देठे, खराब पाने, फळांच्या साली, नारळ, शहाळे, लाकडांचे तुकडे, केस, अंडय़ांची टरफले, मांसाहारी अन्नातील हाडे, कापूस, टिश्यु पेपर, शिजवलेले अन्न, धान्यांचा कोंडा-कचरा, पालापाचोळा यांचा समावेश होतो. या कचऱ्यांची निर्मिती दैनंदिन चालू असते, म्हणूनच प्रत्येक दिवशी तो घराबाहेर जाणे आवश्यक असते. मात्र सुक्या कचऱ्याचे तसे नसते. सुका कचरा म्हणजे घरातील अजैविक टाकाऊ  वस्तू. यामध्ये कागदांचे कपटे, प्लॅस्टिक, औषधाच्या रिकाम्या स्ट्रिप्स, थर्माकोल, काच, धातू, स्पंज, बॅटरी सेल, कापडांचे तुकडे, बल्ब, टय़ुब, रबर, जाड पुठ्ठे, खेळणी, चामडे आणि अशा विविध वस्तूंचा समावेश होतो. हा कचरा वेगळ्या पिशवीत भरून आठवडय़ातून एकदा घराबाहेर काढणे अपेक्षित असते. आपण मात्र ओला आणि सुका दोन्ही एकाच पिशवीत भरून दररोज नित्यनियमाने घराबाहेर ठेवतो. हा सर्व कचरा सदनिकेच्या दारापासून गृहसंकुलाच्या माध्यमातून एका ठिकाणी गोळा करून संकुलाच्याच कर्मचाऱ्यांकडून महानगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाडीपर्यंत दररोज पोहचविला जातो. तेथून तो डंपिंग मैदानावर जातो आणि मोठय़ा ढिगाऱ्याच्या रूपात विसावतो. शहरामध्ये आणि शहराबाहेर असणारी ही डंपिंग मैदाने सध्या पर्यावरण आणि आरोग्यविषयक समस्येमुळे कायम चर्चेमध्ये आहेत. सातत्याने लागणाऱ्या आगी, दरुगधी आणि लोकांच्या तक्रारी यावर मार्ग काढणे कठीण जात आहे. गृहसंकुलातील घनकचरा व्यवस्थापन नेहमीच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करावा या पद्धतीवर आधारलेली असते, महानगरपालिकेचा तसा लिखित नियमसुद्धा आहे. मात्र याची फार कुठे अंमलबजावणी होताना दिसत नाही. ‘चलता है! चलने दो’ या पद्धतीने दोन्ही कचरा एकत्र करूनच विल्हेवाटीसाठीच पाठवला जातो. कचरा दोन भागात वेगळे करण्याची सुरुवात सदनिकेमध्येच झाली तर गृहसंकुलावरील केवढे तरी ओझे हलके होऊ  शकते. प्रत्येक दिवशी फक्त ओला कचरा गोळा करून गृहसंकुलातच त्याचे उत्कृष्ट प्रकारच्या सेंद्रिय खतात रूपांतर करता येते, आणि हेच खत गृहसंकुलामधील बागेसाठी आणि कुंडय़ांना वापरता येते. ओल्या कचऱ्याचे लवकरात लवकर खतामध्ये रूपांतर व्हावे म्हणून काही द्रवरूप विकरे वापरली जातात.
कोल्हापूर शहरातील एका नवीन गृहसंकुलात ओल्या कचऱ्याचे दैनंदिन संकलन व विघटन उत्कृष्ट पद्धतीने कसे केले जाऊ  शकले हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. विकासकाने तेथे आठवडय़ातील सात वारांचे प्रत्येकी एक असे सात आयताकृती सिंमेटचे खड्डे नावासह एकमेकांस जोडून तयार केले आहेत. प्रत्येकावर घट्ट जाळी आहे. संकुलातील ओला कचरा दिवसाप्रमाणे त्या त्या खड्डय़ात जमा केला जातो, त्यावर विकराचे द्रवरूप पाणी शिंपडले जाते. एका आठवडय़ात उत्तम प्रतीचे खत तयार होते आणि तेसुद्धा दरुगधविरहित. असा घनकचरा व्यवस्थापनचा प्रयोग अनेक गृहसंकुलात सहज उभारता येऊ  शकतो, पण त्याची आखणी संकुल तयार होत असतानाच केली तर फार उत्तम. ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र गोळा करून डंपिंग मैदानावर आणल्यानंतर त्यामधील प्लॅस्टिक, काच, धातू या आणि अशा विविध अजैविक वस्तूंना वेगवेगळे करून त्याचा पुनर्वापरासाठी वापर होतो. हे कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संघटनांची महानगरपालिकेमध्ये नोंद असते. यामध्ये महिलांचा फार मोठा सहभाग आहे. डंपिंग मैदानावर हजारो स्त्री-पुरुष या एकत्रित कचऱ्यातून सुका भाग तेवढा वेगळा करण्याचा प्रयत्न करतात, तेही एवढय़ा दरुगधीत स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता! घनकचरा व्यवस्थापनाचे हे बिघडलेले गणित सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न म्हणजे उगमस्थानीच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणे. गृहसंकुलाने हा सुका कचरा प्रत्येक सदनिकेमधून आठवडय़ातून एकदा गोळा करून महानगरपालिकेकडे सुपूर्द केला तर त्यांचे केवढे तरी ओझे हलके होऊ  शकते. गृहसंकुले मान्यताप्राप्त संस्थेकडून संकुलातच सुक्या कचऱ्याचे विविध भाग वेगवेगळे करून गृहसंकुलास चार पैसेही मिळवून देऊ  शकतात. पालिकेच्या घनकचरा विभागाकडे या सर्व मंडळांची माहिती उपलब्ध असते. महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे बंधन प्रत्येक गृहसंकुलास सक्तीचे करण्यात आले आहे. न करणाऱ्यांना कायदा कलम ४७१ व ४७२ अंतर्गत मोठा दंडसुद्धा होऊ  शकतो.
प्रत्येक सदस्याने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून संकुलाच्या कर्मचाऱ्यांना दिला तर पर्यावरणाची केवढी तरी मोठी सेवा तुमच्या हातून सहज घडू शकते.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा