चिमणी ही आपल्या अंगणातली हक्काची पाहुणी. लहानपणी ‘एक घास चिऊचा,’ असे म्हणत आईने भरवलेला घास कायम लक्षात राहतो आणि त्याचबरोबर अंगणात दंगा करणारी चिमणीही! २० मार्च या ‘आंतरराष्ट्रीय चिमणी दिवसा’ निमित्त अंगणातल्या या लहानग्या पाहुणीची जागवलेली सय..
पहाटे लवकर उठून गृहसंकुलात चालण्याचा व्यायाम ती गेली काही वष्रे नियमित करत आहे. अशा नीरव शांततेत चालताना माझ्या मनात नेहमीच एखाद्या विषयाला जोडून शब्दांची जुळवाजुळव चालू असते. आतासुद्धा तसेच झाले. उठल्यानंतर समोरच्या दिनदíशकेकडे लक्ष गेले आणि २० मार्चसमोर मीच केलेले गोलाकार चिन्ह समोर आले. हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस. बाहेर आल्यावर चालताना प्रत्येक पावलावर मला माझे पन्नास वर्षांपूर्वीचे बालपण आठवत गेले.
गावाकडील ते सुंदर मातीचे घर, समोरचे स्वच्छ अंगण, पहाटेचा सडा, सुबक रांगोळी आणि चिमण्यांची चिवचिव. आमच्या घरात खणांचे माळवद होते. प्रत्येक खणाचे मोठे लाकूड अंगणाच्या दिशेने थोडे पुढे आलेले होते आणि त्यांच्या आडोशास दहा-बारा चिमण्यांची जोडपी त्यांच्या पिलांसह आनंदात राहात होती. गावातील प्रत्येक घरात असेच काहीसे चित्र दिसत असे. अनेक वेळा त्यांच्या किलबिलाटामुळेच आम्हास जाग येत असे. त्याकाळी गावात प्रत्येकाच्या घरी घडय़ाळ असणे शक्य नव्हते. म्हणूनच चिमण्यांची पहाटेची चिवचिव हाच आमचा पहाटेच्या अभ्यासासाठी अलार्म होता.
आजच्या माझ्या उच्च शिक्षणाच्या पायाभरणीमध्ये अंगणातील चिऊताईच्या चिवचिवाटाचासुद्धा सहभाग आहे हे मी कसे विसरणार!  माझ्या लहान बहिणीस वरणभात भरवताना अंगणातील कितीतरी चिमण्या ओसरीवर माझ्या आईच्या जवळ धीटपणे येत असत. प्रत्येक घासातील अर्धा घास चिऊताईचा असे. घरातील सगळ्या बहीण-भावांचे निरागस बालपण आणि त्यांना तो चिऊचा घास अजूनही मला आठवतो. चिमण्यांना खाऊ देण्यासाठी आई जेव्हा अंगणात सुपामध्ये धान्य घेऊन पाखडत असे तेव्हा चार-पाच चिमण्या कायम तिला धान्य स्वच्छतेमध्ये मदत करत. दिवाळीच्या दिवसात अंगणामध्ये रवा, मदा
उन्हात ठेवला की चिऊताई ताटलीत बसून त्यात मिळालेली एखादी अळी शोधून तिच्या बाळास खाऊ घालत असे. ‘‘चिऊ अंगणात असेल तर कशाला हवी चाळणी’’! असे आई आम्हास नेहमीच सांगत असे.
 खणांच्या वर असलेले वाळलेले गवत गोळा करून त्यांनी अंगणातील वळचणीमध्ये बांधलेली कितीतरी घरटी, त्यामधील छान पिल्ले, त्यांच्या आई-बाबांनी आणलेला घास खाण्यासाठी सर्वाची एकाच वेळी उघडणारी गुलाबी मुखे, सर्वासाठी एकसारखी वाटणी हे सर्व बघण्यात, निरीक्षण करण्यात माझे सुंदर सुरेख बालपण कधी संपले कळालेसुद्धा नाही. नवरात्रीच्या वेळी घर सारवणे, दिवाळीसाठी अंगणाची स्वच्छता, आकाशकंदील उभारणी या सर्वामध्ये चिऊच्या घरटय़ास कुठेही इजा होणार नाही याची आम्ही काळजी घेत असू. उन्हाळ्यात गच्चीवर जाऊन धान्य वाळवण्यामध्ये माझा कायम पुढाकार असे. कारण साठवणीच्या धान्यातील पोरकिडे ही चिमण्यांसाठी मेजवाणी असे आणि त्यांचा वाढपी होण्याच्या आनंदासाठी मी कायम भुकेला असे. घराची ओसरी आणि समोरचे अंगण स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यामध्ये माझ्या आईला सर्वात जास्त कुणी मदत केली असेल तर या चिमण्यांनीच. महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आलो पण गावाची ओढ कायम राहिली. अनेक वेळा एकांतात असताना आईच्या आणि अंगणातील चिमण्यांच्या आठवणींनी जीव व्याकूळ होत असे. कसे असेल त्यांचे घर! चिऊचे बाळ खाली तर पडले नसेल ना? माझ्या पत्रातून बहीण-भावाबरोबरच त्यांचीसुद्धा विचारपूस असे.
आज मी गृहसंकुलात फिरत आहे. माझी चिमणी मला कुठेही दिसत नाही. दिसत आहेत ते फक्त कबूतर आणि कावळे! कुठे गेली ती? की तिला आपण घालवले? घरात पाऊल ठेवले आणि छोटय़ा सव्वावर्षांच्या नातवाने पायास मिठी मारली. बोटास धरून अस्पष्ट हुकांर देत त्याने मला संगणकाजवळ नेले. उद्देश अर्थात नेहमीप्रमाणे बालगीते ऐकणे. ‘‘एक चिऊ आली. बाळाला पाहून गेली! एक होता काऊ तो चिमणीला म्हणाला!, चिमणा-चिमणीचे लगीन!’’ संगणकाच्या पडद्यावर या बालगीतांच्या चित्रफिती एकामागून एक सुरू झाल्या.   त्यामधील अनिमेटेड चिमणा-चिमणी, इतर प्राणी-पक्षी हावभाव करून नाचत होती, नातू किबोर्ड आणि माऊसला मध्येच हात लाऊन टाळ्या वाजवत होता, पुन्हा पुन्हा तेच गाणे लावण्याचा आग्रह करत होता. माझे डोळे अश्रूने भरून आले. किती सुरेख होते आमचे बालपण! चिमण्यांनी भरलेले अंगण, त्यांची चिवचिव आणि आजचे त्याचे हे संगीताच्या तालावर नाचणारे संगणकामध्ये बंदिस्त असलेले अनिमेटेड रूप. कधी पहावयास मिळणार पुन्हा त्यांची किलबिल, की अशा बालगीतांमध्येच आमच्या छोटय़ांचे बालपण संपणार?
                                                                                               

 

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!