सणसुदीचे दिवस सुरू झाले की आपलं घर देखील सुरेख सजवावं असं प्रत्येकालाच वाटतं. येणारं प्रत्येक वर्ष जसं आधीच्या वर्षांपेक्षा वेगळं असतं, तसंच नित्य वर्षी येणारे सणवारसुद्धा वेगळे असतात. म्हणूनच उद्याच्या दसऱ्यासाठी नेहमीचं घर स्पेशल दिसावं असं वाटत असेल तर काही छोटे छोटे बदल करून ते सुंदररीत्या सजवता येईल.
आपण भारतीय म्हणजे कमालीचे उत्सवप्रिय! सणवार आले की आनंदाचं, चतन्याचं वातावरण निर्माण होतं. येणाऱ्या प्रत्येक सणाला आपण खास तयारी करतो. अगदी कपडय़ालत्त्यापासून ते घरातल्या पक्वान्नांपर्यंत. यात गृहसजावटसुद्धा असतेच. येणारं प्रत्येक वर्ष जसं वेगळं असतं तसंच सणवारसुद्धा वेगळे असतात, त्यातला उत्साह, मौजमजा वेगळी असते. सणासुदीच्या दिवसांत घरसुद्धा चतन्यदायी व्हावं यासाठी अनेक जणं ते नानाविध वस्तूंनी सजवत असतात. जेणे करून सणांच्या काळात आपलं घरही एकदम स्पेशल दिसेल. मुळात गृहसजावटीसाठी प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या घराचं इंटीरिअर टॉप टू बॉटम बदण्याची गरज नाही. काही छोटे बदल आणि कल्पक मांडणी याद्वारे तुम्ही घराचं इंटीरिअर नेहमीपेक्षा वेगळं आणि फेस्टिव्हल लुक देऊन सजवू शकता.
उद्या साडेतीन मुहुर्तापकी एक असलेला दसरा आहे. या दसऱ्यालासुद्धा आपलं घर खास, हटके दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असेल. मग त्याची सुरुवात तुम्ही घराच्या मुख्य दरवाजापासून करा. केशरी गोंडय़ांचं तोरण दारावर आपण लावतोच, पण घराचा मुख्य दरवाजा अधिक आकर्षक केला तर आपल्याकडे येणाऱ्या आप्तांचा प्रवेश अधिक प्रसन्नतेने होईल. मुख्य दरवाजाच्या डोअरबेलच्या आजूबाजूस एखादा छोटासा पितळेचा लोंबता दिवा लावता येईल. अ‍ॅण्टिक डेकोरेटीव्ह वस्तूंमध्येच एक डोअरनॉक हा प्रकार असतो. तोसुद्धा दारावर लावता येईल किंवा दारावर अनेक जणं स्वस्तिक किंवा कलशाचा स्टीकर चिकटवतात. त्याऐवजी खास दसऱ्यासाठी म्हणून डिझायनर स्वस्तिक, कलश लावता येतील. खडे, मोती यांनी बनवलेले असे स्वस्तिक, कलश बाजारात आता सहज मिळू लागले आहेत.
दिवाणखान्यातली बठक जर सोफा प्रकारातली किंवा भारतीय बठक असेल तर त्यावरच्या कुशन्स, लोड यांची कव्हर्स ब्राइट रंगांची असावीत. हल्ली सिल्क, टसरपासून तयार केलेली ट्रॅडिशनल लुक असलेली तयार कव्हर्स बाजारात सहजी उपलब्ध आहेत. पडद्यांमध्येही वैविध्य असल्याने कुशन कव्हर्सना मिळते जुळते पडदे विनासायास मिळू शकतात. फक्त रंगसंगतीचा मेळ बसला पाहिजे हे ध्यान्यात ठेवा. मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट पद्धतीने रंगांचा ताळमेळ बसवावा. एकाच डिझाइनचे, रंगांचे सेटही मिळतात, त्यांचा वापर करता येईल. यात कुशन्स, लोडची कव्हर्स, पडदे असतात. बठक मस्त जमली की इतर सजावटीकडे लक्ष द्या. घरात तांबा-पितळेचं ताह्मण असेल तर त्यात पाणी घालून विविध रंगांची छोटय़ा आकारातली फुल (उदा. जाई, जुई, प्राजक्त, सदाफुली वगरे.) एकेक करून गोलाकार रचावीत. ही रचना अतिशय सुंदर दिसते. किंवा िभतीवर फुलांच्या माळासुद्धा सोडता येतील. वॉल युनिटमधल्या नेहमीच्या डेकोरेटिव्ह वस्तू काढून काही खास वस्तू असतील तर त्यांची मांडणी करावी. जसं की, गोल्डप्लेटेड पक्ष्यांची जोडी, डॉल्फीन, गणपतीची मूर्ती वगरे. दिवाणखान्यातल्या एखाद्या िभतीवर वॉल हँिगग किंवा फोटो फ्रेम्स लावाव्यात. घरातल्या लहान मुलांनी काही चित्र काढली असतील. तर तीसुद्धा तुम्ही एखाद्या िभतीवर लावू शकता. सजावटीतला मुलांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे, हे यातून समोर येईल आणि मुलांनाही त्याचा आनंद वाटेल.
झाडांमुळे घरात उबदारपणा निर्माण होतो. घरात सहज राहू शकतील अशी छोटी रोपं छानशा कुंडीत ठेवून घराचा किंवा दिवाणखान्याचा एखादा कोपरा अधिक उठावदार, प्रसन्न करता येईल. असे छोटे छोटे बदल आणि कलात्मक वस्तूंचा वापर करून कमी वेळेत एकदम झटपट सुरेख सजावट करता येते.

इंटिरिअर डिझायनर

sandudwadkar@gmail.com