मधुसूदन फाटक

माझे वडील आठ दशकांपूर्वी आपल्या कुटुंबीयांसह नाना चौकाजवळील शास्त्री हॉल नावाच्या एका चाळ समूहामध्ये ठाकूरद्वारहून स्थलांतरित झाले. त्या मध्यमवर्गीयांनी भरलेल्या प्राचीन वाडीचा परिसर हिरव्याकंच वनराईने नटलेला होता. त्या वनराईतच लपेटलेला एक बंगला शास्त्री हॉल वसाहतीच्या शेजारीच होता. मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेट यांनी आपल्या मात्यापित्यांच्या स्मरणार्थ एक भव्य मंदिर उभारले होते. मंदिराभोवतीचे प्रांगणही विशाल होते. त्यातील उत्तरेचा एका भागात नाना शंकरशेट यांनी, ठाकूरद्वारला भव्य वाडा असूनही एक बंगला बांधला होता. नानाचौकाचा हा भाग त्याकाळी गिरगावचे ठाकूरद्वारचे उपनगर मानले जायचे. त्यामुळे गजबजलेला ठाकूरद्वारातून त्या हिरवाईने नटलेल्या परिसरात आणि धार्मिक वातावरणात नाना शंकरशेट यांनी हे विश्रामस्थान उभे केले असावे. हा बंगला (छायाचित्रांत उजव्या कोपऱ्यात) पुढे अनेक वर्षे संगीत क्षेत्रातील अनेक महाकलाकारांच्या वास्तव्याने सूरमय झाला होता. साक्षात बालगंधर्व मुंबईत मुक्कामाला आले की या बंगल्यात उतरत असत. भव्य मंदिराने व्यापलेले प्रांगण असल्यामुळे दर गुरुवारी बालगंधर्व तेथे भजनाचा रियाझ करीत असत. पुढे ‘संगीत स्वयंवर’ नाटकाची निर्मितीची प्रक्रिया गंधर्व संगीत मंडळींची, तेथेच सुरू केली. कारण त्या नाटकाचे संगीत दिग्दर्शक भास्करबुवा बखले हे शेजारच्याच शास्त्री हॉल वाडीचे निवासी होते. ते घरी चाल सुचली की मंदिरातील बंगल्यात जाऊन तातडीने ते गीत गंधर्वाकडून बसवून घेत असत. बालगंधर्वानी स्थलांतर केल्यानंतर काही काळ ही वास्तू रिकामी होती.

त्या काळी मराठी सिनेसृष्टी गाजवत असलेले मास्टर विनायक यांनी आपल्या कंपनीचा मुक्काम कोल्हापूरहून मुंबईला हलविला आणि आपल्या कंपनीच्या कलाकारांना कुटुंबासह निवासासाठी हा बंगला घेतला (ही अमूल्य माहिती मला  दिनकर द. पाटील यांनी दिली), त्यात दीनानाथ मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंब येथील निवासी झाले ते पुढे साधारण एका तपासाठी. बालपणी इतर विद्यार्थ्यांसोबत मी शाळेला निघालो असता, एक तेजस्वी चेहऱ्यांची मध्यमवयीन महिला, व्हिक्टोरियामध्ये (त्या वेळचे मुंबईचे भाडय़ाचे वाहन) चढताना माझ्या मित्राने मला थांबवून विचारले. ‘काय रे या कोण आहेत माहीत आहे का?’ मी नकारार्थी मान हलविल्यावर त्याने माहिती पुरविली ती जन्मभर स्मरणात राहिली. ‘अरे, अपण सकाळी रेडिओवर गाणी ऐकतो ना, त्या गाणाऱ्या लता मंगेशकर.’ त्या अलभ्य दर्शनाचे महत्त्व पुढील काळातच समजले. आणि आम्ही आयुष्यभर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या शेजारच्या वाडीत राहतो, असे अभिमानाने सांगत होतो.

मंदिर प्रांगणातील हा दुमजली बंगला पुण्यातील पेशवाई थाटाचा आणि कोकणी धाटणीचे मिश्रण असलेला असा होता. त्याच्या दर्शनी भागात एक पोर्च होते आणि त्यासमोर मोठे अंगण जे भवानीशंकर मंदिराला भिडलेले होते. पोर्चमधून आत शिरल्यावर प्रशस्त दिवाणखाना आणि आतमध्ये अनेक खोल्या होत्या. पहिल्या मजल्याची रचनाही अशीच होती. फक्त खालील दिवाणखान्यात असलेल्या झुंबरांचा अभाव होता. सबंध बंगला कोरीवकाम केलेला शिसवी खांबांवर उभारलेला होता.

तळमजल्यावर माई मंगेशकरांसह, लता मंगेशकर यांचे कुटुंब राहत होते. पहिल्या मजल्यावर एका बाजूला माझे लेखनांतून झालेले मित्र, ग्रामीण मराठी चित्रपटांचे गाजलेले लेखक – दिग्दर्शक दिनकर द. पाटील हे भाडेकरू होते. तर उर्वरित भागात छायाचित्रकार दिग्दर्शक माधव शिंदे वास्तव्याला होते. पाटील यांच्याकडे त्यांचा एक सोयरा- बाळ पारटे हा एक उत्तम हार्मोनियमवादक काही दिवस पाहुणा होता. लता दिदींनी त्याला हेरला आणि त्याची गाठ, विख्यात संगीत दिग्दर्शक जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्याशी घालून दिली आणि पुढे अनेक वर्षे तो त्याचा नोटेशन तयार करणारा साहाय्यक म्हणून नावाजला.

या बंगल्याच्या भिंतीतून काय जादू होती कोण जाणे, पण येथे राहिलेला प्रत्येक भाडेकरू कोठल्या ना कोठल्या कलांमध्ये निष्णात होते. काही सुरुवातीच्या काळात आम्ही शाळकरी मुलं येता-जाता या बंगल्यात अकारण डोकावत असू- लतादीदी दिसतात का या आशेने. धीर चेपल्यावर रुपारेलच्या अंगणात काही मुले रबरी बॉलने क्रिकेट ख्ेाळत असत. त्यातही आम्ही वेळप्रसंगी सहभागी झालो. हेतू असा होता की, लतादीदी केव्हा तरी ओरडत बाहेर येतील, ‘अरे, जपून मारा, चेंडूने काचा फुटतील’, पण छे, त्या कधीच नाही तर कधी तरी वृद्धावस्थांतील माई रागवायच्या आणि खेळ थांबायचा.

दिनकरराव पाटलांची एक हृदय आठवण सांगितली की, लताताई मोठय़ा गायिका म्हणून गाजू लागल्या तरी इतक्या साध्या होत्या की लहर आली की आमच्या घरी आल्या की हाक द्यायची, ‘पाटील वैनी, चहा प्यायला आल्ये हो. माझ्या जय मल्हार सिनेमाच्या वेळी त्यांनी मला खूप साहाय्य केले,’ असे डोळ्यात कृतज्ञेचे पाणी आणून दिनकरराव सांगत असत.

लतादीदी येथे असेपर्यंत त्या वास्तूत ‘सुरेल बाल कला मंडळा’चा गणेशोत्सव साजरा व्हायचा. तेव्हा हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीत दिग्दर्शकाचे कार्यक्रम त्यांत सादर होत असत आणि कधी तरी लतादीदींचा आवाजही कानावर पडेल या आशेने समोरचा रस्ता रसिकांनी तुडुंब भरलेला असे.

ताडदेव रोडच्या रस्ता सर्वासाठी मंदिराचे प्रांगण आणि तो बंगला १९५२ साली जमीनदोस्त झाला आणि मंगेशकर कुटुंब येथून प्रभुकुंजमध्ये गेले आणि तो कोपरा उदास भासू लागला.

vasturang@expressindia.com