सुचित्रा साठे

अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनातील अत्यंत आवश्यक अशा गरजा. अन्न आणि वस्त्र हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असू शकेल, पण निवारा मात्र एका कुटुंबाला आपल्या छताखाली घेत असतो. ते घर असतं. कुटुंबातील सर्वाना ते प्रिय असतं. सर्वाच्या गरजा, आवडीनिवडी ते पुरवत असतं.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

नवीन घर घेतलं की अगदी नुसता मुहूर्त करायचा म्हटला तरी बऱ्याच गोष्टी न्याव्या लागतात. केर काढायला केरसुणी, पुसायला फडकी, कलश, तांदूळ, गणपतीचा फोटो, पुजेचं साहित्य, सरबताच्या बाटल्या, कोरडा खाऊ, कागदी कप, डिश असं सगळं आठवणीने नेऊनसुद्धा गंध किंवा कात्री, केरभरणी, प्लॅस्टिकच्या पिशव्या असं काही तरी राहतं आणि मग लक्षात येतं की, खरंच घर म्हटलं की किती गोष्टी लागतात. मुहूर्त झाला की लगेच अत्यावश्यक गोष्टींसाठी घराची दारं उघडीच राहतात.

गाळणं, चिमटा, डबे, भांडी स्वयंपाकघरातील जागा आवडतात. गाद्या-गिरद्या, डबल बेडने झोपण्याव्यतिरिक्त काही करायला तिथं जागाच शिल्लक राहत नाही. शिवाय वॉर्डरोब आपला ‘रोब’ दाखवत डोळ्यात न मावणारी जागा अडवतो. दिवाणखान्यात बैठकव्यवस्था ठाण मांडून बसते. गॅलऱ्यांना तारा अडकतात. घरातल्या सभासदांचा ‘गृहप्रवेश’ होतो. स्थिरस्थावर होत कुटुंब घरात रंगू लागतं. हळूहळू नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतात. उमलती पिढी ‘बागडू’ लागते. वयानुसार शाळेबरोबरच खेळ, छंद अशा अनेक ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ चालू होतात. युनिफॉर्म, पीटी ड्रेस, डेली युज, पार्टीवेअर, कॅज्युअल्स् अशांचा भार कपाटाला होतच राहतो. सुट्टीत पर्यटनाला झुकतं माप दिलं जातं. मग तिथली आठवण म्हणून, जाऊन आलो हे घरी येणाऱ्यांना कळावं म्हणून काहीबाही घरात येत राहतं. वाढती गरज, हौस, बदल, संसाररथाची वेगात असलेली आर्थिक घोडदौड, खुळखुळणारा खिसा, घराचा मेकओव्हर, मॅचिंगचं गणित, सेलिब्रेशन मूड, आवड अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शॉपिंगचा मुद्दा ऐरणीवर असतो. आवक वाढल्यामुळे साहजिकच शोकेस, कपाटं, वॉर्डरोब निमूटपणे सगळं पोटाशी धरत राहतात. पण त्यांचीही सहनशक्ती संपते आणि कपडे जागा शोधत अडकत राहतात, घुसत राहतात. सरकत राहतात. ‘इंच इंच लढवू’ म्हणत माळ्याच्या पोटामंदी असलेली जागा संपुष्टात येते. काळ पुढे सरकतो तसा ‘पसारा’ पसरायला लागतो.

पूर्वी चपला, बुटांच्या बाबतीत एक नेहमी वापरताला आणि दुसरा पावसाळी असे दोनच प्रकार, तेही पुन:पुन्हा अंगठा शिवून, सोल लावून झिजेपर्यंत वापरले जायचे. केवळ अनवाणी फिरण्याची वेळ येऊ नये, इतपतच त्याचं महत्त्व. बदलत्या अर्थकारणामुळे नखशिखान्त सजण्याला महत्त्व आल्यामुळे पादत्राणांमध्येही ‘त्राण’ आलाय. आणि पेन्सिलहील, फ्लॅट, हायहील अशी कलाकुसर दिसून यायला लागलीय. आणि रसिकतेने घरात दर‘डोई’ नव्हे, दर‘पायी’ येणाऱ्या जोडांची संख्या इतकी वाढत गेलीय की, दारातच नाही तर माळ्यावर, वॉर्डरोबमध्ये खालच्या बाजूला खास जागा निर्माण करण्यात आली आहे.

सगळ्या गोष्टी मोजूनमापून, मोजक्या असतानाच्या काळात पसाऱ्याला तोंड वर काढायला जागाच नव्हती. आता मात्र त्याचं चांगलंच फावलंय.

तसा थोडाफार पसारा हे घर जिवंत असल्याचं लक्षण आहे. अकृत्रिम, नैसर्गिक वातावरणाचं द्योतक आहे. जसं पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा तिथले नियम, शिस्त, चालीरिती संभाळण्याकडेच जास्त लक्ष ठेवावं लागतं. पाणी सांडणार नाही ना, चमच्याचा आवाज होणार नाही ना, कपडय़ांवर डाग पडून फजिती होणार नाही ना, या विचारांमुळे जेवणातलं लक्ष उडून जातं. मस्त ढेकर येईपर्यंत जेवल्याचं समाधान लाभत नाही. बोटाने चाटूनपुसून खाल्ल्याचा आनंद मिळत नाही. त्याप्रमाणे पसारा नाही, बेडवरच्या परीटघडीच्या चादरीला एकही चुनी पडलेली नाही. उशी वेडीवाकडी ठेवलेली नाही, अभ्यासाच्या टेबलावर पुस्तकांचा विस्कटलेला ढीग नाही, पेन स्टँडमध्येच ‘रिफील’ होऊन उभं आहे, रद्दी कुठे नाहीच; असं दिसलं की वर्तमानपत्रातल्या जाहिरातीतल्या घराचं अंतरंग बघतोय की काय, असं वाटत राहतं.

घरात रंगकाम चालू असलं की एकाच खोलीत बसायची वेळ येते. कमीत कमी ताटल्या, वाटय़ा, भांडी यांच्यात भागवलं जातं. त्या वेळी लक्षात येतं की, अरेच्च्या पोट भरतंय की नेहमीप्रमाणे. म्हणजे आपणच आपला पसारा नको इतका वाढवलाय. तो तसा ‘वाढणं’ हे नैसर्गिक आहे. वाढायलाही हवा. पण कुठे तरी लक्ष्मणरेषा आखायला हवी. नाही तर मग सगळी सुबत्ता असूनही घराचं रंगरूप डोळ्यात भरत नाही. जिकडं पाहावं तिकडं पसाराच पसारा. घरातल्या कोणाकडेच ‘वेळ’ हा फॅक्टर नाही. त्यामुळे घरावर आवराआवरीचा हात फिरलाच जात नाही. त्यामुळे निरुपयोगी, नको असलेल्या टाकाऊ गोष्टीसुद्धा चांगल्या वस्तूंच्या गळ्यात गळे घालून बसतात. रिटर्न गिफ्ट प्रकरणामुळे नको इतक्या गोष्टी (वॉटरबॅग, टिफिन, मग, रंग, पेन्सिल, पेन) जमा होतात. एकदा वापरली की त्यातलं नावीन्य संपतं. मग त्या घरात इकडून तिकडे लोळत राहतात. न आवरल्यामुळे, बघायला वेळ नसल्यामुळे, खिसा गरम असल्यामुळे, घरात असलेल्याच गोष्टी पुन्हा पुन्हा येतात. घराशी गट्टी करून राहतात. प्रदर्शनांमधून मिरची कटर, वेलची पावडर करण्याचे मशीन अशी झटपट कामं करणारी साधनं पाहिली की घेण्याचा मोह होतो. पण घरी आल्यावर अनुभव शहाणपणा शिकवतो आणि मग अशा वस्तू टाकवत ही नाही आणि ठेववत ही नाही. मग त्या अडगळ ठरून घरातले सांदीकोपरे अडवतात.

घरातील प्रत्येक व्यक्तीच्या खोलीच्या बाबतीत असाच अनुभव येत राहतो. आवराआवरीचा ‘उद्या’ कधी उगवतच नाही. कामवाली बाई येऊन फक्त जागा पुसून घेते. सांगितलं तर कपडय़ांच्या घडय़ा करून ठेवेल, पण विवेकाने ‘हवं-नको’ ती कसं ठरवणार? त्यामुळे कधी कधी नवीन गोष्ट, कपडा ठेवणं व्यवस्थित नसल्यामुळे, देखभाल न केली गेल्यामुळे झुळझुळीत न वाटता जुनाच वाटतो. खंडीभर पेनं असतात, पण वेळेला एकही जागेवर मिळत नाही. मिळालं तर ते चालत नाही, अशी अवस्था होते. सगळं हाताशी असूनसुद्धा हवं ते हातात येत नाही. सुट्टी असली की दिवस उशिरा चालू होतो, मग घर ‘जैसे थे’च राहतं. याच कारणास्तव पाहुण्यांनी ‘फोन करूनच यावं’ असा आग्रह धरला जातो. म्हणजे कसं, सगळा पसारा बंद कपाटांत ढकलला की तेवढय़ापुरतं तरी घराचं रूप चांगलं दिसतं. त्या बंद कपाटांमधून काय काय ब्रह्मांड साठवलेलं असतं, हे ज्याचं त्यालाच माहीत.

अर्थात ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे काही घरं अशीही असतात की, तिथं मनाला लगाम घालण्याची प्रवृत्ती असते. अनावश्यक खरेदीचा मोह टाळला जातो. नको असलेल्या गोष्टीची त्वरित कोणत्या ना कोणत्या पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. प्रत्येक गोष्टीला तिची ‘जागा’ दाखवलेली असते. ती वस्तू तिथंच ठेवण्याबद्दल, कधी थोडाफार जाचक वाटणारा, पण उपयुक्त असा आग्रह धरलेला असतो. प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी सोपवली जाते. नाही तर टीव्ही बघता बघता कानातले टॉप समोरच्या टीपॉयवर ठेवायचे, विसरून जायचं, मग कधी तरी पुन्हा घालताना त्याची आठवण झाली की मग शोधाशोध. या शोधमोहिमेत ज्या गोष्टी थोडय़ाफार व्यवस्थित ठेवलेल्या असतील त्याही ‘पसरून’ जातात. घरातल्या मंडळींचा स्वभावही या पसाऱ्यास कारणीभूत असतो. जुनीच गोष्ट ‘नव्या’सारखी ठेवणारेही काही जण असतात. घराकडे लक्ष द्यायला इतका मोकळा वेळ कोणाला आहे, असा आविर्भाव देहबोलीतून व्यक्त होत असतो. तरीसुद्धा हेही तितकंच खरं की, आधी कोणतीही गोष्ट व्यवस्थित करण्याला, ठेवण्याला वेळ दिला तर नंतरचा ‘खूप’ वेळ वाचू शकतो, नव्हे वाचतोच. हा सूक्ष्म विचार केला तर खरंच ‘घरी या जास्त गोष्टींचा पसारा मांडला सारा’ असं म्हणायची वेळ येणार नाही.

तसा थोडाफार पसारा हे घर जिवंत असल्याचं लक्षण आहे. अकृत्रिम, नैसर्गिक वातावरणाचं द्योतक आहे. जसं पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा तिथले नियम, शिस्त, चालीरिती संभाळण्याकडेच जास्त लक्ष ठेवावं लागतं. पाणी सांडणार नाही ना, चमच्याचा आवाज होणार नाही ना, कपडय़ांवर डाग पडून फजिती होणार नाही ना, या विचारांमुळे जेवणातलं लक्ष उडून जातं. मस्त ढेकर येईपर्यंत जेवल्याचं समाधान लाभत नाही. बोटाने चाटूनपुसून खाल्ल्याचा आनंद मिळत नाही. त्याप्रमाणे पसारा नाही, बेडवरच्या परीटघडीच्या चादरीला एकही चुनी पडलेली नाही. उशी वेडीवाकडी ठेवलेली नाही, अभ्यासाच्या टेबलावर पुस्तकांचा विस्कटलेला ढीग नाही, पेन स्टँडमध्येच ‘रिफील’ होऊन उभं आहे, रद्दी कुठे नाहीच; असं दिसलं की वर्तमानपत्रातल्या जाहिरातीतल्या घराचं अंतरंग बघतोय की काय, असं वाटत राहतं.

suchitrasathe52@gmail.com