22 October 2019

News Flash

‘गंध’ घरातील गेला सांगून..

ऋतुमानानुसार सणांचं आणि त्यानिमित्ताने आहाराचं नियोजन केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सुचित्रा साठे

त्या त्या दिवशी तो तो पदार्थ आवर्जून घरी करायचाच परंपरा चालू राहावी, भोगीचे घरगुती मेनू कार्ड विस्मृतीच्या खाईत न जाता उमलत्या पिढीच्या हातात पडावे, हीच तर घराची धडपड..

दिवस उजाडला रे उजाडला की सगळ्यांना पोटपूजेचे वेध लागतातच. या पोटपूजेची तयारी करणारं घरातलं एकमेव स्थान म्हणजे स्वयंपाकघर. ‘आज काय खायला’, असा विचार करत स्वयंपाकघरात डोकवायला कोणाला सांगावं लागत नाही. भजी किंवा वडे तळायला घेतले की गुळाला मुंगळे यावेत, त्याप्रमाणे एकेकजण खुशीत, दीर्घ श्वास घेत आत डोकावतात. चव घेण्यासाठी ‘हात’ पुढे पुढे होत राहतात. घरांत भरून राहिलेला तो तळणीचा वास प्रत्येकाला बातमी देत, त्याची भूक चाळवत घरांत बागडत राहतो. स्वयंपाकघराचं पदार्थाशी घट्ट  नातं असतं. कितीतरी ‘गंध’ त्या पदार्थाच्या निर्मितीचे जाहिरातदार असतात.

घर म्हटलं की ‘भात भाजी आमटी पोळी’ ही चौकडी असली तरी अंबाडीचा आंबट, मेथीचा कडवट फ्लॉवर कोबीचा विशिष्ट गंध, पोळी भाकरीचा खरपूस गंध आपली ओळख जपत असतात. सण असला तर पर्वणीच असते. आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक बदलत्या

ऋतुमानानुसार सणांचं आणि त्यानिमित्ताने आहाराचं नियोजन केले आहे. साहजिकच रोजच्या मेनूत बदल घडून येतो. चार घास जास्त जातात. आरोग्यम् धनसंपदा लाभावी, हा त्या मागचा निखळ हेतू. या हेतूमुळे ‘भाजी’ हा पानातला महत्त्वाचा, कौतुकाचा घटक. तिच्याशिवाय पानाला शोभाच नाही. तशी ती उजवीच.

मात्र ऋ तुराज वसंताचं आगमन होताच फळांचा राजा आंबा घरात दिमाखात पाऊल टाकतो. जेवणाच्या पानांत अगदी ‘मानाचं पान’ पटकावतो. एरवी, भाजीशिवाय काम अडतं, पण गुठळ्यागुठळ्यांचा दाट केशरी हापूसच्या रसाची वाटी पानांत मधोमध स्थिरावली की उजव्या डाव्या बाजू निष्प्रभ होतात. परंतु काही दिवसांचाच प्रश्न. कोकणच्या राजाचा झिम्मा खेळून झाल्यावर त्याला निरोप दिला की भाजीचे कौतुकाचे दिवस परत येतात.

वर्षां ऋ तूचं आगमन होतं. धरणीवर ‘रंग’हीन सरीवर सरी बरसतात, जादू करतात आणि धरणीच्या पोटातून ‘हिरव्या’ रानभाज्या बाहेर डोकावतात. आवर्जून कौतुकाने त्या घरात आणल्या जातात. पानातल्या ‘हिरव्या’ चैतन्याच्या उपस्थितीची दखल घेताना तोंडाला  पाणी सुटते.

पावसाचा जोर ओसरतो. गणरायाचे पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऋ षिपंचमी येते. बैलांच्या श्रमाविना तेलातूपाशिवाय नुसते मीठ, मिरची, चिंच घालून केलेली ती ‘भाजी’ एखाद्या पक्वान्नासारखा नुसतीच ओरपून खाऊन घरातले तृप्त होतात. अनेकांचा वजनाचा काटा त्या दिवसापुरता थोडा सुखावतो. दमून भागून गौरीच्या रूपात आलेली माहेरवाशीण पानांत ‘पालेभाजी’ आणि भाकरी बघून हरवून जाते. दुसऱ्या दिवशी विविध ‘भाज्या’, कोशिंबिरी, पंचपक्वान्नाचा बेत, त्यातून डोकावणारं माहेरचं वैभव तिला मोहरून टाकतं. कडवेपणाचं वैशिष्टय़ जपत काल्र्याची ‘भाजी’ पितृपंधरवडय़ात आपलं स्थान पानांत अबाधित ठेवते.

नवरात्र, दिवाळी करत कालचक्र पुढे सरकते. हेमंताचा गारवा पांघरत ‘दिवस सुगीचे’ सुरू होतात. उष्णतेचं नियंत्रण करणाऱ्या मकरसंक्रांतीचे घराला वेध लागतात. संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी. संक्रांतीच्या तयारीच्या गडबडीतही घराला भोगीचा विसर पडत नाही. भोगी म्हटलं की घरामध्ये विशिष्ट मेनूकार्ड तयार असतं. किंबहुना घरातला तो ‘गंध’च भोगीची आठवण करून देतो. त्या दिवशी पानामध्ये विराजमान होते ती अनामिक गंधाची मिश्र भाजी. हवेमुळे पोटातला अग्नी उद्दीपित झालेला असतोच. त्यामुळे भोगी स्पेशल भाजीचा गंध मनाला वेड लावतो. ‘या भाजीमध्ये दडलंय काय?’ असा प्रश्न पडला असेल ना! अहो हा तर काळ्या आईने पाठवेलला खास ताजा रंगीत नजराणा. निळी जांभळी बिनबियांची वांगी, दोन्ही बाजूच्या शिरा काढताक्षणी जणून दोन्ही हात बाजूला करत दाणे उडवणारी वालपापडी, आळोखेपिळोखे देत उठलेल्या घेवडय़ाच्या शेंगा, गच्च दाण्यांनी टच्च फुगलेले मटार, गुलाबी थंडी अंगावर ओढून घेत रंगलेली गाजरे, हरभरा ओला हरभरा, बटाटय़ाला ‘टाटा’ करून चालणारच नाही. अशा ज्याच्या त्यांच्या आवडीप्रमाणे भाज्या, मीठ, तिखट, गोडा मसाला, गूळ, खोबरं आणि भुरभुरलेली कोथिंबीरने सजलेली ही भाजी बघताना ‘रूपास भाळलो आम्ही, भुललो तुझ्या स्वादाला’ अशीच म्हणण्याची घरच्यांवर वेळ येते. ही भाजी कौतुकाची असतेच, पण फक्त भाजी म्हणजे भोगी नाही. तर भाजीच्या बरोबर संगनमत करून असते तीळ लावलेली बाजरीची खरपूस भाकरी, ताज्या लोण्याचा गोळा, गरमागरम वाफाळणारी मऊ मोकळी मुगाच्या डाळीची खिचडी आणि त्यावर लोणकढी तूप. थंडीशी सामना करण्यासाठी शरीराची उष्णता कायम ठेवण्याचा फक्कड बेत घरात जमून येतो.

आपला शेतीप्रधान देश, त्यातून गरिबी पाचवीला पुजलेली. अशा वेळी भुईतून वरती आलेल्या पिकाचे कौतुक करण्यासाठी आपापसात आदानप्रदान झाली असावी. ‘माझ्या हरभऱ्याचा नमुना घे, तुझी वांगी दे.’ हा एकत्र झालेला शिधा एकत्रच शिजवला गेला असावा आणि त्यातूनच भोगीच्या स्वादिष्ट भाजीची निर्मिती झाली असावी; असे वाटत राहते. बदलत्या काळाबरोबर पंचतारांकित शेफच्या कल्पक ‘टच’ने वेगवेगळ्या रंगरूपात, आकर्षक नावाने तिचे बारसे होत असले तरी ‘भोगी डे’ शी तिची जुळलेली नाळ तुटलेली नाही.

त्या त्या दिवशी तो तो पदार्थ आवर्जून घरी करायचाच ही परंपरा चालू राहावी, भोगीचे घरगुती मेनू कार्ड विस्मृतीच्या खाईत न जाता उमलत्या पिढीच्या हातात पडावे, हीच तर घराची धडपड.

First Published on January 12, 2019 1:40 am

Web Title: suchitra sathe vasturang article