25 February 2021

News Flash

माझ्या स्वप्नातलं घर!

माझे सुरुवातीपासूनचे सीन ज्या खोलीत चित्रित झाले आहेत ती या घरातील माझी सर्वात आवडती जागा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

गिरिजा प्रभू

जेव्हा मी पहिल्यांदा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेच्या सेटवर- ‘नंदनवन’ या घरात प्रवेश केला, त्याच क्षणी मला सकारात्मक ऊर्जा जाणवली.  शिर्केपाटील म्हणजे कोल्हापुरातलं श्रीमंत कुटुंब. त्यामुळे मालिकेचा सेटही देखणा आणि भव्यदिव्य. ‘नंदनवन’ हे त्यांच्या श्रीमंतीला साजेसं असं घर; पण सेटवरचं हे घर माझ्यासाठी माझं दुसरं घरच असल्यासारखं आहे.

मालिकेतील या घरात प्रवेश करताच तुम्हाला ‘नंदनवन’ हे नाव घरातील स्वरूपाविषयी, तिथल्या माणसांविषयी, तिथल्या ज्येष्ठ माणसांनी जोडलेल्या माणुसकीच्या धाग्याविषयी खूप काही सांगून जातं.

मुंबईतल्या चित्रनगरीत आमचा हा आलिशान सेट आहे. या घराभोवतालची झाडी, झाडांभोवतालचे पार, अंगण..  असं आमचं हे घर खऱ्या अर्थाने नंदनवनच आहे. माझ्या स्वत:च्या घरी प्रवेश करताना माझ्या मनात जी भावना असते, तशीच सेटवरच्या या घरी येतानाही असते. मन आनंदून जातं. मला स्वत:ला घराच्या आजूबाजूला असलेली झाडी, हिरवळ खूप आवडते. या निसर्ग सहवासामुळे आजूबाजूची हवाही खेळती राहते आणि मनालाही प्रसन्न ठेवते. आमच्या या घराभोवतालचं वातावरणही तसंच आहे.

माझे सुरुवातीपासूनचे सीन ज्या खोलीत चित्रित झाले आहेत ती या घरातील माझी सर्वात आवडती जागा आहे. या घरातील अन्य खोल्यांच्या तुलनेत ही खोली छोटी आहे. त्या खोलीत शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच्या आठवणी आहेत. त्यामुळे सेटवरची ही खोली म्हणजे माझी परमप्रिय जागा आहे. या घराच्या प्रत्येक कोपऱ्यातल्या आठवणी आहेत. स्वयंपाकघर, भव्यदिव्य हॉल, देवघर, प्रत्येकाच्या खोल्या.. माझ्या लेखी या प्रत्येक जागेला एक वेगळं महत्त्व आहे. या प्रत्येक ठिकाणी माझे सीन चित्रित झाल्यामुळे मी या घरातील या प्रत्येक जागेशी काहीना काही कारणांमुळे एकरूप झाले आहे.

खरं तर माझ्यासाठी हा सेट नाहीच; हे माझं दुसरं घरच आहे. सेटची बांधणी करताना खूप छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे. देवघर, तुळशी वृंदावन, झोपाळा.. या सर्वच गोष्टी घराला खऱ्या अर्थाने घरपण देतात. आम्ही सगळेच कलाकार इथे आपल्या घराप्रमाणेच वावरतो. त्यामुळे या सेटरूपी वास्तूला माझ्या आयुष्यात खूप मोलाचं स्थान आहे.

प्रत्यक्षातही मला ‘नंदनवन’सारखं घर आवडतं. खऱ्या आयुष्यातही माझं स्वत:चं असं घर असेल तर ते मला आवडेल. गंमत म्हणजे, या मालिकेतील घर आणि माझं स्वप्नातलं घर अगदी मिळतंजुळतं आहे. घराबाहेर हिरवळ आणि मोकळं आभाळ असावं, हीच माझी इच्छा आहे आणि तिथेही मी या घराप्रमाणे माझ्या घराच्या आवारातही खूप झाडं लावेन. साधेपणातच सौंदर्य दडलेलं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या मालिकेतील हे घर. या घराची सजावट साधी, पण आकर्षक अशी आहे. या घरातील साधेपणा इथल्या ज्येष्ठ मंडळींचं व्यक्तिमत्त्व सांगून जातं. माझं घरही मला अशाच पद्धतीने सजवायला आवडेल.

या सेटवरचं अर्थात घरातलं वातावरण खूपच छान असतं. वर्षां उसगावकर आणि माझे अन्य सहकलाकार मला खूपच सहकार्य करतात. माझी प्रमुख भूमिका असलेली ही पहिली मालिका. मात्र पहिल्या दिवसापासून माझं नवखेपण कोणीच जाणवू दिलं नाही. खेळीमेळीच्या वातावरणात आमचं शूटिंग सुरू असतं. दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि सहकलाकार उत्तम सहकार्य लाभल्यामुळेच सीन करतानाही खूप मज्जा येते. या मालिकेतील कलाकारांचं ऑफस्क्रीन नातं खेळीमेळीचं असंच आहे. त्याचंच प्रतिबिंब मालिकेत उमटतं. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेच्या निमित्ताने मला दुसरं कुटुंब मिळालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 10:16 am

Web Title: sukh mhanje kay asta my dream home girija prabhu abn 97
Next Stories
1 नंदनवन जिव्हाळ्याचं ठिकाण
2 स्थावर मालमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान- विपणन आणि विक्री व्यवस्था
3 स्थावर मालमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान- विपणन आणि विक्री व्यवस्था
Just Now!
X