सामूहिक गृहनिर्मितीचे जितके प्रकार मुंबईत आहेत तितके इतर कोणत्याही नगरात नाहीत. त्यापैकी पहिला आणि शेवटचा स्वदेशी रचनेचा प्रकार म्हणजे चाळ. त्यानंतर ज्या काही वास्तू बांधल्या गेल्या त्यावर पाश्चात्त्य शैलीचा प्रभाव आहे. कारण त्यांच्या निर्मितीच्या आसपास मुंबईत स्कूल ऑफ आर्किटेक्चर स्थापन झाले आणि त्यातून उत्तीर्ण होऊन भारतीयांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास पंधरा-वीस वर्षे उलटली. त्या स्कूलमधील पाठय़पुस्तकं आणि समग्र शिक्षण इंग्रजी होतं. त्यानंतर सगळ्याच वास्तुनिर्मितीवर पाश्चात्त्य ठसा उमटणं स्वाभाविक होतं. तो ठसा अजूनही कोणाला थांबवता आलेला नाही.
चाळींचे किती प्रकार असावेत. दगडी चाळी, विटांच्या चाळी, लाकडांच्या चाळी, सिमेंट-काँक्रीटच्या चाळी. काहींना एका बाजूला गॅलरी आणि खोल्या. तर काहींना दोन्ही बाजूला गॅलऱ्या आणि मध्ये खोल्या. ज्यांना दोन्ही बाजूला गॅलऱ्या आहेत त्या फारच सोयीस्कर आहेत. दोन्ही बाजूंना गॅलऱ्या करण्याची पद्धत फारच कल्पक होती. काहींना एक-दोन चौक आणि चहूबाजूंनी खोल्या. इंग्रजी ‘सी’च्या आकारापासून आय. एच. ओ. असे अनेक आकार. तर काहींना मध्ये गॅलरी आणि दोन्ही बाजूला खोल्या आहेत.
अनेक चाळी आजच्या अपार्टमेंटपेक्षा दिसायला चांगल्या आहेत. दोन्ही बाजूस उतरतं छप्पर. सलग गॅलऱ्यांमुळे त्यांना प्राप्त झालेलं लयबद्ध दृश्यचित्र मोहक आहे. त्या ज्या दिवशी बांधल्या गेल्या त्या दिवशीचं त्यांचं कोरेकरकरीतपण नजरेसमोर आणलं की त्याची प्रचीती येऊ शकेल. रीगल, न्यू एम्पायर सिनेमा किंवा मरीन ड्राइव्हवर ज्या शैलीत इमारती बांधल्या त्यांना ‘आर्ट डेको’ हे नाव आहे. मुंबईत त्या धाटणीच्या पुष्कळ इमारती आहेत. युरोपात जन्माला आलेली ती शैली अमेरिकेतून मुंबईत आली. आज मरीन ड्राइव्हला सारख्या उंचीचे ‘आर्ट डेको’ शैलीचे ठोकळे उभे आहेत. त्यांच्या जागी मेट्रोसमोरच्या ‘जेर महाला’सारख्या इमारती असत्या तर क्वीन्स नेकलेस आजच्याहून सुंदर दिसला असता.
चाळींच्या प्रमुख दोन शैली होत्या. मराठी आणि गुजराती. तिसरी ‘आर्ट डेको’ ही शैली आयात केली गेली. अनेक कल्पक आणि सामूहिक जीवनाला पोषक अशा रचना चाळींमध्ये दिसतात. अंगणांची मोकळी जागा आणि इमारतींची उंची यांचे प्रमाण घनाकार आणि अंगणाचं नातं कसं होतं ते आजही पाहायला मिळतं.
ग्रँट रोड स्टेशन ओलांडणाऱ्या दगडी पुलाच्या पायथ्याशी पूर्वेकडे १९११ साली बांधलेली पन्नालाल टेरेस नावाची चाळ आहे. हिच्यात दगडाचाही वापर केलेला आहे. जुन्या काळासारखे छपराच्या कठडय़ावर चबुतरे केलेले आहेत. कोरीव कामही चांगल्या प्रतीचं आहे. चाळींच्या आत जायला मोठा दिंडी दरवाजा आहे. आत गेल्यावर विशाल अंगण असून मध्ये उभं राहिल्यास सुंदर दृश्य दिसतं.  ज्या पन्नालाल जव्हेरीनं ही चाळ बांधली तो निझामाचा जव्हेरी होता. अफाट संपत्ती होती त्याच्याकडे. काहींचा कार्पेट एरिया २४० तर काहींचा ६०० चौरस फूट आहे. मालकाच्या वंशजाकडे तो माणूस महिना चारशे रुपये भाडं देतो. सरकारी यादीत ही चाळ आहे. पण नंतर काय होणार ते नक्की माहीत नाही, असं तो म्हणाला. तिच्या आजूबाजूला अनेक सिनेमागृहं, शाळा व दैनंदिन गरजेच्या सगळ्या सोयी आहेत.
मराठी धाटणीची एक चाळ किंग्जसर्कल स्टेशनामागे आहे. गिरगाव व लालबागेत त्या शैलीच्या अनेक चाळी आहेत. मराठी चाळींना दिंडी दरवाजा नसतो. १९१९ साली बांधलेला तो चाळसमूह उल्लेखनीय वाटतो. त्या चाळींच्या निर्मात्यांनी सामूहिक गरजांचा धोरणी विचार केला होता. जेव्हा चाळीतल्या जागा मालकी हक्कानं दिल्या तेव्हा एक सोडून एक गाळा सहकारी संस्थेच्या ताब्यात ठेवला होता. कोणाकडे लग्न प्रसंग किंवा सण साजरा करायचा झाला तर ती रिकामी जागा भाडय़ाने मिळत असे. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांची राहण्याची सोय होत असे. लग्नाची एकूण एक कामं घरातल्या स्त्रिया करत. त्याकाळात लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रथा नव्हती. महिना पंधरा दिवस आधीपासून सगळी तयारी चालत असे. आत्या, माम्या, काकू सगळ्या जमत. ज्याच्या घरचं लग्न असे त्याला सर्व नातेवाईक येऊन मदत करत.
एका ज्येष्ठ नागरिकानं ही गोष्ट मला सांगितली तेव्हा दूरदर्शी आयोजनाचं कौतुक वाटलं. पुढे वस्तीवाढीच्या रेटय़ाला नमून त्या रिकाम्या जागा अन्य लोकांना देण्यात आल्या. त्या काळात गावाकडच्या लोकांना हॉटेलात राहायची माहिती नव्हती. त्यांची त्याकाळी निर्मिलेली सोय शंभर वर्षांनी गृहनिर्मितीच्या क्षेत्रात इतकी प्रगती होऊनही कुठेच पाहायला मिळत नाही. अंगणातल्या कार्य मंडपात उजवले जाई. लहान मुलाचा वाढदिवस साजरा करायचा झाला तर हल्ली हॉटेलाचा आधार घ्यावा लागतो. त्या काळातली सामूहिक गृहरचना आणि त्यातून निर्माण होणारं वैविध्य आज दुर्मीळ झालंय.
आर्ट डेको शैलीतली चाळ सविस्तर पाहण्याचा योग मित्रामुळे आला. तो म्हणाला, ‘‘मुंबईचा अभ्यास करायचा झाला तर मस्जिद, भेंडीबाजार, पायधुणी या भागांत पायी फिरण्याला पर्याय नाही. माझं बालपण जिथे गेलं ती चाळ पाहून ये.’’ त्यानं पत्ता दिला. मस्जिद रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे उतरल्यावर नरसी नाथा स्ट्रीट आहे. तिथल्या भात बाजारात जैन मंदिराजवळ शोधत गेलो. तो म्हणाला ती चाळ मिळाली. जवळजवळ दीडशे फूट लांब आणि तितकीच रुंद चाळ आहे. दर्शनी भाग मरीन ड्राइव्हवरच्या इमारतींसारखा दिसतो. गेटमधून आत शिरल्यावर बारा फूट रुंदीचा कॉरिडॉर आहे. उजव्या बाजूला लिफ्ट आणि दोन्ही बाजूंना जिने आहेत. लिफ्टनं वर गेलो. मित्राच्या नातेवाईकाला भेटलो. त्यांच्याकडे दोन खोल्या आहेत. समोर रुंद गॅलरी आणि मोठा चौक आहे.
प्रत्येक मजल्यावर सहा कोपऱ्यात सहा संडास आहेत. घरात मोरी आहे. सगळा संसार दोन खोल्यांत. ज्यांच्याकडे गेलो ते म्हणाले, ‘‘आमच्या दोन पिढय़ा येथे गेल्या. माझी तिसरी पिढी. आम्हाला इथल्या सोयीच्या जीवनाची इतकी सवय झाली आहे की येथून कुठे जावंसं वाटत नाही. उपनगरात जायचं म्हटलं तर आयुष्याची कमाई अपुरी पडेल अशा फ्लॅटच्या किमती आहेत. मात्र मुलांना खेळायला जागा नाही. पण त्याची आता सवय झाली आहे. इथली जागा विकता येते. पण मिळालेल्या पागडीतले ठरावीक पैसे ज्या ट्रस्टची चाळ आहे त्यांना द्यावी लागते आणि येणारं गिऱ्हाईक हे आमच्या जातीचंच असावं लागतं. खालच्या मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये अंधार असतो. तसा पहिल्या मजल्यावरही. पण वरच्या मजल्यावर उजेडाचं प्रमाण जास्त आहे. त्या इमारतीला नव्वद र्वष झाली असावीत. चाळीचा दरवाजा बंद केला की, कोणालाही आत शिरता येत नाही.
एल्फिन्स्टन रोडचा पूल पश्चिमेकडे उतरल्यावर उजव्या हाताला असलेली ‘सूरज बिल्डिंग सुंदर आहे. तिचं दर्शनी चित्र शिल्पासारखं प्रमाणबद्ध आणि नादमय आहे. तिला दोन्ही बाजूला गॅलरी आहे. तळमजल्यावर मागे अंगण आहे. स्टेशन जवळ असल्यानं सोयीस्कर आहे.
तशीच एक तीनशे फूट लांबीची दोन गॅलऱ्यांची तीन मजली ‘इराणी चाळ’ मुख्य रस्त्याला लागून आहे. चाळीच्या मालकाचा जन्म इराणमधला. त्यानं ती बांधली. तळमजला धरून तीन मजली आहे. वरती मंगलोरी कौलाचं दोन्ही बाजूला उतरतं छप्पर आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकाशी बोललो त्याच्या आजोबांच्या नावावर जागा आहे. मुलं दूर गेली आहेत. सध्या तो आणि त्याची पत्नी असे दोघंच तिथे राहतात. आहे ती जागा सोडण्यात काही अर्थ नाही असं त्यानं सांगितलं.
चाळीत जिथे जिना आहे त्याच्या पहिल्या मजल्यावर मोकळी जागा आहे. तिथे मुलं कॅरम वगैरे खेळू शकतात. हिला मात्र आजूबाजूला मोकळी जागा मिळत नाही ही अडचण आहे. इथली जागा सोडून जायचं तर वीस लाख रुपये मिळतात. पण त्यातले अर्धे चाळ मालकाला द्यावे लागतात. पण फारसं कोणी चाळ सोडून जात नाहीत. कारण अशी मोक्याची जागा इतक्या कमी भाडय़ात मुंबईत मिळणं अशक्य आहे. अगदी तशीच गोष्ट लालबागेतल्या चाळीत राहणाऱ्यानं सांगितली. त्याचे वडील बॉम्बे गॅस कंपनीत कामाला होते. त्यांच्या नावावर जागा आहे. तेही नवराबायको दोघंच राहतात.
नंतरच्या काळात एकेका प्लॉटमध्ये चार मजली ब्लॉक बांधले गेले. इमारतींच्या चहूबाजूंना दहा फूट मार्जिन सोडलं होतं. त्यापैकी कोणत्याही इमारतीत मुलांना खेळायला जागा उरली नाही. त्यामुळे आज समूहजीवनाला मुकावं लागतं. त्यांना जास्त काळ संकुचित स्पेसशी सामना करावा लागतो आहे.
एकेकाळी एका जातीची माणसं एका ठिकाणी राहू इच्छित. त्यामुळे मुंबईत बऱ्याच जातवार वस्त्या आहेत. उदाहरणार्थ सारस्वतांची तालमक्की वाडी. कुलाब्याची पारशांची खुशरो बाग, भेंडीबाजार, भुलेश्वर, मस्जिद बंदरला कच्छी, शाकाहारी आणि मांसाहारी लोकांच्या वस्त्या वेगळ्या पडत. त्यात कोणाशी कोणाबरोबर भांडण नसे. पण तसं ते सहज घडत होतं. मुंबईत गरीब-श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोक वर्षांनुवर्षे सुखानं नांदले आहेत.
जेव्हा आर्किटेक्चर या विषयाचे भारतीय विद्यार्थी अमेरिकेत किंवा इतर देशांत शिकायला जातात तेव्हा ते भारतातील प्रश्नांसंबंधी संशोधनपर निबंध लिहितात. मार्गदर्शक अर्थात तिकडचे प्राध्यापक असतात. असे शोधनिबंध मुंबईच्या चाळी. गुजरातमधले पोळ. सिद्धपूरची ‘घरं’ यासंबंधी असतात. परदेशातला विषय अभ्यासाला घेण्यापेक्षा भारतीय विषयासंबंधी परदेशी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन करणं उद्बोधक ठरू शकतं. विद्यार्थी तिऱ्हाईताच्या दृष्टिकोनातून परिचित विषयाकडे पाहू शकतो. हा प्रमुख फायदा असतो. कारण ज्या वास्तू प्रकारात जवळजवळ सव्वाशे र्वष लोक आनंदानं जगले. त्यांनी आपली सुखदु:ख एकमेकांना वाटली. दुसऱ्यांच्या पाठीशी अडीअडचणींना उभे राहिले याचं जेव्हा अवकाशीय पृथक्करण केलं जातं. तेव्हा आपल्याच गोष्टीबाबत नव्या गोष्टी डोळ्यासमोर येण्याचा आनंद असतो. पण त्यातून परीक्षा उत्तीर्ण होणं या पलीकडे काही निष्पन्न होत नाही. कारण आपण सगळे परदेशी कल्पनांना कवटाळू लागलो आहोत. स्वतंत्र जगण्याचा अतिरेक होतो आहे.
चाळींचे सामायिक शौचालय, गॅलरीतून जाताना प्रत्येक खिडकीतून डोकावत जाणारी माणसं वगैरे गोष्टींना कंटाळून स्वेच्छेने चाळ सोडणारे बरेच झाले. कितीतरी चाळीतले गाळे व्यापारासाठी, शिकवण्यांच्या वर्गासाठी किंवा गोडाऊन करण्यासाठी वापरले जात आहेत.
शिवाय गुजरातेत काही शहरात आणखी एक प्रकार आहे. तिथे दरवाजातून आत शिरलं की त्याच दरवाजातून बाहेर यावे लागे. यामुळे त्या गृहसंकुलांना संरक्षित प्रवेश असे. तोही एक गेटेड कम्युनिटीचा प्रकार होता. पूर्वीच्या काळी चोराचिलटांची फार भीती असे. तेव्हा सगळ्यांनी मिळून आलेल्या प्रसंगाचा सामना करता येत असे. एकटय़ा-दुकटय़ा स्त्रिया, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक सुरक्षित असत. सामूहिक सुरक्षा ही महत्त्वाची बाब होती. तशी आजही आहे. गुजरातेतली ती पद्धत स्थलांतर केलेल्या गुजराती समाजानं मुंबईत आणली.
कुटुंबाचं खासगीपण जपलं जाईल व इच्छा झाल्यास सहजपणे शेजाऱ्यांशी शिळोप्याच्या गप्पाही मारायला मजल्या मजल्यावर स्वतंत्र जागा असेल अशा रचनेची अपेक्षा आहे. आजचं एकांगी आणि कोषातलं जीवन बरं वाटत असलं तरी त्या जगण्याला पूर्णत्व येत नाही. काही दशकांनंतर चाळी असतीलच याची खात्री देता येत नाही. पण त्यांच्यातले सद्गुण नव्या रचनेत जपले गेले तर उद्याचं जीवन सुखाचं होईल.