रोहित पोदार

भारतात शहरीकरणाची प्रक्रिया झपाटय़ाने वेग घेत आहे. त्यामुळे गाव आणि शहरातील अंतर वेगाने कमी होत आहे. परिणामी, शेती करण्याकडे लोकांचा कल कमी होत असून, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी विशेष आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन कमी अन् खाणारी तोंडं जास्त असं काहीसं चित्र भविष्यात दिसल्यास त्याविषयी आश्चर्य वाटायला नको. संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन आतापासूनच या संदर्भात योग्य आणि आवश्यक त्या पर्यायांचा अवलंब केल्यास भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. यासाठी रूफटॉप फार्मिग म्हणजेच गच्चीवरील शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

या संकल्पनेचा विचार केल्यास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर या संकल्पनेचा सहज केलेला अवलंब. जगभरातील बहुसंख्य शहरांमध्ये गच्चीवरील शेतीचा नुसताच अवलंब केला गेला नाही, तर तिचा झपाटय़ाने विकासदेखील होत आहे. अन्नधान्य निर्मितीसाठी निव्वळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता इतर कोणकोणत्या मार्गाने ही गरज पूर्ण होऊ शकते, याचा विचार प्रामुख्याने या गच्चीवरील शेती संकल्पनेत केला गेला आहे. शिवाय, या संकल्पनेमध्ये असलेल्या हायड्रोलॉजिकल पद्धतीमुळे इमारतीचे तापमान तर नियंत्रणात राहतेच, पण त्याचे इतरही अनेक फायदे इमारतीला मिळतात. व्यावसायिक आणि निवासी संकुलांमध्ये गच्चीवरील शेती शेतीचे तंत्रज्ञान बसविण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यापैकी, हायड्रोफॅनिक्स, अ‍ॅरोपॉनिक्स आणि कंटेनर गार्डिनग या काही लोकप्रिय पद्धती आहेत.

पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनत चालली आहे. गच्चीवरील शेती शेतीत कमी जागेत मोठय़ा प्रमाणात पीक घेता येते. परिणामी, हरित पर्यावरणाचे रक्षण तर होतेच; शिवाय त्याचा समतोलही साधला जातो. हा समतोल कसा? एखाद्या व्यावसायिक अथवा निवासी संकुलावर हे तंत्रज्ञान बसविल्यास, इमारतीच्या प्रगतीस बाधक ठरणाऱ्या बाह्य़ नकारात्मक गोष्टींना आळा बसतो. शिवाय, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक असे कैक फायदे त्या इमारतीस मिळतात. जसे, वादळी पावसामध्ये ग्रीन रूफ पद्धतीमध्ये साठ ते शंभर टक्क्यांपर्यंत पाणी राखून धरण्याची क्षमता असते. याव्यतिरिक्त सर्वसामान्य छपरांच्या तुलनेत हे ग्रीन रूफ अधिक काळापर्यंत टिकते. तसेच अल्ट्राव्हायोलेट किरणांपासूनदेखील ते इमारतीचे रक्षण करते. शिवाय, वातावरणात असे काही हानीकारक घटक असतात, जे पावसाळ्यात इमारत गळतीसाठी कारणीभूत ठरतात. अशा घटकांना रोखण्याचे कामदेखील या ग्रीन रूफमुळे सहजसाध्य होते. विविध स्वरूपाच्या भाजीपाला लागवडीमुळे उन्हाळ्यात छप्परावर थंडावा राखण्यास मदत होते. तर इतर स्वरूपाच्या झाडांमुळे सावली निर्माण झाल्यामुळे कडक उन्हाळ्यातदेखील उष्णतेपासून रक्षण होते.

एखाद्या व्यावसायिक किंवा निवासी जागेत हे तंत्रज्ञान बसविल्यानंतर, वर्षांतून दोनदा त्याची तपासणी करणे आवश्यक ठरते. तसं पाहिलं तर यात विशेष असं काहीच नाही. कारण अगदी पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्थेमध्येदेखील नियमितपणे छतांची तपासणी ही केलीच जाते. या तंत्रज्ञानामधील झाडांची तपासणी करताना त्यांना एखाद्या बुरशीजन्य रोगाची किंवा किडीची लागण झालेली नाही ना, हे प्रामुख्याने पाहावे लागते. त्याचबरोबर झाडांना वाढीसाठी पुरेशी जागा आहे की नाही, मातीचे थर योग्य पातळीत आहेत की नाही, हे तपासणेदेखील आवश्यक ठरते. याच जोडीने पाण्याची सिंचन व्यवस्था आणि पाणी वाहून नेणारी व्यवस्था योग्य त्या रीतीने कार्यरत आहे का हेदेखील पाहावे. कारण या व्यवस्थेस बिघाड निर्माण झाल्यास मातीचे थर खराब होऊन झाडेदेखील खराब होण्याची शक्यता असते. तेव्हा काळाची गरज लक्षात घेऊन, आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतल्यास तापमान बदलाच्या दुष्परिणामापासून आपण पर्यावरणाला वाचवू शकू. परंतु ही  एका-दुकटय़ाने करावयाची गोष्ट नसून, त्यात सर्वाचा सक्रिय सहभाग तितिकाच आवश्यक आहे आणि म्हणूनच गच्चीवरील शेती यांसारख्या संकल्पनेचा प्रचार व प्रसार मोठय़ा प्रमाणावर होणे गरजेचे आहे.

रूफटॉप ही संकल्पना आज भारतात नवीन असली तरीही हरित छत आणि रूफटॉप शेती यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर आता बरेचजण करताना दिसत आहेत. पर्यावरण सजग आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणारा असा जो शहरी वर्ग आहे, त्याला भविष्यातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे या स्वरूपाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना तो प्राधान्य देत आहे. कामानिमित्त अथवा इतर अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक शहरांकडे वळू लागली आहेत. अशा वेळी उत्तम आणि सकस अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी गच्चीवरील शेती हा योग्य आणि उत्तम पर्याय ठरू शकतो. शिवाय, त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार धान्य अथवा भाजीपाला- फळे यांचे उत्पादन सहजपणे या माध्यमातून घेता येते. त्यामुळे स्थानिक लोकांची रसायनविरहित अन्नधान्याची आणि ताज्या फळे, भाज्या यांची गरजदेखील यानिमित्ताने पूर्ण होते. दिवसेंदिवस शेतजमिनी पिकविण्याकडे लोकांचा कल कमी होत आहे, अशा वेळी गच्चीवरील शेती हा शहरी भागासाठी निश्चितच चांगला पर्याय होऊ शकतो. यामुळे पर्यावरणाची निगा तर राखली जाईल. त्याचबरोबर प्रदूषणविरहित, शुद्ध अशा मोकळ्या हवेत अन् तेही घराजवळच वावरण्याची संधीदेखील यानिमित्ताने लाभेल.

शब्दांकन-  सुचित्रा प्रभुणे