पाण्याला जीवन असे म्हटले जाते. म्हणजे पाणी जीवनासाठी आवश्यक असते, हा त्याचा एक अर्थ झाला. पिण्यासाठी आपल्याला पाणी लागते. शरीरशुद्धीसाठी, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी म्हणजेच अनेक नित्योपयोगी गोष्टींसाठी पाणी लागते. औद्योगिक क्षेत्रात पाण्याची आवश्यकता असते. ऊर्जानिर्मितीसाठी, मग ती जलऊर्जा असो किंवा औष्णिक वा अणुऊर्जा, त्यासाठी पाणी हेच माध्यम असते. शेती क्षेत्रात तर पाण्याची गरज फार मोठी असते. पाण्याची आवश्यकता अशी सर्वच क्षेत्रांत जाणवत असताना त्या पाण्याविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. तरीदेखील पाण्याविषयी शास्त्रीय माहिती समाजात अभावानेच आढळते. कोलंबसने जहाजावर अनेक दिवस सतत प्रवास करीत असताना म्हटले होते की, ‘‘सगळीकडे पाणीच पाणी आहे, पण पिण्यासाठी मात्र एकही थेंब नाही!’’  पाच महासागरांमध्ये व अनेक सागरांमध्ये जे खारे पाणी आहे त्याने पृथ्वीवरील एकूण ७२ टक्के भूभाग व्यापलेला आहे. एकूण पाण्याच्या साठय़ांपकी ९६.५% खारे पाणी असून, फक्त १.५ ते १.७५ टक्के पाणी गोडे आहे. उरलेले पाणी आíक्टक व अंटाíक्टक महासागरातील बर्फामध्ये बंदिस्त असून निसर्गात जलचक्र सतत सुरू असते.
जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतशी पाण्याची गरजदेखील वाढत आहे व त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या या जलचक्रावर परिणाम होत आहे. जगातील सांडपाण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र भूजलाची पातळी खाली जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे व त्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतुकीच्या सुविधा  पुरविण्यासाठी जे रस्ते बांधले जात आहेत, त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण विलक्षण वेगाने कमी होत आहे. परिणामी जो पाऊस पडतो त्याचे पाणी वाहून जाते व त्याचा उपयोग आपल्याला करता येत नाही. पदार्थाच्या अविनाशित्वाचा नियम जरी पाण्यालाही लागू असला तरी उपलब्ध असलेले गोडे पाणी कमी होत चालले आहे व पाण्याच्या चक्रात अडथळे येऊन ते आता लडखडत चालत आहे. हा प्रकार असाच चालत राहिला तर पुढचे महायुद्ध पाण्यावरून लढले जाईल, यात शंकाच नाही. आपल्या देशात राज्याराज्यांमध्ये पाण्यावरून भांडणे होत आहेतच व त्यांची तीव्रतादेखील वाढत चालली आहे.
पंधरा-वीस वर्षांपूर्वी जर आपल्या देशात कोणी भाकीत केले असते की, येथे पाण्याच्या बाटल्या विकल्या जातील, तर त्याला विनाचौकशी येरवडय़ाला धाडले असते. पण आता परिस्थिती मात्र झपाटय़ाने बदलली आहे. तांब्याच्या भांडय़ात ठेवलेले पाणी जिवाणुमुक्त राहते हे विसरून आपण आता अधिकाधिक महाग व ऊर्जेवर अवलंबून असलेल्या  पाणी शुद्धीकरण पद्धती वापरू लागलो आहोत. शेवग्याच्या बिया वाळवून त्याची भुकटी केली व स्वच्छ फडक्यात बांधून जर नळाला अडकवली तरी आपल्याला जिवाणुमुक्त पाणी मिळू शकते. शिवाय असली गाळणी महिना महिना चालू शकते. सौरऊर्जेवर पाणी गरम करून त्यावर आधारित पाणी शुद्धीकरणाची उपकरणे आता काळाची गरज झाली आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन हा आपल्यासाठी खरं तर अगदी जिव्हाळ्याचा विषय असायला हवा. पण शहरांमधून पिण्याचे काल भरून ठेवलेले पाणी बिनदिक्कतपणे ओतून दिले जाते. प्रत्येक घरात आता शौचालयात पाण्याच्या १० ते १५ लिटरच्या टाक्या बसविलेल्या असतात व दर दिवशी व दर माणशी किमान ४-५ वेळा खटका ओढून त्या मोकळ्या केल्या जातात. इतके पाणी दर वेळी वापरणे आवश्यकही नसते. शिवाय हे वापरले जाणारे पाणी पिण्याच्या गुणवत्तेचे असते! म्हणूनच यावर सर्वसामान्यांच्या घरातूनही नियंत्रण असणे आवश्यक झाले आहे. अशा टाक्यांचे आकारमान कमी ठेवणे हा साधा उपायसुद्धा मदतीला येईल. यासाठी अशा टाक्यांमध्ये एक लिटरच्या दोन किंवा तीन पाण्याच्या बाटल्या बुडवून ठेवल्या तर दर वेळी दोन ते तीन लिटर पाण्याची बचत सहजपणे होऊ शकते. भांडय़ातील तळाशी गेलेले पाणी वर आणण्यासाठी कावळ्याने त्यात जे दगड टाकले होते ती गोष्ट आठवा! स्वयंपाकघरातील व अंघोळीचे वापरलेले पाणी शौचालयाच्या टाकीत कसे वापरले जाईल, या दृष्टीने प्रयत्न व्हावयास हवे आहेत. महाविद्यालयातील विशेषत: विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या प्रकल्पांची मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांच्या उन्हाळी कार्यक्रमात केला पाहिजे. सागरी पाण्याचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करण्याच्या योजना आता प्रत्यक्षात राबविण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. भारतासारख्या देशाला एवढा मोठा सागरी किनारा असल्यामुळे हे सहज शक्य आहे. त्यासाठी मानसिकतेत मात्र बदल होणे गरजेचे आहे.
आज आपल्या देशात जवळजवळ प्रत्येक शहरात पिण्याचे व अनेक ठिकाणी वापरण्याचे पाणी नळाने पुरविले जात आहे. अनेक ठिकाणी हे पाणी पुरत नाही म्हणून नलिकाकूप विहिरी किंवा काही ठिकाणी अजून शाबूत असलेल्या जुन्या विहिरींचे पाणी वापरले जाते. या विहिरींचा उपसाही कधी होत असेल का? शंका येण्यासारखी परिस्थिती असते. कित्येक विहिरी बुजविल्या गेल्या आहेत, तर गणपती विसर्जन, निर्माल्य विसर्जन यांसारख्या प्रथांमुळे व सातत्याने दुर्लक्षित राहिल्यामुळे कित्येक विहिरी वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. अनेक शहरांमधून पाण्याचा इतका तुटवडा जाणवतो की, तेथे पाणी मोठमोठय़ा जलटाक्यांमधून पुरवावे लागते. हे पाणी लांब लांबच्या ठिकाणी आणावे लागते व त्यामुळे त्याच्यासाठी भरपूर पसेही मोजावे लागतात. आजकाल शहरात व खेडय़ांमधून देखील प्रत्येक इमारतीच्या व घरांच्या गच्चीवर पाण्याच्या टाक्या असतात. या टाक्यांपर्यंत जाण्याचा मार्ग अनेक ठिकाणी मुक्त असतो. कुणीही माणूस या टाक्यांपर्यंत सहज पोहोचू शकतो. तसा तो पोहोचायला खरे तर अजिबात हरकत नसावी! पण जग आता भल्याचे राहिले नाही, असे जे जाणवते आणि चांगल्यापेक्षा वाईटाचीच शंका अधिक येते; त्यामुळे या टाक्या सुरक्षित ठेवणे ही गरज निर्माण झाली आहे. अनेक शतकांपूर्वी आर्य चाणक्यांनी जे सांगितले होते की, पाण्याचे साठे अगदी सुरक्षित असले पाहिजेत ते आजही तंतोतंत लागू आहे.
पाण्याच्या या टाक्या कधी धुतल्या जातात का, याची कुणी फारशी दाखल घेताना दिसत नाही. गृहनिर्माण सोसायटय़ांमधून खरे तर याविषयी खूप जागरूकता असायला हवी. दर चार ते सहा महिन्यांनी या टाक्या धुतल्या गेल्या पाहिजेत व टाकीच्या पाण्याचे नमुने ठरावीक मुदतीनंतर रासायनिक व सूक्ष्म जैविक तपासणीसाठी पाठविले पाहिजेत. पाण्यामधून विषमज्वर, कावीळ, पटकी, हगवण असे साथीचे रोग पसरत असतात. तसेच टाकीतून पाणी गळत असेल तर त्या भागात सतत ओल राहून त्या ठिकाणी बुरशी व शेवाळे वाढत राहते. ती जागा निसरडी तर होतेच, शिवाय माशा, डास, पिसवा, झुरळे असले कीटकदेखील त्या भागात राज्य करू लागतात. टाक्या धुतल्या गेल्या नाहीत तर टाकीच्या आतल्या भागावर बऱ्याच वेळा क्षारांची पुटे चढू लागतात. आणि क्षारयुक्त पाणी आपल्याला प्यावे लागते. म्हणून पाण्याच्या टाक्या धुण्याचे वार्षकि वेळापत्रक करून ते प्रत्येक संस्थेने पाळले पाहिजे. तशी नोंदवही त्या संस्थेच्या कार्यालयात असली पाहिजे. तसेच पाण्याची गळती होऊ न देणे, टाकीचा नियंत्रक व्हॉल्व कार्यरत आहे की नाही याची वेळोवेळी खात्री करून घेणे हेही अतिशय आवश्यक आहे. पाणी जेव्हा दिवसातून ठरावीक वेळी पुरविले जाते तेव्हा अनेक घरांमधून ते वेगवेगळ्या भांडय़ांमध्ये साठवून ठेवले जाते. नित्यनियमाने दुसऱ्या दिवशी जर आदल्या दिवशीचे पाणी संपले नसेल तर ते ओतून दिले जाते व नव्याने ताजे पाणी भरले जाते. यात पाण्याचा अपव्यय तर होतोच, शिवाय आपण तसे करून देशातील अनेकांना तहानलेले ठेवत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही. जलचक्र नीट चालत राहण्यासाठी आपल्या नित्य वापरात असलेल्या पाण्याची काळजीपूर्वक जपणूक करणे अगदी आवश्यक आहे व ते प्रत्येकाचे कर्तव्यदेखील आहे.
पाण्याच्या रंगाबाबत असे म्हणतात की, ‘‘पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलाये लगे उस जैसा’’. रासायनिकदृष्टय़ा पाहिले तर पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे संयुग आहे. पाण्याच्या एका रेणूत दोन हायड्रोजनचे व एक ऑक्सिजनचा अणू एकमेकांशी रासायनिक बंधांनी घट्ट जोडलेले असतात. पाण्याचा रेणू हा त्रिकोणी असतो असे म्हणावयास हरकत नाही. त्रिमितीमध्ये या त्रिकोणाची कल्पना केली तर पाण्याचे असे अनेक कोटय़वधी रेणू एका लहान आकाराच्या पेल्यात असू शकतात. हे रेणू कितीही जवळजवळ असले तरी त्यांच्यामध्ये थोडी जागा उरतेच. एखादा साखर किंवा मिठासारखा पदार्थ पाण्यात विरघळतो म्हणजे त्याचे रेणू या पाण्याच्या रेणूंमधील मोकळ्या जागेत जाऊन बसतात. पाण्यात अनेक पदार्थ कमी-अधिक प्रमाणात विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात. पाण्याच्या या सर्वसमावेशक गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील तसेच पृथ्वीतलावरील प्रत्येक जिवंत पेशीमध्ये त्याला मानाचे व मोक्याचे स्थान मिळालेले आहे. जीवनावश्यक पोषण द्रव्यांचे वहन पाण्याद्वारे होत असते.
पाण्याचा सामू हा ७ असतो. म्हणजे ते आम्लही नाही आणि अल्कलीदेखील नाही. सामू ही प्रणाली पाणी हे प्रमाण धरूनच निर्मिली गेली आहे हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. शरीरातील रक्ताचा सामूदेखील या पाण्यामुळेच ७.२ ते ७.४ एवढा
राखला जातो. शरीरातील आम्लता वाढली तर त्याचा आपल्याला त्रास भोगावा लागतो. दुधाचा सामू हादेखील ७ च्याच जवळ असतो. निसर्गात प्रत्येक गोष्टीचा समतोल कसा
राखला जातो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये पाण्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, कावेरी, नर्मदा, गोदावरी आणि कृष्णामाई या जीवनसरिता आजही भक्तिभावाने पुजल्या जातात. त्याच देशात गंगा स्वच्छ करण्यासाठी वर्षांनुवष्रे मोहीम राबवावी लागते, हीच मोठी शोकांतिका आहे. इतर सरितांची अवस्था तर गंगेपेक्षाही वाईट आहे. घराच्या चार िभतींत आपण सुरक्षित राहून या सरिता शुद्ध होतील अशी अपेक्षा बाळगणे अगदी चुकीचे आहे! विज्ञानाच्या माध्यमातून आपण ही पूजा अधिक चांगली करू शकतो. त्यासाठी करण्याचे साधे, पण महत्त्वाचे उपाय इथे देत आहे. प्रत्येक वाचक आपल्या अनुभवातून यात अजून चांगले बदल घडवून आणू शकेल याची खात्री आहे.
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र
पाणी बचतीचे उपाय
* घरातील नळांची गळती अजिबात होऊ देऊ नये. थेंब थेंब गळणाऱ्या नळातून दिवसाला ३० ते ४० लिटर पाणी वाया जाते याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्वरित उपाययोजना करून ही गळती थांबवावी.
* शॉवरमुळे पाण्याची बचत होते, पण त्याखाली तासन्तास उभे राहू नका व पाण्याचा अपव्यय टाळा. पाण्याच्या मीटरवर नीट लक्ष ठेवून आपले पाणी वाया जात नाही ना, याची दक्षता घ्या. आपले वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा मुक्तहस्ताने वापर करू नका. पावसाचे पाणी जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यासाठी जरूर वापरा.
* इमारतींच्या गच्चीवर पावसाचे पाणी पडते त्याला वाट करून देऊन ते जमिनीत मुरविले तर पुढचे ६-७ महिने तेच पाणी नलिकाकूप विहिरीतून वापरता येईल. इमारतीची गच्ची ४० मी.  ४० मी. असेल तर मुंबईच्या पावसात चार महिन्यांत ३२ लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येईल!
* दात घासताना किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका. भाज्या किंवा फळे धुताना नळाखाली न धुता जर त्यासाठी परात किंवा भांडय़ाचा वापर केला तर ते पाणी फेकून न देता झाडांसाठी वापरता येईल. इमारतीच्या आवारातील झाडे तेथे वास्तव्य करणाऱ्या सदस्यांनी दत्तक घ्यावीत व त्यासाठी पाण्याचा असा उपयोग करावा. कुकरमधील पाण्याचा वापरदेखील असाच करता येईल. तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी वनस्पतींना पोषक असते म्हणून ते त्यासाठीच वापरा.
* पाण्याच्या बाटल्या अर्धवट पिऊन तशाच टाकून देऊ नका. निसर्गाची ती एक मोठी प्रतारणा आपण करीत आहे व म्हणूच तो अक्षम्य गुन्हा आहे. पाणी संपणार नसेल तर आजूबाजूच्या झाडांना घाला व त्यांचा दुवा मिळवा. कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्र वापरत असाल तर त्याचा वापर पूर्ण क्षमतेनेच करा. आठवडय़ातून दोन-तीन दिवसच त्याचा वापर तारतम्याने केला तर ऊर्जा व पाणी या दोन्हीची चांगली बचत होऊ शकते.
* न्हाणीघरातील व स्वयंपाकघरातील पाणी ऑक्सिडेशन करून बागेसाठी व शौचालयाच्या टाक्यांसाठी वापरता येईल. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध आहे.
* इमारतींच्या आवारात जर बाग वाढविली असेल तर दिवसा त्यावर एका विशिष्ट जातीचे प्लास्टिक अंथरून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. अर्थात त्यासाठी सदस्यांना थोडे कष्ट करावे लागतील अथवा माळ्याला उचलून पसे द्यावे लागतील. आवारातील झाडांना ठिबक पद्धतीने (पाण्याच्या बाटलीला छोटेसे छिद्र पाडून) पाणी दिले तर पाण्याची बचत होईल. झाडाच्या बुंध्याजवळ जर नारळाच्या शेंडय़ा किंवा मॉस ठेवले तर पाणी कमी वापरावे लागेल.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर