राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या

बाहेर कुठेही चार-आठ दिवस राहिल्यानंतर, मग ते ट्रॅव्हल कंपनीबरोबरचं पंचतारांकित वास्तव्य का असेना, जेव्हा आपण घरी परततो, तेव्हा प्रत्येकाच्याच मनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा अभंग रुणझुणू लागतोच लागतो. खूप दिवसांनी भेटलेलं घर आपल्याशी बोलतं. हितगुज करतं. त्याच्या उबेत आपल्याला सुरक्षित वाटतं. सजीवपणाची अशी अनेक लक्षणं घराला लगडून असतात. परंतु या पलीकडे जाऊन चोवीस तास श्वासोच्छ्वास करणारं घर मी अलीकडेच पाहिलं. हे अनोखं घर म्हणजे श्री संजीव खडके यांचा पुण्यातील निर्मल बाग परिसरातील सोनहरी नावाचा टुमदार बंगला. (आईचे नाव सोनुबाई आणि वडिलांचे नरहरी, त्यांची आठवण.)

या वास्तूचे आर्किटेक्ट गिरीश दोशी म्हणाले, ‘‘घरातील प्रत्येक सदस्याचं मत विचारात घेत, त्यांच्याशी सहा महिने सतत चर्चा केल्यावर आम्ही या घराचा प्लॅन बनवला. खडके कुटुंब आधी रास्तापेठेत राहत असल्याने घर आधुनिक, पण वाडा संकल्पनेशी  मिळतंजुळतं असावं हे कुटुंबप्रमुख संजीव खडके यांचं मत. यासाठी हॉलचं छत २५ फूट उंच ठेवून वरच्या चार बेडरूम्सच्या खिडक्या हॉलमध्ये उघडतील अशी रचना केली, जेणेकरून खाली काय चाललंय ते वरून डोकावल्यावरही सहज दिसावं. हे घर धार्मिक असल्याने यज्ञ, होम, भजनं.. असे कार्यक्रम हॉलच्या प्रशस्त जागेत नियमित होत असतात. त्यांचा आस्वाद बेडरूम्सच्या खिडक्यांतून अथवा समोरासमोरच्या बेडरूम्सना जोडणाऱ्या पॅसेजमधून आरामात घेता येतो..’’

या बंगल्याचे बांधकाम फेरो सिमेंट आणि काँक्रीट ब्लॉक वापरून केलंय. दिसायला नाजूक पण वापरायला मजबूत अशा या बांधकाम प्रकाराला आíकटेक्ट गिरीश दोशी यांनी विष्णू पद्धत (गुरू विष्णू जोशी यांच्या नावावरून) असं नाव दिलंय. या पद्धतीत सिमेंटही कमी लागतं आणि घरही गार राहतं, असं त्यांचं म्हणणं.

प्रवेशद्वारातून आत आलं की चार फूट उंचीच्या पायऱ्या चढून आपण प्रथम घराबाहेरच्या चौथऱ्यावर विसावतो. या ठिकाणी छानशी आसनव्यवस्था आहे आणि चौथऱ्याखाली कुत्र्यासाठी स्पेशल रूम आहे. डाव्या हाताला मांडलेली मोठमोठी तांब्याची चकचकीत भांडी लक्ष वेधून घेतात. यातील सर्वात मोठा हंडा तब्बल १२० किलो वजनाचा आहे. तो घडवायला अडीच र्वष लागली म्हणतात.

सतत सुरू असणारं वायुवीजन हे या घराचं वैशिष्टय़. विंड कॅचर आणि टबरे व्हेंटिलेटर ही त्यासाठी वापरलेली दोन आयुधं. गच्चीच्या वरची शुद्ध हवा (वारा) आत यावी आणि घरभर फिरावी यासाठी इथे एक खास रचना करण्यात आली आहे. या दुमजली घराच्या साधारण मध्यभागी बेसमेंटपासून गच्चीपर्यंत चार फूट बाय चार फूट एवढी मोकळी जागा (डक्ट) ठेवण्यात आलीय. ही पोकळी दोन्ही मजल्यांवरील आजूबाजूच्या खोल्यांशी खिडक्यांनी जोडलीय आणि वरच्या बाजूला फेरो सिमेंटचा क्रॉस टाकलाय. या क्रॉसच्या चारी बाजूला खिडक्या आहेत. या रचनेमुळे वरचा वारा (विद्युत शक्तीशिवाय) पकडला जातो आणि डक्टमधून सरळ खाली येऊन लगतच्या खिडक्यांतून घरभर फिरतो. घरातली गरम हवा बाहेर पडावी म्हणून जिन्याच्या वर सोलर चिमणीच्या दोन बाजूंना दोन टबरे व्हेंटिलेटर बसवलेत. ते सोलर चिमणीमुळे गरम झालेल्या हवेच्या दाबाने गोल गोल फिरत राहतात, पर्यायी संपूर्ण घरातली गरम हवा इथून बाहेर पडते. डक्टच्या तळाशी कारंज्याची व्यवस्था केलीय. हे कारंजे सुरू केल्यावर तर हवेचं अभिसरण (गरम हवा बाहेर जाणं आणि थंड हवा आत येणं) जास्तच जलद होतं. अशा वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे या घराचं तापमान बाहेरच्यापेक्षा कायम चार डिग्रीने कमी राहतं आणि घरंही कितीही दिवस बंद असलं तरी उघडताच सदैव सुस्नात दिसतं. या वायुवीजनचा आणखी एक फायदा म्हणजे घरामध्ये कुठेही लावलेल्या उदबत्तीचा गंध वा गाण्याची धून फिरणाऱ्या वाऱ्यावर स्वार होऊन घरभर संचार करते.

घराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचणारा सूर्यप्रकाश हे या बंगल्याचं आणखी एक वैशिष्टय़. पांढऱ्या रंगात रंगलेल्या भिंती आणि समोरासमोर उघडणाऱ्या भरपूर खिडक्या यांनी ही जबाबदारी उचललीय. हॉलमध्ये बसलेल्याला वरच्या बेडरूम्सकडे जाणारे जिने इथे सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत. ते हॉलच्या एका भिंतीच्या पल्याड लपलेत. समोरासमोरच्या बाजूला सरसरत वर गेलेले हे उंचच जिने  (२० पायऱ्या) म्हणजे एक व्ही शेप दरीच  वाटते. जिन्यांवरील पांढऱ्याशुभ्र टाइल्स आणि वरच्या अंगाला असलेल्या पूर्व-पश्चिम खिडक्या यामुळे हे जिनेही कायम अंगाखांद्यावर उजेड खेळवत असतात. अशा प्रकारे चहूबाजूंनी प्रकाश आत येत असल्याने संध्याकाळचे सात वाजले तरी दिवे लावण्याची गरज भासत नाही आणि रात्रीही चंद्राच्या शीतल चांदण्याने घर उजळलेलं असतं.

दोन्ही बाजूंनी वापरता येणारं आयलॅन्ड किचन हे देखील बंगल्याला साजेसं सुबक. या स्वयंपाकघराच्या मागील बाजूस उघडणाऱ्या दारातून बाहेर पाऊल टाकलं की छोटासा हिरवागार बगीचा दृष्टीस पडतो. (म्हणजे कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेवल्यावरही पटकन जाऊन मिरची, कोथिंबीर काढीपत्ता आणायला बरं!) घराच्या गच्चीतही भाजीपाला, लिंबू आणि फुलझाडं बहरली आहेत. जेवढी जमीन बांधकामाला दिली. तेवढी निसर्गाला परत द्यायची हे त्यामागचं तत्त्व.

किचनला लागून देवघर आहे. त्यातील देवाचे सर्व टाक खडक्यांनी स्वहस्ते (ज्वेलर असल्याने) घडवलेत. घरात अद्ययावत होम थिएटरदेखील आहे, पण खोल्याखोल्यांतून स्वतंत्र टी. व्ही. मात्र नाही. झोपताना संवाद घडावा हा हेतू. खडक्यांच्या मुलांचा बांधकाम व्यवसाय असल्यामुळे होम थिएटरला लागून त्यांचं स्वतंत्र ऑफिस आहे. इथे येण्याजाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असल्याने घराच्या प्रायव्हसीला बाधा येत नाही.

बेसमेंटला किचनच्या बरोबर खाली बांधलेलं प्रशस्त ध्यानमंदिर (मेडिटेशन रूम) हे पूर्ण खडके परिवाराचं जिव्हाळ्याचं ठिकाण. संजीव खडके म्हणाले की, इथे अर्धा तास जरी बसलं तरी दिवसभरासाठी लागणाऱ्या ऊर्जेची शिदोरी मिळते. या ध्यानमंदिरातील एका भिंतीलगत भली मोठी लायब्ररी आहे. ज्यात समग्र संत वाङ्मय आणि दुर्मीळ पुस्तकांचं भांडार भरलंय.

या सोनहरी बंगल्यात स्वत: संजीव खडके, त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि तीन नातवंडं असं नऊ जणांचं कुटुंब राहतं. ही मंडळी वीकएण्डला बाहेर जाण्याऐवजी शांतपणे घरात राहणं पसंत करतात. आणि का नाही करणार? मुबलक वारा, उजेड आणि ऊर्जा देणारं घर असेल तर तुम्ही-आम्हीही हेच करू. नाही का?

– संपदा वागळे

waglesampada@gmail.com