24 November 2017

News Flash

स्थितप्रज्ञ रंग

हे रंग वापरायचे काही फायदे आहेत. ते कोणते, ते पाहूया

मनोज अणावकर | Updated: September 2, 2017 2:25 AM

विरक्तीनंतर येते ती स्थितप्रज्ञता! गेल्या लेखात रंगचक्रावरचा शेवटचा आणि विरक्तीची छटा असलेला जांभळा रंग पाहिल्यानंतर येतात ते स्थितप्रज्ञ रंग. हे रंग कोणते आणि त्यांना स्थितप्रज्ञ रंग का म्हणतात, ते जाणून घेऊया. दगड, लाकूड, नारळाचा कीस अशा नसíगक वस्तूंचे जे रंग आहेत, ते ‘न्यूट्रल कलर्स’ या रंग प्रकारात मोडतात. ते रंग थंडावाही देत नाहीत किंवा उष्ण रंगही नाहीत. त्यामुळेच त्यांना ‘न्यूट्रल कलर्स’ असं म्हटलं जातं. पण हे रंग स्थितप्रज्ञ असले, तरी ते निष्क्रिय मात्र नाहीत. या रंगांमध्ये रंगवलेल्या खोल्या आकाराने मोठय़ा वाटतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे लहान खोल्यांमध्ये मोठेपणाचा आभास निर्माण करायचं महत्त्वाचं काम ते करतात.

हे रंग वापरायचे काही फायदे आहेत. ते कोणते, ते पाहूया :-

१)      या रंगांच्या व्याख्येनुसार ते कोणत्याही विशिष्ट रंगकुटुंबात येत नसल्यामुळे या रंगांवरून नजर फिरते तेव्हा डोळ्यांना शीण वाटत नाही.

२)      घरातलं फíनचर, मग ते टेबल-खुच्र्या असोत, वा बुकशेल्फ, कोणत्याही डिझाइनचं असलं तरी न्यूट्रल कलर्समध्ये ते वावगं वाटत नाही.

३)      इतर रंगांचे पॅटर्न्स अर्थात आकृतिबंध किंवा टेक्श्चर अर्थात, विविध प्रकारचे पोत हेसुद्धा या न्यूट्रल कलर्ससोबत अधिकच ठाशीव दिसतात.

४)      एकूणच खोलीच्या सजावटीत न्यूट्रल कलर्स हे पाया घालायचं काम करतात, पण हे सगळे फायदे असले तरी या रंगांचा वापर करताना काही आव्हानं जाणवतात, ती अशी :-

१)      एखाद्या खोलीत केवळ हेच रंग वापरले किंवा या रंगांचा अधिक वापर केला तर वातावरण सुस्तावलेलं वाटतं.

२)      हे रंग जरी न्यूट्रल कलर्स म्हटले जात असले, तरी त्यांना छटा असतात आणि या रंगांमुळे येणारी खोलीतल्या वातावरणातली मरगळ किंवा मलूलपणा कमी करण्यासाठी या छटांचा कल्पक वापर करून घ्यावा लागतो.

बेश् (Biege) म्हणजे ज्याला पिंगट रंग म्हणता येईल, असा रंग हा न्यूट्रल कलर्सचं प्रतीक मानला जातो. पण त्याच्या सोनेरी रंगाकडे झुकणाऱ्या छटा आणि गुलाबी रंगाकडे झुकणाऱ्या छटा अशा दोन्ही प्रकारच्या छटा असतात. हस्तीदंती रंग हे न्यूट्रल कलर्सचं आणखी एक उदाहरण! सोनेरी, राखाडी, तपकिरी, बिस्किटांच्या विविध रंगछटा, क्रीम कलर ही अशी या रंगांमधल्या वैविध्यतेची उदाहरणं देता येतील.

या रंगांमुळे मनाला स्थिरता आणि शांतता प्राप्त होते. त्यामुळे घरातल्या सर्वच खोल्यांमध्ये हे रंग उपयोगात आणता येतात. मात्र, लिव्हिंग रूम, बेडरूम किंवा विशेषत: किचनमध्ये ते अधिक प्रभावी ठरतात. ज्या खोलीत धावपळ दगदग असते, अशा खोलीत जर हे रंग उपयोगात आणले, तर त्या तशाही धावपळीच्या स्थितीत मन गोंधळून न जाता शांतपणे कामं पार पाडता येतात. सध्याच्या काळात घरच्या जबाबदाऱ्यांबरोबरच नोकरी-उद्योगांमध्येही महिलांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशा परिस्थितीत घरातलं उरकून बाहेर जाताना, त्यांचा बराचसा वेळ हा किचनमध्ये आणि तोही धावपळीत, दगदगीत जातो. त्यामुळे किचनसाठी या न्यूट्रल कलर्सचा वापर अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. ब्राउन, क्रीम किंवा मातकट रंगांचा वापर भिंतींव्यतिरिक्त इतर ठिकाणी करता येईल. क्रीम कलरच्या भिंतींच्या पाश्र्वभूमीवर बिस्किटाच्या रंगाच्या सोनेरी पिवळसर रंगछटेच्या दगडाचा टॉप असलेला स्वयंपाकघरातला ओटा आणि त्याखाली क्रीम रंगाचा सनमायका असलेल्या ट्रॉलीज किचनला शांत, पण ‘रिच लुक’ मिळवून द्यायला मदत करतात. (छायाचित्र १ पाहा)

लिव्हिंग रूमसाठीही या रंगांचा वापर करता येऊ शकतो. एकदम फिक्कट ब्राउन रंगांच्या भिंती, त्याच रंगाचं फ्लोअिरग आणि त्याला  शोभतील अशी सोफ्याची कव्हरं. अशा प्रकारच्या खोल्यांमध्ये दिसायला साधेपणा असतो. (छायाचित्र २ पाहा)

बेडरूमसाठी या रंगांचा वापर करताना वॉर्डरोब आणि भिंतींसाठी फिक्कट गुलाबी किंवा क्रीम रंगाचा वापर, तर ब्लँकेट, कारपेट अशा जाडसर पोत असलेल्या वस्तूंसाठी तपकिरी रंगाचा वापर केला तर खोली साधी असूनही उठून दिसते. (छायाचित्र ३ पाहा)

न्यूट्रल कलर्सच्या या रंगांच्या कुटुंबातले रंग एकमेकांशी मिळतंजुळतं घेणारे आहेत. त्यामुळे खोलीसाठी कलर स्कीम निवडताना डोक्याला फार ताण द्यावा लागत नाही. पण केवळ न्यूट्रल कलरमधल्या खोल्या कंटाळवाण्या होऊ नयेत यासाठी त्यात इतर रंगांचा वापर केला तर त्यांना उठावदारपणा येतो. त्यामुळे लाकडी सेंटर टेबलवर लाल रंगातली फुलं आणि खोलीच्या बाहेर खिडकीतून दिसणाऱ्या हिरवाईची साथ असेल अशी खोली न्यूट्रल कलर्समध्ये असूनही प्रसन्न वाटते. (छायाचित्र ४ पाहा)

थोडक्यात सांगायचं, तर न्यूट्रल कलर्स अर्थात, स्थितप्रज्ञ रंग हे एखाद्या स्थितप्रज्ञ व्यक्तीप्रमाणेच स्थितप्रज्ञ असूनही रोजच्या मानवी व्यवहारांमध्ये कोणती ना कोणती भूमिका बजावणारे असतात. पण या रंगांचा सुयोग्य वापर केला, तर विविध रंगांच्या कमीअधिक ऊर्जेमुळे डोळ्यांना जाणवणारा ताण हे न्यूट्रल कलर्स कमी करू शकतात. म्हणूनच कल्पकपणे त्यांचा वापर करून घ्या.

मनोज अणावकर

anaokarm@yahoo.co.in

(इंटिरियर डिझायनर)

 

First Published on September 2, 2017 2:25 am

Web Title: the role of colors in interior design